December 23, 2010

(४३) - आलो कुठून कोठे..


(येथे ऐका)
'आलो कुठून कोठे..' - नीधनीसां.. 
या संगतीने किंचितशी 
मल्हाराची आठवण करून देणारी सुरवात..परंतु पुढच्याच 'तुडवीत पायवाट..' ची 'मधध' ही संगती मल्हाराची पायवाट सोडून अचानक शहाण्यात (शहाणा कानडा) शिरते तेव्हा त्या बदललेल्या पायवाटेचं कौतुक वाटतं.. कानांना सुखावतं ते शहाण्यातलं वळण..!

काटे सरून गेले..उरली फुले मनात..! - यातला शुद्ध रिखभ आश्वासक वाटतो. पायवाटेत भेटलेले काटे सरून गेले. त्याचं आता दु:ख नाही.. मनात उरली आहेत ती फक्त त्या वाटेवरली फुलं..!

प्रत्येक पाउलाचे होते नवे इशारे..
सार्‍या ऋतूत लपला हृदयातला वसंत..!


गाण्याचा अंतराही छान. 'तू तिथे मी..' चित्रपटातले आयुष्यभर नौकरी करून, सोबत सार्‍या सांसारिक जिम्मेदार्‍या पार पाडून निवृत्त झालेले मोहन जोशी - ऊर्फ नाना आता निवांतपणे आरामखुर्चीत विसावले आहेत. सुहास जोशी ही त्यांची 'अगं..' देवापाशी काहीबाही पोथी वाचत बसली आहे. आता अगदी कृतार्थ आहेत म्हातारा-म्हातारी..! Smile

संगीतकार आनंद मोडकांचं हे एक छोटेखानी गाणं. गाण्याची चाल अगदी मोकळी परंतु तितकीच सुरेख. छान जमलेला अध्ध्या त्रितालाचा ठेका. गाण्यातली संतूरही अगदी प्रसन्न..! शेवटी काय हो, ' काटे सरून जाऊन मनात फुलं उरणं हेच महत्वाचं..!

-- तात्या अभ्यंकर.

No comments: