June 09, 2007

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..

राम राम मंडळी,

दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..

आमच्या ठाण्याच्याच राहणार्‍या एक संस्कृत भाषेच्या विदुषी सौ अदिती जमखंडिकर यांनी एका कार्यक्रमाकरता संस्कृत भाषेचं वर्णन करणार्‍या,

संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी
सकलसंस्कृती मुकुटविलासिनी
ज्ञानविज्ञानविद्याकलाशालिनी
महाकाव्यकथानाटकभूषिणी
नमनं नत शिरसा..

चूभूद्याघ्या - मला संस्कृत नीटसं लिहितादेखील येत नाही! ;)

थोडक्यात मुजिक डायरेक्शणच म्हणा ना! ;)

मी या ओळींना भैरवी रागाचा साज चढवला आणि सौ वरदा गोडबोले व डॉ राम देशपांडे या आजच्या तरूण पिढीतल्या अभिजात संगीत गाणार्‍या आघाडीच्या गायकांनी उत्तम तर्‍हेने गाऊन या ओळींचं आणि माझ्या चालीचं सोनं केलं.

डॉ राम देशपांडे यांनी पं यशवंतबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, पं उल्हास कशाळकर, पं यशवंत महाले यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली आहे. रामवर एखादा लेख मी लवकरच लिहिणार आहे. सौ वरदा गोडबोले यांच्यावर माझा विस्तृत लेख आपल्याला
इथे वाचता येईल. माझ्या अजूनही काही बंदिशी वरदाने गायल्या आहेत त्या मी यथावकाश जालावर चढवीन आणि त्याची माहिती इथे सवडीने देईनच!

या गाण्याला संवादिनीची साथ पं विश्वनाथ कान्हेरे यांनी केली आहे.

कान्हेरेबुवा हे
पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य. कान्हेरेबुवांची संवादिनीची साथसंगत अगदी ऐकण्यासारखी असते. फारच सुरेख! भारतातल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना बुवांनी साथ केली आहे. पं उल्हास कशाळकरांच्या साथीला नेहमी बुवाच असतात.

माझा बुवांशी अगदी चांगला परिचय आहे, हे मी माझं भाग्य समजतो. कधी बुवांच्या घरी गेलो की बुवा स्वतः प्रेमाने पिठलंभात करून वाढतील, आणि अगदी मनसोक्त पेटी ऐकवतील. 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी कोकणी शिवी देऊन 'बस रे, काय घाई आहे? एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील! ;)

तबल्याच्या साथीला धनंजय पुराणिक आहेत. आज नाट्यसंगीताच्या किंवा भजनाअभंगांच्या साथीला धनंजय पुराणिकच पाहिजेत असा आग्रह अनेक मोठे कलाकार नेहमी धरतात. मंडळी, हा धन्या पुराणिक आपला दोस्त बरं का. राहणारा डोंबिवलीचा. धन्याचं घराणं हे मूळचं कीर्तनकारांच्या परंपरेतलंच घराणं. धन्या स्वतः गातोही उत्तम! असो..

मंडळी, राग भैरवीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या मते राग भैरवी म्हणजे खुद्द आपली भारतीय संस्कृती! आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी! माझ्या तरी भैरवीबद्दल याच भावना आहेत. भैरवीबद्दल विस्तृतपणे एकदा केव्हातरी लिहिणारच आहे.

बराय तर मंडळी, अदितीताईंच्या वरील ओळी आपल्याला
या दुव्यावरून उतरवून घेता येतील आणि ते गाणे ऐकता येईल.

ऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा हो! ;)

आपला,
(गाण्याखाण्यातला) तात्या.

No comments: