March 31, 2011

पाकसिद्ध बल्लवाचार्य गणपा..!

फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..!
पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धी असल्याशिवाय अशी देखणी, चवदार पाककृती हातातून उतरत नाही. सिद्धीला वयाचं वावडं नसावं आणि म्हणूनच इतक्या तरूण वयात गणपा 'बल्लवाचार्य' या पदास पोहोचला आहे हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. 'पाककलेतील सिद्धपुरुष', 'बल्लवाचार्य', 'पाकसिद्धीमहामहोपाध्याय' अश्या अनेक पदव्या आमच्या गणपाला शोभून दिसतील..!
गणपाचा खारेखा हा ब्लॉग अक्षरश: बघत राहावा असा आहे. किती नानाविध पदार्थ? तेही सचित्र, सुरेख मांडलेले..! असं म्हणतात की एखादी सुंदर नटलेली, थटलेली बाई डयरेक्ट बघण्यापेक्षा ती जेव्हा तिचा तो साजशृंगार करत असते, तिचा केशसंभार सवारत असते, खोपा घालीत असते, नाकी नथ आणि गोर्‍यापान दंडावर छानशी जाळीदार वाक चढवत असते तेव्हाच तिला पाहावं..! भाईकाका म्हणायचे की गाण्याच्या सुरवातीला जेव्हा वाद्य लागत असतात, तबले-तानपुरे-सारंग्या जुळत असतात ते श्रवणसुख काही औरच..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृती जेव्हा जन्म घेत असतात तेव्हापासूनच त्या पाहण्यात खरी गंमत आहे, मौज आहे, आनंद आहे. पाककृतीचं छानसं मांडलेलं साहित्य, नानाविध मसाले, कच्चामाल या सगळ्याची पूर्वतयारी याचेही अगदी स्टेप-बाय-स्टेप सुरेख फोटो गणप्याने दिले आहेत. आणि या सार्‍यासोबत गणपाची पाकवाणीही तेवढीच वाचनीय आणि चवदार .! 
चला आता एक लहानशी सफरच करू या गणपाच्या या ब्लॉगची..
काय? सुरवातीलाच गरमागरम आलूपराठा खायचा म्हणता..? हा घ्या..
हे त्याचं नटणं-थटणं पाहा किती लोभसवाणं..
आणि हा घा तैय्यार आलूपराठा. हा वाढताना गणपा म्हणतो - " ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का " 
आता काय? डायरेक्ट दम बिर्याणी खायची म्हणता? अहो थांबा थांबा, जरा तैय्यार तर होऊ द्या. तिला जरा 'दम'देणं सुरू आहे..! 
हम्म.. आता खा मनसोक्त... 
तुम्हाला जयपूर गायकी आवडते का? म्हणजे तुम्हाला अनवट राग आणि अनवट पदार्थ नक्कीच आवडत असणार..! त्याकरता ही घ्या खास तुमच्याकरता सुरणाच्या वड्यांची देखणी पूर्वतयारी.. तेलात सूर मारण्यापूर्वीचे हे सुरणाचे वडे..! तैय्यार वडे पाहायला तुम्हाला त्या ब्लॉगवरच मी पाठवणार आहे..! 
असो..
अहो इथे किती आणि कशाकशाची झलक दाखवू? अजून खूप खूप खादाडी शिल्लक आहे गणप्याच्या ब्लॉगवर. कुठे युरोपियन डोसाच आहे, तर कुठे इदेचा शीरखुर्मा आहे. कुठे पेपर चिकन आहे तर कुठे शाकाहार्‍यांकरता व्हेज बिर्याणी आणि सुक्या मटणाची व्हेज व्हर्जन आहे. कुठे केळफुलाचे जोरदार कबाबच आहेत तर कुठे देशप्रेम जागृत करणारे तिरंगा कबाब आहेत. मधेच छानशी कोथंबीर वडी सजूनधजून उभी आहे! 
कुठे उडपी उत्तपा हुशारी करतो आहे तर कुठे बोंडाची भाकरी तुमचा जीव एवढुसा करते आहे. कुठे चिकन साते, तर कुठे पात्रानी मच्छी. कुठे लाजवाब वांग्याचं भरीत तर कुठे तुमचा आत्मा थंड करणारी मलई कुल्फी..!
हा ब्लॉग निर्माण करून 'देता किती घेशील दो कराने' अशी तुमची माझी अवस्था करून ठेवली आहे गणप्याने! खरंच खूप कौतुक वाटतं, कमाल वाटते..!
या ब्लॉगवर वावरत असताना सतत कुठेतरी एक प्रसन्नता डोकावत असते. ती एकापेक्षा एक अजोड पाकशिल्प पाहताना त्या मागे असलेला दैवी परीसस्पर्श सतत जाणवतो..
आमचे अण्णा माडगुळकर म्हणतात-
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृतींमागे असलेले साक्षात आई अन्नपूर्णेचे अदृष्य हात आपल्याला दिसत नाहीत इतकंच..!
-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

साधक said...

धन्यवाद तात्या. गणपाचा ब्लॉग माहितच नव्हता. मिपा वर त्याच्या रेसिपीस वाचून माहित होत्या.