April 28, 2015

हृषिदा आणि सादगी..

हृषिदांच्या चित्रपटातील 'घर' ही संकल्पना आणि त्यामागील सादगी, साधेपणा..

मान्य आहे की हृषिदांच्या बर्या०च चित्रपटांमध्ये जरा ऐसपैस किंवा बंगलेवजा घर दाखवण्यात आले आहे. परंतु त्यात कुठेही भडकपणा किंवा भपका नसे. ते घर, तो बंगला आणि त्यात राहणारी माणसं इतकी आपलीशी वाटत की आपणही दोन दिवस त्या घरी जाऊन त्या पात्रांसोबत राहावं असं वाटत असे. हृषिदांच्या चित्रपटातील 'घर' या संकल्पनेबद्दल खूप दिवस लिहायचं माझ्या मनात होतं. यापूर्वी या विषयावर कुणी लिहिलं आहे की नाही ते माहीत नाही..

अनुराधा चित्रपटातल्या बलराज सहानी या गावातल्या डॉक्टरचं घर. त्यात राहणारी एक सोज्वळ बायको, आणि त्यांची एक गोड मुलगी. सबंध चित्रपटात हे घर, त्यातल्या खोल्या आपल्यसमोर येत असतात. त्यातला साधेपणा बघा..

आशीर्वाद चित्रपटातलं डॉ संजीवकुमार आणि सुमिता सन्यालचं नीटनेटकं घर बघा. त्या घराभोवती फुलांची छान बाग करणारे दादामुनी..

आनंद चित्रपटातला बाबूमोशायचा खानदानी बंगला बघा. अगदी साधा आणि सात्विक. घरामध्ये वडिलांसमान असलेला एक जुना नोकर. आनंदचं त्या घरातलं वावरणं, त्याच घरात आनंदने अखेरचा श्वास घेणं.. त्याच घरात आनंदने अगदी घरगुती स्वरुपात गायलेलं मेने तेरे लिये ही.. हे गाणं.. किंवा त्याच घरात एका संध्याकाळी आनंदने गायलेलं कही दूर जब दिन ढल जाए.. हे अंतमुख करणारं गाणं..!

गुड्डी चित्रपटातलं घर बघा. भाऊ, वहिनी, वडील ए के हंगल, आणि सर्वांची लाडकी असलेली गुड्डी.. अगदी घरगुती वेषात बुद्धिब़ळाचा डाव मांडून बसलेले हंगल.

घर, घराचं घरपण आणि त्यातली तुमच्याआमच्या सारखी साधी माणसं, त्यांची आपसातली नाती या सगळ्या गोष्टी हृषिदांनी कशा जपल्या आहेत हे तुम्हाला त्यांच्या चित्रपटातून बघायला मिळेल. माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे..!

बावर्ची चित्रपटातील चांगला चौसोपी वाडा. वाड्यातच प्रत्येकाच्या वेगळ्या खोल्या. कुटुंबप्रमुख हरिंन्द्रनाथ चट्टोपाध्याय यांची वेगळी खोली. त्या खोलीत असलेली त्यांची दागिन्यांची पेटी. :)

एके दिवशी 'क्यो न सब लोग एक जगह एकठ्ठा होकर चाय पिये.?' असं म्हणत बावर्चीने घरातल्या सगळ्या मंडळींना चहासाठी एकत्र बोलावणं.. आणि चहा पिता पिता सगळ्यांनी म्हटलेलं ..भोर आयी गया अंधियारा..हे मन्नादांचं अप्रतिम गाणं..!

मिली चित्रपटातला दादामुनींचा फ्लॅट, त्यात राहणारी त्यांची बहीण उषा किरण.. वरच्या मजल्यावरचा ओपन टेरेस असलेला अमिताभचा फ्लॅट. त्या सोसायटीतली मुलं, माणसं.. आजारी मिलीची खोली. एके रात्री तिचं वडील दादामुनी यांना मिठी मारून रडणं.. मिलीचा सैन्यातला भाऊ..

घर आणि नातेसंबंध हृषिदांनी कसे जपले आहेत पाहा.. उगीच नाही मी आज त्यांच्या नावानं टीपं गाळत..!

गोलमाल मधला भवानीशंकरांचा ऐसपैस बंगला, त्यात राहणारी त्यांची बहीण शुभा खोटे आणि देखणी मुलगी बिंदिया गोस्वामी.. तर रामप्रशाद दशरथप्रशाद शर्माचं साधं बैठं घर. त्याच्या बहिणीने छान, नीटनेटकं ठेवलेलं..घराच्या स्वयंपाकघराला दीना पाठक आत येऊ शकेल अशी एक खिडकी..! :)

खूबसुरत चित्रपटातील दीना पाठकने जपलेली त्या घरातील शिस्त.. दादामुनी, तीन मुलं, सुना, अशी एकत्र कुटुम्बपद्धती.. त्या घरात राहायला आलेली सुनेची बहिण रेखा.. तिचा अल्लडपणा, तिचा वात्रटपणा, दादामुनींसोबत तिची असलेली दोस्ती..! :)

मला सांगा, हल्लीच्या चित्रपटात कुठे पाहायला मिळतं का हो असं? आठवतंय कुणाला हल्लीच्या चित्रपटातलं असं सात्विक घर आणि त्यातील माणसं आणि त्यांचे नातेसंबंध आणि कुटुंबवत्सलता..??

म्हणजे मग घर आणि कौटुंबिक नातेसंबंधांच्या मूल्यांची जपणूक करणार्या हृषिदांचं महत्व कळतं आणि त्यांच्यावर डोळस भक्ति जडते..!

हल्ली फक्त रा वन ने ३०० कोटींचा धंदा केला आणि चेन्नई एक्सप्रेसने ५०० कोटींचा धंदा केला असा आणि इतकाच बाजार पाहिला की खरोखर खूप कीव येते, दया येते..!

या ३०० किंवा ५०० कोटीं पेक्षा मला मिशावाले भवानी शंकर आणि रामप्रशाद दशरथप्रशाद शर्मा खूप खूप मोठे आहेत.. कारण ते माझे आहेत.. कायमचे...!

Hats off to you.. हृषिदा..!

-- तात्या अभ्यंकर..

8 comments:

Bob said...

खरे आहे तुम्ही म्हणता ते … लेख आवडला…… पु.ले.शु.

Bob said...

खरे आहे तुम्ही म्हणता ते … लेख आवडला…… पु.ले.शु.

Bob said...

खरे आहे तुम्ही म्हणता ते … लेख आवडला…… पु.ले.शु.

Abhishek said...

हृषिदांना खरीखुरी नस कळली होती किंवा ती त्यांचीच नस होती... आज ती भावना शोधूनही सापडणे अवघड

mannab said...

हे चित्रपट निर्माण करणारे हृषिदा आज नाहीत आणि प्रेक्षकांना तसे काही पहाण्याची इच्छा उरली नाही हे आजचे वास्तव आहे. काय उपाय आहे याच्यावर ?
मंगेश नाबर

Sandhya Bapat said...

Tatya, Aagdi aamcya manatale bolalat.

Sandhya Bapat said...

Tatya, Khare aahe, to sadhepana jo manala bhawto, to aata pahayalahi milat nahi. Chhan Lekh. Agadi amachya manatale bolalat.

shubha prabhusatam said...

तात्या आजच हे वाचले आणि पूर्ण पटले,म्हणजे च्यामारी आपल्याला हेच म्हणचेय की अस वाटले,तुम्ही जशी घरे सांगितली आहेत ना बस बस ,जे बात, हाल्लू दिसतच नाहीत,साडी,मोकळी ढकल,सुटसुटीत अशी,हल्ली दिसतो तो प्रचंड भपका,बटबटीत,खोटा