December 02, 2010

बम्बई मेरी जान..१ - मुंबैच्या लोकलगाड्यांच्या लाईनी..


राम राम मंडळी,

आजवर पोटापाण्याच्या निमित्तानं सारी मुंबै फिरलो. अगदी अनेकदा..

ह्या भटकंतीत प्रामुख्यानं साथ मिळाली ती आमच्या बेस्ट बसेसची आणि मुंबैच्या लोकल ट्रेन्सची. मुंबैच्या उपनगरी गाड्या म्हणजे मुंबैच्या धमन्या. मध्य रेल्चे, पश्चिम रेल्चे, हार्बर रेल्वे, अलिकडे निघालेली पनवेलपुतुरची रेल्वे वगैरे वगैरे..


अफाट जाळं आहे हे सगळं. नानाविध ठेसनं, क्रॉसिंग. छोटी मोठी जंक्शन्स, तर कधी मध्य-पश्चिम, तर मध्य-हार्बर तर कधी हार्बर-पश्चिम असं हे रेल्वेचं अंतर्गत छोटंमोठं क्रॉसिंग, रेल्वे रुळांचा परस्पर काटशह आणि या काटशहाचे उडाणपूल..

मुंबै फिरताना हे सगळं खूप अनुभवलं, पाहिलं. मुंबै उपनगरीय रेल्चे प्रवासाला कंटाळून न जाता कधी डब्यातल्या लोकांचे चेहेरे वाचायचा प्रयत्न केला तर कधी खिडकीबाहेर पाहात तर कधी मस्त मजेत फुटबोर्डावर उभं राहून आपण घाटातून जाताना कशी मजा बघतो तसं मनसोक्त मुंबै दर्शन घेतलं..भरभरून प्रेम केलं मुंबै नावाच्या अजब शहरावर..

आता सुरवातीपासनंच जशी आठवेल तशी सुरवात करतो आमच्या मुंबैच्या रेल्वे जाळ्याची उकल करण्याची.


या लेखाचा हेतू?

फक्त थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न या पलिकडे काहीही नाही. यामुळे झालाच तर या माहितीचा थोडाफार उपेग मुंबैत येणार्‍या काही नवख्यांना होऊ शकेल. माझ्यासारखे जाणते मुंबैकर उगाचंच डोळ्यासमोर क्षणभर तो रेल्वेमार्ग आणतील आणि मी लिहिलेली माहिती चूक की बरोबर हे तपासून पाहतील इतकंच..!हास्य

मुंबैच्या उपनगरीय गाड्यांची उकल संपली की मग सार्‍या आशिया खंडात जी उत्कृष्ट मानली जाते ती आमच्या मुंबैच्या बेस्ट बशींची रोचक माहिती मी देईन.. आणि त्याचसोबत जमलंच तर मुंबैच्या रस्त्यांबद्दल लिहिन. आजतोवर जवळजवळ सारीच मुंबै कधी बेस्टच्या संगतीत तर कधी पायी तुडवली आहे.

हा सगळा लेखनप्रपंच का? कारण एकच. मंडळी, खूप पिरेम करतो आम्ही या शहरावर..! हास्य

असो.. तर आता सुरुवात करुया..

चर्चगेटाहून पश्चिम रेल्चेने तुम्ही निघालात की तुम्हाला पहिलं जंक्शन भेटतं ते दादर. हे मध्य आणि पश्चिम रेल्वेचें एक कॉमन स्टेशन. तूर्तास दादरला बाजूला ठेउया. त्याच पश्चिम रेल्वेने तुम्ही दादरहून फुडे सरकलात की पुढे माटुंगारोड नावाचं एक लहानसं, निरुपद्रवी स्टेशन लागतं. ते ओलांडून पुढे सरकलात की तुमच्या पश्चिम रेल्वेला पहिला काटशह बसतो तो आमच्या हार्बर रेल्वेचा. वडाळा-किंग्जसर्कल कडून येणारी मध्यरेल्वेची लाईन माटुंगारोडच्या पुढे पश्चिम रेल्वेला पूर्वेकडून येऊन काटते आणि मग येथून पुढे मध्य व पश्चिम रेल्वेच्या ह्या दोन्ही लाईनी गुण्यागोविंदाने एकत्र धावतात व माहिम स्टेशनात विसावतात. त्यामुळे माहिम स्टेशनला 'जंक्शन' ही पदवी मिळाली आहे. म्हणजे माहिमहून येताना एक लाईन चर्चगेटाकडे तर एक लाईन वडाळ्याकडे..

इथून मग पुढे ह्या दोन्ही लाईनी खार, सांताक्रुज, विलेपार्ले करत थेट अंधेरीपर्यंत एकत्र धावतात. मी जेव्हा जेव्हा माहिम ते अंधेरी हा पश्चिम रेल्वेचा प्रवास करतो तेव्हा खिडकीबाहेर माझ्यासंगती धावणार्‍या मध्य रेल्वेच्यादेखील लाईनी पाहून मला खूप भरून येतं. अहो या तर माझ्या माहेरच्या लाईनी. कारण मी ठाण्याचा, म्हणजे शेन्ट्रल रेल्वेचा..! हास्य

आता जरा वेळ अंधेरीला थांबुया. हम्म..का थांबुया? तर तूर्तास नाही परंतु आज ना उद्या अंधेरी स्टेशनलादेखील पूर्व पश्चिम असा एक काटशह बसणार आहे..! हास्य

आमच्या मध्यरेल्वेवरच्या गुज्जूभाईंचं घाटकोपर स्टेशन हे जंक्शन होणार आहे कारण घाटकोपर ते थेट पश्चिमेला वर्सोव्यापर्यंत अश्या एका नव्या मोनो रेल्वेलाईनची आखणी/कामकाज तूर्तास प्रस्तावित आहे. मज्जा मज्जा आहे बरं का मंडळी य लाईनीवर. कोण-कोणती स्टेशनं असणार आहेत या लाईनीवर? ऐकाल तर खुश व्हाल. कारण या अत्यंत गजबजलेल्या आणि ट्राफिक जामने सदैव हैराण असलेल्या या मार्गावर रेल्वेमार्गाची कृपा होणार आहे. असल्फा, सुभाषनगर, साकिनाका, मरोळनाका, एयरपोर्ट रोड, चकाला, त्यानंतर अंधेरीला काटशह देत डीन एन रोड आणि वर्सोवा..! आहे की नाही मज्जा? त्यात पुन्हा मरोळनाका ते साक्षात छत्रपति शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत एक लाईन जाणार आहे. त्यामुळे वर्सोव्याकडून व घाटकोपर मार्गे ज्यांना विमानतळावर जायचं आहे ते बापडे ट्रॅफिक जाम मधून कायमचे वाचतील..

पण काय सांगावं मंडळी? ही मुंबै आहे. आणि आमचे मुंबैकर एकेदिशी ही मोनोरेलदेखील पार जाम करून टाकतील.. हास्य

तर कुठे होतो आपण?

येस्स. अंधेरीला होतो. (अंधेरी म्हणजे आपल्या माधुरीचं गाव बर्र का..! या लेखमालेत मी जाता जाता काही हिंदी-म्हराटी नट्यांचीही उपनगरं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.. हास्य

तर अंधेरीहून आता पश्चिम रेल्वेनं सरळ फुडे चला. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली (अस्सल मुंबैकरांच्या उच्चारी बोरोली. जसं डोंबिवलीचं डोंबोली तस्सच बोरिवलीचं बोरोली..! हास्य , आणि मग दहिसर.

इथेच थांबा मंडळी. कारण दहिसर चेकपोस्टाच्या पुढे मुंबै पालिकेची हद्द संपते अन् आमचा ठाणे जिल्हा सुरू होतो. मुंबै महापा संपून मिरारोड-भाईंदर महापा सुरू होते.. (भाईंदर उच्चारी - भैंदर!) आणि त्यानंतर नायगाव हे स्टेशन घेऊन गाडी येते वसईला. वसई..! माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, वसईची खाडी..! नक्की लिहीन एकदा केव्हातरी वसईच्या गंमती.. हास्य कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. आहाहा..! काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! हास्य

काय सांगू मंडळी, गोरेगाव हा शब्द लिहिताना गोरेगाव पूर्वला स्टेशनच्या बाहेरच असलेलं आमच्या गाळवणकरशेठचं हॉटेल सत्कार आठवलं हो. फारा वर्षांपूर्वी जेव्हा फक्त मुंबै दूरदर्शन होतं तेव्हा मनाली दीक्षित नावाची एक सुंदर स्त्री दूरदर्शनवर निवेदिका होती. वा वा! काय दिसायची छान. तर सांगायचा मुद्दा काय तर आमची मनालीही गोरेगावचीच..! हास्य

मालाडला असलेले भैय्यांचे तबेले-गोठे आठवले, आणि कांदिवली? एका वेड्या वयात चित्रा जोशी नावाच्या मुलीवर जीव जडला होता माझा. चित्राला आता कांदिवलीला दिल्यालादेखील अनेक वर्ष झाली. पण जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा मिश्किल चेहेर्‍याची चित्रा आठवते. असो.. हास्य

अजून बरीचशी माहिती बाकी आहे मंडळी. ती 'मुंबै मेरी जान..'च्या ती फुडल्या भागात.. हास्य

तोवर हे गाणं ऐका....

आपला,
(हाडाचा मुंबैकर) तात्या.

2 comments:

Anonymous said...

vaachun aaThavaNi daaTalyaa. Satkar chi chav ekda ghetli ki jibhevarchi geli tari hrudayaat rengaaLatech. aaNi tumchya dikshit (purvashramichya joshi) bai jithe pahilyaa majlyavar rahaaychyaa, tithech dusryaa majlyaavar lahaanacha moTha jhalo. tya muLe ya aaThavaNi agdi manaa javaLachyaa (yaman saarkhyaach)...

Ravi Datar said...

Arre Tatya ... tu Mumbaikar kassa?

Tu tar THANEKAR !!!

Mumbai Mulund la sampte mitraa ... tya pudhey TMC cha rajya suru hota !

Kadhi taree aaplya sundar Thanya baddal pan lihi ki :-)