December 04, 2010

काही स्वरचित्रे काही शब्दचित्रे (४०).. बिती ना बिताई..बिती ना बिताई..(येथे ऐका)
हे केवळ एक गाणं नाही..,हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे जगातला सारा चांगुलपणा, सारी सृजनशिलता, सर्जनशिलता..! हे गाणं म्हणजे गुलजार-पंचमदांची प्रतिभा, दीदी-भुपेन्द्रसिंगची गायकी, जया-हरिभाईचा अभिनय! हे गाणं म्हणजे मृदुता, हे गाणं म्हणजे हळवेपणा..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!
हे गाणं म्हणजे पूर्वस्मृति, हे गाणं म्हणजे जे जे काही उत्तम, उदात्त, उन्नत ते सर्व.. हे गाणं म्हणजे गायकी, हे गाणं म्हणजे लयकारी, हे गाणं म्हणजे हार्मनी, हे गाणं म्हणजे केरव्यातला वजनदार ठेका!
हे गाणं म्हणजे, 'वो गोलिया क्या खतम हो गई?' या डॉक्टरांच्या प्रश्नावर 'सासें खतम हो गई!' हे हरिभाईचं उत्तर! हे गाणं म्हणजे पतीपत्नीचं गूज, बापलेकीचं गान, पितापुत्राचं अबोल, मुकं प्रेम!
'तुम्हाला 'मेथी का साग' खूप आवडायचं, असं बाबूजी नेहेमी सांगायचे..' असं जया भादुरी प्राणला सांगते..त्यावर 'वो मुझे याद करता था?' हा प्राणचा सवाल..त्यावर 'मेरे बाबूजी जैसा उसुलोंका पक्का और कोई नही..! असं माझे बाबूजी नेहमी म्हणायचे!' हे जयाचं उत्तर.. त्यावर भितीवरील हरिभाईच्या फोटोकडे पाहताना आलेलं प्राणच्या डोळ्यातलं पाणी..! त्याच्या पोटातलं तुटणं..!
हे गाणं म्हणजे बरंच काही..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: