July 15, 2016

विठ्ठल उभा पहावा विटेवरी..

आज संध्याकाळी ठाण्याच्या गोखले रस्त्यावरून चाललो असताना अचानक पाठीवर थाप पडली..

"तात्या..भोसडीच्या..."

मागे वळून बघतो तर खूप जुनी ओळख निघाली. 30 वर्षांपूर्वेचा कोलेजमधला जुना दोस्त भेटला होता.

"अरे.. तू...? इथे कुठे..? किती वर्षांनी भेटतो आहेस" वगैरे जुजबी बोलणं झालं..

"तात्या, आता घरीच चल ५ मिनिटं. मी तुझं काही ऐकणार नाही. तुला आठवतंय, पूर्वीही आमच्या घरी तू आला आहेस. आईलाही भेटशील माझ्या.."

मी काहीही आढेवेढे न घेता त्याच्या घरी गेलो.

"आई..तात्या आलाय. ओळखलंस का? अजून साला जिवंत आहे.."

पक्षाघताने डावी बाजू गेलेली त्याची आई खुर्चीवर बसली होती. त्याच्या बायकोने पुढ्यात पाणी आणून ठेवलं. मी म्हातारीच्या पाया पडलो..

"अरे तू गायचास ना रे..? इथेही एकदा गाणं म्हटलं होतंस.."

पक्षाघातामुळे म्हातारीचं बोलणं तसं पटकन कळत नव्हतं..पण मेमरी sharp होती.

"तात्या..चहा टाकलाय. बघ, आईनेही तुला ओळखलं. चहा होईपर्यंत म्हण एखादं गाणं.."

सगळ्या घटना पटापट घडत होत्या. मीही लगेच त्या म्हातारीच्या पुढ्यात बसून 'फिरत्या चाकावरती देसी..' हे गाणं लगेच हातवारे करून हौशीहैशीने गायलं. म्हातारी खुश झाली. तिच्या चेहे-यावर छान समाधान पसरलं. पक्षाघाताने तिचा वाकडा झालेला चेहेरा आता एकदम छान दिसू लागला.

चहा आला. बाकरवडी आली. आमच्या जनरल गप्पा सुरू होत्या. त्याची बायकोही अगदी सात्विक, समाधानी दिसत होती.

तेवढ्यात १०-१२ वर्षाची एक मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. तिला पाहून मला जरा भलतीच शंका आली. ती मुलगी स्पेशल चाईल्ड होती. Autistic..

"हा कोण आहे माहित्ये का? हा तात्याकाका.. नमस्कार कर बघू तात्याकाकाला..त्याला hello म्हण.."

"तात्या..ही माझी लाडकी लेक. तुझ्याकडे कशी छान बघते आहे बघ.."

मला हे सगळं जरा धक्कादायकच होतं. तरी मी पटकन स्वत:ला सावरत त्या मुलीच्या गालावर आणि चेहे-यावर प्रेमाने हात फिरवला.

"खूप सुंदर आहे रे तुझी मुलगी.."

माझं फक्त एवढं एक वाक्य. परंतु त्या वाक्यामुळे मला लाख मोलाचं समाधान आणि आनंद दिसला त्या नवरा-बायकोच्या चेहे-यावर..

आणि खरंच ती मुलगी सुंदर होती. अगदी निष्पाप...

जरा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि एकदम माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं..

एका वेगळ्याच दुनियेतली मुलं आहेत ही. त्यांना तुमच्या दयेची भीक मुळीच नकोय. त्यांना फक्त आणि फक्त तुमचं प्रेम हवं आहे. आणि तुम्ही कोण लागून गेलात त्याच्यावर दया दाखवणारे..? तुमची so called बुद्धी शाबूत आहे हा तुमचा भ्रम आहे.. अरे..तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक संवेदनशील मुलं आहेत ती..!

"चल निघतो रे..उशीर होतोय..पुन्हा येईन."

म्हातारीच्या पाया पडलो आणि निघालो. ते दोघे आणि ती मुलगी जिन्यापर्यंत मला सोडायला आले..

"तात्याकाकाला टाटा कर.."

पुन्हा एकदा त्या मुलीचा तो सुंदर चेहेरा..

मी इमारतीखाली उतरलो. दुकानातून एक छान डेअरीमिल्क घेतलं आणि पुन्हा त्याच्या घरचं दार वाजवलं.

'अरे..तुझ्या लेकीकारता खाऊ आणलाय..' असं म्हणून त्या मुलीचा हात हातात घेतला आणि तिच्या हातावर डेअरीमिल्क ठेवलं..

पुन्हा एकदा तेच निष्पाप, निरागस हास्य..

उद्या आषाढी. पण मला मात्र तिच्या त्या निर्व्याज, निष्पाप हास्यामधून विठोबाने आजच दर्शन दिलं होतं..

-- तात्या अभ्यंकर..

6 comments:

Rajat Joshi said...

Speechless!

Unknown said...

LIKED IT VERY MUCH ..... GOD BLESS..

Unknown said...

LIKED IT VERY MUCH .... GOD BLESS..

रिकामा जोशीकाका said...

अप्रतीम

रिकामा जोशीकाका said...

अप्रतीम

Tatyaa.. said...

Thx