February 01, 2016

परंपरा...

मला गाणं आणि खाणं यात जराही कुठे परंपरा ढळलेली आढळली की ते एखाद्या कुलीन स्त्रीचा पदर ढळल्यासारखं वाटतं..

नाविन्य..नवे नवे प्रयोग वगैरेसारख्या गोष्टी मला गाण्या-खाण्यात रुचत नाहीत..कदाचित माझा तो दोष असू शकेल.. मान्य आहे..!

पण आपल्या पूर्वजांनी गाण्या-खाण्यात हजारो वर्षांपूर्वीच योग्य ते बदल करून संशोधन करून या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत.. त्या तशाच हव्यात.. वैद्यकीय क्षेत्रात म्हणा किंवा शेती-तंत्रज्ञान क्षेत्रात म्हणा.. नवे नवे शोध, नवी तत्र यांचे स्वागतच आहे..

परंतु यमनमध्ये किंवा मालकंस मध्ये तुम्ही आता नवे शोध लावायला जाऊ नका. फ्युजन वगैरे सारखे घाणेरडे प्रकार करू नका..

दही चांगले घट्ट बांधून त्याचा चक्का टांगत ठेवणे ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी सिद्ध केलेली आहे. तिथे बदल करायला तुम्ही जाऊ नका.. रबडीही चुलीवर पितळेच्या कढईत चांगली आटवत आटवतच होते..instant रबडी mix हा गलिच्छ प्रकार आहे..

उत्तम गोश्त बिर्याणी करायला चार-सहा तास लागतात.. तिथे काहीही instant चालत नाही.. एकूणातच गाण्या-खाण्यात instant या शब्दालाच मज्जाव आहे..

जुनं आहे ते सगळं कृपया तसंच राहू द्या.. त्यात शाणपणा करून त्या गोष्टी instant करायला जाऊ नका. उत्तम खवा चांगला मळून आणि मग ते गुलाबजाम तळताना चांगले आतपर्यंत शिजू द्या..आणि मगच पाकात टाका.. gits चे भिकारडे गिळगिळीत instant गुलाबजाम खाऊ नका..

तूप-गूळ पोळीच्या गुंडाळीला गुंडाळीच म्हणा किंवा कुस्करा म्हणा..त्याला franky हे दळभद्री नाव देऊ नका..

नाथ हा माझा हे पद नाट्यसंगीतासारखच म्हणा... त्याचं भावगीत करू नका..

मला नाही आवडत असं कुठलंही नाविन्य.. कदाचित माझा तो दोष असू शकेल..

-- (गाण्या-खाण्यात कट्टर परंपरावादी) तात्या.. 

December 30, 2015

पाडगावकर..

आज पाडगावकर गेले. वयस्कर होते. एक ना एक दिवस जाणारच होते, ते आज गेले.

Normally कुणी दिवंगत झालं की पहिल्या दिवशी खूप दु:ख होतं आणि जसा काळ जाईल तसं ते दु:ख कमी होत जातं.. यावर आपण 'काळ हाच खरा वैद्य. तो भल्या भल्या जखमा बुजावतो..' असं म्हणतो..आणि पुढील वर्ष-दोन वर्षात माणसं सावरतात..

परंतु पाडगावकर यांच्या सारख्या मंडळींच्या बाबतीत निदान माझा तरी नेमका उलटा अनुभव आहे..

मला आज दु:ख झालं असलं तरी ते तितकंसं जाणवत नाहीये..परंतु जसा जसा काळ जाईल तसं हे दु:ख तीव्र होईल. आपण काय गमावून बसलो आहोत याची कल्पना मग जास्त त्रास द्यायला लागेल..

हाच अनुभव मला बाबूजी, भीमण्णा, भाईकाका, हृषिदा..किशोरदा, पंचमदा..यांच्या बाबतीत आला आहे.. यांच्यासारखी मंडळी तात्कालिक तेरा दिवसांचं किंवा वर्षभराचं दु:ख देत नाहीत. ही मंडळी कधीही भरून न येणा-या Long Term खोल जखमा देवून जातात..!

पाडगावकरही त्यांच्यापैकीच..!

कुमार किंवा अण्णांची एखादी गाण्याची मैफल ऐकली की दुस-या दिवशी अधिक त्रास होतो आणि मग मन सैरभैर होऊ लागतं..!

-- तात्या अभ्यंकर..

December 17, 2015

सुगुनामावशी..

मुंबई. दुपारी दीड-दोनची वेळ..

पापी पेट का सवाल है बाबा..

कुणी बायकोच्या हातचा छान छान डबा, तर कुणी हापिसाच्या कॅन्टिनमध्ये, कुणी वडापाव तर कुणी चायनीजच्या गाडीवर, कुणी शेट्टी लोकांच्या सोडा मारलेल्या महागड्या थाळ्या खात असतो, तर काही कॉर्पोरेट्स आपल्या छान छान सुंदर सुंदर बिनबाह्यांचं पोलकं घातलेल्या मैत्रिणीसोबत किंवा सेक्रेट्रीसोबत छानशा पंचतारांकित हाटेलात बफे लंच घेत असतो..

हाटेलं, खाऊ गल्ल्या, भजी-वडापाव-कॅनन पावभाजी-इडली-डोसा-मेंदूवडा-चायनीजच्या गाड्या.. सगळं ओसंडून वाहत असतं.. कष्टकरी मुंबई जेवत असते..

कधी कधी तात्याही मुंबईत उन्हातान्हाचा भटकत असतो आणि तो जर दादर भागात असेल तर त्याला मोठा आसरा असतो तो सुगुनामावशीच्या जेवणाचा..

सुगुनामावशीची रस्त्यावरची राईसप्लेट..रस्त्यावर उभं राहूनच जेवायची..

गेली १५-१६ वर्ष तात्या तिथे जेवतो आहे आणि आंध्रातली तेलुगू सुगुनामावशी त्याला प्रेमाने वाढते आहे..!

३ पोळ्या, एक उसळ, एक भाजी, वरण (मावशी त्याला 'डाळ' हा साधासुधा शब्द वापरते. ) आणि भात..

५०-६० रुपयांमध्ये अगदी समाधान होईल असं पोटभर घरगुती जेवण.. रस्त्यावर उभं राहून तात्या जेवत असतो..

चांगल्या चवीची टामाटू किंवा बटाट्याची रस्सा भाजी, छानशी मटकीची उसळ, कधी वांगी तर कधी शेवग्याच्या शेंगा घातलेली सुरेख चवीची फोडणी दिलेली डाळ, अगदी घरच्यासारख्या मऊसूत पोळ्या आणि उत्तम बारीक तांदळाचा भात..तुमची थाळी भरली जाते आणि मग तिथे रस्त्यावरचं उभं राहून जेवायचं. भुकेकरता अजून काय पंचपक्वान्न पाहिजेत..?

मध्यरेल्वेच्या दादर स्थानकाच्या फलाट क्र ६ वरून शिवाजी स्थानकाकडे तोंड करून शेवटच्या फाटकातून बाहेर पडलं की १०-१५ पावलांवरच रेल्वे मजदूर युनियनच्या कार्यालयाला लागून असलेल्या फुटपाथवर सुगुनामावशी जेवणाचे डबे घेऊन बसते. भात, भाजी, वरण, पोळ्या असा माल भरलेले चार-पाच मोठे डबे असतात. जेवणानंतर स्वच्छ आणि थंडगार पिण्याचं पाणी. सुगुनामावशी रेल्वेच्या फलाट क्रमांक ६ वरच्याच 'पिने का पानी' नामक पाणपोईतून ही व्यवस्था करते..

मी फार पूर्वीपासून या बाईच्या प्रेमात होतो. तिचं एकदा नाव विचारलं होतं, सगळी हकिगत विचारली होती.. तेव्हा कळलं की तिचं नाव सुगुना.. मूळची आंध्रप्रदेशातली..आता मस्त बम्बई-हिंदी बोलते.. :)

"इतने साल से यहा खाना देती हू..लेकीन कभी किसिने नाम भी नही पुछा. तुम पहिला आदमी है जिसने मेरेकू पुछा..!"

मी आपुलकीनं केलेल्या चौकशीचं सुगुनामावशीला भरून आलं होतं, खूप अप्रूप वाटलं होतं..!

आता पुन्हा जाईन केव्हातरी सुगुनाच्या हातचं जेवायला..

भुकेल्या पोटाला छान छान वातानुकूलित, पंचतारांकित, सप्ततारांकित हाटेलातल्या जेवणापेक्षा सुगुनामावशीच्या हातचा सैंपाक केव्हाही बरा..!

मस्त उन्हात फुटपाथवर उभं राहून सुगुनामावशीकडे तात्या जेवत असतो आणि एकीकडे गुणगुणतसुद्धा असतो..

ए दिल है मुष्किल जीना यहा
जरा हटके जरा बचके ये है बाँबे मेरी जान..

-- (मुंबईकर) तात्या. :)

December 15, 2015

कच्च्या कैरीची दारू..

मगाशी उगीचंच मार्लिनचा बाबा आठवला. मस्त होता तो..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..!

याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. धर्मेंद्रला तर ज्यो आन्टीचं अतिकौतुक होतं. तो तर तिला कधी कधी आग्रह करून स्वत:च्या गाडीत बसवून स्वत:चं शुटिंग बघायला घेऊन जायचा..:)

प्राणसाहेबांच्या घरी काही विशेष घरगुती समारंभ असेल तर ज्यो आन्टीला देखील विशेष आमंत्रण असे..:)

कैरीची दारू बनव..अशी खास प्राणसाहेबाची तिला मे महिन्यात फर्माईश असे. पण मे महिन्यातही ज्यो कैरीची दारू रोज बनवत नसे. मात्र फक्त प्राणसाहेबांकरता बनवायची केव्हातरी..:)

इथे वसईला फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा..

आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची.. मी आणि मार्लिन कधी कधी चोरून मुंबई फिरायला जायचो..पिक्चर बघायचो.. अंधारात कोप-यातल्या शिटा पकडून ज्यांनी पिक्चर नाय बघितला त्यांची जवानी फुकट आहे.. :)

मग पिक्चर बघून आम्ही खारदांड्याला ज्यो कडे जायचो. तिथे थोडीशी जांभळाची पिवाची आणि ज्योच्या हातची ताजी मांदेली. मग मी तिथून एकटाच घरी यायचो. कारण उशीर झालेला असे. मार्लिन मग त्या रात्री ज्यो कडेच रहायची. खारला ज्यो कडे जाते आहे अशी थाप मारूनच ती घरातून निघायची. आधी चोरून मला भेटायची, आम्ही पिक्चर वगैरे बघायचो आणि मग ज्यो कडे जायची.. :)

पुढे मग केव्हातरी ज्यो नेच आमचं भांडं फोडलं.. :)

आज मात्र अचानक मार्लिन, तिचा बाबा, ज्यो, फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..

धर्मेंद्र आताशा त्याच्या लोणावळ्याच्या बंगल्यात एकटाच पीत बसलेला असतो. ज्यो च्या हातची कच्च्या कैरीची दारू आवडीने पिणारे आमचे प्राणसाहेबही काळाच्या ओघात कुठेतरी नाहीसे झाले..

असो..

-- तात्या अभ्यंकर..

August 26, 2015

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात..

मोबाईल नव्हते, FB नव्हतं, whats app नव्हतं.. त्यामुळे..

"सुखी आहे पोर सांग आईच्या कानात.."

असा निरोप वाऱ्यातर्फे आपल्या आईला पाठवावा लागे.. छान निळ्या शाईने लिहिलेलं एखादं पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र किती सुरेख दिसायचं.. कधी एकदा ते वाचतो असं वाटायचं..

कसं वाटत असेल तेव्हाच्या सूनबाईला..? माझ्या आईचं पत्र आलंय, माझ्या बाबांचं पत्र आलंय! किती उत्सुकता, किती कौतुक असेल!

आता काय whats app आले, सेल्फी आले. मान्य आहे की जग जवळ आलं. पटकन संपर्काची सोय झाली. मला नव्याला दोष द्यायचा नाही..

पण वाऱ्यासोबत पाठवलेल्या त्या निरोपाचा किंवा त्या पोस्टकार्डाचा ओलावा मात्र गेला तो गेलाच!.

whats app वर पाठवलेल्या एका वाक्याच्या त्या निर्जीव मेसेजला भरगच्च लिहिलेल्या त्या आंतरदेशीय पत्राची सर नाही..

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय..

हा निरोप पोहोचवायला तो पिंगा घालणारा वाराच हवा..whatsapp चं ते काम नाही!

-- तात्या अभ्यंकर..

August 09, 2015

राधेमा सारख्यांची मानसिकता..

disclaimer - माझं हे लेखन सरसकट सर्वच्या सर्व स्त्रीजातीबद्दल मुळीच नाही हे कृपया लक्षात घ्या. परंतु मी जी काही मुंबई बघितली आहे, मग त्यात भुर्जीपावला महाग असलेला आमचा गरीब फोरास रोड आला, महागडे डान्सबार आणि त्यातल्या अत्यंत नखरेल मुली आल्या आणि जुहू-कुलाब्याचे पबही आले. या सर्वातून आणि अनुभवातून माझं जे मत बनलं आहे ते आपल्यासमोर मांडतो आहे..
--------------------------------------

आता जरा माझा एक सिरीयस ष्टडीच तुमच्यासमोर मांडतो..चक्क अभ्यासच म्हणा ना..!

एकंदरीतच दिल्ली-आग्रा-यूपी-आणि पंजाब येथील ब-याचशा मुली या जरा छानछोकी प्रिय असतात. स्वत:चंच कौतुक करून घेण्यात या पुढे असतात. त्याना डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी इत्यादी-इत्यादीची जात्याच आवड असते. अवास्तव खर्च करणे, दिखावा करणे या गोष्टीही यात आल्या.

आता एकंदरीतच छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला अत्यंत पूरक असं वातावरण हे मुंबईत आहे. त्यामुळे यांना लहानपणापासूनच मुंबईबद्दल एक सुप्त परंतु जबर आकर्षण असतं.

या मुली रंगारुपानं ब-या असतात. कधी सुरेख असतात, कधी नाजूक असतात तर कधी चांगल्या उफाड्याच्या असतात. कुणी काही म्हणा..उत्तर हिंदुस्थानच्या मातीतच तो रंग आहे..

तर अशाच काही मुलींना कुणी एक भेटतो. हा कुणी एक जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी असतो. हा त्या मुलीना मुंबईची स्वप्न दाखवतो. मी वर म्हट्ल्याप्रमाणे छानछोकी, डिझायनर कपडे, डिझायनर ज्वेलरी, शॉपिंग, अंगात थोडी फिल्लमबाजी या सगळ्याला तो इसम पुरेपूर हवा देतो. आणि believe me, त्या मुली आपली सगळी अक्कल अचानक गहाण ठेवून तो इसम म्हणेल ते, अगदी म्हणेल ते करायला तयार होतात. मायाजाली मुंबईचं आणि छानछोकीचं जबरदस्त आकर्षण त्यांची सगळी विचारशक्तीच गमावून बसतं..

आणि मग या मुली मुंबईला येतात किंवा आणल्या जातात. आणि मग इथूनच पुढे शेकडो वाटा फुटतात हे लक्षात घ्या. मग कुणी माधुरी दीक्षित होता होता एखादी extra होऊनच रहाते, कुणी कुठल्या पबमध्ये entertainer बनते, कुणी escort services वाल्यांच्या हाती लागते, कुणी डान्सबर मध्ये थिरकत लाखो कमावते, कुणी एखादी छोटी-मोठी नोकरी करून इतर वेळी चक्क call girl चा व्यवसाय करते..

अर्थात, अशाही अनेक जणी आहेत की ज्या मुंबईचं वास्तव लक्षात आल्यावर वेळीच सावरून सन्मार्गालाही लागतात, सन्माननीय मार्गाने स्वत:चं करीयर घडवतात..

ही सुखविंदर कौर ऊर्फ so called राधेमा ही ह्याच सर्वाची बळी आहे. पंजाबात लग्न केलं, दोन मुलं झाली, नवरा आखातात गेला.. परंतु मूळचं जरा बरं रंगरूप..आणि वर म्हटल्याप्रमाणे मुंबईचं सुप्त आकर्षण.. मला खात्री आहे..तू सुरेख दिसतेस, तू खूप मोठी स्टार होशील, तू देवी आहेस..वगैरे वगैरे कुठल्याही बहाण्याला ती सहज फसणारी होती आणि फसलीच..

पुढे मुंबईत आली. पण हिच्या बाबतीत तेवढी एकाच वेगळी गोष्ट झाली आणि ती म्हणजे पब, call girl, डान्स बार, escort वगैरे नेहमीच्या वाटेत न शिरता ही अध्यात्म नावाच्या बाजारात शिरली. देवी झाली. तुम्ही तिचा डिझायनर मेकप बघा, कपाळावरचा फिल्मी टिळा बघा, उंची ड्रेस, महागड्या चपला बघा..माझा वर मांडलेला मुद्दा तुम्हाला पटेल. end of the day, अध्यात्माच्या बाजारातही तिच्या मनातली छानछोकी पूर्ण झालीच की..!

पुढे तिच्या चौक्या, तिचे दरबार, तिचे महागडे भक्त..या सगळ्या गोष्टी अनिवार्यच होत्या त्यामुळे त्या इतिहासात मी जात नाही. ते आता सर्वांनाच माहीत आहे..

मी फक्त कुठेतरी या सगळ्यामागचं मूळ आणि या सगळ्यामागची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच..

एरवी..माझ्या आध्यात्माच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. एका वेश्येत सुद्धा विठोबा पाहून तिला नमस्कार करणारे तुकोबा हीच माझी आध्यात्माची साधीसोपी व्याख्या आहे. असो!

-- (मुंबईचा) तात्या अभ्यंकर..

August 08, 2015

साखर-खोबर्याचा गोडवा...

तयासि तुळणा कैसी, मेरु मांदार धाकुटे..

वा! काय सुंदर शब्द आहेत!

खूप वर्षांपूर्वी..म्हणजे साधारण १९७६-७७ च्या सुमारास मी अगदी तिसरी-चौथीत असताना मला आठवतंय..आमच्या सोसायाटीमध्ये एक मेहेंदळे नावाचं कुटुंब रहायचं. त्यातले भाऊ मेहेंदळे तीन सांजा झाल्या की दर शनिवारी आम्हा सगळ्या बाळगोपाळाना इमारतीच्या गच्चीत जमवायचे. आणि मग ती हनुमंताची पर्वत उचलणारी लहानशी तसबीर ठेऊन, छान उदबत्ती वगैरे लावून आम्ही सगळे भीमरूपी महारुद्रा म्हणायचे. त्यानंतर नारळ फोडून त्याचे लहान तुकडे करून आणि त्यात साखर घालून आम्ही सगळे लहान लहान हनुमान तो सुंदर प्रसाद खायचो. पुढे काळाच्या ओघात ती आरतीही केव्हातरी बंद झाली..

तेव्हा संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा या गोष्टी घराघरात चालायच्या. अर्थात, त्यातल्या १९, २९ वगैरे पाढ्याना मी आजही घाबरतो तो भाग वेगळा! :)

पण तेव्हा तीन सांजेला देवाला नमस्कार करून घरातल्या सगळ्या वडिललधा-यांना नमस्कार करायची पद्धत होती. मी आजही संध्याकाळी दिवाबत्ती करून म्हातारीच्या पाया पडतो!

आता whatsapp आले, video games आले, स्कायपी आल्या, सेल्फी आले.. चालायचंच. माझी कुठलीच तक्रार नाही..

पण भाऊ मेहेंदळे यांच्यासारख्या बुजुर्गांनी किंवा आपल्या आई-वडिलांनी आपल्याला संध्याकाळचा पर्वचा, पाढे, रामरक्षा, भीमरूपी महारुद्रा हा अनमोल ठेवा दिला आहे. तो आपण टिकवला पाहिजे!

काळाच्या ओघात भाऊ मेहेंदळेही गेले. पण त्या साखर-खोबर्याचा गोडवा आजही कायम आहे. कारण तो अक्षय आहे!

असो..

-- तात्या अभ्यंकर.

August 06, 2015

भिडे आजोबा.. :)

मगाशी साक्षात एक शिल्पं बघितलं. रस्त्याने एक अत्यंत आकर्षक तरुणी चालली होती. पांढरा शुभ्र पंजाबी बिनबाह्यांचा ड्रेस, चालण्यात एक रुबाब. हातात पर्स, छत्री वगैरे. मी तर साला ते अफाट सौंदर्य बघून क्षणभर स्तब्धच झालो.

तेवढ्यात तिचा चपलेचा काहीतरी problem झाला की चप्पल सटकली असं काहीसं झालं असावं, म्हणून ती क्षणभर थबकली आणि पुन्हा मार्गस्थ झाली.

क्षणभर एक वादळच येऊन गेलं की काय असं वाटलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी जेव्हा क्षण्भर थबकलो होतो तेव्हा माझ्यापुढे १०-१२ फुटावर चालत असणारा एक म्हाताराही तिच्याकडे पाहत जागीच थबकला होता. मुलगी तर केव्हाच आम्हाला पास झाली होती. तिच्या वाटेने निघून गेली होती. पण त्या म्हाता-याबद्दल मला उत्सुकता होती म्हणून मी थोडा पुढे गेलो आणि त्याला गाठला.

बघतो तर पुष्पांजली सोसायटीतले आमचे भिडे आजोबा. एकदम मस्त friendly म्हातारा आहे! :)

"काय आजोबा.. कसं काय..? कोण होती हो ती मुलगी..? छान होती ना..?"

मी डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला तशी म्हाताराही खुलला..! :)

"हो रे.. खरंच छान होती रे. बहुतेक ऑफिसला चालली असावी.."

"मग..? बाकी काय कसं आजोबा, कुठपर्यंत फेरी..?"

"अरे नेहमीची फेरी. अंघोळ वगैरे आटपून जरा देवदर्शन. मग यायचं जरा एक चक्कर मारून. एरवी मी दुस-या वाटेने जातो पण आज जरा पोष्टात काम होतं म्हणून इकडून आलो.."

"आता उद्यापासून ह्याच वाटेने सकाळचा फेरफटका पूर्ण करत जाईन. वेळ बघून ठेवली आहे.."

"कुठली वेळ..?"  मला एक क्षण कळेचना.

"अरे तिच्या ऑफिसला जायची रे.. कुठल्या ऑफिसला वगैरे जात असेल तर हीच वेळ असेल ना.? ख्या ख्या ख्या..!" :)

"अरे बाबा..ही वेळा बघून ठेवायची सवय खूप जुनी आहे. आता या वयात कशी सुटेल..?"

म्हातारा आपली कवळी दाखवत मनमुराद हसला.. :)

"भिडे आजोबा..गुरु आहात..!"

"हा हा हा.. दे टाळी.. चल जरा चहा घेऊ.."

चहा घेताना आजोबा मिश्कीलपणे पुटपुटले..

"संध्याकाळी ऑफीस किती वाजता सुटतं कुणास ठाऊक.."

-- (भिडे आजोबांचा नातू) तात्या.. :)

July 16, 2015

माझं आध्यात्म..!

दर्शन, प्रदर्शन आणि जाहिरात म्हणजे आध्यात्म नव्हे..

आमच्या भागवतधर्माने नामस्मरण हा अतिशय सोपा आणि सर्वांना केव्हाही, कधीही करता येण्याजोगा भक्तिमार्ग सांगितला आहे. माझ्या मते तरी हेच खरे आध्यात्म..!

ठीक आहे..श्रुतीस्मृतीपुराणोक्त, कर्मकांड..होमहवन, पोथ्यापुराणं हे मीही मानतो. ते करण्याला ना नाही. पण त्याची जाहिरात नको, अवडंबर नको. कारण जाहिरात, अवडंबर ह्या गोष्टी आल्या की त्यातला देव निघून जातो आणि उरतात ती केवळ ढोंगी कर्मकांड..! तसं होता कामा नये..!

"मग..? गेली पंचवीस वर्ष गुरुवारचा उपास करतोय..!"  

असं अभिमानाने सांगितलंत रे सांगितलंत की गेली ती २५ वर्ष फुकट..!

अभिमान आला, अहं आला की अध्यात्म संपलंच म्हणून समजा..!

उप-वास करताय ना..? मग तो स्वत:पुरता.स्वत:च्या घरात मर्यादित ठेवा. काय खिचडी,फळं खायची ती कुणालाही त्रास न देता खा..

"माझा उपास आहे हो..माझ्याकरता खिचडी करा.."

ज्या क्षणी अहंभावाने अशी ऑर्डर सोडाल की त्या क्षणी त्या उपासाचं महत्व संपलंच म्हणून समजा..!

अगदी आमच्या भागवतधर्मातल्या वारीचंही तसंचं आहे.

"मग..? अहो गेली पंचवीस वर्ष न चुकता वारीला जातोय..!"

असं अभिमानाने म्हटलंत की ती २५ वर्ष फुकट गेलीच म्हणून समजा. २५ वर्ष वारीला जाताय ना..मग काळजी करू नका. विठोबाचं लक्ष आहे तुमच्याकडे..!

"हो..मला रविना टंडन अतिशय आवडते..तिचं सौंदर्य मला भावतं असं खुलेपणाने म्हणा. तिथे आध्यात्म आहे.. पण मनातल्या मनात रवीना आवडत असूनही,

"रवीना माझ्या बहिणीसारखी आहे.."

असं म्हटलंत की त्यातलं आध्यात्म संपलंच म्हणून समजा..! :)

असो.. हे झाले माझे व्यक्तिगत अध्यात्मिक विचार. कुणाला पटतील, कुणाला न पटतील. कुणाला पचतील, कुणाला न पचतील..!

ते सर्वांना पटलेच पाहिजेत असा जर माझा आग्रह असेल तेथे माझंही आध्यात्म संपलं....! :)

कारण आध्यात्मात आग्रह नसतो..हट्ट नसतो..असते ती फक्त परमात्म्यावरची निर्व्याज श्रद्धा.. मग त्या परमात्म्याला तुम्ही गणपती, शंकर, विठोबा, दत्त, अल्ला, येशू, गुरुग्रंथसाहेब.. काहीही नाव द्या.. It makes no difference..!

आणि अखेर अध्यात्म्याचा तरी सगळा हा अट्टाहास का..? तर शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून..!

फार सुंदर अभंग आहे आमच्या अण्णांचा..! असो..

-- तात्या अभ्यंकर.

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार या महान ग्रंथातून साभार..!) :)

July 14, 2015

हो..मी जुनाट आहे..

हो..मी जुनाट आहे. तुमचा आरोप मला मान्य आहे..

मला काही नकोत ते malls, whats app, सेल्फी. मला काही नको. मोबाईल तर मुळीच नको. मला कुणाला फोन करायचाच असेल तर तो मी पोस्टात जाऊन आठ आणे भरून करेन. पूर्वी करायचो तसा..!

मला हवी आहेत ती बाबूजींची आणि सुमन कल्याणपूरची संध्याकाळी आकाशवाणीवर लागणारी गाणी. घाल घाल पिंगा.हे सुमनताईंचं गाणं ऐकायचं आहे मला..!

मला हव्या आहेत सुधा नरवणे आणि सुहासिनी मुळगावकर. मी शोधतो आहे त्या दोघींना..!

मला कुठल्याही वृत्तवाहिन्या नको आहेत.. मला हवे आहेत ते अनंत भावे आणि प्रदीप भिडे.

मला हवी आहे छानशी दिसणारी..बातम्या देणारी कृष्णधवल स्मिता तळवलकर..

मला हवे आहेत ते संध्याकाळी ७ वाजताच लागणारे कुकर आणि त्यातला गरमगरम वरणभात. सोबत तोंडी लावायला काकडी-टोमेटो ची कोशिंबीर किंवा फोडणीची मिरची..आणि पोळीसोबत आईनं केलेली शिकरण..जी कुस्करताना तिच्या बुडलेल्या हाताची तिला चव आहे..!

मला सकाळी ६ वाजता आकाशवाणीवर गायलेला आमच्या अण्णांचा अभंग ऐकायचा आहे. मला ऐकायचे आहेत लासलगाव, नंदूरबारचे बाजारभाव.. आणि मला मनापासून ऐकायचं आहे वनिता मंडळ..

हो..मी जुनाट आहे. तुमचा आरोप मला मान्य आहे..

-- तात्या अभ्यंकर..