November 10, 2010

दु:खाच्या वाटेवर..


(येथे ऐका)
'...वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली, अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली..!'

भटसाहेबांच्या या शब्दांवर काय बोलावं? खूप काही सांगून जाणारे हे शब्द, आपण फक्त अनुभवायचे इतकंच...!

वाटच मुळी दु:खाची आहे. ते कमी की काय, की त्या वाटेवर तुझं गाव लागावं अन् वेशीपाशीच भेटावी तुझी उदास हाक..त्या हाकेसरशी मग माझे पाय थबकतात अन् माझी पायपीट सांडू लागते माझ्या डोळ्यातनं. अगदी माझ्या नकळत..!

भटसाहेबांचे शब्द, सुधीर मोघ्याचे यमनचे स्वर अन् श्रीकांत पारगावकरच्या गोड गळ्यातील स्वर. खूप खूप मोठं आहे आपलं मराठी संगीत..!

सहज कधी तू घरात लावशील सांजवात
माझेही मन तिथेच ज्योतीसह थरथरेल..!


इथेच खरे तर शब्द संपतात..!

थोड्याच वेळात त्या सांजवातेमुळे प्रसन्न झालेली कातरवेळ टळेल आणि.. 

'मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद..'

तुझ्या अंगणी टपटपेल प्राजक्त. पण तो प्राजक्त नसेल.. ती माझी हाक असेल, माझी पायपीट असेल, ते माझं आयुष्य असेल..! दु:खाच्या वाटेवर तुझं हे गाव लागलं अन् इथे थबकलो खरा, पण अगदी क्षणभरच. माझा पल्ला लांबचा आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: