March 04, 2011

मंगेश....!

राम राम मंडळी,

तानपुरा, तंबोरा...!

आपल्या भारतीय संगीताचा आधार...!



आपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...

या वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..!

ही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...

१) तानपुर्‍याच्या खुंट्या.



तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

२) तानपुर्‍याचा भोपळा.



तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..

तानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..

३) घोडी किंवा ब्रिड्ज.



ह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.

४) जवार आणि मणी.



जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

जमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा "जवारी लागण्याला" देता येईल! हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...!

वर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य! काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे!

घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.

५) तानपुर्‍याचे लागणे.

अरे देवा! हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही! उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.

असो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

वर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..


असो,

तर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान! उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ "देवत्वा"चीच उपमा देईन..

सुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी!



स्वरभास्कर तानपुरा जुळवताहेत...!


मंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे! ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...

लतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,
"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का! त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...!



-- तात्या अभ्यंकर.

February 26, 2011

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?"


"हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!"


शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते.


शबनम..!


मी तसा कडमड्या हौशी गाणारा.. चार मित्रांनी जरा हरबर्‍याच्या झाडावर चढवायचा अवकाश, की लग्गेच मी नरडं साफ करायला घेतलंच म्हणून समजा! आता माझ्यासारख्या बेसुर्‍या, बेताल गवयाला काय गोविंदराव पटवर्धन साथीला मिळणार?! :)


त्यामुळे माझे बाजिंदे-साजिंदेही अगदी माझ्याचसारखे शिकाऊ. शकीलभाय पेटीवाला त्यातलाच एक. दोन तीन वर्षांपूर्वी बनारसी चाळीतल्या या शकीलभाय बाजेवाल्याने माझी आणि शबनमची ओळख करून दिली होती. काँग्रेस हाऊस आणि फोरासरोडवरच्या बनारसी चाळीत जिथे मुजरा होतो तिथे शकील भाय हार्मोनियम वाजवतो, चांगली वाजवतो. शकीलभाय हा शबनमचा मामू, की असाच कुणी सगेवाला.


"तात्याभाय, ये शबनम. इसको अच्छा पैसा मिलता है, अच्छा नाचती है. इसकू जरा तुम्हारा एल आय सी का पॉलिसी लेके देव!"


त्या दिवशी प्रथमच मी शबनमचा मुजरा पाहिला. छान दिसत होती, नाचतही छान होती. त्या बैठकीत दोनचार अय्याश लोक बसले होते, ते पैसे उडवत होते! ती मंडळी निघून गेल्यानंतर शबनमने माझ्याकरता आणि शकीलकरता चहा मागवला. मग एल आय सी पॉलिसी म्हणजे काय? विमा म्हणजे काय? कसे आणि किती वर्ष हप्ते भरावे लागतील, लाईफ-कव्हर म्हणजे काय?, इत्यादी सर्व सर्व गोष्टींवर मी तिचं भरपूर बौद्धिक घेतलं. समुपदेशनच म्हणा ना!


शबनम तशी अशिक्षितच. ज्या समाजात, ज्या वस्तीत, ज्या लोकात वाढली तो समाजही अशिक्षितच. तिला माझं बोलणं समजत होतं आणि नव्हतंही! शेवटी मी तिला त्या एरियाच्या, खास बंबिय्या-हिंदीत समजाऊन सांगितल्यावर तिला माझं म्हणणं पटलं असावं!


"देख, अभि साला तेरी चमडी टाईट है, थोबडा ठीक है, जवानी है तबतक तेरे मुजरेपे पैसा उडेगा. एक बार चमडी उतर गयी तो साला कुत्ताभी तेरेको पैसा नही देगा. यही सब यहा बैठे हुए ऐय्याश रंडीबाज तब तेरेपे थुकेंगे भी नही! किसी और कच्ची कली, आयटम को पैसा देंगे. तब क्या करेगी? कहासे लाएगी पैसा? क्या खाएगी?"


इतक्या कडक आणि हेटाळणीभरल्या शब्दात सुनावल्यावर शबनम भानावर आली. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं! त्यानंतर तिला मी विम्याच्या, पोस्टाच्या मासिक बचत योजनेच्या काही स्कीम्स समजावून सांगितल्या. आयूर्विमा महामंडळाची न्यू जनरक्षा पॉलिसी तिला दिली. डबल ढक्कनला सांगून मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या डेली रिकरींगच्या बचत योजनेत तिला पैसे गुंतवायला लावले. डबल ढक्कन हा प्राणी त्या बँकेचा दलाल आहे. हा इसम पूर्वी दिवसरात्र गांजा पिऊन फोरासरोडवर, फॉकलंडरोडवर पडलेला असायचा. मीच त्याला त्या बँकेचा दलाल बनवला. डबल ढक्कन तसा वल्ली माणूस. त्याचे व्यक्तिचित्र पुन्हा केव्हातरी!


दरम्यानच्या काळात विम्याच्या वगैरे कामानिमित्त माझी आणि शबनमची काही वेळा भेट झाली. एकदोन वेळेला मी तिला बाकायदा दिल्ली दरबार हाटेलात बिर्याणी खायलाही घेऊन गेलो आहे. 'हा माणूस मादरचोद नाही आणि याला आपल्यासोबत गेम वाजवण्यात काहीही इंटरेस्ट नाही!' असा कुठेतरी एक विश्वास, एक खात्री तिला होती/आहे! कारण ती ज्या दुनियेत वावरते त्या दुनियेत बाहेरच्या सभ्य, सुशिक्षित, पांढरपेशा समाजातले लोक तोंडं लपवून, कुठे काही चान्स मारायला मिळतो का, या एकाच हेतूने येतात. हो, तोंडं लपवून! घरच्या बायकोवर त्या मायझव्यांचं समाधान होत नाही. 'अमर प्रेम' मधली किशोरदाने गायलेली, 'हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!' ही ओळ मी तिथे येणार्‍या काही पांढरपेशा पब्लिकच्या बाबतीत अनुभवली आहे!


तर काय सांगत होतो?


आमची शब्बो तशी हुशार, व्यवहारचतूर परंतु अत्यंत अबोल. बोलेल तेही अगदी हळू आवाजात. स्वभावाने तशी खरच खूप चांगली आहे. पण नशीबाने तिला त्या बाजारात बसवली. तिची आई याच धंद्यातली. बनारसला कोठेवाली होती. काही वर्षांपूर्वी ती लहानग्या शबनमला घेऊन मुंबैत आली. शबनम १५-१६ वर्षाची झाली, जवानीत आली आणि आपसूकच या धंद्यात आली!


अहमदाबादचा पन्नाशीतला कुणी करोडपती जगनसेठ एकदा काँग्रेस हाऊस मध्ये मुजरा ऐकायला आला होता. सोळा-सतरा वर्षाच्या शब्बोरानीवर नजर गेली त्याची. पैसे उडवू लागला तिच्यावर. अडनिड्या वयातली शबनमही भाळली त्याच्यावर. आणि एकेदिवशी बाकायदा नथ-उतरणीचा कार्यक्रम ठरला. शबनमला चुरगाळण्याचे एक लाख रुपये ठरले. खुद्द तिच्या आईनेच सौदा ठरवला आणि पैसे घेतले. आता बोला..!


एकदा चव घेतल्यावर तो जगनसेठ येईनासा झाला! पन्नाशीतला जगनसेठ मुलीच्या वयाला शोभेल अश्या शबनमला भोगून दुसरीकडे हुंगेगिरी करायला चालता झाला! शबनमला दिवस राहिले. नथ-उतरणीच्या संबंधातून जर दिवस राहिले तर होणारं मुल फारच मुबारक! त्यातून मुलगी झाली तर फारच छान. कारण ती जवान होऊन पुढे घराणं चालवेल अशी मुजरेवाल्या/कोठेवाल्या दुनियेची धारणा!


शबनमला मुलगी झाली. जगनसेठने दिलेले पैसे संपले. शबनम पुन्हा कोठ्यावर हजर! आता तिची मुलगी मोठी होते आहे. आईचं म्हारातपण आहे, औषधपाणी आहे. जिंदगी सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे..!


काहीच दिवसांपूर्वी शबनमच्या त्या 'मुबारक ' (?) औलादीचा जनमदिन होता म्हणून तिने मला जेवायला बोलावलं होतं. मटणकुर्मा-पराठे असा बेत होता. दोन पेगही झाले तिथे. तिची आईही होती तिथे. जनरली कुठल्याही वडिलधार्‍या माणसाला प्रथम भेटलं की वाकून नमस्कार करायची सवय आहे मला. परंतु मुलीच्या नथ-उतरणीचे लाख रुपये घेतलेल्या त्या बाईला बघितल्यावर नमस्कार तर सोडाच, उलट घृणा आली मला तिची! पण कुणाला दोष देणारा मी कोण? काय अधिकार मला? 'शबनमके मेहमान!' म्हणून त्या बाईने पाहिलं मला आणि लाचारपणे हसली. घृणेची जागा किवेने घेतली!


शबनमची पोरगी गोड आहे! कधी कधी विचार केला की वाटतं की त्या जगनसेठला का दोष द्यावा? त्याने सौदा केला होता, लाख रुपये मोजले होते! तरीही मनातल्या मनात त्या जगनसेठला शिव्याशाप देत मी त्या निष्पाप चिमुरडीच्या हातात शंभराची नोट ठेवली!




आता लौकरच शबनमचं डेली रिकरींग डिपॉझिट मॅच्युअर होणार आहे. तिला ३०००० रुपये मिळणार आहेत. मी तिला पुन्हा ते डिपॉझिट कंटीन्यू करायला सांगणार आहे. पण सध्या नाही. कारण तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे आहेत, ती चाहेल तो खाऊ घ्यायचा आहे, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची आहे!


करू देत..!


-- तात्या अभ्यंकर.

February 21, 2011

याचे करू आता काय मला सांग.. :)



जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा......
..................याचे करू आता काय मला सांग.. (येथे ऐका)

काही गोष्टी घडतात तेव्हा कुणा एका व्यक्तिचं नव्हे, कुणा एका प्रांताचं, राज्याचं, देशाचं नव्हे, सार्‍या विश्वाचं नव्हे, एखाद-दुसर्‍या आकाशगंगेचं नव्हे तर सार्‍या अंतराळाचंच भाग्य उजळून निघतं. यमनचा जन्म झाला तेव्हा नेमकं हेच झालं..!

'गलगले निघाले' मधला जरा वेडासा खुळासा पण साधासा भोळासा भरत जाधव. त्याच्या प्रेमात पडलेली केतकी थत्ते. आणि मग या भरतच्या वर्णनाचं स्वरचित्र रेखाटताना अशोक पत्कींना आधार मिळतो यमनचा आणि एक छोटेखानी, जलद लयीचं नितांत सुंदर गाणं जन्माला येतं..!

बोले मनातील भाषा, याचा थोडासा हा लोचा, याचे करू आता काय मला सांग..!

गरे नी़नी़नी़ रे गरे , गरे म'म'म'म'म'म' म'धनीरेंनीध गरेगरेसा..!

तुम्ही अण्णांचा एखादा 'नामाचा गजर गर्जे भीमातीर.'. सारखा अभंग घ्या किंवा बाबूजींच्या 'समाधी साधन संजीवन नाम..' सारख्या लै भारीतल्या भारी ओळी घ्या.. किंवा मग '....याचा थोडासा हा लोचा याचे करू आता काय मला सांग..' या ओळी घ्या; आपला यमन सगळ्यांना पुरून उरतो हो. अक्षरश: त्या गाण्याचं सोनं करतो..!

'याचे करू आता काय मला सांग..' ची ' म'धनीरेंनीध गरेगरेसा..' ही संगती केवळ क्लास, त्यातलं कौतुक क्लास..! अगदी आपली वाटते ही संगती. वैशाली सामंतने छान गायलं आहे हे गाणं..

यमनासोबतच या गाण्यातली जलद लय मला फार आवडली.. पुढे छानसं यमनचं इंजिन आणि त्याला जोडलेले शब्दास्वरांचे रंगीबेरंगी डबे; अशी ती गाडी छोटी छोटी वळणं घेत मस्त चालली आहे असं वाटतं..हास्य

मन नितळ नितळ
नाही इतरासारखे
नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..!

' मुखी राम राम..!'

आला..! शुद्ध मध्यम आला...!

' नाही मनामध्ये पाप मुखी राम राम..' या ओळीत शेवटी येणारा शुद्ध मध्यम केवळ अद्भूत..! शुद्ध मध्यमाबद्दल मी बापडा काय बोलणार..? मला अद्याप नीटसा कळलेलाच नाही हा स्वर..! हास्य

एकंदरीत खूप बरं वाटतं हे गाणं ऐकून, खूप प्रसन्न वाटतं..!

गाण्याचं चित्रिकरणही मस्त. आणि केतकी थत्ते..?

मला जर कुणी विचारलं की सार्‍या अंतराळात छान, सुंदर, सुरेख, झकास, फक्कड दिसणारी मुलगी कोण, तर मी क्षणात केतकी थत्ते हे उत्तर देईन..!हास्य



केतकी, जियो..! हास्य

-- तात्या अभ्यंकर.

February 18, 2011

मेघना माझी बहीण..

परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं.

मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच.

मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच!

मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली. पण मेघना खरी रमली ती डबींगच्या क्षेत्रात, संचलन-निवेदनाच्या क्षेत्रात..
परवा सहज म्हणून मेघनाशी गप्पा मारत बसलो होतो, तिच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी जाणून घेत होतो आणि हळूहळू थक्कही होत होतो! आमची ही लहानशी मेघना आज इतकी कर्तृत्ववान असेल असं मला खरंच वाटलं नव्हतं!

"तुला पोगो, डिस्ने, कार्टून नेटवर्क इत्यादी वाहिन्यांवरची नॉडी, निन्जा हातोडी, डिझ्झी, डेक्स्टर्स लॅब मधली डिडी ही पात्रं माहित्येत का? त्या सर्वांकरता माझा आवाज वापरला आहे!"

"बे वॉच" कार्यक्रमात मी पॅमेला अ‍ॅन्डरसनला आवाज दिला आहे!"

"एका लीन नावाच्या चिनी अभिनेत्रीकरता माझा आवाज डब केला गेला आहे. बाल हनुमानमधील 'बाल हनुमानही मीच आहे."

"आणि तुला गंमत महित्ये का? पुणे आणि 'मुंबै-सेन्ट्रल' रेल्वे स्थानकात ध्वनिमुद्रीत उद्घोषणेतून (रेकॉर्डेड अनाउंन्समेन्ट) जी बया बोलते ना, तीही मीच!" Smile

मेघना सांगत होती. आपण तर साला फक्त कौतुकाने तिच्याकडे पाहात होतो!



त्यानंतर मला मेघनाने तिथल्या तिथे निरनिराळ्या आवाजात बोलण्याचा एक छोटेखानी पर्फॉर्मन्सच करून दाखवला..

वाक्य होतं - "खूप दिवसांनी भेटलास, अगदी बरं वाटलं!"

हे वाक्य एक अगदी चिमुरडी, एक तिसरी-चौथीत असलेली, एक कॉलेजकुमारी, एक मध्यमवयीन स्त्री आणि एक आज्जीबाई या स्त्रिया कसं बोलतील तसं अगदी एकापाठोपाठ एक बोलून दाखवलं! प्रत्येक पात्राच्या वेळेस क्षणात केलेला आवाजातील बदल, हेल, शब्दोच्चार, प्रत्येक वयाचा लेहेजा तिनं इतका सुंदर सांभाळला की क्या केहेने! अगदी सह्ही पर्फॉर्मन्स होता तो..

मेघनासमोर प्रामुख्याने दोन क्षेत्रं होती -एक म्हणजे अभिनय किंवा दुसरं म्हणजे डबींग- निवेदन-संचलन (रंगमंचीय किंवा दूरचित्रवाणी सादरीकरण इत्यादी.) आणि मेघनाने निवडलं ते डबींगचं क्षेत्र आणि आजमितीला मेघना एक अतिशय व्यस्त डबीग आर्टीस्ट म्हणून कार्यरत आहे. विदेशी चित्रपटाच्या ज्या हिंदी डीव्हीडीज आणि सीडीज इथे बनवल्या जातात त्यातही मेघनाला डबिंग कलाकार म्हणून काम करण्याच्या खूप संधी आहेत/येत असतात.

मेघनाचा स्वभाव सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचा आहे. आजमितीस मराठीतील जवळ जवळ सगळ्या कलाकारांशी सह-अभिनयातून म्हणा, एखाद्या रंगमंचीय कार्यक्रमातून म्हणा, मुलाखतीतून म्हणा, मेघनाचा उत्तम परिचय आहे, मैत्री आहे. अभिनय क्षेत्र तिनं सोडलं आहे असं नाही, परंतु त्या क्षेत्रात राहण्यासाठी जे काही कॉन्टॅक्ट्स ठेवावे लागतात, काही एक रॅपो ठेवावा लागतो ते ठेवणं मेघनाला तितकसं जमत नाही किंवा तिचा तो स्वभाव नाही असं आपण म्हणू.. तरीही आभाळमाया, चार दिवस सासूचे, माझं सोनूलं सोनूलं, किंवा सनईचौघडे, मी शिवाजीराजे भोसले.. यासारख्या मोजक्याच चित्रपटांतून तिनं भूमिका केल्या आहेत..परंतु वर म्हटल्याप्रमाणे मेघना खरी रमते ती डबिंगमध्ये किंवा रंगमंचीय/दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातच.

लोभ असावा, गाणे तुमचे आमचे, मी आणि आई - सॉलिड टीम!, 'मी मराठी' वाहिनीवरील मोगरा फुलला, पाकसिद्धी, पिकनिक रंगे तार्‍यासंगे, स्टार माझा वाहिनीवरील खमंग हा पाकसिद्धी कार्यक्रम, ई टीव्ही वरील टॅक्स फ्री हा चित्रपटांविषयी कार्यक्रम, 'साम' टीव्ही वरील आयुर्वेदाचार्य बालाजी तांब्यांसोबत 'आयुर्वेद' हा कार्यक्रम... यादी मोठीच आहे!

मेघनाने काही सरकारी कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे/करते. ते करत असताना तिला राजकीय क्षेत्रातली मंडळी, त्यांची पदं-मानमरातब, प्रोटोकॉल, इत्यादी अनेक गोष्टींचं भान ठेवायला लागतं. अनेक देशी-विदेशी वित्तीय संस्थांच्या रंगमंचीय कार्यक्रमांचं (कॉर्पोरेट शोज) सूत्रसंचालन, त्यांचे विक्री मेळे, त्यात येणार्‍या संभावित ग्राहकांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शीत करणे ही सर्व कामं मेघना लीलया करते. पण हे सगळं सहज साध्य होत नाही, नसतं! त्याकरता करावी लागते ती अविरत मेहनत आणि अभ्यास!

श्रीराम ट्रान्सपोर्ट कंपनी सारख्या नावाजलेल्या कंपनीकरता मेघनाने भारतातल्या १२ ते १३ राज्यांमधून एका वेळी अडीच ते तीन हजार लोकांकरता माहितीप्रद असे कॉर्पोरेट शोज केले आहेत!

सचिन ट्रॅव्हल्स या नावाजलेल्या यात्राकंपनी सोबतही मेघना निगडीत आहे. त्यांचा 'हॅलो प्रवासी' हा कार्यक्रम ती करते. एकदा त्या कंपनीच्या यात्रेकरूंसोबत मेघना दक्षिण अफ्रिकेच्या दौर्‍यावरही गेली होती. तिथं तिनं त्या लोकांकरता विनय आपटेंच्या दिग्दर्शनाखाली आयपीएलचा सामनाही कव्हर केला होता.

"दक्षिण अफ्रिकेतील मसाईमाराच्या जंगलात चार दिवस राहण्याचा अनुभव केवळ रोमांचकारी होता!"
मेघना सांगते!

किती हरहुन्नरी! किती क्षेत्रात तिचा वावर आहे! किती नानाविध विषयात तिला गती आहे, तिचा अभ्यास आहे, कष्ट आहेत, परिश्रम आहेत! खरंच अभिमान वाटतो..!



रुपारेल महाविद्यालयातून बी ए ही पदवी घेणार्‍या मेघनाचा लोकसाहित्याचा विशेष अभ्यास असून एम ए ला लोकसाहित्य हा विषय घेऊन मुंबै विद्यापिठातून ती एम ए ला पहिली आली आहे!

काय नी किती लिहू मेघनाबद्दल?
जियो मेघना, जियो...!

-- तात्या अभ्यंकर.

January 25, 2011

काका हलवायाकडची जिलबी..

लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे.

अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं. आज जेव्हा खरोखरच विमान आलं आणि त्यांना तुकोबांच्या पंक्तित घेऊन गेलं तेव्हा त्या वास्तवातली प्रखरता जाणवली..!

नाही पचवू शकत आहे ते वास्तव. मीही सामान्यच..! ना त्यांच्यासारखा योगीसाधक, ना तुकोबांसारखा परब्रह्म कळलेला..!

अगदी १९८८-८९ पासूनच्या त्यांच्या आठवणी, त्यांचा सहवास, त्यांचा अत्यंत साधा सादगीभरा स्वभाव..सारं काही मनात रेंगाळत आहे..

प्रयत्न करतोय पण सूत्ररुपात नेमकेपणाने मांडता येत नाहीयेत त्या आठवणी या क्षणी..!

तसे अबोल होते ते..! पण कधी कधी आपणहून बोलायचे. ख्यालाबद्दल, गाण्याबद्दल, जुन्या गायकांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल भरभरून बोलायचे..

कधी कधी थट्टाही करायचे,

"काय अभ्यंकर, काय म्हणतंय तुमचं गाणं? काय रियाजवगैरे..?"

"छे हो अण्णा, मी कुठला गातोय? मी दगड आहे अजून.."

"तेही नसे थोडके..! तुम्ही दगड आहात हे स्वतःहून कबूल करताय, ही एक चांगली सांगितिक खूण आहे. परंतु काही लोकांना आपण दगड आहोत हेच कळत नाही, ही गोष्ट मात्र संगीताला घातक आहे..! दगड असण वाईट नाही परंतु आपण दगड आहोत हे न समजणं, हे मात्र घातक..

असं अगदी नेमकं आणि मार्मिक बोलायचे..!

"वा..! काका हलवायाकडची जिलेबी का? तुम्ही अगदी न चुकता आणता बरं..!"

कधी असं कौतुक करायचे.. मग ते पंजाबात जलंधरला असताना तिथे कशी जिलेबी मिळायची ते सांगायचे..

जलंधरलाच कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून जोरबैठका आणि नंतर डायरेक्ट विहिरीत उडी मारून केलेली अंघोळ..!

आठवणीत रमून जायचे.

मग त्या बोलण्यात हाफिजअली यायचे, बिस्मिल्लाखा यायचे, सिद्धेश्वरीदेवी, रसूलनबाई यायच्या..!

कधी विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाची गोष्ट..

विदाऊट तिकिट रेल्वेप्रवासाला अण्णा 'फ्री पास होल्डर' असं गंमतीने म्हणत..!

कधी तंबोरा कसा लावावा, जवारी कशी काढावी, तंबोरा जवारदार कसा वाजला पाहिजे याचे धडे नेहरू सेन्टरच्या किंवा बिर्ला मातुश्रीच्या ग्रीनरूममध्ये मिळायचे..!

खूप आठवणी आहेत, पण वर म्हटल्याप्रमाणे आत्ता धड काही सुचत नाहीये..

पण ते सारं सूत्ररुपाने लिहायचं आहे एकदा..

क्षमा करा, तूर्तास इथेच थांबवतो या ओबधधोबड ओळी..

तात्या.

January 22, 2011

जीवन डोर तुम्ही संग बांधी..


(येथे ऐका)

'जीवन डोर..' च्या पंचमामधली सहजता पाहा. 'तुम्ही..' या शब्दातलं आर्जव पाहा, मार्दव पाहा. 'बांधी..' या शब्दातला षड्ज पाहा. 'दैवी..' हा शब्ददेखील तोकडा पडावा असा षड्ज..! 'क्या तोडेंगे इस बंधन को..' मधला विश्वास पाहा, त्यातले भाव पाहा. 'जगके तुफां आंधी..' नंतरचा शुद्ध गंधारावरचा न्यास पाहा. तानपुर्‍यातला नैसर्गिक शुद्ध गंधार आणि दिदीचा शुद्ध गंधार दोन्ही एकच..! हौशी संगीतज्ञांनी अगदी श्रुतीन् श्रुती तपासून पाहावी. आपला ओपन चायलेन्ज..! 'डोर..' शब्दावरची अतिनाजूक, अतिहळवी जागा पाहा....!
ही सारी गायकी अवघ्या दोन ओळीतली..!

गाणं कसं मांडावं, शब्द कसे टाकावेत, त्यातले भाव कसे जपावेत, आवाजाचा लगाव कसा हवा, लयीला अगदी अलगदपणे, बेमालूमपणे कसं सांभाळावं, या सार्‍या प्रश्नांची उत्तरं केवळ,

'जीवन डोर तुम्ही संग बांधी,
क्या तोडेंगे इस बंधन को
जगके तुफां आंधी रे आंधी..'


या दोन-तीनच ओळीत मिळतात. पुढलं गाणं म्हणजे सगळा बोनस. 'देता किती घेशील दो करांनी..' अशी अवस्था..!

गाणं ऐकून अगदी कुणीही यमनातल्या एखाद्या 'नी़रेपम'रेगरेनी़ध़नी़रेसा..' सारख्या संगतीने सहज गुणगुणायला सुरवात करावी..! खूप पोटेन्शिअल असलेली चाल. अर्थात, ही श्रीमंती यमनची.

'चाहे घिरे हो बादल सारे,
फिरभी रहुंगी तुम्हारी तुम्हारी..!'


यातलं भिडणारं आश्वासन आणि पुन्हा एकदा शुद्ध गंधार..! शब्दच संपतात..!

-- तात्या अभ्यंकर.

January 16, 2011

येऊ देत आता अजून एक विमान...!

देवा परमेश्वरा,


आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..!

देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..!

ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत.

माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत..

आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..!

याचसाठी केला होता अट्टाहास,
शेवटचा दिस गोड व्हावा..!

त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!

दहा वर्षाचा एक मुलगा कलेचं वेड घेऊन घरातून पळाला. खूप खस्ता खाल्या, अपार कष्ट केले. पुढे त्याचं फळ मिळालं, त्याचा वेलू गगनावेरी गेला. अक्षरश: न्हाऊ घातलं सर्वांना त्या अलौकिक सुरांनी.

'भारतरत्न..' या पदवीचा सन्मान झाला..!

'एकामेवाद्वितिय..', 'परंतु या सम हा..' ही सारी बिरुदं रोजचीच झाली, सवयीची झाली..!

या वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्यायांनी 'सवाईगंधर्व संगीत महोत्सव..' हा संगीताचा महायज्ञ सुरू ठेवला. पन्नास वर्षांहून अधिक काळ..!

लौकिकार्थाने आयुष्यभर एखाद्या बादशहासारखे, सम्राटासारखे वावरले ते...! परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र तेवढेच साधे आणि सादगीभरे राहिले..!

परंतु आता मात्र नको हा वनवास, नकोत त्या अंथरुणातल्या हालअपेष्टा..!

काहीच दिसांपूर्वी त्यांच्या दर्शनाकरता गेलो होतो त्यांच्या घरी..!
देवा, विश्वास ठेव, मला काय म्हणाले माहित्ये?

" परमेश्वराने माझी क्रूर थट्टा चालवली आहे...!"

देवा, थांबव आता ही क्रूर थट्टा..!

देवा, लोकांना कदाचित माझी ही प्रार्थना आवडणार नाही. दुषणं देतील मला लोकं..! परंतु पर्वा नाही. कारण माझं त्यांच्यावर अत्यंत प्रेम आहे अन् त्याहूनही अधिक निस्सीम अशी डोळस श्रद्धा आहे...!

"अणुरणिया थोकडा.." लिहिंणार्‍या तुकोबांकरता देवा तू विमान पाठवलं होतंस..

त्याच ओळीतल्या भावार्थात आणि त्यातल्या मालकंसाच्या दैवी सुरात कोट्यावधीच्या जनसमुदायाला डोलायला लावणार्‍या, समाधीस्त करणार्‍या भूतलावरच्या एका योग्याकरताही विमान पाठव..

येऊ देत आता अजून एक विमान...!

-- तात्या.

January 13, 2011

मकरसंक्रांती पेश्शल - प्पत्तंग उडवीत होते..! :)


राम राम मंडळी,

सर्वांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.

तीळगुळ घ्या अन् ग्वाड बोला..!

मकरसंक्रांती दाराशी उभी आहे. या दिवसाचं आणि पतंग उडवण्याचं काही वेगळंच नातं. खास करून अहमदाबाद आदी गुज्जू शहरात याचं खास महत्व. त्या मानाने आपल्या महाराष्ट्रात कमी. परंतु या पतंग उडवण्यावर मात्र एक झक्कास लावणी आपल्याकडे आशाताईंनी गाऊन ठेवली आहे.

प्पत्तंग उडवीत होते..!
(कृपया येथे ऐका)

च्यामारी, सुरवातच लै ठसकेबाज आहे. उच्चारी अगदी प ल प आणि त ल त जोडलेला आहे. लावणीच्या सुरवातीलाच 'पतंग' हा शब्द असा काही पडला आहे की क्या बात है..! मंडळी, अगदी गंमत म्हणून तुम्हीच गुणगुणून पाहा. आधी नुसतं 'पतंग उडवीत होते..' हे गुणगुणा. अगदी मिळमिळीत मुगडाळ खिचडीची चव लागेल. परंतु त्यानंतर लगेच 'प्पत्तंग उडवीत होते..' हे म्हणून पाहा.. झणझणीत, ठसकेबाज मिसळीची मजा येईल..! Smile

पतंग शब्दाचा 'प्पत्तंग' हा उच्चार हे या लावणीचं मला भावलेलं मर्मस्थान..! गाणं ऐकावं हे अर्थातच महत्वाचं, परंतु ते कसं एकावं हे अधिक महत्वाचं..!

चढाओढीनं चढवीत होते,
गं बाई मी प्पत्तंग उडवीत होते..!

आहाहा काय साला सीन आहे..!

'चढाओढीनं चढवीत होते..!'

मंडळी, आणा पाहू डोळ्यासमोर, एक झक्कास मर्‍हाटमोळी ठसकेबाज बया, नऊवारीबिव्वारी नेसून मस्त मोकळ्या हवेत प्पत्तंग बदवते आहे, चढवते आहे. मोप वारं सुटल आहे तिच्यायला. बाईचा पदर मस्त वार्‍यावर फडफडतो आहे, कपाळावर जीवघेणी बट मस्त खेळते आहे अन् बाई प्पत्तंग उडवत आहे..!

किती कौतुक करावं गदिमांचं आणि आशाताईंचं..!

होता झक्कास सुटला वारा
वर प्पत्तंग अकरा बारा
एकमेकांना अडवीत होते..

डोळ्यासमोर अक्षरश: चित्र उभं करण्याचं कसब तो देशस्थ रांगडा गडी गदिमाच करू जाणे..!

काटाकाटीस आला गं रंग
हसू फेसाळे घुसळीत अंग..!

आता प्पत्तंग उडीवतांना काटाकाटी ही चालायचीच की राव. नायतर काय मजा? Smile

दैव हारजीत घडवीत होते.!

मंडळी, हे आमचे अण्णा माडगुळकर. 'दैवजात दु:खे भरता..' लिहिणारे हेच अण्णा मडगुळकर..!

दैव काय अन् नियती काय..! तिथे जीत कमी. त्या मानाने हारच जास्त..!

मंजूर हाय आमास्नी ही हारजीत...!

काटाकाटी होईल. त्यात कदाचित आपला पतंग गूल होईल, काटला जाऊन झोकांड्या खाईल..!

दैव हारजीत घडवीत होते

तरीही,

प्पत्तंग उडवीत राहिलं पाहिजे, हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

January 10, 2011

केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर...

आज बर्‍याच दिवसांनी सुमन कल्याणपुरांचं एक भावगीत कानी पडलं आणि मी खूप वर्ष मागे गेलो.
कुठलं होतं ते भावगीत?


'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर!'

अगदी साधंसुधंच परंतु हृदयाला हात घालणारं असं हे भावगीत! पूर्वी आकाशावाणी मुंबई 'ब' नांवाचा एक प्रकार होता. त्यावर कामगारविश्व, आपली गाणी, इत्यादी कार्यक्रमात अशी भावगीतं लागायची हे मला आठवतंय. खूप सुख वाटायचं ही गाणी ऐकताना. साधारणपणे ८०-८५ चा तो काळ असेल! किंवा त्याही आधीचा. साधारणपणे ७५ ते ८५ चं दशक असावं. तेव्हा दूरदर्शनचं आगमन झालं होतं. पण आकाशवाणी मुंबई 'ब' चा तेव्हा बराच प्रभाव होता एवढं मला आठवतंय. माझ्या शालेय काळातील ही सगळी वर्ष. दुपारी काहीतरी बारा-साडेबाराची शाळा असे. अकरा वाजता कामगारविश्वातील गाणी लागली की हळूहळू शाळेचं दप्तर वगैरे भरायला लागायचं. मग त्यानंतर काय असेल ते पोळीभाजीचं साधंसुधं जेवण आणि नंतर गणवेष घालून शाळेत जाणे!

दोन तीन वर्ष आमची शाळा सकाळची होती. तेव्हा सकाळी ६ वाजता आमची आई आकाशवाणी मुंबई ब सुरू करायची. मला आठवतंय, अण्णांचे माझे माहेर पंढरी, पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा हे अभंग हमखास कानावर पडायचे. सकाळी सातच्या बातम्यात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' म्हणून बातम्या सांगणार्‍या कुणी बाई यायच्या. त्यांचा तो आवाज इतका फॅमिलियर झाला होता की सुधा नरवणे आपल्या घरातल्याच कुणीतरी वाटत! अलिकडे मी रेडियो लावतो पण मला तो आपलासा नाही वाटत! काय रेडियो मिर्ची काय, नी काय काय! त्यातल्या उठवळ निवेदकांची ना धड हिंदी, ना धड विंग्रजी अशी अखंड बडबड! काय म्हणतात बरं त्यांना? व्ही जे की टीजे असलं काहीतरी म्हणतात! मला या शब्दांचे अर्थही अजून माहीत नाहीत. त्या मानाने आमच्या सुधा नरवणे मला खूप आपल्या वाटायच्या, घरातल्या वाटायच्या! इतक्या की त्यांनी कधी चुकून त्यांच्या खणखणीत आवाजात 'सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहेत' असं रेडियोतून म्हणायच्या ऐवजी, 'अभ्यासाला बस पाहू आता' असं जरी म्हटलं असतं तरी ते मला वेगळं वाटलं नसतं!
कुठे गेली ही सगळी मंडळी? सकाळी कामगार विश्वात ज्वारी, बाजरीचे आणि कुठले कुठले बाजारभाव सांगत. त्यात नंदूरबारचा उल्लेख हमखास असायचा! इतका, की ते कधीही न पाहिलेलं नंदूरबारदेखील मला खूप आपलसं वाटायचं!

साला खूप साधा काळ होता तो! केतकीच्या वनी तिथे.. या गाण्याइतकाच साधा! तिन्ही सांजा सखे मिळाल्या, प्रिया आज माझी, स्वर आले दुरूनी, तुझे गीत गाण्यासाठी, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पाहुनी रघुनंदन सावळा, हृदयी जागा तू अनुरागा, श्रावणात घन निळा बरसला, नाविका रे, मृदुल करांनी छेडित, अशी अनेक एकापेक्षा एक गोड गाणी तेव्हा कानावर पडायची.

आजुबाजूची माणसंदेखील तेव्हा खूप साधी होती. देशीच होती, ग्लोबल झाली नव्हती! मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात आपुलकीची उठबस असायची. कुणीही कुणाकडे पटकन उठून जाऊ शकत होती. हल्लीसारखं आधी फोन करून यायची पद्धत तेव्हा विकसित झाली नव्हती! किंबहुना, प्रत्येक कुटुंबातील प्रायव्हसी तेव्हा थोडी जास्त उदारमरवादी होती असं आपण म्हणू हवं तर! आणि जळ्ळे बोंबलायला तेव्हा एवढे घरोघरी फोन तरी कुठे होते? एका कुटुंबातली चार माणसं पटकन उठून कुणाकडे गेली तरी, "अरे वा वा! या या" असंच हसतमुखाने स्वागत व्हायचं! लगेच जेवायची वगैरे बाहेर ऑर्डर दिली जात नसे. ८-१० माणसांचा आमटीभात, पाचपंचवीस पोळ्या, गोडाचा शिरा तेव्हा आमच्या आया-मावश्या सहज करू शकत होत्या. सोबतीला पापड, कुर्डया, सांडगी मिरची तळली जायची, साधी कांदाटोमॅटोचीच, पण वर फोडणी वगैरे दिलेली झकास कोशिंबिर केली जायची! सगळी मंडळी हसतमुखाने, मोकळेपणाने जेवायची, अगदी यथास्थित गप्पाटप्पा व्हायच्या !
यजमानांच्या मनात, 'काय यांना काही मॅनर्स वगैरे आहेत की नाही? न कळवता जेवायला आले?' असा विचार यायचा काळ नव्हता तो!

पटकन, 'आमचा अमूक काका ना, तो फार पैसेवाला आहे बुवा, किंवा तमूक नातेवाईक ना, तो तर काय करोडपती आहे!' अशी आजच्या इतकी सर्रास भाषा लोकांच्या तोंडी असलेली मला तरी आठवत नाही. समोरच्या माणसाला पैशावरून लहानमोठा ठरवायची पद्धत आजच्या इतकी तरी नक्कीच विकसित झाली नव्हती!

कुणी कुणाकडे पाच-पंचवीस हजार रुपये मागितले तर एक तर दिले जात किंवा न दिले जात, तो भाग वेगळा, परंतु त्या नकारातदेखील पैसे नसत म्हणून नकार दिला जाई. समोरचा माणूस परत देईल की नाही, किंवा च्यामारी कशाला फुक्कट याला मदत करा? पुन्हा मागायला आला तर? हा संशय त्या नकारात नसे! कुठेतरी माणसामाणसातली माणूसकी, आपुलकी जागी होती असं वाटतं!

हे सगळं लेखन खरं तर एखाद्याला खूप ऍबस्ट्रॅक्ट वाटेल किंवा असंबद्धही वाटेल, हे मी नाकारत नाही. पण 'केतकीच्या वनी तिथे' मधला एकंदरीतच जो साधेपणा आणि सात्विकपणा आहे ना, तो आज तरी मला खूप हरवल्यासारखा वाटतो. आपल्याला माहित्ये, की एखादं गाणं हे बर्‍याचदा एखादा प्रसंग, एखाद्या व्यक्तिशी निगडीत असतं. ते ते गाणं लागलं की माणसाला त्या गाण्याशी निगडीत असलेल्या गोष्टी आपोआप आठवायला लागतात. मी वर उल्लेख केलेली जी गाणी आहेत ना, ती सगळी गाणी मला केवळ एखादी व्यक्ति किंवा एखादा प्रसंगच नव्हे, तर संपूर्ण एका ठराविक काळाची आठवण करून देतात! कारण एका ठराविक काळात ही गाणी वारंवार कानावर पडायची. आणि तेच सगळं मी शब्दात मांडायचा वेडा प्रयत्न करतो आहे!

साला आज सगळीकडे पाहतो तर काय चाल्लंय हे माझं मलाच समजत नाही. कुणाला कुणाकडे बघायला वेळ नाही. मॉल, मल्टिप्लेक्स, हे शब्द हल्ली वारंवार कानावर पडतात परंतु मला ते अजूनही अपरिचित वाटतात, आपले वाटत नाहीत! अहो कसला आलाय मॉलफॉल? वाण्याकडून दीड दोन रुपायाला नारळाची वाटी विकत आणणारा मी! महिन्याचं सामान यादी करून वाण्याकडून मांडून आणायचं. म्हणजे वाणी ते सामान घरी आणून देत असे. पण मांडूनच! त्याचे पैसे मागाहून दिले जात. त्याला 'मांडून आणणे' असं म्हणत असत!
हल्लीच्या मॉल संस्कृतीमध्ये, साला आमचा 'मांडून आणणे' हा वाक्प्रचारच नाहीसा झाला! रोकडा, किंवा क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असल्याशिवाय मॉलवाले उभे करतील का? पण आमचा वाणी मात्र बापडा आठ आठ दिवस देखील थांबायचा हो! पैशांची गरज त्यालाही असे, नाही असं नाही.

पण त्या मांडून आणण्यातली गरीबी आता कुठे दिसत नाही हे मात्र खरं! चांगलंच आहे ते म्हणा..!

आणि कसलं तुमचं ते डोंबलाचं मल्टिप्लेक्स हो? दिवार, जंजीर, त्रिशूल यासारखे सिनेमे पाच दहा रुपायात आमच्या ठाण्याच्या मल्हार किंवा आराधना सिनेमागृहात पाहायला मिळायचे! त्यात सुद्धा शनिवार किंवा रविवारी शिणेमा पाहायचा असेल तर मंङळवार बुधवार पासूनच ऍडव्हान्स बुकिंग करावं लागे. आता काय, दूरदर्शन सुरू केले की कुठेना कुठे सिनेमे सुरूच असतात! पण त्यात 'आम्हाला डॉनची रविवारी दुपारी ३ च्या शोची तिकिटं मिळाली बरं का!' हे सांगण्यातला जो काय एक आनंद होता ना, तो आता मिळत नाही!

दूरदर्शनदेखील किती घरगुती होतं, आपलं होतं! संध्याकाळी सहा ते दहा-साडेदहा! त्यात गुरुवारी छायागीत, शनिवारी मराठी शिणेमा आणि रविवारी हिंदी शिणेमा! आणि रविवार सकाळची साप्ताहिकी! ही साप्ताहिकी बघायला मात्र मजा यायची! ती पाहिल्यावर मग ठरायचं की येत्या आठवड्यात काय काय पाहण्यासारखं आहे? कुठले कुठले चांगले कार्यक्रम आहेत ते! तेव्हा दूरदर्शन वरील कार्यक्रमसुद्धा किती चांगले असत! विनायक चासकर, विनय आपटे, सुहासिनी मुळगावकरांसारखे लोक अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम द्यायचे!

सुहासिनीबाईंचा गजरा हा कार्यक्रम तर खूपच चांगला असे. बबन प्रभू, याकूब सईद सारखी गुणी लोकं खूप चांगले कार्यक्रम करायची, नाटकं करायची. साडेसातच्या बातम्यातली अनंत भावे, प्रदीप भिडे, ही मंडळी खूप आपलीशी वाटायची! 'फिल्मस डिव्हिजन की भेंट' नावाचा एक अतिशय सुरेख कार्यक्रम लागायचा. त्यातला तो भाई भगतांचा ठराविक आवाज! जाम मजा यायची तो भाई भगतांचा आवाज ऐकायला!

असो! मी इथे हे जे काही बरळतोय त्याचा संदर्भ आपल्यापैकी किती वाचकांना लागेल हे मला माहिती नाही!
आज साला मी डी डी सह्याद्री बघतो तर मला काहीच बघावंसं वाटत नाही. बघावं तेव्हा सारख्या कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या स्पर्धा, 'मला प्लीज प्लीज प्लीज एसेमेस करा सांगणारे रोज कुत्र्यांच्या छत्र्यांसारखे उगवणारे ते गाणारे स्पर्धक, मग त्यातला एक कोण तरी अजिंक्यतारा किंवा इंडियन आयडॉल होणार, बाकीचे स्पर्धक रडणार, प्रेक्षकात बसलेले त्यांचे आईवडील रडणार! छ्या.. सगळाच उठवळपणा तिच्यायला!

माझ्यासारख्या जुनाट माणसाला ह्यतलं काहीच पटत नाही बुवा!

असो! जे काही मनात आलं ते भरभरून लिहावसं वाटलं! हल्ली 'गारवा नवा नवा' किंवा 'ऐका दाजिबा' ह्या गाण्यांचा काळ आहे. नाही, नसतीलही हो ही गाणी वाईट! पण मला मात्र त्यातला 'गारवा नवा नवा' नाही सोसत!

त्यापेक्षा 'केतकीच्या वनी तिथे नाचला गं मोर' या गाण्याची उबच मला पुरेशी आहे, अद्याप पुरत आहे!

--तात्या अभ्यंकर.