November 04, 2013

केसरिया बालम...

केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस..

हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. 

केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. 

ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा किंवा केसरिया बालम.

देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे.. 

पधारो म्हारो देस..

राजस्थानातल्या पुरातन, प्राचिन हवेलीतलं प्रशस्त संगमरवरी अंगण किंवा सूक्ष्म कोरीव काम केलेल्या त्या हवेलीतला एखादा झरोका किंवा अनेक पायर्‍या असलेल्या विहिरीच्या एखाद्या पायरीवरून किंवा गरम वाळूच्या एखाद्या टेकडीवरून फुलणारं हे गाणं..

हे वर्णन माझे मित्र डॉ अग्रवाल यांचं..



या लोकगीताची तशी बरीच वेगवेगळी कडवी गायली जातात.. शेवटी हे गाणं म्हणजे एक साद आहे.. कधी कुठला रचनाकार त्याच्या प्रतिभेनुसार आणि कल्पनेनुसार ही पधारण्याची साद घालेल हे सांगता यायचं नाही.. राजस्थानातलं हे पारंपारिक लोकगीत, त्यामुळे कुणा एका रचनाकाराची यावर मालकी नाही..

परंतु मूळ गाण्यात काही सुंदर पंक्ति आहेत..त्या अलीकडे कुणी म्हणताना आढळत नाहीत..

जसे,

मारू थारे देस में निपूजे तीन रतन
एक ढोलो, दूजी मारवन , तीजो कसूमल रंग
पधारो म्हारे देस...

केसर सू पग ला धोवती घरे पधारो जी..
पधारो म्हारे देस...

और बढ़ाई क्या करू पल पल वारूगी
पधारो म्हारे देस आओ म्हारे देस...

आणि या ओळी तर सुरेखच आहेत..

आंबा मीठी आमरी,
चोसर मीठी छाछ.
नैना मीठी कामरी
रन मीठी तलवार

पधारो म्हारे देस नि...

आमच्या एका दोस्ताच्या लग्नाला जोधपूरला गेलो होतो तेव्हा ही डॉ अग्रवाल नावाची आसामी मला भेटली. डॉक्टरसाहेब राजस्थानी लोकगीताचे गाढे अभ्यासक. खूप गप्पा झाल्या त्याच्याशी. अगदी मोकळाढाकळा गप्पीष्ट माणूस. झकास मैफल रंगली त्यांच्यासोबत. खूप जोधपूर फिरलो आम्ही. सोबत डालबाटी आणि राजस्थानी मिठाई..! :)

त्याच्याकडून अगदी भरभरून ऐकायला मिळालं या गाण्याबद्दल.. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या अग्रवालांनी मला या गाण्याच्या एकूण ६ निरनिराळ्या चाली ऐकवल्या..!

आपलं भारतीय संगीत किती म्हणजे किती समृद्ध असावं? इतकी राज्यं, इतक्या भाषा.. प्रत्येक मातीतलं गाणं वेगळं आणि तेवढंच ढंगदार..मग ती मराठमोळी लावणी किंवा ठाकरगीत असू दे, किंवा राजस्थानातलं केसरिया असू दे, किंवा मध्यप्रदेशातल्या माळव्यातलं लोकगीत असू दे, किंवा पंजाबातल्या रंगेल मातीतल्या टप्प्याशी दोस्ती करणारं कुठलं कुडी-मुंडाचं प्रेमगीत असू दे.. किती वैभवशाली आहे आपलं संगीत..! विचार करू लागलो की मन थक्क होतं. ह्या सा-याचा अभ्यास करायला सातच काय, सातशे जन्म देखील पुरणार नाहीत.. पुन्हा पुन्हा या भारतीय मातीत जन्म घ्यावा लागेल..!

जोधपूरहून परतीच्या सूर्यनगरी एक्सप्रेसने निघालो. जानेवारीचे दिवस. संध्याकाळ उलटलेली. गाडी सुसाट मुम्बैकडे निघाली होती. बोचरं वारं होतं..आणि सोबत शब्दवेल्हाळ 'केसरिया बालम..' चे स्वर कानात रुंजी घालत होते...!

-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ said...

तात्या, सहज इकडेतिकडे करत ब्लॉग विश्ववर सफर करत असता आपले ब्लॉग चाळला.हा धागा शिवाय तुळू श्रीकला सेल्स गर्ल, कामाठीपुऱ्यातील गल्यातील मैत्रिणींचा हळवा जीवन संघर्ष,मज़ा आ गया....