July 01, 2013

बुड बुड घागरी.. :)

स्नान, अंघोळ आणि तिचे नानाविध प्रकार आणि नानाविध रुपं..

"छ्या लेका दूर हो..४-४ दिवसात अंघोळ कर नाहीस.." इथपासून ते रोज छान छान श्रीमंती टबात ऊन ऊन पाण्यात अंघोळ करणारे..!

मुंबै उपनगरी रेल्वेतून जाताना बरेच वेळा काही भय्ये साधारणपणे लालसर चड्डीवर अंघोळ करताना फार सुरेख दिसतात.. डोक्याला शांपूबिंपू असली श्रीमंती भानगड नाही. ‌साबणच लावतात डोक्याला आणि थंड पाण्यानेच अंघोळ करतात..

पण मी एक पाहिलं आहे.. बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करणारे बरेचवेळा स्वताःचीच बढाई मारताना दिसतात..

"कितीही थंडी असो.. मी बारा महिने थंड पाण्याने अंघोळ करतो..ह्या ह्या ह्या... "

अशी फुशारकी मारतात..

अंघोळ.. एक प्रसन्न प्रकार..

पूर्वी बंब असायचे. झकासपैकी कढत कढत पाणी देणारे बंब.. आता गिझर, गॅसगिझर आले..

'काय पण म्हणा.. बंबातल्या पाण्याने अंघोळ करायची मजाच वेगळी.. ' हे म्हणणारे आता फार कमी राहिलेत..

उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला मनसोक्त केलेली विहिरी-नदीतली अंघोळ.. व्वा..! आडातलं पाणी बाकी काय आल्हाददायक गार असतं..!

गंगा-गोदावरी आदी तिर्थात केलेली अंघोळ.. हरिद्वार-अलाहाबाद आदी कुंभात केलेली अघोळ... व्वा..!

सहज लिहायला बसलो.. पण किती प्रकार सुचताहेत अंघोळीचे.. साला, लेखणी प्रसन्न आहे आपल्याला.. भाईकाकांचा भक्कम आशिर्वाद आहे.. :)

ब्राह्मणात नाही, पण इतर बऱ्याच जातीत मयताला घालतात ती अंघोळ.. तेव्हाची रडारड.. भसाभस पाणी ओतत असतात त्या मयतावर.. त्याला बिचाऱ्याला पत्ताच नसतो.. माझ्या ओळखीच्या एका म्हाताऱ्याचं मयत. चमत्कारिक कुबड होतं त्या बिचाऱ्याला. त्याच्या पायावर पाणी घातलं की तो डोक्याकडनं उठून बसायचा.. आणी डोक्यावर पाणी घातलं की पाय वर करायचा..!

लहानपणीची आई-आज्जीने घातलेली काऊचीऊची अंघोळ.. नंतर तीट-पावडर.. व्वा..!

नरकचतुर्दशीची दिवाळीच्या पहाटे छान सुगंधी तेल-उटण्याचं अभ्यंग स्नान..

डोक्याला छान खोबरेल तेल लावून छान कढत पाण्याने बहिणीने घातलेली भाउबिजेची अंघोळ..!

"अरे जा आता अंघोळीला.. "

"हे काय, तुमची अंघोळ वगैरे झाली वाटतं.. "

"आज पाणी नाही.. अंघोळीला बुट्टी.. "

"लांबून प्रवासाहून आलाय. घ्या जरा अंघोळ वगैरे करून.. आमटीभात तयार आहे.. "

"साल्याच्या नावाने अंघोळ केली.. "

अंघोळीच्या बाबतीतले असे असंख्य संवाद..

एक अंघोळ मात्र खूप उदास. नकोशी वाटणारी.. स्मशानात अग्नी देण्यापूर्वीची किंवा मयताहून आल्यानंतरची अवेळी अंघोळ..

पण त्या अंघोळीने आप्तस्वकियांच्या आठवणी, त्यांचे प्रेमळ स्पर्श, त्यांची शाबासकी, माया, ममत्व.. कधीच वाहून जात नाही. बादलीभर पाण्याची ती ताकद नाही..!

बराय तर मंडळी.. पाणी तापलं आहे. आलोच दोन तांबे घेऊन..! :)

-- तात्या अभ्यंकर.

June 26, 2013

मधुशाला भाग २


मधुशाला भाग २

कृपया येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=N_A29EVM_-c

बने पुजारी प्रेमी साकी, गंगाजल पावन हाला,
रहे फेरता अविरत गति से मधु के प्यालों की माला

बसंतशी मिळताजुळता सतारीचा सुंदर तुकडा..पूर्वी थाटाचे स्वर.. गंगाजलवरचा पंचम गंगाजलाइतकाच पवित्र, आरस्पानी..!

साकी झालेला पुजारी आणि गंगाजल पावन हाला.. हा प्रेमी, हा साकी, हा पुजारी.. मधुचे प्याले अविरत गतीने सतत भरते ठेवतो..रितेपणा माहीत नाही त्या प्याल्यांना..! 'अविरत गती..' ही खूप छान फ्रेज वापरली आहे बच्चनसाहेबांनी..

'और लिये जा, और पीये जा', इसी मंत्र का जाप करे'
मैं शिव की प्रतिमा बन बैठूं, मंदिर हो यह मधुशाला

लूट हा मधु दोन्ही हातांनी भरभरून. रिचव ते प्याल्यामागून प्याले.. हाच जणू काही मंत्र..

मै शिव की.. सारेगसा.. पुढे मंद्रातले 'नीध' जोडा पाहू सायलेन्ट.. किती छान छाया पडेल शुद्धकल्याणाची..! काय सात्विकता त्या शुद्धगंधाराची..! शिवाइतकीच सत्य आणि सुंदर..!

मैं शिव की प्रतिमा बन बैठूं, मंदिर हो यह मधुशाला..

वा..!

याच्यानंतरचे बासरीचे सूर अगदी खास.. बंगाली ढंगाचे.. इंटिरियर पश्चिम बंगालमधलं नदीकाठचं एखादं खेडं..नदीच्या बाजूनेच छान पायवाट गेलेली..बाकी सारं हिरवंगार.. हे जयदेवसाहेब कुठून काय आणतील याची कल्पना येत नाही..

आणि मग मास्टरपीस म्हणावी अशी रुबाई -

एक बरस में, एक बार ही जगती होली की ज्वाला,
एक बार ही लगती बाज़ी, जलती दीपों की माला,
दुनियावालों, किन्तु, किसी दिन आ मदिरालय में देखो,
दिन को होली, रात दिवाली, रोज़ मनाती मधुशाला

अरे येऊन तर बघा एकदा आमच्या मधुशालेत.. दिसभर इथे रंग खेळले जातात..आणि तीनसांजांना इथे दिव्यांची रोषणाई होते.. दिसभर आम्ही रंगून जातो पुरणपोळी आणि भांगेच्या नानाविध रंगात..आणि संध्याकाळी दिवाळीच्या फटाकेफराळाची मैफल जमवतो. वर्षातनं एकदा होळी किंवा दिवाळी हा संकुचितपणा इथे नाही..!

दिन को होली, रात दिवाली... निषाद..गंधार आणि 'गमग' संगती बेचैन करते आहे मला.. असं वाटतं की त्या 'गमग' नंतर एकदाची ती 'गमप..रेसा..' संगती घ्यावी आणि त्या गौडसारंगाला आपल्या मधुशालेत प्रवेश द्यावा..!

(वाचकांचा थोडा हिंदुस्थानी अभिजात संगीताचा अभ्यास असणं आवश्यक आहे.. अगदी 'इंडियन आयडॉल' होण्याइतपत नाही..पण थोडातरी आवश्यक आहे..;)

पुढे पुन्हा सुंदर सतार आणि बासरी.. गाडी थोडीशी नटाकडे वळते का हो? शुद्ध नट की सार नट ते काय आपल्याला कळत नाही..आम्ही पारंपारिक किराणावाले. अनवट जयपूरवाले नाही..पण थोडा तरी नट नक्की आहे..

अधरों पर हो कोई भी रस जिहवा पर लगती हाला,
भाजन हो कोई हाथों में लगता रक्खा है प्याला,
हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती,
आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला

अधर म्हणजे ओठ, आणि भाजन म्हणजे भांडं, बर्तन...:)

हर सूरत साकी की सूरत में परिवर्तित हो जाती,

इथे थोडा उत्तरांगातला हमीर आहे बरं का..

हर सूरत साकी की सूरत
विवाह करुनी मदन जाळिला..

काय जमतात का सूर..?! :)

गाणं कसंही शिकावं हो.. त्यावर प्रेम करत ते शिकत रहाणं महत्वाचं..!

प्रत्येक सूरत, प्रत्येक चेहरा त्या साकीसारखाच दिसू लागतो आणि मग डोळ्यासमोर काहीही असलं तरी डोळ्यात मात्र मधुशालाच असते..

आँखों के आगे हो कुछ भी, आँखों में है मधुशाला

काय लिहून गेलेत थोरले बच्चन..क्या बात है..!



सुमुखी तुम्हारा, सुन्दर मुख ही, मुझको कन्चन का प्याला
छलक रही है जिसमें माणिक रूप मधुर मादक हाला,
मैं ही साकी बनता, मैं ही पीने वाला बनता हूँ
जहाँ कहीं मिल बैठे हम तुम़ वहीं गयी हो मधुशाला

आता थोडा जयजयवंतीचा रंग दिसू लागतो बरं का..

तुझा चेहरा हाच जणू एक कांचनाचा प्याला ज्यात ती माणिकरुपी, लाल मदिरा..छलकते आहे..मग मीच साकी बनतो आणि पिणाराही मीच..

आणि मग जिथे आपण बसतो..चार सुखदु:खाच्या गोष्टी करतो..सुखदःख वाटतो...हमराज, हमसफर होतो..तिथेच मधुशाला अवतरते..

ठराविक जागेवर, ठराविक चार भिंती आणि छ्त असलेला गुत्ता अपेक्षितच नाही बच्चनसाहेबांना.. त्यांची मधुशाला खूप व्यापक आहे, विशाल आहे..!

दो दिन ही मधु मुझे पिलाकर ऊब उठी साकीबाला,
भरकर अब खिसका देती है वह मेरे आगे प्याला,
नाज़, अदा, अंदाजों से अब, हाय पिलाना दूर हुआ,
अब तो कर देती है केवल फ़र्ज़ - अदाई मधुशाला...

आता थोडी मारुबिहाग, थोडी नंदातली बासरी..

पण आता थोडी तक्रार आहे त्या साकीबालाबद्दल..ती तिचं केवळ कर्तव्य करते आहे अशी कुठेतरी नाराजी आहे..

'वह मेरे आगे प्याला..' नंदचा काय सुरेख रंग सांडला आहे इथे..!

'नाज', 'अदा'.. - किती सुरेल, मधुर आणि मोकळा तार षड्ज लावला आहे मन्नादंनी..'नाज़, अदा, अंदाजों से अब...' म्हणतानाच मन्नादांचा सुंदर अंदाज पाहा..

मी काही गाण्यातली कुठली विशारद वगैरेची पदवी घेतलेली नाही परंतु अंदाजाने गायचं नसतं तर गायकीत अंदाज असावा लागतो इतपत तरी आता कळायला लागलंय.. विंडियन आयडॉलच्या परिक्षेस बसायला आता हरकत नाही..! ;)

'हाए पिलाना दूर हुआ..' मधली 'गम'पम'रेसा' संगती केवळ विलक्षण..!

अब तो कर देती है केवल फ़र्ज़ - अदाई मधुशाला...

नुसतं कर्तव्य नकोय.. कुणीतरी प्रेमाने ती हाला आम्हाला परोसली पाहिजे.. नाहीतर मग ती मधुशाळाच नव्हे..

आता इथून थोडी अजून गहन होत जाते मधुशाला...मृत्यूची जाणीव असलेली, थोडी समारोपाची मधुशाला..स्वरही बदलतात..थोडे गंभीर होतात.. नट, मारुबिहाग, जयजयवंती, हमिराची अल्लडता रहात नाही..

पुन्हा पाहू केव्हातरी पुढल्या भागात..

-- तात्या अभ्यंकर.

June 25, 2013

मधुशाला भाग १

जयदेव..

हिंदी चित्रपटसृष्टीतला इतरांच्या मानाने तसा दुर्लक्षित राहिलेला परंतु एक असामान्य प्रतिभावंत संगीतकार. हिंदी चित्रसृष्टीत संगीतकार म्हणून त्यांनी काम केलंच परंतु त्यांनी अजून एक अक्षरश: शिवधनुष्य पेलावं असं एक काम करून ठेवलं आहे आणि ते म्हणजे कवी हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्याला संगीतबद्ध केलं आहे. मधुशालेतल्या चार चार ओळींच्या रुबायांना त्या त्या मुडात बांधणं हे माझ्या मते हे अतिशय म्हणजे अतिशय अवघड काम आहे आणि म्हणूनच तितकंच मोठं आहे. अगदी आभाळाइतकं मोठं म्हणावं इतकं..!





दुधात साखर म्हणजे विलक्षण गोड आणि लचिल्या गळ्याच्या मन्नादांनी जयदेवांची ही मधुशाला गायली आहे. एका एल्पी रेकॉर्डमध्ये मावतील इतपत काही निवडक रुबायांची मधुशालेची एल्पी रेकॉर्ड निघाली त्यालादेखील आता खूप वर्ष झाली परतु आश्चर्याची आणि खेदाची गोष्ट अशी की मधुशालेवर अशी एक इतकी सुंदर रेकॉर्ड उपलब्ध आहे ही गोष्देखील आजही अनेकांना माहीत नाही..

अनेक वर्षांपूर्वी मुंबैच्या एन सी पी ए च्या संगीत लायब्ररीत जयदेवांनी संगीतबद्ध केलेली आणि मन्नादांनी गायलेली ही मधुशाला एकदा माझ्या ऐकण्यात आली आणि अक्षरश: स्वर्ग हाती लागल्याचा आनंद झाला. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा एन सी पी ए ला गेलो तेव्हा तेव्हा या रेकॉर्डची अक्षरश: पारायणं केली तरीही समाधान होत नाही..!

या एलपी रेकॉर्डच्या पहिल्या भागातल्या रुबायांचा मूड जयदेवांनी हलका ठेवला आहे. आणि दुस-या भागातील सगळ्या रुबाया थोड्या गंभीर स्वरावलींमध्ये बांधल्या आहेत.

आज आपल्या सुदैवाने यूट्यूबवर ही रेकॉर्ड ४ भागांमध्ये उपलब्ध आहे.

त्याचा पहिला भाग इथे एका..- http://www.youtube.com/watch?v=TAPpsLSJvtE

सुरवातीला सुरेख लागलेला तानपुरा आणि सुंदर बासरी..

मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला
'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला
अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ
राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'

या ओळी खुद्द हरिवंशराय बच्चन यांनी स्वतः अतिशय सुरेल गायल्या आहेत. चाल अर्थातच त्यांची स्वत:ची. जयदेवांनी त्यांचा आणि त्यांच्या ह्या मूळ चालीचा मान ठेऊन ही पहिली रुबाई त्यांच्याच आवाजात, त्यांच्याच चालीत ध्वनिमुद्रित केली आहे हे अगदी विशेष म्हणावं लागेल..

हरिवंशराय बच्चन यांचा आवाज अगदी टिपिकल म्हणावा असा, थोडासा थोरल्या पंचमदांसारखा.. परंतु अतिशय सुरेल..'पिनेवाला..' च्या सुरावटीतली 'गमग' संगती अगदी 'झंडा उंचा रहे हमारा..' तल्या 'हमारा'शी जुळणारी.. मजा येते ऐकायला..

'अलग अलग पथ बतलाते सब..' मधील 'पध' आणि तीव्र मध्यम केवळ खास.. अगदी सुरेल..जियो..!

सुन, कलकल़ छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला
सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला
बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है
चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला..

इथून पुढे मन्नादांनी हे शिवधनुष्य पेललं आहे.. अगदी सहज आणि गोड गळ्याची गायकी..दैवीच प्रकार सगळा...!

केहरव्याचा थोडा अनवट ठाय ठेका. कल कल छल छल हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..आणि 'सुन रुनझुन रुनझुन चल' नंतर किंचितशा पॉजने क्षणभर लय रोखून धरली आहे आणि 'वितरण' शब्दावर किती सहज मोकळी केली आहे..! 'वितरण' हा शब्ददेखील खास आहे.. 

'बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है'

'आलोच की आता..ही इथे आहे मधुशाला हाकेच्या अंतरावर..' हे आपण ज्या सह्जतेने म्हणू अगदी तीच सहजता जयदेवांनी ठेवली आहे आणि मन्नादांनी गायली आहे..!

ऐकायला सोपं वाटतं परंतु गायकीच्या दृष्टीने हे खूप कठीण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.. 'इंडियन आयडॉल' किंवा 'महागायक' होण्याइतकं हे सहजसोपं नाही..!

'चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला..'

प्रत्येक वे़ळेस रुबाई पूर्ण करताना ठेवलेला ओघवता ठेका मन प्रसन्न करतो.. 'चहक रहे' च्या स्वरातील ममत्व आणि 'पिनेवाले' शब्दातला शुद्ध गंधार..! काय बोलावं?

लाल सुरा की धार लपट सी कह न इसे देना ज्वाला
फेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला
दर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं
पीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला

फेनिल मदिरा है, मत इसको कह देना उर का छाला

'मत' हा शब्द खास मन्नादांनीच उच्चारावा.. आणि 'दर्द नशा है इस मदिरा का विगत स्मृतियाँ साकी हैं' यातला दर्द काही औरच.. 'विगत स्मृतियाँ साकी हैं' हे शब्द बेचैन करतात..!

'पीड़ा में आनंद जिसे हो, आए मेरी मधुशाला..' यातल्या 'पीडा' शब्दातील शुद्ध गंधाराला केवळ नमस्कार..किती गोड आणि हळवा सूर आहे मन्नादांचा...!

धर्मग्रन्थ सब जला चुकी है जिसके अंतर की ज्वाला
मंदिर, मसजिद, गिरिजे, सब को तोड़ चुका जो मतवाला
पंडित, मोमिन, पादिरयों के फंदों को जो काट चुका
कर सकती है आज उसी का स्वागत मेरी मधुशाला..

माझ्या मते या ओळी डॉक्टरेट कराव्यात अशा आहेत..!

लालायित अधरों से जिसने, हाय, नहीं चूमी हाला,
हर्ष-विकंपित कर से जिसने, हा, न छुआ मधु का प्याला,
हाथ पकड़ लज्जित साकी को पास नहीं जिसने खींचा,
व्यर्थ सुखा डाली जीवन की उसने मधुमय मधुशाला

किती म्हणजे किती मॅच्युअर्ड स्वरावली आहे या ओळींची! कसदार, खानदानी म्हणावी अशी.. आणि मन्नादांचा 'देख कबिरा रोया..' किंवा 'पुछो ना कैसे..' मध्ये जसा मुरलेला स्वर लागला आहे ना, अगदी तसाच स्वर इथे लागला आहे. बिमलदांच्या एखाद्या जुन्या चित्रपटाचा दर्जा, किंवा मदनमोहनच्या संगीताचा जो दर्जा..अगदी तोच दर्जा जयदेवांनी जपला आहे..केवळ आणि केवळ खानदानी..!

इथे पहिला भाग संपतो.. उत्तरोत्तर ही मधुशाला अजून रंगत जाते, मुरत जाते. अर्थावर कुठेही कुरघोडी न करता अर्थाला अगदी उचलून धरणारी जयदेवांची स्वररचना आणि मन्नादांची गायकी..

पुढील तीन भागांवर पुन्हा केव्हातरी. जसं जमेल तसं लिहिणार आहे, निदान तसा प्रयत्न करणार आहे. पण मला पूर्ण कल्पना आहे की जयदेव-मन्नादांची ही मधुशाला केवळ शब्दातीत आहे..!

-- तात्या अभ्यंकर.

June 10, 2013

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर..

अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे..

माधुरी ६८ सालची. आम्ही ६९ चे. आमच्यापेक्षा एकाच वर्षाने मोठी..महाविद्यालयीन वर्षाच्या आसपासच तिचे परिंदा आणि तेजब आले. माधुरी तेव्हा आमच्या कॉलेजातलीच कुणी वाटायची.. साले आम्ही सगळेच तेव्हा माधुरीच्या पिरेमात पडलो होतो..!

गोरेगाव म्हटलं की जसं गोरेगाव पूर्वेला स्थानकाच्या बाहेरच असलेलं गाळवणकरशेठचं हॉटेल श्रीसत्कार आठवतं..तसंच गोरेगाव म्हटलं की मनाली दीक्षित आठवते.. ही मनाली फार पूर्वी मुंबै दूरदर्शनवर निवेदिका होती.. कुठल्याश्या अल्लड, नासमज वयात आम्ही साला या मनालीच्याच प्रेमात पडलो होतो.. काय प्रसन्नवदनी होती..! वा..!

९.१७ च्या ठाणा फास्ट गाडीला चित्रा जोशी असायची.. विलक्षण आकर्षक दिसायची.. मिश्किल होती. गाडी स्थानकात शिरता शिरताच पटकन उडी मारून खिडकी पकडायची! पुढे चित्राला कांदिवलीला दिल्याचं ऐकलं.. जळ्ळी कांदिवली ती..! आमचं ठाणं काय वैट होतं? राहिली असती चित्रा ठाण्यातल्या ठाण्यातच तर काय बिघडणार होतं..?

पण मग केवळ चित्राला तिथे दिली म्हणून मग मला उगाचंच कांदिवली आवडू लागली..आता आयुष्यात जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली मिश्किल चित्रा आठवते आणि तात्यामामा उगाचंच गालातल्या गालात हसतो आणि कांदिवली स्टेशन नकळत मागे पडतं..

वसई.. माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, आणि वसईची खाडी..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..! (याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. पूर्वी एकदा केव्हातरी तिचं खूप छान व्यक्तिचित्र लिहिलं होतं मी पण जळ्ळं कुठे सेव्ह केलंय ते आजही सापडत नाही. असो..)

फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा
..
आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची..!

असतात अशा काही काही आठवणी. त्या त्या स्थानकांच्या आठवणी.. तसं म्हटलं तर अजून दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही आहे.. अहो शेवटी आमच्या आवडीनिवडी मध्यमवर्गीय, त्यामुळे स्थानकंही मध्यमवर्गीयच.. खार वेस्टची कुणी पूनम अग्रवाल किंवा बँन्ड्राची कुणी दीपा गोयल किंवा पूजा ओबेरॉय आम्हाला कशाला माहिती असणारेत?!

असो.. आज मात्र अचानक फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..! :)

-- तात्या फर्नांडिस.

April 25, 2013

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

खूप छान होती ती, गोड होती...

"जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण..

आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ...

कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता. मरीनड्राईव्हला Queen's Neckless म्हणतात आणि 'ती Queen म्हणजे मीच, हा रस्ता म्हणजे माझाच Neckless आहे' असं मात्र ती गंमतीने म्हणायची. मला जर कधी या संदर्भातला निर्णायक अधिकार प्राप्त झाला तर मी मरीनड्राईव्हच्या रस्त्याला तिचं नांव देईन..

mb

फारा वर्षांपूर्वी वरळी सीफेसला बाबूलाल नावाचा एक पाणीपुरीवाला होता. तिला बाबूलालची पाणीपुरी अत्यँत प्रिय होती. बाबूलालच्या मुलाला धंद्यात मुळीच रस नव्हता पण चांगली नौकरीही मिळत नव्हती. खूप खटपट करून तिने बाबूलालच्या मुलाला टाटासमुहात चिकटवला होता अशी आठवण वहिदाजींनी सांगितली होती. मरण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ऑक्सिजनवर असताना तिने बाबूलालची पाणीपुरी खायची इच्छा व्यक्त केली होती...!

मथुरापेढा, अजमेरी कलाकंद, आणि आमच्या मुंबैच्या मेरवनचा मावाकेक तिला खूप आवडत असे. 'मुंबै माझं First Love' असं ती म्हणत असे आणि त्यानंतर तिला लखनऊ आवडत असे. खूप निष्पाप, निर्विष होती ती...

अंथरुणावर खिळण्यापूर्वीची २-३ वर्ष ती स्पूलवरती एकटीच दीदीची गाणी ऐकायची आणि रडायची. अंथरुणावर खिळल्यावर दीदी तिला एकदा भेटायलाही गेली होती तेव्हा दीदीचा हात हातात घेऊन खूप रडली होती ती...

मुंबईत आता बांद्र्याला तिची कबर आहे..तिच्यावर भरपूर धूळ आहे..

खरं तर त्या कबरस्तानातील तिची कबरही आता हरवत चालली आहे..!

खुदा निगेहेबान हो तुम्हारा या गाण्यात,

उठे जनाजा जो कल हमारा
कसम है तुमको न देना कांधा...!


हे तिनं म्ह्टलं होतं ते तसं एका अर्थी खरंच ठरलं....

शेवटली काही वर्ष फार एकाकी होती ती.. कुणी भेटायला येईल का? निदान फोनवर तरी कुणी बोलेल का..?

कुठल्याही चित्रपटाच्या शुटींगच्या अखेरच्या दिवशी सर्व कामगारांना भरपूर मिठाई वाटायची ती...

तिचा तो अरेबियन व्हिलाही आता नामशेष झाला.. आम्हाला ती वास्तूही जतन करून ठेवता आली नाही..!

इथे वेळ कुणाला आहे..? शापित का होईना, परंतु मधुबाला नावाची एक कुणातरी यक्षिण होती हे देखील आता आम्ही फार काळ लक्षात ठेवू की नाही, हे माहीत नाही..!

-- तात्या.

April 10, 2013

पंजाब सिन्धु गुजरात मराठा...

कुठलेही, किंवा खास करून सी एस टी चे बाहेरगावच्या गाड्यांचे आरक्षण सभागृह..
इथे कधी गेलो तर का माहीत नाही, परंतु मला विलक्षण आनंद होतो, मन अगदी सुखावून जातं..

कुणी सरदार भटिंड्याचं बुकींग करण्याकरता उभा असतो.. अजून दोघंतिघं सरदार जे असतात त्यांना दिल्लीला जायचं असतं.. या यूपी-बिहारच्या भय्या लोकांना जसं मुंबईचं वेड, तसं तमाम सरदार लोकांना दिल्लीचं विलक्षण आकर्षण..!

कुणी जौनपुरचा भैय्या अगदी उद्याच निघायचं या तयारीने आलेला असतो.. त्याला ते वेटींग, आर ए सी, तत्काल..वगैरे जाम काही समजत नसतं..

कुणी बिहारी मुजफ्फरपूरला जाणार्‍या पवन एक्सप्रेसच्या मागे लागलेला असतो..

तर चारपाच जणांचं एखादं गुजराथी टोळकं.. राजकोटची तिकिटं काढण्यात गुंग असतं.. त्यांना लग्नाकरता राजकोटला जायचं असतं त्यामुळे त्यांना एकदम २०-२५ तिकिटं हवी असतात..

तर कधी एखादा टिपिकल बंगाली म्हातारा अगदी बरोब्बर ९० की १२० दिवस आधीच हावड्याला जाणार्‍या गीतांजलीकरता उभा असतो..

दिल्लीला जाण्याकरता तर अनेक जण आलेले असतात.. तरूण, तरुणी, म्हातारा, म्हातारी, बिझिनेसवाले.. कुणी हवापालट, तर कुणी नौकरीधंद्याच्या निमित्ताने, कुणी शादीकरता तर कुणी इंटरव्ह्यू करता..

दोघं हिरे व्यापारातले मारवाडी. ते बांद्रा - जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसमध्ये कुठे कन्फर्न जागा मिळते आहे का या विचाराने सूर्यनगरीची करुणा भाकत असतात..

तर कुणी एखादा केळकर, पटवर्धन किंवा बापट नावाचा टिपिकल पुणेकर त्याचं आणि त्याच्या बायकोचं इंद्रायणीचं तिकिट घेण्याकरता उभा असतो..

साऊथची गडबड तर काही विचारू नका..त्यातसुद्धा केरलावाले चिक्कार.. कुणाला पलक्कड, तर कुणाला थेट थिरुवनंतपुरम.. कुणा तमिळीला मदुराईला जायचं असतं.. तर कुणी रामी रेड्डी गुंतुर, विशाखापटणमची करुणा भाकत असतो..

क्रेडीटकार्डवाल्यांची लाईन वेगळी.. वरिष्ठ नागरिकांची लाईन वेगळी..

सेकन्ड एसी वाले तर त्या रिझर्वेशन हॉलमध्येही आपण सेकन्ड एसीमध्येच बसलेले आहोत असे वावरत असतात.. बाकी मात्र सारी जनता स्लीपर क्लासवाली.. अगदी एस १ ते एस १० मधली..

एकंदरीतच तो सारा नजारा पाहून दिल खूश होऊन जातो माझा...

पंजाब सिन्धु गुजरात मराठा,
द्रावि़ड़ उत्कल बंग ।
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधि तरंग

याचं सुरेख दर्शन होतं..!

-- तात्या.

March 18, 2013

कधी वाटतं..

कधी वाटतं..

नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या
घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं..

तर कधी वाटतं...

भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी
संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या..

कधी वाटतं..

बाबूजींच्या पायाशी बसून
'झाला महार पंढरीनाथ..' किंवा
'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं..

तर कधी वाटतं..

थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं..
आणि तिच्या पायांना मिठी मारावी..

कधी वाटतं...

हळूच, पावलांचा आवाज न करता
कलाश्री बंगल्यात शिरावं...
आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या
तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला
पुरिया कानी पडावा..

वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन
चुपचाप ऐकत बसावं..

नाहीच जर हिंमत झाली..

तर कलाश्रीच्या अंगणातली
थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी
आणि माघारी फिरावं...!

-- तात्या.

September 22, 2012

जुने दिवस..

आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, 
सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन

ेक गुणी माणसं...
वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....

आज या सगळ्याची खूप आठवण येते..! आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..! 

खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!
-- तात्या अभ्यंकर.

September 14, 2012

इष्काची इंगळी...:)

इष्काची इंगळी..
येथे ऐका - http://www.hummaa.com/music/song/mala-ishkachi-ingali-dasali/134557#

जगदिशरावांची झकास लेखणी, आमच्या गावरान रामभाऊ कदमांचं फक्कड संगीत आणि उषाताईंची ठसकेदार गायकी..

सुरवातीची मस्त यमनातली आलापी..


मी एकलीच निजले रातीच्या अंधारात..
नको तिथ्थच पडला अवचित माझा हात
हाताखालती नागं काढून वैरीण ती बसली..!

नागं काढलेल्या इंगळीला 'वैरीण' म्हटलंय..! :)

जोरदारच लावणी बांधली आहे रामभाऊ कदमांनी.. सुंदर ढोलकी आणि हार्मोनियमचे यमनातले तुकडे केवळ अप्रतिम..!

साऱ्या घरात फिरले बाई गं..
मला 'अवशिद' गवलं न्हाई गं..

छ्या..! आजवर कधी कुणाला इष्काची इंगळी डसल्यावर टायमावर अवशिद मिळालंय का..? अहो अजून अशा अवशिदाचा शोध लागायचाय..! :)

'न्हाई गं.. ' हे शब्द उषाताईंनी अतिशय सुरेख म्हटले आहेत.. आणि त्यातला तो यमनामध्ये येणारा शुद्ध मध्यम.. तोही अगदी अवचितच येऊन पडला आहे..

खरंच कुठे गेली हो आता अशी गाणी..?

या इंगळीचा कळला इंगा..
खुळ्यावाणी मी घातला पिंगा..!

माझ्या मते खेबुडकरदादांच्या या ओळी सुवर्णाक्षरात लिहून ठेवाव्या अशा आहेत.. अहो ही इष्काची इंगळी एकदा का कडाडून चावली ना, की अक्षरश: भल्याभल्यांना पिंगा घालायला लावते.. अगदी खुळं करून सोडते बघा..!



या अजरामर लावणीबद्दल उषाताईंना मोठ्ठं 'थँक यू..' आणि खेबुडकरदादांना व रामभाऊ कदमांना विनम्र आदरांजली..!

(इष्काच्या इंगळीचा मांत्रिक) तात्या अभ्यंकर.. :)

August 31, 2012

शिकवणी - एका कुंद दुपारची..:)

ओ सजना.. बरखा बहार आयी.. -- येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=G_KCiPOmNEg

तिचं नांव..? ते जाऊ दे...!.

ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष..

आमची वयं असतील विशीच्या घरातली..

वय वर्ष १९-२०..!

सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..! शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा..

अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है.. झालं आणि राणीच्या त्या रित्या सिंहासनावर ती अवचित येऊन बसली..

आता ध्यानीमनी फक्त तीच दिसू लागली.. कुठेही काही मंगल-शुभ-सुंदर दिसलं की त्यातही तीच दिसू लागली.. कुठे चांगलं गाणं ऐकलं, कुठे काही चांगलंचुंगलं खाल्लं, कधी एखादा उत्तम चित्रपट पाहण्यात आला.. की तीच दिसायची. जे जे उत्तम-उदात्त-उन्नत-महन्मधुर ते ते.. त्या सर्वात फक्त ती आणि तीच दिसू लागली..!

"मला Amalgamation of companies शिकवशील का रे? त्याच्या एंट्रीज मला जमतच नाहीत.. तू सांगशील समजावून..? "

आहाहा.. किती सुरेख आणि सुरेल स्वर तिचा.. चेहऱ्यावरचे ते भाबडे भाव..!

"घरी येशील का रे आज दुपारी माझ्या..? "

ठरल्याप्रमाणे पोहोचलो तिच्या घरी.. वाजले असतील दुपारचे काहीतरी दोन-अडीच.. ती अंधारलेली कुंद पावसाळी दुपार..!

तिची आईही तिच्याइतकीच सुरेख आणि गोड.. मुलीला शिकवायला दुसरा-तिसरा कुणी नसून आपला भावी जावईच खुद्द आला आहे असेच भाव होते हो त्या माउलीच्या चेहऱ्यावर.. म्हणजे मला तरी तेव्हा ते तसेच वाटले.. :)

छान, सुंदर, सुरेख, नीटनेटकं आवरलेलं तिचं घर.. त्या घरातली टापटीप, स्वच्छता सारी तिचीच असेल का हो? अगदी हवेशीर घर.. या खिडकीतून त्या खिडकीत वाहणारी वाऱ्याची मंद झुळूक केवळ तिच्याकरताच वाहते आहे का..? हा फ्लॉवरपॉट तिनेच या विवक्षित ठिकाणी ठेवला असेल का..? ते सुंदर पडदे.. त्यांचं सिलेक्शन तिचंच असेल का..?


छ्या..!

पिरेमात पडल्यावर प्रत्येक गोष्ट सुरेख, सुंदरच का दिसते हो त्या वयात..? त्या वयातली जादू न कळणारी आहे, अगम्य आहे, पण अतीव सुंदर आहे..

निसर्ग..! दुसरं काय? त्या त्या वयाची गणितं तोच बांधून देतो झालं..!

तिनं वह्या-पुस्तकं काढली.. प्राध्यापक अभ्यंकर तिला Amalgamation of companies शिकवणार होते.. :)

"तुम्ही बसा हं.. मी जात्ये केळकरमावशींकडे भिशीला.. " - सासूबाई म्हणाल्या..

जय हो त्या केळकरमावशींचा.. कधीही न पाहिलेल्या त्या केळकरमावशीला मी मनातल्या मनात एक फ्लाइंग किस देऊन टाकला.. :)

आता घरात आम्ही दोघंच.. बाहेर सुरेखसा पाऊस लागला आहे.. आणि त्या कुंद वातावरणातली ती रम्य दुपार.. आणि माझ्यासमोर ती बसली होती... पुस्तकाची दोन-चार पानं उलटली गेली असतील-नसतील,

दुरून कुठूनतरी रेडियोचे स्वर ऐकू आले.. 'ओ सजना.. बरखा बहार आयी.. '..! - सलीलदा आणि दीदीचं एक अतीव सुंदर गाणं.. ताजी टवटवीत चाल आणि जीव ओवाळून टाकावा अशी दीदीची गायकी...!

"ए रेडियो लाव ना.. काय सुंदर गाणं लागलंय बघ.. "

लगेच रेडियो लावतानाची तिची ती मोहक लगबग..

त्या गाण्यातही फार सुंदर पाऊस दाखवला आहे.. मनमुराद कोसळणारा.. त्या अंधारलेल्या दुपारीही अगदी तसाच पाऊस पडत होता.. आणि माझी साधना, माझी वहिदा, माझी मधुबाला.. माझ्यासमोर बसली होती.. :)

छे हो.. आता कसली अकाउंटन्सी आणि कसलं ते Amalgamation of companies..? सब साले बहाने थे..!

ती मला आवडली होती आणि मी तिला आवडलो होतो.. बास्स.. इतकंच खरं होतं..

आता पाऊसही थोडा वाढला होता.. तिथे केळकरमावशीकडची भिशीही एव्हाना रंगली होती.. रेडियोवर दीदीचं 'ओ सजना.. ' सुरू होतं..

पुन्हा एक वाऱ्याची झुळूक आली.. आणि काही क्षण अकाउंटन्सीच्या पुस्तकांनी आपली पानं मिटून घेऊन आम्हाला फार नाही.. पण आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या 'किस'करता थोडी मोकळीक दिली होती.. प्रायव्हसी दिली होती..!

'ओ सजना बरखा बहार आई..! '

गाणं असं ऐकावं, असं अनुभवावं, आणि आयुष्यभराकरता मर्मबंधात जतन करून ठेवावं..!

आज ती कुठे आहे हे मला माहीत नाही.. खरंच माहीत नाही.. पण हा छोटेखानी लेख खास तिच्याकरता..

God Bless You Dear.. Cheers..!

-- प्राध्यापक अभ्यंकर. :)