March 22, 2015

तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे..

मी म्हटलं होतं ना.. की भीमण्णा, बाबूजी, भाईकाका, पंचमदा, किशोरदा, हृषिदा, प्राणसाहेब, दादामुनी, उत्पल दत्त यापैकी कुणी ना कुणी रोज माझ्या सोबतीला असतात..

काल रात्री माझ्या घरी भाईकाका आले होते.. खूप गप्पा मारल्या आम्ही..

घरी आल्याआल्या मला म्हणाले की गुढीपाडवा आहे आज..गोड काय केलं आहेस..?

"चितळेचं आम्रखंड आणलं आहे.."

"मला आण पाहू लगेच.." :)

पण नंतर का माहीत नाही..अचानक थोडं वातावरण गंभीर झालं.. अंतुबर्वा येऊन बसला आमच्यात..!

"विशाल सागरतीर आहे, नारळाची बनं आहेत, पोफळीच्या बागा आहेत..सारं काही आहे..पण त्या उदात्ततेला दारिद्र्य असं विलक्षण छेद देउन जातं..आणि मग उरतं ते केवळ भयाण विनोदाचं अभेद्य असं कवच..!"

"संध्याकाळी त्या माडाच्या काळ्या आकृती हालताना ती थकलेली, सुकलेली तोंड तत्वज्ञान सांगू लागली की काळीज हादरतं..!"

"भाईकाका.. केवळ या दोन वाक्यांकरता मी तुम्हाला माझ्या मनाचं ज्ञानपीठ देउन टाकलं आहे.."

"अरे असू दे रे.." -- भाईकाका म्हणाले..

"का हो भाईकाका.. नारायणच्या मुलाच्या मुठीत तो सकाळपासूनचा काळवंडलेला लाडूच तुम्ही का हो ठेवलात..?"

"जाऊ दे रे.. चल..आपण गजा खोतला भेटू..!" - भाईकाका हसून म्हणाले.. :)

गजा खोत मात्र निखळ आनंद देउन जातो.. पेटीच्या पट्टीत उगीच का कांता मधला उ शोधणारा भाबडा गजा खोत..:)

कलेवर, माणसांवर भरभरून प्रेम करायला शिकवणारे रावसाहेब..

जिंदादिलीने आयुष्य जगायला शिकवणारे काकाजी..

केरसुणीने समुद्राच्या लाटा अडवायला जमलं नाही हे आयुष्याच्या अखेरीस कबूल करणारे आचार्य...

"सापडला रे सापडला..मला चितळेच्या आम्रखंडातही आत्मा सापडला.." असं म्हणून भाईकाका मनमुराद हसले..:)

"तात्या.. लेका चाळीशी ओलांडलीस.. पण उसासे टाकणारा तुझ्यातला नाथा कामत अजून तसाच तरूण आहे रे.."

माझ्या स्टेटसं वरचा प्रियामणीचा फोटो पाहत भाईकाका मिश्किलीने म्हणाले.. :)

"हो..भाईकाका.. पण नंदा प्रधान लिहून तुम्ही आम्हाला जखमी का केलंत..? त्यापेक्षा नाथा कितीतरी आनंद देणारा नाही का..?

नंदा प्रधान..आणि इंदू वेलणकर.. जीव ओवाळून टाकावासा वाटतो..!

पुष्कळ गप्पा रंगल्या आमच्या.. सगळ्याच इथे लिहिणं शक्य नाही..ज्या सहज आठवल्या त्या लिहिल्या..

मग मला भाईकाकनी आठवणीने त्यांचे नेहमीचे सल्ले दिले..

'तुला जे काही आवडेल..मग ते गाणं असो..कविता असो..चित्रपट असो.नाटक असो..काहीही असो..ते तू जगालाही मनमुराद सांग.."

"कुठल्याही माणसाकडे एकाच एक चष्म्यातून बघू नको..त्याला अनेक कंगोरे असू शकतात..ते तपासून बघायचा प्रयत्न कर..एखाद्याचे दोष शोधण खूपच सोपं आहे रे..!"

"दुस-याच्या कलेचे, गुणांचे योग्य ते कौतुक करून तू मोठा होत असतोस हे लक्षात ठेव..!"

"चल निघतो रे..कुमारच्या घरी मैफल आहे..भीमसेनही यायचा आहे..आता मस्त मैफल जमणार..तुझ्यातला नाथा कामत मात्र तसाच कायम असू दे.."

असा आशीर्वाद देउन भाईकाका निघून गेले..

आता स्वर्गात ती मैफल जमली असेल.. कुमारांचं "उड जाएगा हंस अकेला.." भन्नाट सुरू असेल..!

-- तात्या अभ्यंकर..

2 comments:

Abhishek said...

स्वर्गीय!

अहं ब्रह्मास्मि said...

अप्रतिम..तात्या