March 30, 2015

तात्याचे आध्यात्मिक विचार.. :)

एका चटणी-भाकरीहून अधिक आस नाही..खरंच नाही..थोडी भाकरी आणि गडवाभर पाणी..!

एक वितेच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी..

आणि बाकी साथीला असते ती भागवतधर्मात सांगितलेली नामस्मरणाची अक्षय शिदोरी..

मग त्या शिदोरीत सुदाम्याचे पोहेही असतील, ग्यानबा-तुकयाची अमृतवाणीही असेल..परंतु ते अक्षय असेल, अवीट असेल..

ऐहिक सुखं सगळ्यानाच हवीहवीशी वाटतात..त्यात काही चुकीचं आहे किंवा तो गुन्हा आहे असं म्हणण्याचा मानभावीपणा मी करणार नाही.. त्यातून मीही नाही सुटलो आणि तुम्हीही सुटला नाहीत...पण आपलं चुकतं इतकंच की आपण ती सुखं अवीट आणि अक्षय आहेत हे धरून चालतो..!

आपल्याला हेही लक्षात ठेवायला हवं की एक दिवस असा येईल की हात उचलून तोंडात घास घ्यायची देखील आपल्यात ताकद उरणार नाही..भले मग समोर उच्चप्रतीच्या सुवासिक बासमतीचा भात असेल..कानानं धड ऐकू येणार नाही..डोळ्यांनी धड दिसणार नाही..

पण तेव्हाही आपल्याला गोड वाटेल तो फक्त विठोबाच..! कारण तो अक्षय आहे..अवीट आहे..त्याकरता दिसंयाचीही गरज नाही आणि ऐकू येण्याचीही गरज नाही..

या जगात देव नाही..असं जे लोक म्हणतात त्यांचं मला हसू येतं.. माझं काही भलं झालं नाही..माझ्या आयुष्यात अमुक अमुक वाईट गोष्टी घडल्या म्हणून या जगात देव नाही..

अहो पण मुळात या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्यायला देव बसलेलाच नाहीये..तो तुमचं भलंही करत नाही आणि वाईटही करत नाही..तुमचं भलं होतं किंवा तुमचं वाईट होतं ती तुमची destiny..! शिवाय भलं आणि वाईट या गोष्टी सापेक्ष आहेत..त्यात देवाचा काहीही संबंध नाही..तो या सगळ्याच्या परे आहे..परंतु तरीही त्याच्या नामस्मरणात सात्विक आनंदाचा अक्षय झरा शोधणं म्हणजेच आध्यात्म..!

ग्यानबा-तुकयाला हा अक्षय आनंदाचा झरा सापडला आणि त्यांनी तो तितक्याच उदारतेने हातचं काहीही राखून न ठेवता इदं न मम या भावनेने लोकाना वाटला म्हणून ते मोठे..म्हणून ते संत..

अन्यथा.. मला आणि माझ्या भावंडाना आमचे आईवडील टाकून गेले..आम्ही उघड्यावर पडलो..देवानं आमचं भलं केलं नाही आणि म्हणून या जगात देवच नाही..असं ज्ञानोबाना देखील सहज म्हणता आलं असतं..!

अर्थात, आमचे ज्ञानोबाराया निरीश्वरवाद्यांइतके बुद्धिमान नव्हते हे आमचं भाग्य..! :)

त्यामुळे आम्ही निरीश्वरवादी आहोत..आम्ही देव मानत नाही..असं जे लोक म्हणतात त्यांना माझ्या शुभेच्छा.. :)

-- श्री श्री तात्याशंकर..

-- (तात्यांचे आध्यात्मिक विचार.. - या महान ग्रंथातून साभार..) :)

6 comments:

prasad salvi said...

आदरणीय तात्या, सा. न. वि. वि.

तुमचा लिखाण आवडतं. पण त्याची पोच नेहमीच देतो असा नाही. लिहिण्याचा कंटाळा. पण या लेखात निरीश्वरवाद्यांची आपण जी संभावना केलीत ती पचली नाही. मी ईश्वर मानीत नाही. कारण मला अनुभूती आली नाही असा त्याचा अर्थ होतो. ज्या रूपात सध्या ईश्वर दिसतो ते रूप मान्य होत नाही. ईश्वर तुम्हाला निव्वळ नामस्मरणाने काही साध्य होईल असा सांगतो हे मान्य नाही . असो .
आपला वाचक
प्रसाद साळवी

Chinar Joshi said...

kya baaat hain !!!

Chinar Joshi said...

kya baaat hain !!!

sharayu said...

माझ्या माहितीप्रमाणे नामजप हा आपल्या जाणिवा प्रगल्भ किवा तरल बनविण्यासाठी केला जातो. पण त्यासाठी आवश्यक काळ जावा लागतो. पी हळद हो गोरी असे होत नाही. शिवाय आपल्यासाठी उपयुक्त नामजप कोणता याचे भान येणे जरूर आहे

नामधारी विनवी (प्र)सिद्धासी... said...

आयुष्यात कधीही फारसा देवळात सुद्धा न जाणारा जर बसल्या जागी देव पहायला तोही डोळे उघडे ठेवून शिकतो तर त्यामानानाने तुम्ही बरेच शिकलेले आहात. कदाचित स्टेशन चुकीचे लागले असेल रेडिओवरचे पण रेडिओ चूकीचा आहे असे वाटत नाही...

कुठल्याही जपाने दिवसाची सुरुवात केली तरी झोपणेपूर्वी आपल्या लाडक्या जपाची सम सापडू लागली की माण७ला देव दिसू लागतो असा आमचा अनुभव आहे. तुमचा वेगळा असू शकतो. देव आणि अनुभव दोन्ही...

sanjeev said...

आपले लिखाण नक्कीच विचार करायला लावणारे असते.