January 23, 2007

तात्याबांवर अजून दोन कविता...

खरंच मंडळी, "मनोगत" या संकेतस्थळावर मला भरभरून प्रेम मिळालं आणि त्याबद्दल मनोगताचा आणि मनोगतींचा मी सदैव ऋणी राहीन. माझा एक मनोगती मित्र "माफिचा साक्षिदार" याने माझ्यावर एक कविता केली आहे ती खाली देत आहे. "माफिचा साक्षिदार" हा स्वत: एक अत्यंत प्रतिभावान गझलकार आणि विडंबनकार आहे.





तात्यांत तात्या बलवान तात्या

तात्यांत तात्या बलवान तात्या
साऱ्या स्त्रियांचे भगवान तात्या

तात्यांत तात्या व्यतिरेक तात्या
खाण्यापिण्याचा अतिरेक तात्या

तात्यांत तात्या सुरळीत तात्या
पावात तात्या मिसळीत तात्या

तात्यांत तात्या बलदंड तात्या
सारेच छोटे व प्रचंड तात्या

तात्यांत तात्या भरदार तात्या
वाटे भिमाचा अवतार तात्या

तात्यांत तात्या किरवंत तात्या
खोटारड्यांचा जणु अंत तात्या

तात्यांत तात्या 'घननीळ' तात्या
हो सुंभ जळला पण पीळ तात्या

तात्यांत तात्या घरट्यात तात्या
जणु कोकिळाच्या नरड्यात तात्या

तात्यांत तात्या वरताण तात्या
संगीतयज्ञी रममाण तात्या


माझी एक टिपिकल पुणेरी मैत्रीण संपदा साठे हिनेदेखील माझ्यावर एक कविता केली आहे. ती येथे देत आहे. संपदाला कवितेचं देणं लाभलं आहे आणि तिचं शब्दवैभव अत्यंत समृद्ध आहे.

सुपात तात्या जात्यांत तात्या......

सुपात तात्या जात्यांत तात्या
पात्यात तात्या गोत्यात तात्या

काल्यात तात्या लाह्यात तात्या
खादाड तात्या वाह्यात तात्या

गप्पांत तात्या रस्त्यात तात्या
पुचाट तात्या सस्त्यात तात्या

गाण्यात तात्या लग्नात तात्या
कंपूत अर्ध्या वचनात तात्या

दारूत तात्या वादात तात्या
गर्दीत तात्या नादात तात्या

माशात तात्या नळीत तात्या
खरीप तात्या गळीत तात्या

लेंग्यात तात्या लुंगीत तात्या
धोत्रात तात्या चड्डीत तात्या

भज्यात तात्या सोड्यात तात्या
गाडीत तात्या घोड्यात तात्या


फोटोत तात्या फुरश्यात तात्या
पुरे झाला वर्षात तात्या


मी माफिचा साक्षिदार आणि संपदा या दोघांचाही मनापासून आभारी आहे. त्यांच्या लेखनप्रवासाला माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा...

--तात्या.

आरती संत तात्याबांची!

राम राम मंडळी,

अहो स्वत:च स्वत:च्या कुल्याभोवती दिवे व आरत्या ओवाळून घ्यायला कुणाला नाही आवडत? पण आमचं मात्र तसं नाही. आज या पृथ्वीतलावावर (एरिया जरा मोठा झाला का? असो, असो!) काही प्रेमळ माणसं अशी आहेत की ज्यांनी आमच्यावर आरती केली आहे.

मनोगत नांवाचं एक संकेतस्थळ आहे, जिथे आम्ही आमच्या चतुरस्र लेखणीने वाजलो आणि गाजलो! वेलणकरशेठ हा मनोगताचा मालक. टिपिकल कोकणस्थ, आणि सोवळ्याओवळ्याचं वातावरण जपणारा! आणि आम्ही हे असे तोंडाळ, आणि अंमळ शिवराळही. सतत सोवळ्याओवळ्याचं वातावरण आणि सगळं छान छान गुडी गुडी वातावरणात आमचा जीव घुसमटू लागला. त्यातच पुढे मनोगतावर मॉडरेशन आलं आणि आमच्या नाकात लगाम घातला गेला. आम्हाला ते काही पटेना, म्हणून मग आम्ही मनोगतावर लिहिणंच बंद केलं. साला माझं लेखन चेक करणारा हा वेलणकर कोण लागून गेला? पण तरीही, आजही 'मनोगत' हे संकेतस्थळ हेच आमचं पहिलं प्रेम आहे आणि नेहमी राहील. मनोगतामुळेच आम्हाला ओळख मिळाली, जिवाभावाची मित्रमंडळी मिळाली, आणि त्याकरता मी वेलणकरशेठचा मरेपर्यंत आभारीच राहीन.

बरं का मंडळी, मैथिली नांवाची आमची एक मैत्रिण आहे मनोगतावर. तिने तर कमालच केलीन. चक्क एक आरतीच लिहिलीन माझ्यावर! आता बोला. अहो कुणाला स्वत:वर केलेली आरती, स्वत:चं गुणगान आवडणार नाही? तसंच ते मलाही आवडलं आणि म्हणूनच मैथिलीने केलेली आरती इथे लिहीत आहे. मी मैथिलीचे अनेक आभार मानतो आणि तिला तिच्या पुढील लेखनाकरता शुभेच्छा देतो. मैथिली, जियो!!!!

--तात्या अभ्यंकर.

संत तात्याबांची आरती!

जय देव जय देव जय तात्या देवा
त्रिकाळ त्रैलोकी मिसळ खावा, जय देव.... ।धृ।

संगीताचे ध्यान तुम्हा लागले,
राग-ताल-सूरी मन रमले,
मनोगतींनाही वेड लावले,
संगीताचे दान पदरी टाकले, जय देव...।१।

मिसळीत तुम्ही ब्रम्ह पाहिले,
कांदा-लिंबू-दही त्यात ओतले,
रस्सा वरपूनी पाव चर्विले,
पेयपानाने सिद्धीस गेले, जय देव...।२।

मनोगतावर प्रकट झाले,
कित्येक विषय ह्यांनी चर्चिले,
पाककृतींना प्रतिसाद दिले,
लेखनाने आपुल्या मैत्र बनविले, जय देव...।३।

January 16, 2007

नेनेसाहेब!

तात्या, सवाईची तिकिटं काढली आहेत. लवकर या. वाट पहात आहे. गाणं ऐकू, मस्त धमाल करू.!"
असा नेनेसाहेबांचा मला दरवर्षी फोन यायचा. सवाईगंधर्व महोत्सवाची आम्हा काही मुंबईकर मित्रांची तिकिटं काढायचं काम नेहमी नेनेसाहेबच करत असत.विजय नेने! आम्ही त्यांना 'नेनेसाहेब' म्हणत असू. पत्ता- सदाशिव पेठ, पुणे. नेनेसाहेब म्हणजे एक वल्ली माणूस. वय ५५ च्या आसपास, मध्यम उंचीचे, केस पिकलेले, हसतमुख चेहरा. (सदाशिवपेठी कोकणस्थ असून!;)

नेनेसाहेब तसा मध्यमवर्गीय, नोकरदार माणूस. पुण्यातल्याच कुठल्याश्या उपनगरातील एका कंपनीत नोकरीला. माझ्या ना नात्याचा, ना गोत्याचा. मग असं काय बरं विशेष होतं नेनेसाहेबांच्यात की ज्यामुळे त्यांचे माझे जन्माचे ऋणानुबंध जोडले गेले? कारण एकच. नेनेसाहेबांकडे शास्त्रीय संगीताच्या प्रत्यक्ष कार्यक्रमांच्या (लाईव्ह रेकॉर्डींग) ध्वनिफितींचा प्रचंड संग्रह होता. प्रचंड म्हणजे शब्दश: प्रचंड! आणि रसिक मंडळींना तो ते कधीही ऐकवायला अगदी हसतमुखाने तयार असत. ठाण्याचे माझे मित्र नंदन म्हसकर यांनी प्रथम त्यांची माझी गाठ घालून दिली.

नेनेसाहेबांच्या घरी म्हसकरांबरोबर मी अगदी प्रथम गेलो तो दिवस मला अजूनही आठवतो. "हे माझे मित्र तात्या अभ्यंकर. गाण्याचे खूप शौकीन आहेत." म्हसकरांनी ओळख करून दिली.
नेनेसाहेबांचं घर म्हणजे सदाशिवपेठेतल्या एका वाड्याची एक लहानशी खोली. त्यात दोन कपाटं, एक खाट, आणि उरलेल्या जागेत ओटा असल्यामुळे त्या जागेला स्वयंपाकघर म्हणायचं. कोपऱ्यातच एक लहानशी मोरी! बास..! एवढाच होता नेनेसाहेबांचा संसार. एकूलती एक मुलगी लग्न होऊन सासरी नांदायला गेलेली.

"बोला काय ऐकवू?" नेनेसाहेबांनी सवाल टाकला. एकदम हा प्रश्न आल्यामुळे मी थोडा गडबडूनच गेलो. "काहीही ऐकवा. अण्णांचं काही लाईव्ह ध्वनिमुद्रण असेल तर मला ऐकायला आवडेल!" मी.

"अरे वा! आत्ता ऐकवतो," असं म्हणून नेनेसाहेब उठले आणि त्यांनी एक जाडजूड रजिस्टरच माझ्या हाती ठेवलं. बाडच म्हणा ना!

"ही पहिलीच काही पानं बघा. तुम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणांची सगळी यादीच पहायला मिळेल. पहिला मान अर्थातच भीमसेनजींचा! बोला, कोणतं ध्वनिमुद्रण लावू? अगं ऐकलंस का? कॉफी टाक पाहू झकासपैकी, आणि काहीतरी खायलाही दे! हे माझे मित्र ठाण्याहून आले आहेत. भीमसेनप्रेमी आहेत!"

पहिल्या भेटीतच मला 'मित्र' असं संबोधून नेनेसाहेब मोकळे झाले होते! त्यांची 'अगं' तिथेच ओट्याजवळ उभी होती. ह्या बाईंचा स्वभाव अगदी गरीब असणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी कुणीही ओळखावं. त्यासुद्धा नेनेसाहेबांसारख्याच अगदी हसतमुख होत्या.

नेनेसाहेबांनी माझ्या हाती ठेवलेलं ते जाडजूड बाड मी उलगडून पाहू लागलो. ते पाहताना मला फक्त चक्कर यायचीच बाकी होती. भीमण्णा, किशोरीताई, मालिनीबाई, आमिरखा, कुमारगंधर्व,.... यादी लांबतच चालली होती. त्यांच्या संग्रहात जुना-नवा कुठला कलाकार नव्हता असं नव्हतंच! आणि प्रत्येकाची एखाद दोन नव्हेत तर अक्षरश: शेकड्यांनी ध्वनिमुद्रणं होती. सगळीच्या सगळी प्रत्यक्ष मैफलीतली! बाजारात व्यावसायिक स्तरावर मिळणारं एकही ध्वनिमुद्रण त्यात नव्हतं! मंडळी, ते बाड पाहताना मला किती आनंद झाला हे मी शब्दात नाही सांगू शकणार!

"बोला तात्या बोला! काय ऐकायचंय?" नेनेसाहेबांच्या या प्रश्नानी मी एकदम भानावर आलो. काय सांगणार होतो मी त्यांना? अहो किती ऐकावं आणि किती नाही अशी माझी परिस्थिती झालेली! त्यादिवशी थोडंफार ध्वनिमुद्रण ऐकून आम्ही तेथून निघालो. "पुन्हा या नक्की. अगदी केव्हाही या. मस्तपैकी गाणं ऐकू." असा आम्हाला नेनेसाहेबांनी हसतमुखानी निरोप दिला.

त्यानंतर मी जेव्हा जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा नेनेसाहेबांच्या घरी फेरी झाली नाही, असं कधी झालंच नाही. कुणाचं गाणं नाही ऐकलं मी त्यांच्याकडे? अरे बापरे माझ्या! मोठ्ठी यादीच होईल त्याची. भीमण्णा, किशोरीताई, कुमारजी, अभिषेकीबुवा, उल्हास कशाळकर, राशिदखान, अजय चक्रवर्ती, वीणाताई, प्रभाताई, रामभाऊ, हे मी प्रत्यक्ष ऐकलेले कलाकार. त्यांचं तर ध्वनिमुद्रण होतंच. त्याशिवाय मास्तर, निवृतीबुवा, गजाननबुवा, मिराशीबुवा, फैयाजखा, आमिरखा, खादिमहुसेनखा, विलायतहुसेनखा, सवाईगंधर्व, या जुन्या मंडळींचीही बरीच ध्वनिमुद्रणं त्यांच्याकडे ऐकायला मिळाली. अगदी मनमुराद, समाधान होईस्तोवर!

नेनेसाहेबांच्या घरच्या प्रत्येक फेरीत मी अगदी मनसोक्त गाणं ऐकत होतो. मनात साठवत होतो, शिकत होतो. अक्षरशः आयुष्यभरची कमाई होती ती नेनेसाहेबांची. मला ते नेहमी म्हणायचे,

"अहो तात्या, हे सगळं मी कसं जमवलं माझं मला माहीत! कुठे कुठे म्हणून नसेन फिरलो मी याच्याकरता? किती पैसे खर्च केले असतील पदरचे! पण आज हा संग्रह पाहिला की माझं मलाच समाधान वाटतं. तुमच्यासारखे चार रसिक घरी ऐकायला येतात, बरं वाटतं! आता नोकरीतून लवकरच निवृत्त होणार आहे. मग काय, फक्त संगीत आणि मीच! अहो पुढचं सगळं आयुष्यभर ऐकत बसलो तरी संपणार नाही एवढं अफाट ध्वनिमुद्रण जमवून ठेवलं आहे मी!

नेनेसाहेबांचा हा अभिमान अगदी सार्थ होता!

खरंच, आमचे नेनेसाहेब म्हणजे खूप मोठा माणूस हो.. मुलखावेगळाच! स्वत: कष्ट करून जमवलेली ध्वनिमुद्रणे लोकांना हौशिहौशीने स्वत:च्याच घरी बोलावून ऐकवणार, वर त्यांची चहापाण्याचीही सरबराई करणार! या माणसाची हौसच दांडगी. मी इतक्या वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण कधीही त्यांच्या चेहऱ्यावर कंटाळा बघितला नाही. संध्याकाळी सहा वाजता गेलो की रात्रीचे दहा कधी वाजायचे ते समजायचंच नाही. " बसा हो तात्या, काय घाई आहे? जाल सावकाश! आता जेवुनच जा!" असा आग्रहही नेहमी व्हायचा.

असाच एक दिवस. मी नेनेसाहेबांच्या घरी गेलो होतो. बाडातून भीमण्णांच्या यमनचं साठ सालातलं एक ध्वनिमुद्रण लेलेसाहेबांना ऐकवायला सांगितलं. त्यावर ते म्हणाले,

"ठीक आहे. काढून आणतो. पुढच्या वेळेला आलात की नक्की ऐकवतो!"
"काढून आणतो? मी समजलो नाही नेनेसाहेब!"
"तात्या, त्याचं काय आहे की काही काही खास ध्वनिमुद्रणं मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली आहेत. खूप जपायला लागतात ती. तुम्ही म्हणता तो अण्णांचा यमन तसाच अगदी खास आहे.!!!

बँकेच्या लॉकरमध्ये? आणि ध्वनिमुद्रणं???? मंडळी, मी खाटेवरून पडायच्याच बेतात होतो. पण ती वस्तुस्थिती होती. लोक साधाराणपणे सोनं-चांदी-हिरे-मोती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. पण जिवापाड मेहनत घेऊन जमवलेलं एकन्एक ध्वनिमुद्रणाचं मोल आमच्या नेनेसाहेबांकरता कुठल्याही हिऱ्यापेक्षा कमी नव्हतं हेच खरं!

नेनेसाहेबांचं कुटुंब कधी बाहेरगावी गेलेलं असलं की शनिवार-रविवारची सुट्टी पाहून आम्ही चार मित्र तर अक्षरश: धमालच करायचो. मी, म्हस्करसाहेब, सुधांशु वझे हे आमचे पुण्यातलेच आणखी एक मित्र, आणि स्वत: नेनेसाहेब. शनिवारी संध्याकाळी ५-६ च्या सुमारास आम्ही सगळे नेनेसाहेबांच्या घरी जमत असू. त्यानंतर मग रात्री साडेआठ, नऊपर्यंत श्रवणभक्ती. त्यानंतर मग बादशाही, किंवा पुना गेस्टहाऊस सारख्या एखाद्या ठिकाणी जाऊन रात्रीचे फर्मास भोजन. भोजन झालं की जरा शतपावली, पानबिन खाऊन आमचा डेरा पुन्हा नेनेसाहेबांच्या घरी पडायचा तो अगदी पहाटेपर्यंत!

काय सांगू तुम्हाला मंडळी मी! खूप धमाल यायची हो. कुणाला काय हवं ते नेनेसाहेब ऐकवायचे. ऐकणाराने फक्त बाड उघडून हुकूम करायचा. त्या दोन दिवसात तर नेनेसाहेबांचा उत्साह अगदी ओसंडूनच वहात असायचा! भरपूर गाणं ऐकणं व्हायचं. गप्पाही अगदी भरपूर. मग रात्री दोन-अडीच वाजता नेनेसाहेब स्वत: झकासपैकी कॉफी करायचे!

कोण होते हो नेनेसाहेब? एक सामान्य मध्यमवर्गीय माणूस. १० बाय १० च्या अवघ्या एका खोलीत राहणारा! पण खरं सांगतो मंडळी, नेनेसाहेबांची ती त्या लहानश्या खोलीतली संपत्ती कुणा बंगलेवाल्याकडेही नसेल!

आज नेनेसाहेबांवर दोन शब्द लिहायला बसलो आणि मन अगदी भरून आलं. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. १९६० सालात संस्मरणीय ठरेल असा यमन गाणारे आमचे अण्णा तर मोठे आहेतच, पण तेच यमनचं ध्वनिमुद्रण बॅकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणारे आमचे नेनेसाहेबही मोठेच!

सर्वात दुर्दैवाची गोष्ट अशी की निवृत्त झाल्यानंतर एवढं अफाट गाणं ऐकायला, जरा निवांतपणे त्याचा आनंद लुटायला नेनेसाहेब पुढचे अवघे तीन महिनेही जगले नाहीत. किती क्रुर वागली नियती नेनेसाहेबांशी! मधुमेहाचं दुखणं. पायाला जखम झाल्याचं निमित्त झालं आणि आमचे नेनेसाहेब कायमचे निघून गेले ते कधीही परत न येण्याकरता!

मंडळी, संगीतातले ऋणानुबंध खूप त्रास देऊन जातात हेच खरं!

मला एकदा ते गंमतीने म्हणाले होते, "तात्या, तुम्ही एवढे अण्णांचे भक्त. मी मरतांना माझ्याकडील अण्णांच्या काही ध्वनिमुद्रिका तुमच्या नावावर करून जाईन हो!" एखादी इस्टेटच माझ्या नांवावर करावी अशा थाटात मोठ्या मिश्किलपणे हे उद्गार त्यांनी काढले होते!

आज मात्र त्यांना एवढंच सांगावसं वाटतं, 'की नको नेनेसाहेब. तुमची इस्टेट तुमच्याकडेच राहू द्या. फक्त एखाद्या शनिवारी-रविवारी पुन्हा एकदा घरी बोलवा हो आम्हा सगळ्यांना. रात्रभर अगदी मनसोक्त गाणं ऐकू!!!

-तात्या अभ्यंकर.

बसंतचं लग्न..११

राम राम मंडळी,

आपल्या बसंताचं लग्न अगदी थाटामाटात सुरू आहे. आता जेवणावळींची तयारी सुरू आहे. सुरेखश्या रांगोळ्या घातल्या आहेत. मंद सुवासाच्या उदबत्त्या लावल्या आहेत. मल्हार, मालकंस, मुलतानी, तोडी, दरबारी यासारख्या बड्या बड्या रागमंडळींची पंगत बसली आहे. साजूक तुपातल्या, अगदी आतपर्यंत पाक शिरलेल्या, केशर घातलेल्या जिलब्या, चवदार मठ्ठा, मसालेभात, डाळिंब्यांची उसळ, गरमागरम पुऱ्या, असा साग्रसंगीत बेत आहे. हल्लीसारखी पहिल्या वरण-भातानंतर लगेच पब्लिकच्या पानात मसालेभात लोटायचा, ही पद्धत इथे नाही बरं का! पहिला वरण-भात, मग जिलेबी, मग डाळिंबीउसळ-पुऱ्या, मग मसाले-भात, मग पुन्हा एकदा जिलेबी (कुणाला पैजा मारायच्या असतील तर त्या ह्या फेरीत मारायच्या बरं का! ;), आणि शेवटी थोडा ताक-भात असा क्रम आहे. शिवाय मठ्ठ्याची अगदी रेलचेल आहे आणि मध्ये मध्ये पंचामृत, लोणची, कोशिंबिरी, कुरडया, पापड यांची ये-जा सुरूच आहे!

बरं का मंडळी, बसंतच्या लग्नात जेवणावळीची जबाबदारी, कुणाला काय हवं, नको ते पहायची जबाबदारी, मंडळींना जिलब्यांचा भरभरून आग्रह करण्याची जबाबदारी एका कुटुंबावर सोपवली गेली आहे. त्या कुटुंबाचं नांव आहे 'सारंग' कुटुंब! सारंग कुटुंबातली मंडळी चांदीच्या ताटातून जिलब्यांचा आग्रह करत आहेत.

आपल्या बसंतवरच्या प्रेमापोटी शुद्ध सारंग आणि गौड सारंग हे दोघे जातीने जेवणावळीची जबाबदारी सांभाळत आहेत!

शुद्ध सारंग! क्या केहेने...

या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून
हे ध्वनिमुद्रण ऐका. हा राग अगदी शांत स्वभावाचा आणि प्रसन्न वृत्तीचा. आपल्या आयुष्यातही अशी एखादी व्यक्ती असते/असावी. कधी ती आपल्या नात्यातली तर कधी मित्रपरिवारातली, किंवा ओळखीतली. आपल्याला कधी काही अडचण आली, मोकळेपणानी बोलावसं वाटलं तर अगदी खुशाल त्या व्यक्तीकडे जावं, मन मोकळं करावं. त्याच्या एखाद-दोन शब्दातच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि मन शांत होतं. त्या व्यक्तीचा अगदी हाच स्वभावविशेष शुद्ध सारंगातही आपल्याला दिसतो.

मंडळी, फार उच्च दर्जाचा शुद्ध सारंग ऐकायला मिळाला अशा काही केवळ अविस्मरणीय मैफली माझ्या खात्यावर जमा आहेत. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो आमच्या दातारवुवांचा. पं डी के दातार! व्हायोलिन वादनातला फार मोठा माणूस. एकदा त्यांच्या सकाळच्या एका मैफलीला जाण्याचा सुयोग मला आला होता. मैफल संपतच आली होती. दुपारचे साडे-बारा, एक वाजला असेल, आणि एकदम बुवांनी शुद्धसारंगातली एक गत सुरू केली. काय सांगू मंडळी तो अनुभव! एकदम लयदार आणि सुरेल काम हो. मध्यलयीतल्या रूपकाच्या ठेक्यात काय सुरेख चालला होता शुद्ध सारंग! ओहोहो, क्या केहेने! आम्ही श्रोतेमंडळी अक्षरश: शुद्धसारंगाच्या त्या सुरांत हरवून गेलो होतो. अशीच मालिनीबाईंची एक मैफल आठवते. क्या बात है. मालिनीबाईंनी तेव्हा असा काही शुद्धसारंग जमवला होता की अंगावर आजही रोमांच उभे राहतात! फार मोठी गायिका. मालिनीबाईंकडून खूप खूप शिकण्यासारखं आहे.

हिराबाईंची शुद्ध सारंगामधली एक बंदिश
येथे ऐका. किती सुंदर गायली आहे पहा. दोन मध्यमांची सगळी जादू आहे. तीन मिनिटांच्या या बंदिशीतली हिराबाईंची आलापी पहा किती सुरेख आहे, क्या बात है...सांगा कसं वाटतंय ऐकून!

एखादी सुरेखशी दुपार आहे, आपण निवांतपणे झाडाखाली बसलो आहोत, ऊन आहे पण आपल्यावर झाडाने छानशी सावली धरली आहे. समोर एखादा शांत जलाशय पसरला आहे आणि सगळीकडे अगदी नीरव शांतता आहे! क्या बात है..मंडळी, हा आहे शुद्ध सारंगचा माहोल, शुद्ध सारंगचा स्वभाव. शांत परंतु आश्वासक!!

शुद्ध सारंग रागातील गिंडेबुवांनी बांधलेल्या एका बंदिशीच्या या ओळी पहा किती सुरेख आहेत-

गगन चढी आयो भानू दुपहार
तपन भयी तनमनकी अति भारी

कदम्ब की छैया, छांडे कन्हैया
शुद्ध नाम सारंग बिराजे!
नामरूप दोऊपार हार

काय बात है! शुद्ध नामातला सारंग कसा विराजमान झाला आहे पहा. सूर्यमहाराज डोक्यावर तळपत आहेत आणि अशा वेळेस एखाद्या गर्द झाडाच्या छानश्या सावलीचा आसरा मिळावा, हा जो अनुभव आहे ना, तो शुद्ध सारंग रागातून मिळतो! मंडळी आयुष्यातही जर कधी अशी उन्हाची तलखली जाणवली, तर अगदी विश्वासाने आमच्या शुद्धसारंगाला शरण जा. जिवाला नक्कीच थोडा सुकून मिळेल याची हमी देतो...

राग गौड सारंग!

हा राग थोडा नटखट आहे बरं का मंडळी;) अहो याच्याबद्दल किती लिहू अन् किती नको! हा मूळचा कल्याण थाटातला. त्यामुळे काही शास्त्रकार याला 'सारंग' मानतच नाहीत. न मानेनात का! आमच्याकरता मात्र हा गौड सारंगच आहे. स्वभावाने कसा आहे बरं गौड सारंग हा राग?
या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून पटकन
हे ध्वनिमुद्रण ऐका. या रागात गायली जाणारी ही एक पारंपरिक बंदिश आहे,

बिन देखे तोहे चैन नाही आवे रे,
तोरी सावरी सुरत मन भाए रे..

आहाहा.. काय सुरेख अस्थाई आहे! आता अंतरा बघा काय सुंदर बांधलाय,

मगन पिया मोसो बोलत नाही,
तडप तडप जिया जाए रे..

अहो मंडळी काही नाही हो, ही त्या कृष्णाची सारी लीला आहे. 'बिन देखे तोहे चैन नाही आए रे'! खरं आहे. हा रागही अगदी तसाच आहे. कृष्णाच्या मुखाचं अवलोकन केल्याशिवाय गोपींना चैन पडत नाहीये. आणि म्हणून त्या गोपी त्याबद्दल लाडिक तक्रार करत आहेत. ही लाडिक तक्रार म्हणजेच आपला गौडसारंग हो.

बरं का मंडळी, ह्या गौडसारंग रागाच्या आरोह-अवरोहातच किती नटखटपणा भरलाय पहा. ना हा आरोहात सरळ चालतो, ना अवरोहात. आपण पुन्हा एकदा वरचा दुवा ऐकून पहा..

सा ग रे म ग प म ध प नी ध सां..!!

आहे की नाही गंमत! कसे एक आड एक स्वर येतात पहा ;)
आणि अवरोहात येताना पण तसंच...

सां ध नी प ध म प ग म रे ग

आणि रे म ग, प‌ऽऽ रे सा

ही संगती.. वा वा...

यातही दोन्ही मध्यमांची मौज आहे बरं का.

गौडसारंग ऐकलेल्या अविस्मरणीय मैफली म्हणजे किशोरीताईंची आणि उल्हास कशाळकरांची. अहो काय सांगू तुम्हाला मंडळी! माझ्या पदरात आनंदाचं आणि समाधानाचं अगदी भरभरून दान टाकलंय या गौडसारंगानी..!

मंडळी, वर आपण शुद्ध सारंगचा स्वभाव पाहिला. तो स्वभावाने थोडा बुजुर्ग आहे. ती सारंग कुटुंबातील एक सिनिअर व्यक्ती आहे असं म्हणा ना. पण गौड सारंग तसा नाही. तो घरातील तरूण मंडळींचा जास्त लाडका आहे. लाड करणारा आहे. एखादी गंभीर समस्या घेऊन जावी तर ती शुद्ध सारंगाकडे बरं का. पण 'कॉलेजातली अमुक अमुक मुलगी आपल्याला लई आवडते बॉस!' हे गुपित सांगावं तर आमच्या गौड सारंगाला! ;) तोच ते समजून घेईल!

पं बापुराव पलुसकर. ग्वाल्हेर गायकीवर विलक्षण प्रभुत्व असलेला, अत्यंत गोड गळ्याची देणगी असलेला एक बुजुर्ग गवई. बापुरावांनी गायलेली गौड सारंग रागातली एक पारंपारिक बंदीश
येथे ऐका. बघा किती सुरेख गायली आहे ती! गौड सारंगाचं काय मोहक दर्शन घडवलं आहे बापुरावांनी! क्या बात है.. असा गवई होणे नाही, असा राग होणे नाही! किशोरीताईदेखील हीच बंदिश फार सुरेख गातात. अगदी रंगवून, लयीशी खेळत. अब क्या बताऊ आपको!!

वाड्याच्या एका खोलीत मालकंसबुवा जप करत बसलेले आहेत, एका खोलीत दरबारीचं कसल्या तरी गहन विषयावर सखोल चिंतन वगैरे सुरू आहे, एका खोलीत मल्हारबा स्वत:च किंचित बेचैन होऊन येरझारा घालत आहेत. तिकडे उगाच कामाशिवाय जाऊ नये! धमाल करायच्ये? मजा करायच्ये? तर मग त्याकरता आहेत आपले हमीर, नट, केदार, आणि आपल्या गौडसारंगासारखे राग!

मंडळी, खरंच किती श्रीमंत आहे आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीत! केवळ अवीट. आपलं अवघं आयुष्य समृद्ध, संपन्न करणारं!

--तात्या अभ्यंकर.

August 31, 2006

एका विद्वानाशी चर्चा..!

राम राम मंडळी,

एका विद्वानाशी झालेल्या चर्चेचा काही भाग येथे देत आहे. वाचा आणि सोडून द्या हो!
उगाच जास्त टेन्शन घेऊ नका! ;)

विद्वानाचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं च्यामारी निळ्या!

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही.

अहो मालक, कुणी काय करवं हे लिहिणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि मुळात तुमचा वर्णाश्रमच माझ्या मते फोल आहे.

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही. तो वर्ग (व्याख्येनुसार - रूढ अर्थानुसार नव्हे) आता लोप पावलेला आहे. आसारामबापू, मुरारीबापू, रमेशभाई ओझा, सुधांशु महाराज इ. इ. हे आता असणारे खरे ब्राह्मण.

खरे ब्राह्मण?? नाही, आपण म्हणता तर असतीलही हो ते खरे ब्राह्मण. पण आपण जी (ब्राह्मणांची!) चार नांवे लिहिली आहेत त्यापैकी दोन ब्राह्मण तर महाचालू आणि बाईलवेडे आहेत अशी खात्रीलायक बातमी मला आहे. मी नांवं कुणाचीच घेणार नाही. अर्थात असेनात का ते बाईलवेडे! अहो साक्षात तुमचा विश्वा जिथे मेनकेसमोर पाघळला तिथे इतरांचं काय? मेनका नाचायला लागल्यावर तुमच्या विश्वाने मनगटाला थुंकी लावत ध्यानधारणेला 'टाईमप्लीज' असं म्हटलंन आणि गेला फोकलिचा तिच्यामागे धावत.. ! :D

शूद्राची व्याख्या कशी करायची , आणि गवंडी (म्हणजे मिस्त्री नव्हे - मिस्त्री, सुतार, मेकॉनिक हे विशेष कला आवश्यक असणारे उद्योग आहेत, त्यासाठी काही वर्षेही घालवायवी लागतात ह्याची मला जाण आहे) वा पाट्या टाकणारे ह्यांना काय म्हणायचे ते सांगायची कोणी तसदी घेईल का ? का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो मालक, पण मला एक सांगा, मुळात कुणाची व्याख्या कराच कशाला? कुणाला काय म्हटलं पाहिजे आणि कुणाला काय नाही हा उद्योग पाहिजे कशाला? सगळी 'माणसं' आहेत एवढं पुरेसं नाही का?

का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो हे रांडेचे शास्त्रकारच तर सगळ्या आगी लावत आहेत. त्यांना नव्हता उद्योग, त्यामुळे बसले लिहीत लोकांना शहाणपणा शिकवत! शास्त्र सांगून वस्त्रात परसाकडला बसणारे ते शास्त्रकार!

कोण ब्राह्मण आहे, की क्षत्रिय आहे, की वैश्य आहे. की शूद्र आहे या गोष्टी कराच कशाला? कुणाचं काम काय, कुणाची व्याख्या काय करायची हे ठरवण्याचे अधिकार या शास्त्रकारांना जळ्ळे कुणी दिले?

असो, माझ्यापुरता हा चर्चाविषय मी थांबवत आहे.
मंडळी,
एकंदरीत अशी काहीशी झाली आमची चर्चा! नाही, माणूस तसा धर्मिक आणि विद्वानच हो. पण त्यांच्या विद्वत्तेची आमच्यासारख्या धर्मलंडांनी नोंद करायची ती कुठच्या खात्यावर?

असो...
चला मला आता मार्केटात जायचंय. चांगली सुरमई मिळते का ते बघतो. थोडीशी मांदेलीही घेईन म्हणतो. च्यामारी म्हावरं हल्ली लई महाग झालंय. सालं या कोळी लोकांच्यावर एकदा एखाद-दोन शास्त्रकारांना सोडले पाहिजेत. भीक नको पण धर्म आवर म्हणत सुतासारखे सरळ येतील! ;)
बराय तर मंडळी,

--तात्या.

August 29, 2006

दामू-गोविंदा जोड रे...

राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.
मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.
मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.
"अरे तू इथे कुठे?"
"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"
"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे.
"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.
पं गोविंदराव पटवर्धन!
संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर.
गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला. त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.
पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.
एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!
मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.
त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.
पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.
कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!
बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!
मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!
साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!
साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला,
"तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
--तात्या अभ्यंकर.

पं भाई गायतोंडे...

राम राम मंडळी,
पं भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्यातलेच. संगीत क्षेत्रातलं एक मोठं नांव. त्यांचं खरं नांव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना याच नांवाने ओळखतात. त्यांचा माझा खूप चांगला परिचय हे माझं भाग्य! त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, अजूनही बरंच काही शिकायचं आहे. मंडळी, भाईंबद्दल विचार करायला लागलो की किती लिहू आणि किती नाही असं होतं!

भाईंची तबला क्षेत्रातली कारकीर्द पाहिली की मन थक्क होतं. भाई मूळचे कोकणातले. कणकवली/कुडाळ भागातले. भाईंचे वडील व्यवसायाने डॉक्टर. त्याकाळी त्या लहानश्या गावातच त्यांची डॉक्टरकी चालायची. डॉक्टर स्वतः उत्तम पेटी वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताची आवड भाईंच्या घरातच होती. हौस म्हणून लहानश्या सुरेशनेही तबला शिकण्यास सुरवात केली.

त्यानंतर शिक्षणाकरता, आणि नोकरी-धंद्याकरता भाई कोल्हापुरात दाखल झाले. इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी कोल्हापुरातच केला. पण मन एकीकडे संगीतात, तबल्यात गुंतलं होतं. त्याला भरपूर खाद्य मिळालं ते कोल्हापुरातल्या देवल क्लबमध्ये. देवल क्लबात अनेक दिग्गजांची नेहमी गाणी-वाजवणी व्हायची. भाईंमधला गुणी विद्यार्थी ते सगळं टिपू लागला. भाईंची आणि भीमण्णांची प्रथम भेट कोल्हापुरातच झाली. एकीकडे तबल्याचा रियाज सुरू होताच. ऐकणं-वाजवणंही सुरू होतं. तरीदेखील कशाची तरी कमतरता होती. काहीतरी अजून हवं होतं! मंडळी, ती कमी होती एका चांगल्या गुरुची. कारण अजून खूप काही शिकायचं होतं/शिकायला हवं होतं. पण कोणाकडे?

आणि अशातच एक दिवस जगन्नाथबुवा पुरोहित हे भाईंना गुरू म्हणून लाभले. हिऱ्यालादेखील पैलू पाडणारा कोणीतरी लागतो! तो भाईंना जगन्नाथबुवांच्या रूपाने मिळाला. जगन्नाथबुवा तेव्हा कोल्हापुरातच होते. संगीतक्षेत्रात तेव्हा बुवांचा विलक्षण दबदबा होता. आग्र्याची घराणेदार गायकी, आणि तबला या दोन्ही क्षेत्रात बुवांचा अधिकार. लोक अंमळ वचकूनच असत बुवांना. अशातच एके दिवशी भाई गुरूगृही पोहोचले आणि तबला शिकायची इच्छा व्यक्त केली. बुवांनीही शिकवण्याचे मान्य केले.

आणि आपल्या 'गुरू-शिष्य' या वैभवशाली परंपरेनुसार रीतसर तालीम सुरू झाली. रियाज सुरू झाला. तबल्यातील मुळाक्षरांचा रियाज! अगदी चार चार, सहा सहा तास हा रियाज चाले. जगन्नाथबुवा समोर बसून शिकवत, आणि खडा रियाज करून घेत. तबल्यातील अक्षरांच्या निकासावर बुवांचा जबरदस्त भर असे. कायदे, गती नंतर! आधी अक्षरं! अक्षरं नीट वाजलीच पाहिजेत, दुगल असो की चौगल असो की आठपट असो. कुठल्याही लयीत तेवढ्याच सफाईने अक्षरांचा निकास झाला पाहिजे. शिकवणीबरोबरच बुवांनी स्वतः समोर बसून हा रियाज भाईंकडून करून घेतला हे बुवांचे डोंगराएवढे उपकार मानताना आजही भाईंचे डोळे पाणावतात! ८ ते ९, ९ ते १० असा गाण्याचा क्लास नव्हता तो. बुवा सांगतील तेवढा वेळ रियाज करावा लागे. कुठलंही क्रमिक पुस्तक भाईंच्या हाताशी नव्हतं. बुवांचा करडा चेहरा हेच क्रमिक पुस्तक! शिष्याचं कौतुक वगैरे करणे हा प्रकार तर बिचाऱ्या जगन्नाथबुवांना माहीतही नव्हता. कितीही जीव तोडून वाजवा, बुवा साधं 'ठीक!' एवढंही म्हणत नसत! पण बुवा आमच्या कोकणातल्या फणसासारखे होते. आतून अतिशय प्रेमळ आणि गऱ्यासारखे गोड आणि बाहेरून काटेरी.

उस्ताद अहमदजान थिरखवाखासाहेब यांचीही भाईंना फार उत्तम तालीम मिळाली. खासाहेबांकडून भाईंनी काय नी किती घेतलं याची काही गणतीच नाही. पण थिरखवासाहेबाचं आणि जगन्नाथबुवांचं नेमकं उलटं होतं. बुवा स्वतः लक्ष घालून तासंतास शिकवीत तसे खासाहेब शिकवत नसत. 'मी वाजवतोय. त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या! जमलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या!' अशीच खासाहेबांची भूमिका असे! पण भाईंनी अक्षरशः एखाद्या टीपकागदाने टिपाव्यात तश्या तबल्यातील बंदिशी, त्यातील सौंदर्यस्थळं टिपली. खासाहेबांचीही हळूहळू भाईंवर मर्जी बसू लागली. पेणचे पं विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे भाई केवळ झपतालातल्या खासियती शिकण्याकरता गेले आणि तिथे झपतालाचे धडे गिरवले, तालीम घेतली.
हे सगळं करताना भाईंना विशेष अडचण वाटली नाही. कारण हात तयार होता. जगन्नाथबुवांकडे तासंतास केलेल्या अक्षरांच्या रियाजाचं हे फळ होतं! कुठलीही नवी बंदिश ऐकली की ती तशीच्या तशी त्यांच्या हातातून अगदी सहजपणे आणि तेवढ्याच सुंदरतेने वाजू लागली.

एक शिष्य घडत होता, गुरू-शिष्य परंपरा धन्य होत होती!
"आज आमच्या भाईंनी इतकं सुरेख वाजवलंय की 'घरी गेल्यावर भाईची नको, पण त्याच्या हातांची एकदा दृष्ट काढून टाका!' असं मी वहिनींना सांगणार आहे."!

वरील उद्गार कविवर्य विंदा करंदीकर यांचे आहेत. प्रसंग होता वांद्रे येथील कलामंदीरात झालेला भाईंच्या एकल-तबलावादनाच्या (तबला-सोलो) कार्यक्रमाचा. विंदा आणि भाईंची चांगली मैत्री. त्यांनीही पं विनायकबुवा घांग्रेकरांकडून काही काळ तबल्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना तबल्यातली उत्तम जाण आहे. विंदा राहतातही साहित्य-सहवासात. त्याच्या बाजूलाच कलामंदीर. त्यामुळे ते आवर्जून भाईंच्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला माझ्या सुदैवाने मीही हजर होतो आणि भाईंच्या मागे तानपुऱ्याला बसलो होतो. त्यादिवशी भाईंनी झपताल इतका अप्रतिम वाजवला की कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यात बसलेले विंदा न राहून उठले आणि रंगमंचावर येऊन बोलू लागले. त्यादिवशी विंदा भाईंबद्दल खूप भरभरून बोलले. अगदी कोल्हापुरापासूनच्या आठवणी निघाल्या. विंदाही काही काळ कोल्हापुरात होते. बरं का मंडळी, करवीर ही केवळ चित्रनगरी नव्हती, तर देवलक्लबमुळे ती काही काळ संगीतनगरीही झाली होती! (मिसळनगरी तर ती आहेच!:)

गाण्याला साथसंगत तर भाई उत्तम करतातच, त्याशिवाय एकल तबलावादन हा तर भाईंचा हातखंडा आणि जिव्हाळ्याचा विषय.

साथसंगत करताना तबलावादकाला नुसता तबला येऊन चालत नाही, तर त्याला गाण्याचीही उत्तम जाण असावी लागते. शिवाय ज्याच्या गाण्याला साथ करायची आहे त्या गवयाच्या गायकीची, त्याच्या घराण्याची तबलजीला थोडीफार तरी माहिती असावी लागते. साथसंगतीचा तबला वाजवताना भाईंनी या सगळ्यावर अगदी बारकाईने विचार केला आहे. आपण कोणाला साथ करतो आहोत? त्याचं गाणं कसं आहे? किराण्याच्या संथ आलापीचं आहे, की ग्वाल्हेर अंगाचं तालाशी खेळणारं आहे, की जयपूरची लयप्रधान गायकी आहे, की बोलबनाव करत बंदिशीच्या अंगाने जाणारी आग्रा घराण्याची गायकी आहे? या सगळ्याचा विचार तबलजीच्या साथीत दिसला पाहिजे आणि त्या अंगानेच त्याची साथ झाली पाहिजे. तरच ते गाणं अधिक रंगतं. भाईंनी आजतागायत अनेक मोठमोठ्या गवयांना साथ केली आहे. यात पं रामभाऊ मराठे, पं कुमार गंधर्व, पं यशवंतबुवा जोशी यांची नावं तर अगदी आवर्जून घ्यावी लागतील.

एकदा एका मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे पं शरदचंद्र आरोलकर यांच्याबरोबर भाईंना साथ करायची होती. तस पाहता भाईंना गाण्यातलं ग्वाल्हेर अंग चांगलंच परिचयाचं होतं. पण मंडळी, ग्वाल्हेरातदेखील दोन पाती आहेत. एक विष्णू दिगंबरांचं आणि एक कृष्णराव शंकर पंडितांचं. (तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा.) तर काय सांगत होतो? आरोलकरबुवा दुसऱ्या पातीचे! (सध्या अधिक तपशिलात शिरत नाही.)
बरं का मंडळी, ग्वाल्हेरवाला गवई पटकन हमीर गातो असं म्हणणार नाही. तो म्हणणार, चला जरा झुमरा गाऊया आणि झुमऱ्यातलं 'चमेली फुली चंपा' सुरू करणार. तेच आग्रावाला म्हणणार 'चलो, जरा 'चमेली फुली चंपा' गायेंगे!' तोही 'हमीर' गातो असं म्हणणार नाही. वर 'हम राग नही गाते, हम बंदिश गाते है!' असंही म्हणणार :) याउलट आमचे किराण्याचे अण्णा 'ग म (नी)ध नी‌.ऽ प अशी अत्यंत सुरेल आलापी करून एका क्षणात हमिराचं फार मोहक दर्शन घडवणार! प्रत्येक घराण्याची वेगळी खासियत! असो..
तर कुठे होतो आपण मंडळी? हां, तर आरोलकरबुवांची मैफल होती. आपल्याला त्यांच्याबरोबर वाजवायचं आहे, ते वादन नीट त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे ही भाईंची भावना. भाई कलेशी इतके प्रामाणिक, की आदल्या दिवशी चक्क आरोलकरांच्या घरी गेले आणि म्हणाले, "बुवा, उद्या आपल्याबरोबर वाजवायचंय. आत्ता बसूया का जरा वेळ? आपल्याला काय हवं नको ते सांगा"!

मला सांगा मंडळी, आज किती लोकांजवळ हा गूण आहे? तसे भाईही साथसंगतीत तयार होतेच की. तशीच जर वेळ आली असती तर ऐनवेळेला प्रत्यक्ष मैफलीतही त्यांनी आरोलकरबुवांना अगदी उत्तमच साथसंगत केलीच असती की! मग अशी काय मोठी गरज होती की ते आरोलकरबुवांच्या घरी गेले?
मंडळी, मला वाटतं इथेच भाईंची संगीतकलेविषयीची तळमळ दिसते!
धीऽ क्ड्धींता तीत् धागे धीं....

सभागृह श्रोत्यांनी भरलं होतं. भाईंच्या एकल वादनाचा (तबला-सोलो) कार्यक्रम सुरू झाला आणि भाईंनी वरील पेशकार सुरू केला. आहाहा, मंडळी काय सांगू तुम्हाला!

या भागात आपण एक एकल तबलावादक म्हणून भाई कसे आहेत हे पाहणार आहोत. एकल तबलावादनात भाईंचं नांव विशेषत्वाने घेतलं जातं. भीमण्णा जसे यमन गाताना त्याच्या ख्यालातून तो राग फार सुंदरपणे दाखवतात, त्यांचे विचार मांडतात, तसंच आहे एकल तबलावादनाचं. एकल तबलावादनात एखाद्या कलाकाराचा तबल्यातील विचार दिसतो. त्याची दृष्टी कशी आहे हेही कळतं. हाताची तयारी दिसते. लयीवरचं प्रभुत्व दिसतं.

आयुष्यभर तबल्यावर केलेला विचार, चिंतन, आणि रियाज ह्या सगळ्या गोष्टी भाईंच्या एकल तबला वादनातून अगदी पुरेपूर दिसतात. मंडळी, भाईंचं एकल तबलावादन ऐकायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असं वाटतं. नादब्रह्मच ते! अहो वर उल्लेखलेला पेशकार नुसता सुरू झाला तरी सभागृह भारून जातं. एखादा सार्वभौम राजा सोन्याची अंबारी असलेल्या हत्तीवर बसून जात आहे आणि दुतर्फा माणिकमोती उधळत आहे असं भाईंचा पेशकार सुरू झाला की वाटतं!
धींऽ धाऽग्ड् धा तत् धाऽग्ड्धातीं ताक्ड् ता तत् धाग्ड्धा

ओहोहो, मंडळी हाही एक पेशकाराचाच प्रकार. हा प्रकार थिरखवाखासाहेबांनी बांधला आहे. हा खेमट्या अंगाचा पेशकार. तसं म्हटलं तर खेमटा हा लोकसंगीतातीलच एक तालप्रकार. यावरूनच हा पेशकार खासाहेबांनी बांधला आहे. आपल्या रागसंगीताचं, शास्त्रीय संगीताचं कुठेतरी आपलं लोकसंगीत हेच मूळ आहे असं म्हणतात ते पटतं! हा पेशकार जेव्हा भाईंच्या हातातून वाजू लागतो तेव्हा सभागृह अक्षरशः डोलू लागतं. काय हाताचं वजन, दाह्याबाह्याचं किती सुरेख बॅलंसींग़! दादऱ्या अंगाचा रेला हा तर केवळ भाईंनीच वाजवावा! रेला वाजवताना लयीवरचं आणि अक्षराच्या निकासावरचं त्यांचं प्रभुत्व पाहिलं की थक्क व्हायला होतं. भाईंची पढंतही अत्यंत रंजक आणि नाट्यपूर्ण असते. अगदी ऐकत राहावीशी वाटते. अहो तबल्यावरचे हातदेखील अगदी देखणे दिसले पाहिजेत असं भाई म्हणतात.

मंडळी, भाईंनी नेहमी वेगवेगळ्या गतींना, बंदिशींना एक काव्य मानलं. 'ही बंदिश बघ, ही गत बघ. अरे यार सुरेख कविता आहे रे ही" असं भाई म्हणतात. आणि खरंच मंडळी, आज अशी अनेक काव्य भाईंच्या हातात सुरक्षित आहेत. नव्हे, ती त्यांनी आयुष्यभर जपली आहेत.

आपल्या गुरुंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा भाईंचा अभ्यास आहे. आमिरहुसेनखासाहेबांकडे भाई कधी शिकले नाहीत, पण खासाहेबांचा भाईंवर फार जीव! अल्लारखासाहेबांचं भाईंवर अतिशय प्रेम होतं. भाईकाकांनी, कुमारांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. आज उ झाकीर हुसेन, पं सुरेशदादा तळवलकर, पं विभव नागेशकर, यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना खूप मानतात.
अर्जुन शेजवलांसारखे अत्यंत थोर पखवाजिया भाईंचा फार आदर करीत. अलीकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समसी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे एक आदर्श म्हणून पाहतात. याचं कारण एकच. ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार. काय नी किती लिहू भाईंबद्दल!

मंडळी, आमचे भाई स्वभावानेही अगदी साधे, निगर्वी आणि प्रसिध्दीपऱमुख आहेत. आमच्या उषाकाकूही अगदी साध्या आहेत. भाईंचे चिरंजीव डॉ दिलिप गायतोंडे हे ठाण्यातले एक यशस्वी नेत्रशल्यविशारद आहेत. तेही फार छान पेटी वाजवतात. त्यांनी पं बाबुराव पेंढारकरांकडे पेटीची रीतसर तालीम घेतली आहे.
आजही काही अडलं की कोणीही भाईंकडे जावं. ती व्यक्ती विन्मुख परत येणं शक्य नाही. गेली अनेक वर्ष भाई तबल्याची विद्या सर्व शिष्यांना मुक्तहस्ते वाटत आहेत. ते नेहमी सर्वांना सांगतात, "बाबानो माझ्याकडे जे काय आहे ते मी द्यायला, वाटायला तयार आहे. तुम्ही या आणि घ्या!" अगदी भाई स्वतःदेखील आत्ता आत्ता पर्यंत पुण्याच्या पं लालजी गोखल्यांकडे मार्गदर्शनाकरता जायचे. लालजी आता नाहीत.

वयाच्या पंचाहत्तरीतदेखील भाईंचा स्टॅमिना आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजपर्यंत भारतभर तबल्याच्या अनेक शिबिरांत, प्रात्यक्षिक-व्याख्यानासारख्या कार्यक्रमांत भाईंनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. आपले विचार लोकांना ऐकवले आहेत. काही काही वेळेला जोडून सुट्टी वगैरे आली की सर्व शिष्यांना घेऊन भाई बाहेरगावी जातात. तिथे त्यांच्याकडून ३-३ दिवस रियाज करून घेतात. जगन्नाथबुवांनी भाईंकडून असाच रियाज करून घेतला होता. भाई आज तेच करत आहेत. गुरू शिष्य परंपरा!!
मला माझ्या सुदैवाने भाईंचं खूप प्रेम मिळालं. गाण्यातल्या, तबल्यातल्या अनेक गोष्टींवर भाई माझ्याशी अगदी भरभरून बोलले आहेत. कधीही भेटलो की कौतुकाने "काय तात्या, काय म्हणतोस" असं विचारणार. मग मी हळूच त्यांचं पान त्यांना देणार. मग मला म्हणणार "क्या बात है! आणलंस का पान! अरे पण तंबाखू फार नाही ना घातलास?:)

त्यांच्या एकलतबलावादनात त्यांच्या मागे मी अनेकदा तंबोऱ्याला बसलो आहे. तंबोरा छान लागला की लगेच "क्या बात है" असं म्हणून कौतुक करणार! इतक्या मोठ्या मनाचे आहेत आमचे भाई. ठाण्यात माझा एक बंदिशींचा कार्यक्रम झाला होता. त्याला ते आवर्जून आले होते. "चांगल्या बांधल्या आहेस बंदिशी" असं कौतुक केलं आणि पाठीवरून हात फिरवला. "नेहमी असंच काम करत रहा" असं प्रोत्साहनही दिलं!

मंडळी, अनेकदा भाईंशी बोललो आहे. पण बोलता बोलता भाई मनानं कोल्हापुरात जातात आणि पुन्हा एकदा हा शिष्य जगन्नाथबुवांच्या आठवणीने हळवा होतो. स्वतःच्या वडिलांचादेखील मृत्यू अगदी धीराने घेणारा हा माणूस, पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा मात्र हमसाहमशी रडला होता. आजही त्यांचे डोळे पाणावतात. मला म्हणतात, "कोणाच्याही मृत्युचं विशेष काही नाही रे तात्या. तो तर प्रत्येकाला येणारच आहे एके दिवशी. पण जगन्नाथबुवा गेले तेव्हा असं वाटलं की आता आपल्याला काही अडलं तर विचारणार कोणाला? हे चूक, हे बरोबर, असं कर, असं करू नको हे सांगणारं कोणी राहिलं नाही रे तात्या. असं वाटतं की पुन्हा एकदा जगन्नाथबुवांसमोर बसावं आणि अक्षरांचा रियाज करावा, अगदी त्यांचं समाधान होईपर्यंत!"

--तात्या अभ्यंकर.

देवासचे कुमारजी...

नमस्कार मंडळी,
१९८९-१९९० च्या दरम्यानची गोष्ट. मी काही कामानिमित्त भोपाळला गेलो होतो. एका सकाळी विशेष काही काम नव्हते, म्हणून जरा भोपाळात भटकत होतो. झकासपैकी जाडनळीची, पाकाने भरलेली, साजुक तुपातली गरमागरम जिलेबी, त्यावर २ ग्लास गरमागरम केशरी आटीव दुध रिचवून आणि १२० जाफरानीपत्तीयुक्त पानाचा तोबरा भरून मस्त मजेत भोपाळात हिंडत होतो. नोव्हेंबर महिन्यातली भोपाळमधली सुरेखशी थंडी, गरमागरम दुध-जिलेबी, आणि १२० तंबाखूपानाची लज्जत! क्या बात है!! मस्त माहोल जमला होता. नकळत सकाळचा भटियार मनाचा ताबा घेत होता. हिंडता हिंडता s t stand पाशी आलो. समोरच "भोपाल-देवास" अशी पाटी असलेली बस उभी दिसली. आणि एकदम मला कुमारजींची (पं कुमार गंधर्व) आठवण झाली! कुमारजी देवासला रहायचे. "जायचं का कुमारजींना भेटयला"? क्षणभर मनामध्ये विचार आला आणि चढलोसुध्दा त्या बसमध्ये!

बसमध्ये मोजकीच माणसं. झकासपैकी खिडकीतली जागा मिळाली होती. पान तर फारच सुरेख जमलं होतं. पिचकारी मारायला खिडकीही मिळाली होती! :) आता मगासच्या भटियारची जागा "सोहनी-भटियार" ने घेतली होती! सोहनी-भटियार हे खास कुमारांचं combination! सोहनी हा उत्तररात्रीचा बादशहा आणि भटियार हे सकाळचं वैभव! कुमारांनी या दोघांना एकत्र आणून "सोहनी-भटियार" हे एक अजब रसायन बनवले आहे. त्यांची त्यातली "म्हारुजी, भुलो ना माने" ही बंदिश प्रसिध्द आहे.

दुपारी एक दिडच्या सुमारास देवासांत उतरलो. वातावरणांत सुरेख गारवा होता. एक छानसा फुलांचा गुच्छ घेतला. समोरच टांगा दिसला. कुमारांचा पत्ता मला माहीत नव्हता. पण देवास तसं फार मोठं नाही. त्या टांगेवाल्यालाच विचारलं,
"कुमारजी कहा रहते है पता है आपको"?
तो लगेच म्हणाला,"देवासमे उन्हे कौन नही जानता? आप बौठिये बाबुजी, हम छोडे देते है आपको उनकी कोठीपे"!

आता मात्र मला थोडंसं टेन्शन यायला लागलं. इथपर्यंत आपण आलो खरे, पण बोलणांर काय त्यांच्याशी? तशी त्यांची माझी ओळख होती. यापूर्वी अनेकदा मुंबै-पुण्याला त्यांच्या बैठकी मी ऐकल्या होत्या, त्यांना भेटलो होतो. पण त्यांचा स्वभाव थोडासा तापट आणि विक्षिप्त होता हे मला माहीत होतं!

तेवढ्यांत त्यांचं घर आलं. मी टांग्यातून उतरलो. देवासचा फारच सुंदर आणि निसर्गरम्य परिसर! एका लाहानश्या टेकडीपाशी आमचा टांगा थांबला होता. त्या टेकडीवरच त्यांचा सुरेख बंगला होता. मी हळूच फाटकापाशी आलो, आणि बघतो तर काय, समोरच कुमारजी त्यांच्या बंगल्याबाहेरील बागेत निवांतपणे बसले होते. मला पाहून स्वतः फाटकापाशी आले आणि मला पाहून म्हणाले,
"अरेच्च्या, तुम्ही इकडे"? "हो, जरा कामाकरता भोपाळपर्यंत आलोच होतो. तुम्हाला भेटावसं वाटलं म्हणून मुद्दाम आलो"
"वा!, या की मग. आतच बसुया"

हुश्श! माझं मगासचं टेन्शन एकदम नाहीसं झालं! ते मला त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे वसुंधराताई बसल्या होत्या. मी त्या दोघांनाही वाकुन नमस्कार केला. "काय, कसं काय" वगैरे प्राथमिक बोलणं झाल्यावर साहजिकच आमच्या गप्पांचा ओघ गाण्याकडे वळला.

मला याची पूर्ण जाणीव होती की मी एका विलक्षण प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वासमोर बसलो होतो! सर्व परंपरांच्या परे गाण्याकडे बघणारा, ख्यालगायकीमध्ये संपूर्णपणे एक वेगळीच वाट शोधणारा, अत्यंत प्रयोगशील, सर्जनशील असा कलावंत म्हणजे कुमारजी! राग, सूर, लय, ताल, गाण्यातली घराणी, बंदिशी, रागसंगीत व लोकसंगीत, कबीर, मीराबाई यांचं साहित्य, निसर्ग, ऋतुमान यांचा गाण्याशी संबंध इ. अनेक गोष्टींवर त्यांनी फार बारकाईने विचार केला होता हेही मला माहीत होतं. त्यामुळेच मला त्यांच्याशी बोलायचं टेन्शन आलं होतं.

कुमारजी म्हणजे मध्यलयीचे बादशहा! त्यामुळे मी हळूच माझ्या बोलण्यातून त्यांना "लयी बद्दल तुमच्याकडून काही विचार ऐकायची इच्छा आहे" असं सांगीतलं. आणि ते भरभरून बोलू लागले. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी अक्षरशः त्यांच्या विचारांचा खजिना माझ्यासमोर ओतला. रागसंगीताबद्दलचे आणि ख्यालगायकीचे त्यांचे अनेक विचार त्यांनी मला सांगितले. त्यांची प्रतिभा खरंच थक्क करणारी होती! त्यानंतर त्यांच्या निर्गुणी भजनांचा मी विषय काढला. त्यावरदेखील ते माझ्याशी खूप चांगलं बोलले.
"उड जायेगा हंस अकेला,
जगदर्शन का मेला"

ह्या कबिराच्या भजनाबद्दल ते बोलू लागले. त्यातल्या,
"जम के दूत, बडे मजबूत,
जमसे पडा है झमेला,
उड जायेगा हंस अकेला"!!

या ओळी वाचतानाच या भजनाची चाल त्यांना सुचली असं ते म्हणाले.
बोलता बोलता तंबोऱ्यांचा विषय निघाला. मला म्हणाले, "अरे तंबोरा उत्तम लागला नाही तर गाणार कसं? तंबोरा हा तर गायकाचा आरसा. आरसा जर धुसर असेल तर आपण त्यांत स्वतःला नीट पाहू शकतो का? मग तंबोरा जर नीट लागला नसेल तर गायक त्याची साथ घेऊन चांगली अभिव्यक्ती करु शकेल का"?!! कुमारजींच्या घरी तंबोऱ्याची एक सुरेल जोडी सुंदर गवसणीत घालून ठेवली होती.
मी म्हटलं, "गवसणी फार सुंदर आहे हो, कुठून आणल्या ह्या गवसण्या"?तर ते हसून मला म्हणाले, "अरे त्या शिवून घेतलेल्या आहेत. ते रजईचं जाडं कापड आहे"!!"रजईचं कापड"?"अरे आता थंडी पडेल ना? मग तंबोऱ्यांना नाही का वाजणांर थंडी"?!! या दिवसांत रजईच्या कापडाच्या गवसण्या माझ्या तंबोऱ्यांना असतांत आणि उन्हाळ्यातल्या पात्तळ तलम कापडाच्या गवसण्या वेगळ्या आहेत!!

मला गाणं म्हणजे काय ते हळुहळु कळत होतं!!

वसुंधराताईंनी मस्तपैकी कन्नड पध्दतीचा थालीपिठासारखा एक पदार्थ खायला दिला. त्याचं नांव आता माझ्या लक्षात नाही. गरमागरम कॉफी केली. पुन्हा एकदा त्या दोघांनाही नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला. जातांना त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर चारही बाजूला फार सुंदर बाग केली होती, ती त्यांनी मला दाखवली.

बसस्टॉपपाशी आलो. एव्हांना संध्याकाळ झाली होती. अर्धा तास थांबल्यावर मला भोपाळची बस मिळाली. आम्ही अवघे ८-१० प्रवासीच त्यात होतो. अंधार पडायला लागला होता. बस भोपाळच्या दिशेने भरधाव निघाली होती. खिडकीत गजाला डोकं टेकून शांत बसलो होतो. देवासच्या आसपासच्या परिसरातल्या गर्द झाडीतून आता बोचरा गार वारा अंगावर येत होता. कुमारजीं आणि वसुंधराताईंनी माझा फार उत्तम पाहूणचार केला होता. मनांत फक्त कृतार्थतेची भावना होती. खूप काही हाती लागल्यासारखं वाटत होतं! आणि अजून आपल्याला बरंच शिकायचं आहे हेदेखील समजलं होतं!!

"उड जायेगा हंस अकेला, जगदर्शन का मेला"

या ओळींचा अर्थ, आणि त्यातल्या सुरावटींतली आर्तता त्या धावत्या बसमध्ये मला अस्वस्थ करून गेली!!
--तात्या अभ्यंकर.

बाबुजींची एक आठवण...

राम राम मंडळी,
आज मी आपल्याला बाबुजींची (स्व सुधीर फडके यांची) एक आठवण सांगणार आहे. माझ्या मनांत तो दिवस आजही घर करून राहिला आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मला आता महिना आणि वर्ष नक्की आठवत नाही, मात्र वीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीची ही घटना आहे, एवढं नक्की.

त्या काळात मी बऱ्याचदा त्यांच्या घरी जात असे. त्यांच्याबद्दल मनात नेहमी आदरयुक्त भितीच असायची. तसे ते माझ्याशी बोलायचे, नाही असं नाही. कधी मुडात असले तर माझी, "काय पंडितजी, आम्हाला कधी ऐकवणार तुमचं गाणं? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडं थोडं!" अशी फिरकीही घ्यायचे!! पण मीच फारसा त्यांच्या वाऱ्याला उभा रहात नसे! त्यांच्या घरी गेलो तरी जास्त वेळ ललितामावशींशीच बोलत असे. खूप गोड आहेत हो आमच्या ललितामावशी!

बाबुजींना एकदा रुटीन चेकप् करता दादर येथील डॉ फडके (माझ्या आठवणीप्रमाणे हिंदु कॉलनीतील डॉ अजित फडके) यांना भेटावयाचे होते. पण डॉ फडके यांनी तो वार केईएम् रूग्णालयाच्या व्हीजीटसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे बाबुजींनी तपासणीकरता केईएम् लाच जायचे ठरवले होते. योगायोगाने मी त्या दिवशी बाबुजींच्या घरी त्यांना भेटावयास गेलो होतो.
ललितामावशींनी मला म्हटलं, "अरे तू आज बाबुजींसोबत केईएम् ला जाशील का?" मी आनंदाने होकार दिला! एकीकडे मनात भितीही होती, पण बाबुजींचा सहवास काही वेळ मिळणार म्हणून मला आनंदही झाला होता. ललितामावशींनी मला टॅक्सीनेच जा, जपून जा असं बजावून सांगितलं होतं.

झालं! आम्ही दोघे शंकर निवासच्या बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर लगेच मला बाबुजी म्हणाले, "अरे अमुक अमुक नंबरची बस केईएम् ला जाते. आपण तिनेच जाऊया. टॅक्सी वगैरे उगाच नको"!! आता मडळी, आली का माझी पंचाईत? बाबुजींनी पहिलाच बॉल अवघड टाकला होता! पण मावशींनी मला बजावलं होतं, त्यामुळे मी टॅक्सीचाच आग्रह धरला. अखेर त्यांनी मान्य केलं. मी हुश्श केलं!

आम्ही दोघे टॅक्सीत बसलो. टॅक्सीवाल्याने विचारलं, "कहा जाना है?" झालं! बाबुजी त्याच्यावर वैतागले. "तुम्ही मुंबईत टॅक्सी चालवता आणि तुम्हाला मराठी येत नाही"? त्यावर तो उर्मटपणे म्हणाला, "तो क्या हुआ?"वातावरण अंमळ तापू लागलं तेव्हा मीच मध्ये पडलो. आणि बाबुजींची समजूत घातली!

थोड्याच वेळात आम्ही केईएम् ला पोहोचलो. आम्हाला तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं. बाबुजी जिन्याकडे जाऊ लागले. मी त्यांना म्हटलं, "जिन्याने नको. लिफ्टची सोय आहे, आपण लिफ्टनेच जाऊ. उगाच आपल्याला त्रास होईल" झालं! पुन्हा माझ्यावर बाबुजी वैतागले. "तुम्ही लोकांनी मला अपंग करायचं ठरवलं आहे की काय? मी जिन्यानेच जाणार. काही होत नाही मला"! मी पुन्हा त्यांची समजूत काढली, "ललितामावशींनी मला अगदी निक्षून सांगितलं आहे की आपल्याला अगदी जपून, सांभाळून घेऊन जा म्हणून. आपण कृपया ऐका माझं"थोडेसे वैतागूनच ते लिफ्टकडे वळले. आम्ही डॉक्टर फडके यांच्या खोलीपाशी गेलो. दरवाजा बंद होता. बाहेर १०-१२ रुग्ण नंबर लावून वाट पहात होते. डॉक्टर आत एका रूग्णाला तपासत होते.

तेवढ्यात काही कामाकरता डॉक्टर बाहेर आले, आणि त्यांनी बाबुजींना बाहेर थांबलेलं बघितलं. अदबीनेच ते आमच्या जवळ आले, आणि म्हणाले, "बाबुजी, आत चला. आता आपल्यालाच तपासतो."

"नाही! मी रांगेतच थांबतो. माझा नंबर येईल तेव्हाच मी आत येईन! "

डॉक्टर म्हणाले, "कमालच करताय आपण. अहो, आपल्याला कशाला हवा नंबर? आपण please आत चलावं".
"नाही! इथे मी बाबुजी वगैरे कोणी नाहीये. ही मंडळी इथे इतका वेळ थांबली आहेतच की नाही? तसाच मीही थांबेन"! पुन्हा ठाम उत्तर.

साधारण तासाभराने आमचा नंबर लागला! तपासणी झाली आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर बाबुजींच्या एका चाहत्याने त्यांना गाठलं. वाकून नमस्कार केला. बाबुजींनी त्यांची कुठे असता, काय नांव वगैरे आस्थेने चौकशी केली.
ते गृहस्थ बाबुजींना म्हणाले, "माझी आई इथेच ऍडमीट आहे. आम्ही सगळे कुटुंबीय आपले चाहते आहोत. आपण येता का २ मिनिटाकरता माझ्या आईच्या खोलीत? तिला खूप आनंद होईल"!

बाबुजींना त्या गृहस्थाचा आग्रह मोडवेना. आम्ही त्यांच्या आईच्या खाटेपाशी गेलो. बाबुजींना पाहताच त्या वृध्द स्त्रीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. उठवत नसतानाही ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली! बाबुजीनी तिचीदेखील आस्थेने चौकशी केली. आकाशवाणीवर प्रथमच जेव्हा गीतरामायणाचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारीत झाला तो मी ऐकला आहे, असं तिने बाबुजींना अडखळत सांगितलं! आजारपणामुळे तिला बिचारीला धड बोलताही येत नव्हतं!

मंडळी, बाबुजी काय, भीमण्णा काय, फार मोठी माणसं ही! वरील लेख वाचतांना टॅक्सीच्या, लिफ्टच्या, उदाहरणांवरून एखाद्याला बाबुजी खूप हट्टी वाटतील. मलादेखील वाटले!! पण मंडळी, हा हट्टीपणा नव्हे. जीवनाशी आयुष्यभर झगडा करून कमावलेलं तेज आहे हे! या झगड्यातूनच त्यांनी हा पीळ कमावला होता!!

आम्ही टॅक्सीत बसलो. आता मात्र बाबुजी मुडात आले होते. अब्दुलकरीमखासाहेब, हिराबाई बडोदेकर, नारायणराव बालगंधर्व यांच्यावर भरभरून बोलू लागले. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य ते मला समजावून देऊ लागले. या तीनही दिग्गजांना बाबुजी गुरूस्थानी मानत. किती मधुकरवृत्तीने त्यांच्या गायकीचा अभ्यास करून त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या संगीतात केला होता!! त्यांच्याबद्दल बोलताना ते अगदी भारावून गेले होते.

मी एकाचवेळी एका माणसाचा जिद्दीपणा, हट्टीपणा पहात होतो, आणि एका शिष्याचं त्यांच्या गुरुंवरचं प्रेम, भारावलेपण बघत होतो.

आजही मी शिवाजीपार्क येथील त्यांच्या घरी जातो. ललितामावशींना, श्रीधरजींना भेटतो. मात्र आजही त्यांच्या दिवाणखान्यात गवसणीत बंद करून ठेवलेली तंबोऱ्यांची जोडी मला अस्वस्थ करून जाते!!!!

तात्या अभ्यंकर.

बुवा.

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी!

आमचा बुवा हे गाणं बऱ्याचदा म्हणतो. रात्रीचे दहा/साडेदहा वाजले आहेत. बुवा आता झोपायच्या तयारीत आहे. पण गेली अनेक वर्षे झोपायच्याआधी अशी काही गाणी बुवा गुणगुणतो. अगदी छान आणि सुरेल! रात्रीचं जेवण झालं की बुवा विडी शिलगावणार. त्याच्या भाषेत सांगायचं तर खाकी! बुवा विडीला 'खाकी' म्हणतो. खाकी ओढून झाली की मग बुवा मुडात येणार. मग कधी एखादा अभंग, एखादं भावगीत असं काहीतरी गुणगुणणार आणि झोपी जाणार. गेली अनेक वर्ष त्याचा हा क्रम सुरू आहे.

बुवा मूळचा सुधागड तालुक्यातील एका लहानश्या गावातला. शिक्षण तसं फार नाही. असाच पोटापाण्याकरता भटकत मुंबईत आलेला. कोणाच्यातरी ओळखीने लागला एकदाचा गोखल्याच्या भटारखान्यात, तो आजतागायत तिथेच आहे. याहून अधिक बुवाचा पूर्वइतिहास मलाही माहीत नाही. मी तरी त्याला 'गोखल्याच्या हाटेलातला एक आचारी' म्हणूनच इतके वर्ष ओळखतो.

आमच्या गोखल्याचं हाटेल म्हणजे हाटेल कसलं ते, रस्त्यापासून सुरू होत मागील दारापर्यंत जाणाऱ्या तीन लहान लहान खोल्या. बाहेरच्या खोलीत फळ्या टाकलेल्या. त्यावर प्लेटा ठेवून उभ्याउभ्याच खायचं. त्याच्या मागे भटारखान्याची खोली. त्याच्या मागे हाटेलचा शिधा ठेवण्याची खोली. आमचा बुवाही त्याच खोलीत गेली अनेक वर्ष राहतो आहे. कपड्याचे एखाद-दोन जोड, एक लहानशी ट्रंक, आणि फटका मारल्याशिवाय सुरू न होणारा एक लहानसा ट्रान्जिस्टर, एवढंच काय ते बुवाचं सामान. रेडियोवरची गाणी मात्र बुवा आवडीने ऐकतो. तेवढीच काय ती त्याची करमणूक. "तात्या, तू फटका मारून बघा एकदा. नाही सुरू होणार हा रेडियो. त्याला मालकाचाच हात कळतो" असं बुवा गमतीने म्हणतो.

एका मोडकळीस आलेल्या रेडियोवरच काय ती बुवाची मालकी!

मिसळीच्या प्रेमापायी गोखल्याच्या हाटेलात माझा नेहमीचा राबता. मालकांपासून सगळे ओळखीचे. मालकांच्या गैरहजेरीत स्वतःलाच मालक समजत कॅशेरचं काम पाहणारा म्यॅनेजर शंकरराव, पाण्याचे गिल्लास, कपबश्या, प्लेटा धुणारा आमचा काशिनाथ, ('च्यामारी या शंकररावाला एकदा चांगला हाणला पाहीजे' हे काशिनाथाचं नेहमीचं स्वगत!;) गिऱ्हाईकांना मिसळ, बटाटवडे, साबुदाणाखिचडी, पोहे, थालीपीठ असली परब्रह्म प्लेटीतून आणून देणारा रघ्या, आणि बुवाचा स्वयंपाकातला अशिष्टंट दामू, आणि आमचा बुवा. बुवा मात्र तिकडचा मुख्य आचारी!

"मिसळप्रेमी तात्या" अशीच माझी गोखल्याकडे ख्याती आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी माझ्या अगदी घरोब्याची. मला तिथे उभं राहून मिसळ खाताना पाहून आत वड्यांकरता उकडलेले बटाटे कुस्करत असलेला, तर कधी साबुदाणावड्याचं पीठ मळत असलेला बुवाही कधी कधी आतूनच ओरडतो, "काय रे तात्या, थोडा रस्सा पाठवू काय? जा रे रघ्या, तात्याला थोडी तिखट 'तरी' नेऊन दे.!" का माहीत नाही, पण शंकर, काशिनाथ, रघ्या, दामू या सगळ्या मंडळींत बुवा माझा विशेष लाडका, आणि मीही बुवाचा! ;)

बुवा आता पन्नाशीच्या थोडा पुढेच असेल. तो सदैव खाकी हाफ पँट आणि बाह्यांचा गंजी, ह्याच वेषात असतो. आज जवळ जवळ ३०-३५ वर्ष बुवा गोखल्याकडे आचाऱ्याचं काम करतोय. लग्नकार्य त्याने केलेलं नाही. दिवसभर भटारखान्यात काम करणे, ते संपलं की तिथेच मागच्या शिध्याच्या खोलीत झोपणे. झालं, संपला दिवस बुवाचा. १०-१२ मिनिटं रोजचं वर्तमानपत्र चाळतो, आणि आकाशवाणी मुंबई 'ब' वरची गाणी आणि मराठी बातम्या मात्र आवर्जून ऐकतो. इतकाच काय तो बुवाचा बाह्य जगाशी संपर्क. दर सोमवारी हाटेल बंद असतं. त्या दिवशी मात्र बुवाला अख्खा दिवस आराम. मग कुठेतरी दिवसभर तलावपाळी, कौपिनेश्वर मंदिर, येऊरचा डोंगर, असा भटकत असतो.

बुवाची रोजची सकाळ मात्र अगदी लवकर सुरू होते. मिसळीकरता उसळ बनवणे, बटाटवड्यांचं पुरण तयार करणे, उपासाच्या पदार्थांची तयारी करणे, अशी अनेक कामं त्याला करायची असतात. पण या कामात त्याला दामुची बरीच मदत होते. मग बेसनाचे/डिंकाचे लाडू, अनरसे, शंकरपाळे, पोह्यांचा चिवडा, असे पदार्थही त्याला अधनंमधनं संपतील तसे करायला लागतात. हे पदार्थ बरण्यांत ठेवून गोखल्या त्याची काउंटरवरून विक्री करतो. मग केव्हातरी दुपारी बुवाच्या मुख्य कामांचा उरका पडतो. पुढची कामं करायला दामूचीही आताशा पुष्कळ मदत होते. त्यानंतर निवांतपणे जेवून, एखादी खाकी शिलगावून दोन घटका मागीलदारी जाऊन बुवा जरा वेळ वर्तमानपत्रही चाळतो.

अशीच एक छानशी दुपार. मी मिसळ खायला हाटेलात गेलो होतो. गिऱ्हाईकांची फारशी वर्दळ नव्हती. मिसळ खाता खाता मध्येच मला,

"हवाच तितुका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,
चोचीपुरता देवो दाणा मायमाऊली काळी
एकवितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी
देणाराचे हात हजारो दुबळी माझी झोळी"

या सुंदर ओळी भटारखान्यातून ऐकू आल्या. नकळत, "वा, क्या बात है" अशी माझी दाद गेली. समोरच डिंकाचे लाडू वळत वळत हे गाणं म्हणत बुवा बसला होता. माझी दाद गेल्यावर मिश्किलपणे माझ्याकडे पहात म्हणाला,

"काय तात्या, लाडू खायचाय काय? आत ये पाहू."

मी भटारखान्यात शिरलो. गोखल्याच्या हाटेलात आपल्याला सगळीकडे फ्री पास आहे.;) डिंकाचे लाडू बाकी आमचा बुवा झकासच करतो हो!

"लाडू मस्तच झालाय रे बुवा. गाणंही फार छान गातोस तू"

"कसलं छान बोडक्याचं! अरे रेडियोवर लागणारी गाणी ऐकून ऐकून जरा आपलं गुणगुणतो झालं."

"अरे नाही. खरंच फार छान वाटतं रे ऐकायला."

असा आमचा संवाद बऱ्याचदा झाला आहे. मी 'तुझं गाणं ऐकायला फार छान वाटतं रे बुवा' असं म्हटलं की मग मात्र बुवाची कळी नेहमीच खुलते. मग त्या नादात बुवा माझ्याशी बऱ्याच गप्पा मारतो. मध्येच, "अरे दाम्या लेका रश्श्याखालचा ग्यास पेटव पाहू. रस्सा गार झाला असेल बघ!" किंवा "काय तात्या, आल्याची फर्मास वडी खाणार काय? ए दाम्या, तात्याला त्या बरणीतली आल्याची वडी दे पाहू" असा बॉसच्या थाटात दामूला हुकूमही सोडतो;)

"काय सांगू तुला तात्या, लहानपणी शाळेत तसा चार यत्ता शिकलो आहे हो मी. मला गाण्यांची, कवितांची खूप आवड. मास्तर जे काय शिकवायचे ते अगदी मन लावून शिकायचो. पण परिस्थितीमुळे फार काळ शिकता नाही आलं रे. बाप वारला आणि खायचेच वांधे झाले म्हणून घराबाहेर पडलो. इकडूनच कसे बसे चार पैसे जमतील तसे गावी आईला पाठवत होतो. आता तीही खपली."

आज मी इतके वर्ष बुवाला ओळखतोय, पण त्याच्या बोलण्यात चुकूनसुद्धा कधी मालकांबद्दल उणा शब्द मी ऐकला नाही. त्याला पगार किती हेही मला माहीत नाही. पण जेव्हा जेव्हा मालकांचा विषय निघतो तेव्हा तेव्हा 'आमचा मालक म्हणजे देवमाणूस हो' असंच बुवा म्हणतो. काय सांगू तुला तात्या, "अरे इथे आलो तेव्हा धड कांदासुद्धा मला चिरता येत नव्हता. पण मालकांनी प्रेमाने ठेवून घेतलं हो. हळूहळू मग मीच सगळी कामं शिकलो. पदार्थ बनवायला शिकलो. आता मात्र बरं चाललं आहे. आणि तसंही एकंदरीत बरंच आयुष्य गेलं असंच आता म्हणायचं रे तात्या. कशाला उगाच कोणाकडे तक्रार करा, रडगाणं गा?!"

"काय रे बुवा? आज ठीक आहे, पण उद्या हातपाय थकल्यावर कुठे जाणारेस? काय करणारेस? कुठे राहणारेस, काही विचार केला आहेस का? मालक काही काम न करता बरा राहू देईल तुला म्हातारपणी?"
मला गेले अनेक दिवस हा प्रश्न बुवाला एकदा विचारायचाच होता.

"खरं सांगू का तुला तात्या? तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर आजतरी माझ्याकडे नाही. उद्याचं उद्या बघू! आणि तुला सांगतो, अरे आजपर्यंततरी दोन वेळच्या भुकेला आणि डोक्यावरच्या छताला काहीही कमी पडलं नाही आणि यापुढेही पडणार नाही. अरे तात्या, उगाच आपल्या हातात नसलेल्या भविष्यातल्या गोष्टींची फार कशाला काळजी करा?

"महाल माड्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया,
गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी,
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी."


"एवढंच माझं मागणं आहे रे. आणि ते नक्की पुरं होईल याची खात्री आहे. अरे आयुष्यभर जीव लावून हे गाणं गातोय ते थोडंच फुकट जाणारे? आणि काय सांगावं, अरे उद्या कदाचित तो देणारा इतकं देईल की ते घ्यायला माझीच झोळी दुबळी पडेल रे तात्या!"

बुवाचं हे उत्तर ऐकून मात्र मी एकदम भारवूनच गेलो. 'गाणं' शब्दशः जगणारी फार कमी माणसं असतात, त्यापैकी बुवा एक! बोलबोलता एक गाणं बुवा मला किती सहज शिकवून गेला!

आज बुवाबद्दल चार ओळी लिहायला बसलो आहे खरा, पण काय लिहू ते सुचत नाही. आणि तसं पाहता एखादा लेख लिहिण्याएवढा बुवा लौकिकअर्थाने मोठाही नाही. पण लौकिकअर्थाने कुणीही नसला तरी माझ्याकरता मात्र बुवा खरंच खूप मोठा आहे.

बरं का मंडळी, माझ्या बऱ्याचदा मनात येतं की बुवाला एखादा छानसा रेडियो भेट म्हणून द्यावा. वास्तविक शंभर-दिडशे रुपायांचा रेडियो घेणं आज बुवालाही तसं जड नाही. पण मला मात्र उगाचच वाटतं की आपणच तो रेडियो बुवाला द्यावा. पण माझं मन धजत नाही.

रेडियोच्या पाठीवर जोरात थाप मारून तो सुरू झाल्यावर त्याच्या मालकाला होणारा आनंद मी कशाला हिरावून घेऊ? आणि नवा रेडियो आणल्यावर मग आमचा बुवा मला मोठ्या मिश्किलीने हे तरी कसं म्हणणार,

"तात्या, तू फटका मारून बघा एकदा. नाही सुरू होणार हा रेडियो. त्याला मालकाचाच हात कळतो"!!!

--तात्या अभ्यंकर.