June 10, 2013

अंधेरी ते वसई..एक छोटेखानी प्रकटन.. :)

काही स्थानकं आणि काही आठवणी.. आज जरा अंधेरी ते वसई हा पश्चिम रेल्वेचा पट्टा आला डोळ्यासमोर..

अंधेरीची माधुरी दीक्षित..योगीनगर, अंधेरी पूर्व. अगदी योगीनगरच्या गणेशोत्सव मंडळातला माधुरीचा नाचदेखील आम्ही प्रचंड गर्दीत जाऊन पाहिला.. पुढे ती एकदा अंधेरीच्या विजयनगरीतल्या नेहमी चट्टेरेपट्टेरी हाफ प्यँन्ट घालून सा-या विजयनगरीत वावरणा-या गोखल्यांकडे आली होती. सौ गोखले आणि माधुरीची आई म्हणे काहीतरी चुलत की मावस बहिणी-बहिणी.. पुढे माधुरी जाम फेमस झाली आणि मग तिचं गोखल्यांकडे येणंही बंद झालं.. गोखले वारले तेव्हा फक्त ५ मिनिटं कारमधून येऊन चटईवर निजलेल्या गोखल्यांना बघून गेली म्हणे..

माधुरी ६८ सालची. आम्ही ६९ चे. आमच्यापेक्षा एकाच वर्षाने मोठी..महाविद्यालयीन वर्षाच्या आसपासच तिचे परिंदा आणि तेजब आले. माधुरी तेव्हा आमच्या कॉलेजातलीच कुणी वाटायची.. साले आम्ही सगळेच तेव्हा माधुरीच्या पिरेमात पडलो होतो..!

गोरेगाव म्हटलं की जसं गोरेगाव पूर्वेला स्थानकाच्या बाहेरच असलेलं गाळवणकरशेठचं हॉटेल श्रीसत्कार आठवतं..तसंच गोरेगाव म्हटलं की मनाली दीक्षित आठवते.. ही मनाली फार पूर्वी मुंबै दूरदर्शनवर निवेदिका होती.. कुठल्याश्या अल्लड, नासमज वयात आम्ही साला या मनालीच्याच प्रेमात पडलो होतो.. काय प्रसन्नवदनी होती..! वा..!

९.१७ च्या ठाणा फास्ट गाडीला चित्रा जोशी असायची.. विलक्षण आकर्षक दिसायची.. मिश्किल होती. गाडी स्थानकात शिरता शिरताच पटकन उडी मारून खिडकी पकडायची! पुढे चित्राला कांदिवलीला दिल्याचं ऐकलं.. जळ्ळी कांदिवली ती..! आमचं ठाणं काय वैट होतं? राहिली असती चित्रा ठाण्यातल्या ठाण्यातच तर काय बिघडणार होतं..?

पण मग केवळ चित्राला तिथे दिली म्हणून मग मला उगाचंच कांदिवली आवडू लागली..आता आयुष्यात जेव्हा जेव्हा कांदिवली क्रॉस करतो तेव्हा तेव्हा ९.१७ च्या ठाणा फास्ट मधली मिश्किल चित्रा आठवते आणि तात्यामामा उगाचंच गालातल्या गालात हसतो आणि कांदिवली स्टेशन नकळत मागे पडतं..

वसई.. माझं एक अतिशय लाडकं गाव. वसईची ताजी मच्छी, तिथली लोकल दारू, आणि वसईची खाडी..

कोणे एकेकाळी वसईच्या मर्लीन नावाच्या एका बाटग्या खिरिस्तावणीच्या पिरेमात पडलो होतो. काय रसरशीत दिसायची आमची मर्लीन..! प्लंबर फर्नांडिस हा माझा दोस्त. त्याचं गाव वसई, फर्नांडिसची आई घरीच दारू बनवायची. अगदी उत्तम चवीची आणि स्कॉचसारखीच लाईट..! (याच फर्नांडिसची सख्खी मावशी खारदांड्याला दारू बनवायची. तिला सगळे 'ज्यो आन्टी' म्हणायचे. धर्मेन्द्र, प्राण, अशोक कुमार ही मंडळी खारदांड्याच्या ज्यो आन्टीच्या खोपटवजा गुत्त्यात बसून दारू प्यायचे. विलक्षण होती ही खारदांड्याची ज्यो आन्टी. पूर्वी एकदा केव्हातरी तिचं खूप छान व्यक्तिचित्र लिहिलं होतं मी पण जळ्ळं कुठे सेव्ह केलंय ते आजही सापडत नाही. असो..)

फर्नांडिसच्या आवशीला मर्लीन दारू बनवायला मदत करायची. मर्लीनचा बाबा हा होल्सेलर कोळी होता..बॉबीमधला प्रेमनाथ दिसतो तसाच दिसायचा आणि लुंगीही तशीच नेसायचा. वसईचा बाटगा कोळी होता मर्लीनचा बाबा
..
आम्ही कधी वसईला गेलो की फर्नांडिसची आई मला प्रेमाने घरी बनवलेली दारू द्यायची.. आणि मर्लीन सुरमई तळून आणायची..!

असतात अशा काही काही आठवणी. त्या त्या स्थानकांच्या आठवणी.. तसं म्हटलं तर अजून दादर आहे, डोंबिवली आहे, झालच तर परळही आहे.. अहो शेवटी आमच्या आवडीनिवडी मध्यमवर्गीय, त्यामुळे स्थानकंही मध्यमवर्गीयच.. खार वेस्टची कुणी पूनम अग्रवाल किंवा बँन्ड्राची कुणी दीपा गोयल किंवा पूजा ओबेरॉय आम्हाला कशाला माहिती असणारेत?!

असो.. आज मात्र अचानक फर्नांडिसच्या आईने केलेल्या दारुची आणि मर्लीनच्या सुरमईची आठवण झाली. परंतु 'मर्लीन, की तिची ताजी फडफडीत सुरमई, यातलं जास्त रसरशीत कोण?' हा प्रश्न मात्र आजही सुटलेला नाही..! :)

-- तात्या फर्नांडिस.

April 25, 2013

कोलाज.. तिच्या काही आठवणींचं....

खूप छान होती ती, गोड होती...

"जत्रेतलं मोठं चक्र. त्यात बसायला खूप आवडायचं तिला. पण पाळणा वरती गेला की खूप घाबरायची ती. गच्च डोळे मिटून माझा हात घट्ट धरून ठेवायची.." - तिच्या आठवणी गोळा करण्याच्या नादात एकदा वहिदाजींना भेटलो होतो तेव्हा त्यांनी सांगितलेली ही आठवण..

आंब्याचं लोणचं, भाजणीचं थालिपीठ, ब्राह्मणी पध्दतीचा लग्नी मसालेभात, वांग्याचं भरीत हे तिचे अत्यंत आवडते खाद्यपदार्थ...

कधी मूड आला तर रात्रीच्या सुमारास ती बराच वेळ मरीनड्राईव्हच्या समुद्रावर हवा खात बसायची. तिला स्वतच्या असीम सौंदर्याचा जराही गर्व किंवा अभिमान नव्हता. मरीनड्राईव्हला Queen's Neckless म्हणतात आणि 'ती Queen म्हणजे मीच, हा रस्ता म्हणजे माझाच Neckless आहे' असं मात्र ती गंमतीने म्हणायची. मला जर कधी या संदर्भातला निर्णायक अधिकार प्राप्त झाला तर मी मरीनड्राईव्हच्या रस्त्याला तिचं नांव देईन..

mb

फारा वर्षांपूर्वी वरळी सीफेसला बाबूलाल नावाचा एक पाणीपुरीवाला होता. तिला बाबूलालची पाणीपुरी अत्यँत प्रिय होती. बाबूलालच्या मुलाला धंद्यात मुळीच रस नव्हता पण चांगली नौकरीही मिळत नव्हती. खूप खटपट करून तिने बाबूलालच्या मुलाला टाटासमुहात चिकटवला होता अशी आठवण वहिदाजींनी सांगितली होती. मरण्यापूर्वी फक्त दोन दिवस आधी, ऑक्सिजनवर असताना तिने बाबूलालची पाणीपुरी खायची इच्छा व्यक्त केली होती...!

मथुरापेढा, अजमेरी कलाकंद, आणि आमच्या मुंबैच्या मेरवनचा मावाकेक तिला खूप आवडत असे. 'मुंबै माझं First Love' असं ती म्हणत असे आणि त्यानंतर तिला लखनऊ आवडत असे. खूप निष्पाप, निर्विष होती ती...

अंथरुणावर खिळण्यापूर्वीची २-३ वर्ष ती स्पूलवरती एकटीच दीदीची गाणी ऐकायची आणि रडायची. अंथरुणावर खिळल्यावर दीदी तिला एकदा भेटायलाही गेली होती तेव्हा दीदीचा हात हातात घेऊन खूप रडली होती ती...

मुंबईत आता बांद्र्याला तिची कबर आहे..तिच्यावर भरपूर धूळ आहे..

खरं तर त्या कबरस्तानातील तिची कबरही आता हरवत चालली आहे..!

खुदा निगेहेबान हो तुम्हारा या गाण्यात,

उठे जनाजा जो कल हमारा
कसम है तुमको न देना कांधा...!


हे तिनं म्ह्टलं होतं ते तसं एका अर्थी खरंच ठरलं....

शेवटली काही वर्ष फार एकाकी होती ती.. कुणी भेटायला येईल का? निदान फोनवर तरी कुणी बोलेल का..?

कुठल्याही चित्रपटाच्या शुटींगच्या अखेरच्या दिवशी सर्व कामगारांना भरपूर मिठाई वाटायची ती...

तिचा तो अरेबियन व्हिलाही आता नामशेष झाला.. आम्हाला ती वास्तूही जतन करून ठेवता आली नाही..!

इथे वेळ कुणाला आहे..? शापित का होईना, परंतु मधुबाला नावाची एक कुणातरी यक्षिण होती हे देखील आता आम्ही फार काळ लक्षात ठेवू की नाही, हे माहीत नाही..!

-- तात्या.

April 10, 2013

पंजाब सिन्धु गुजरात मराठा...

कुठलेही, किंवा खास करून सी एस टी चे बाहेरगावच्या गाड्यांचे आरक्षण सभागृह..
इथे कधी गेलो तर का माहीत नाही, परंतु मला विलक्षण आनंद होतो, मन अगदी सुखावून जातं..

कुणी सरदार भटिंड्याचं बुकींग करण्याकरता उभा असतो.. अजून दोघंतिघं सरदार जे असतात त्यांना दिल्लीला जायचं असतं.. या यूपी-बिहारच्या भय्या लोकांना जसं मुंबईचं वेड, तसं तमाम सरदार लोकांना दिल्लीचं विलक्षण आकर्षण..!

कुणी जौनपुरचा भैय्या अगदी उद्याच निघायचं या तयारीने आलेला असतो.. त्याला ते वेटींग, आर ए सी, तत्काल..वगैरे जाम काही समजत नसतं..

कुणी बिहारी मुजफ्फरपूरला जाणार्‍या पवन एक्सप्रेसच्या मागे लागलेला असतो..

तर चारपाच जणांचं एखादं गुजराथी टोळकं.. राजकोटची तिकिटं काढण्यात गुंग असतं.. त्यांना लग्नाकरता राजकोटला जायचं असतं त्यामुळे त्यांना एकदम २०-२५ तिकिटं हवी असतात..

तर कधी एखादा टिपिकल बंगाली म्हातारा अगदी बरोब्बर ९० की १२० दिवस आधीच हावड्याला जाणार्‍या गीतांजलीकरता उभा असतो..

दिल्लीला जाण्याकरता तर अनेक जण आलेले असतात.. तरूण, तरुणी, म्हातारा, म्हातारी, बिझिनेसवाले.. कुणी हवापालट, तर कुणी नौकरीधंद्याच्या निमित्ताने, कुणी शादीकरता तर कुणी इंटरव्ह्यू करता..

दोघं हिरे व्यापारातले मारवाडी. ते बांद्रा - जोधपूर सूर्यनगरी एक्सप्रेसमध्ये कुठे कन्फर्न जागा मिळते आहे का या विचाराने सूर्यनगरीची करुणा भाकत असतात..

तर कुणी एखादा केळकर, पटवर्धन किंवा बापट नावाचा टिपिकल पुणेकर त्याचं आणि त्याच्या बायकोचं इंद्रायणीचं तिकिट घेण्याकरता उभा असतो..

साऊथची गडबड तर काही विचारू नका..त्यातसुद्धा केरलावाले चिक्कार.. कुणाला पलक्कड, तर कुणाला थेट थिरुवनंतपुरम.. कुणा तमिळीला मदुराईला जायचं असतं.. तर कुणी रामी रेड्डी गुंतुर, विशाखापटणमची करुणा भाकत असतो..

क्रेडीटकार्डवाल्यांची लाईन वेगळी.. वरिष्ठ नागरिकांची लाईन वेगळी..

सेकन्ड एसी वाले तर त्या रिझर्वेशन हॉलमध्येही आपण सेकन्ड एसीमध्येच बसलेले आहोत असे वावरत असतात.. बाकी मात्र सारी जनता स्लीपर क्लासवाली.. अगदी एस १ ते एस १० मधली..

एकंदरीतच तो सारा नजारा पाहून दिल खूश होऊन जातो माझा...

पंजाब सिन्धु गुजरात मराठा,
द्रावि़ड़ उत्कल बंग ।
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधि तरंग

याचं सुरेख दर्शन होतं..!

-- तात्या.

March 18, 2013

कधी वाटतं..

कधी वाटतं..

नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या
घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं..

तर कधी वाटतं...

भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी
संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या..

कधी वाटतं..

बाबूजींच्या पायाशी बसून
'झाला महार पंढरीनाथ..' किंवा
'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं..

तर कधी वाटतं..

थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं..
आणि तिच्या पायांना मिठी मारावी..

कधी वाटतं...

हळूच, पावलांचा आवाज न करता
कलाश्री बंगल्यात शिरावं...
आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या
तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला
पुरिया कानी पडावा..

वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन
चुपचाप ऐकत बसावं..

नाहीच जर हिंमत झाली..

तर कलाश्रीच्या अंगणातली
थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी
आणि माघारी फिरावं...!

-- तात्या.

September 22, 2012

जुने दिवस..

आमची माती आमची माणसं, साप्ताहिकी, अमृतमंथन, प्रतिभा आणि प्रतिमा, छायागीत, गजरा, फक्त शनिवारी आणि रविवारी दाखवले जाणारे मराठी-हिंदी चित्रपट, 
सुहासिनी मुळगावकर, विनायक चासकर, विनय आपटे, सई परांजपे, अरुण जोगळेकर, अनंत भावे, प्रदिप भिडे अशी अन

ेक गुणी माणसं...
वर्ल्ड धीस वीक, चाळ नावाची वाचाळ वस्ती, शोटाइम, हमलोग, नुक्कड, उडान, ये जो है जिंदगी, एक कहानी, सुरभि, बुनियाद, तमस, 'मिले सूर मेरा तुम्हारा', 'बजे सरगम....देश राग', या अवघ्या दोन गाण्यांनी जागवलेली राष्ट्रीय भावना, अशोक चक्रधर संचालित खास होळीनिमित्तचं हिंदी हास्यकविसंमेलन....

आज या सगळ्याची खूप आठवण येते..! आज म्हणे काहितरी तीनशेहून अधिक वाहिन्या आहेत परंतु एकही वाहिनी सलग १५ मिनिटांच्यावर बघवत नाही ही खरी शोकांतिका आहे, आपली सांस्कृतिक दिवाळखोरी आहे..! 

खूप काही पार हरवून बसलो आहोत आपण. आणि म्हणूनच ८० च्या दशकातल्या दूरदर्शनला माझा मानाचा मुजरा...!
-- तात्या अभ्यंकर.

September 14, 2012

इष्काची इंगळी...:)

इष्काची इंगळी..
येथे ऐका - http://www.hummaa.com/music/song/mala-ishkachi-ingali-dasali/134557#

जगदिशरावांची झकास लेखणी, आमच्या गावरान रामभाऊ कदमांचं फक्कड संगीत आणि उषाताईंची ठसकेदार गायकी..

सुरवातीची मस्त यमनातली आलापी..


मी एकलीच निजले रातीच्या अंधारात..
नको तिथ्थच पडला अवचित माझा हात
हाताखालती नागं काढून वैरीण ती बसली..!

नागं काढलेल्या इंगळीला 'वैरीण' म्हटलंय..! :)

जोरदारच लावणी बांधली आहे रामभाऊ कदमांनी.. सुंदर ढोलकी आणि हार्मोनियमचे यमनातले तुकडे केवळ अप्रतिम..!

साऱ्या घरात फिरले बाई गं..
मला 'अवशिद' गवलं न्हाई गं..

छ्या..! आजवर कधी कुणाला इष्काची इंगळी डसल्यावर टायमावर अवशिद मिळालंय का..? अहो अजून अशा अवशिदाचा शोध लागायचाय..! :)

'न्हाई गं.. ' हे शब्द उषाताईंनी अतिशय सुरेख म्हटले आहेत.. आणि त्यातला तो यमनामध्ये येणारा शुद्ध मध्यम.. तोही अगदी अवचितच येऊन पडला आहे..

खरंच कुठे गेली हो आता अशी गाणी..?

या इंगळीचा कळला इंगा..
खुळ्यावाणी मी घातला पिंगा..!

माझ्या मते खेबुडकरदादांच्या या ओळी सुवर्णाक्षरात लिहून ठेवाव्या अशा आहेत.. अहो ही इष्काची इंगळी एकदा का कडाडून चावली ना, की अक्षरश: भल्याभल्यांना पिंगा घालायला लावते.. अगदी खुळं करून सोडते बघा..!



या अजरामर लावणीबद्दल उषाताईंना मोठ्ठं 'थँक यू..' आणि खेबुडकरदादांना व रामभाऊ कदमांना विनम्र आदरांजली..!

(इष्काच्या इंगळीचा मांत्रिक) तात्या अभ्यंकर.. :)

August 31, 2012

शिकवणी - एका कुंद दुपारची..:)

ओ सजना.. बरखा बहार आयी.. -- येथे ऐका - http://www.youtube.com/watch?v=G_KCiPOmNEg

तिचं नांव..? ते जाऊ दे...!.

ती वर्गात होती माझ्या. वाणिज्य शाखा तृतीय वर्ष..

आमची वयं असतील विशीच्या घरातली..

वय वर्ष १९-२०..!

सालं काय वर्णन करावं त्या वयातल्या तारुण्याचं..! शब्दशः: मंतरलेली वर्ष..! त्या वयात कुठल्या जादुई दुनियेत मन वावरत असतं काय समजत नाय बा..

अशातच ती आली माझ्या त्या स्वप्नांच्या दुनियेत.. स्वप्नांचं त्या वयातलं ते बेधुंद राज्य अन मी त्याचा अभिषिक्त सम्राट..! पण त्या राज्याच्या राणीचं सिंहासन मोकळंच होतं.. वर्गातल्या वर्गात आमच्या नजरा जुळल्या.. 'दिल में कुछ कुछ होता है.. झालं आणि राणीच्या त्या रित्या सिंहासनावर ती अवचित येऊन बसली..

आता ध्यानीमनी फक्त तीच दिसू लागली.. कुठेही काही मंगल-शुभ-सुंदर दिसलं की त्यातही तीच दिसू लागली.. कुठे चांगलं गाणं ऐकलं, कुठे काही चांगलंचुंगलं खाल्लं, कधी एखादा उत्तम चित्रपट पाहण्यात आला.. की तीच दिसायची. जे जे उत्तम-उदात्त-उन्नत-महन्मधुर ते ते.. त्या सर्वात फक्त ती आणि तीच दिसू लागली..!

"मला Amalgamation of companies शिकवशील का रे? त्याच्या एंट्रीज मला जमतच नाहीत.. तू सांगशील समजावून..? "

आहाहा.. किती सुरेख आणि सुरेल स्वर तिचा.. चेहऱ्यावरचे ते भाबडे भाव..!

"घरी येशील का रे आज दुपारी माझ्या..? "

ठरल्याप्रमाणे पोहोचलो तिच्या घरी.. वाजले असतील दुपारचे काहीतरी दोन-अडीच.. ती अंधारलेली कुंद पावसाळी दुपार..!

तिची आईही तिच्याइतकीच सुरेख आणि गोड.. मुलीला शिकवायला दुसरा-तिसरा कुणी नसून आपला भावी जावईच खुद्द आला आहे असेच भाव होते हो त्या माउलीच्या चेहऱ्यावर.. म्हणजे मला तरी तेव्हा ते तसेच वाटले.. :)

छान, सुंदर, सुरेख, नीटनेटकं आवरलेलं तिचं घर.. त्या घरातली टापटीप, स्वच्छता सारी तिचीच असेल का हो? अगदी हवेशीर घर.. या खिडकीतून त्या खिडकीत वाहणारी वाऱ्याची मंद झुळूक केवळ तिच्याकरताच वाहते आहे का..? हा फ्लॉवरपॉट तिनेच या विवक्षित ठिकाणी ठेवला असेल का..? ते सुंदर पडदे.. त्यांचं सिलेक्शन तिचंच असेल का..?


छ्या..!

पिरेमात पडल्यावर प्रत्येक गोष्ट सुरेख, सुंदरच का दिसते हो त्या वयात..? त्या वयातली जादू न कळणारी आहे, अगम्य आहे, पण अतीव सुंदर आहे..

निसर्ग..! दुसरं काय? त्या त्या वयाची गणितं तोच बांधून देतो झालं..!

तिनं वह्या-पुस्तकं काढली.. प्राध्यापक अभ्यंकर तिला Amalgamation of companies शिकवणार होते.. :)

"तुम्ही बसा हं.. मी जात्ये केळकरमावशींकडे भिशीला.. " - सासूबाई म्हणाल्या..

जय हो त्या केळकरमावशींचा.. कधीही न पाहिलेल्या त्या केळकरमावशीला मी मनातल्या मनात एक फ्लाइंग किस देऊन टाकला.. :)

आता घरात आम्ही दोघंच.. बाहेर सुरेखसा पाऊस लागला आहे.. आणि त्या कुंद वातावरणातली ती रम्य दुपार.. आणि माझ्यासमोर ती बसली होती... पुस्तकाची दोन-चार पानं उलटली गेली असतील-नसतील,

दुरून कुठूनतरी रेडियोचे स्वर ऐकू आले.. 'ओ सजना.. बरखा बहार आयी.. '..! - सलीलदा आणि दीदीचं एक अतीव सुंदर गाणं.. ताजी टवटवीत चाल आणि जीव ओवाळून टाकावा अशी दीदीची गायकी...!

"ए रेडियो लाव ना.. काय सुंदर गाणं लागलंय बघ.. "

लगेच रेडियो लावतानाची तिची ती मोहक लगबग..

त्या गाण्यातही फार सुंदर पाऊस दाखवला आहे.. मनमुराद कोसळणारा.. त्या अंधारलेल्या दुपारीही अगदी तसाच पाऊस पडत होता.. आणि माझी साधना, माझी वहिदा, माझी मधुबाला.. माझ्यासमोर बसली होती.. :)

छे हो.. आता कसली अकाउंटन्सी आणि कसलं ते Amalgamation of companies..? सब साले बहाने थे..!

ती मला आवडली होती आणि मी तिला आवडलो होतो.. बास्स.. इतकंच खरं होतं..

आता पाऊसही थोडा वाढला होता.. तिथे केळकरमावशीकडची भिशीही एव्हाना रंगली होती.. रेडियोवर दीदीचं 'ओ सजना.. ' सुरू होतं..

पुन्हा एक वाऱ्याची झुळूक आली.. आणि काही क्षण अकाउंटन्सीच्या पुस्तकांनी आपली पानं मिटून घेऊन आम्हाला फार नाही.. पण आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या 'किस'करता थोडी मोकळीक दिली होती.. प्रायव्हसी दिली होती..!

'ओ सजना बरखा बहार आई..! '

गाणं असं ऐकावं, असं अनुभवावं, आणि आयुष्यभराकरता मर्मबंधात जतन करून ठेवावं..!

आज ती कुठे आहे हे मला माहीत नाही.. खरंच माहीत नाही.. पण हा छोटेखानी लेख खास तिच्याकरता..

God Bless You Dear.. Cheers..!

-- प्राध्यापक अभ्यंकर. :)

August 30, 2012

सादगीभरा धर्मेंद्र..

ही हकिगत असेल काहीतरी १४-१५ वर्षांपूर्वीची..

अजय विश्वकर्मा हा माझा एक भैय्या मित्र. लहानपणापासूनच अत्यंत हुशार.. दहावींनंतर व्हिज्युअल इफेक्ट्स, ऍनिमेशन, एडिटिंग वगैरे विषयात प्रावीण्य मिळवलंन आणि नंतर तो चित्रपट व्यवसायाशी जोडला गेला. तिथे काही वर्ष उमेदवारी करून पुढे त्याने अंधेरीला स्वत:चा एक छोटेखानी स्टुडियो सुरू केला. एक छोटीशी पूजा ठेवली आणि त्या पूजेचं त्याने मलाही निमंत्रण दिलं..

 "तात्या, बस थोडेही मेहेमान लोग आनेवाले है.. तुझे आना ही है.. बाद मे तुझे खाना खाकेही जाना होगा."

मी ठरल्यावेळेला तिथे पोहोचलो.. त्याने मला हौशीने त्याची यंत्रसामग्री वगैरे दाखवली.. फार नाही परंतु २०-२५ माणसंच तिथे आली होती.. मी दर्शन घेतलं, तीर्थ-प्रसाद घेतला. जरा वेळाने अगदी उत्तम भोजन झालं आणि अजयला मनापासून शुभेच्छा देऊन मी अजयचा निरोप घेऊ लागलो..

"तात्या, रूक जा थोडा टाइम. तुझे एक खास मेहेमान से मिलाना है.. अभी तक वह आए नही, लेकीन आएंगे जरूर...! "

कोण बरं हे खास मेहेमान? मग मीही तिथे जरा वेळ थांबून त्यांची वाट पाहू लागलो..

जरा वेळाने बघतो तर स्टुडियोच्या बाहेर एक पॉश गाडी येऊन उभी राहिली आणि त्यातून चक्क तुमचा-आमचा लाडका धर्मा मांडवकर, अर्थात धर्मेंद्र उतरला..! आपण तर साला जाम खूश झालो त्याला पाहून.. 

आतापावेतोवर बरीच मंडळी जेवून निघून गेली होती.. आम्ही अगदी मोजकीच माणसं मागे उरलो होतो.. मग धरमपापाजींनी दर्शन वगैरे घेतलं.

अजयने त्यांची माझी ओळख करून दिली.. "ये तात्या है. मेरा दोस्त है..आपका फॅन है. थाना मे रेहेता है.. " 

प्रसन्न हसत धरमपापाजींनी माझ्याशी हस्तांदोलन केलं.. मंडळी, खरं सांगतो, मला त्यांची ती हाताची पकड अजूनही आठवते.. भक्कम लोखंडी पकड..!

 "आप हमारे फॅन है. बहुत अच्छा लगा.. कौनसी फिल्मे पसंद है हमारी..?"

मग मी त्यांना फटाफट काही नावं सांगितली.. 'बंदिनी', 'ममता', 'अनुपमा', 'चुपके चुपके', 'गुड्डी', आणि अर्थातच वीरूचा 'शोले..!'

"वीरू पसंद आया आपको..? " :)

मग धरमपापाजी एकदम मोडक्यातोडक्या मराठीतूनच सुरू झाले..

"तू मराठी आहे ना..? मंग तुज्याशी मराटीतच बोलतो.. " "तुला खरं सांगू काय? तसा मी कोण ग्रेट ऍक्टर वगैरे बिल्कूल नाय रे.. पण तुमचा लोकांचा प्यार एवढा भेटला ना, म्हणून तर माझी आजवर रोजीरोटी चालली..! " 

अगदी हसतमुखपणे आणि प्रांजळपणे धरमपापाजी म्हणाले.. "इतके वर्ष इथे इंडस्ट्रीत हाय, पण तू माझा गुड्डी सिनेमा पाहिला ना? त्यात सांगितल्याप्रमाणे अजूनही मी स्वत:कडे त्रयस्थपणेच बघतो..'

"हमे अभी तक पुरी तरहसे राज नाही आयी ये फिल्मी दुनिया.. यकीन करो मेरा.. आप जैसे चाहनेवालो के आशीर्वाद से रोजीरोटी मिली, चार पैसे मिले.. लेकीन आज भी मै अपने आप को इस दुनिया से अलग मानता हू..! "

मग मला अचानक गुड्डी चित्रपटाअखेरचे त्याचे संवाद आठवले.. त्यात धर्मेंद्र फिल्मी दुनियेने वेडावलेल्या एका मुलीला - जया भादुरीला सांगत असतो.. "मी लहानपणी माझ्या शेतावर मस्त मोकळेपणाने उभं राहायचो तेव्हा मला किती सुरक्षित वाटायचं..पण इथे सगळं वेगळंच आहे.. जो पर्यंत तुम्ही प्रकाशझोतात आहात तोवर तुम्हाला लोक विचारतात.. नंतर तुमची अवस्था एका जळालेल्या स्टूदीयोतल्या एखाद्या मोडक्या दिव्यासारखी होते.. तो दिवा ज्याने त्या स्टुडियोत अनेकांचे चेहरे उजळले..! "

आज मला पुन्हा एकदा धरमपाजींचा हा संवाद आठवला. परवाच ए के हंगल वारले.. किती बॉलीवुडवाले होते त्यांच्या मयताला..? तीनशे-तीनशे करोडवाल्या सलमान-शाहरुखचा जमाना आहे.. कात्रिना, करीना, प्रियांकाचा जमाना आहे.. हंगलसाहेबांना कोण विचारतो? किसको टाइम है..?!

अजयच्या स्टुडीयोत मला भेटलेले धरमपापाजी मात्र मला गुड्डीतल्याइतकेच साधे आणि माणुसकी जपलेले वाटले, सादगीभरे वाटले..


धरमपापाजी.. हेमामलिनीचे "स्वत:..!" (शब्दश्रेय : रमाबाई रानडे! ) :)

जरा वेळाने मी तेथून निघालो... त्यांच्या पाया पडलो.. त्यांनी पुन्हा एकदा मला "अरे अरे.. बस बस.. " असं म्हणून उठवला.. हात मिळवला.. "बेटा, ऐसाही प्यार रहे.. आप है तो हम है..! "

घरी परतताना त्यांच्या हाताची लोखंडी पकड जाणवत होती.. डोळ्यासमोर त्यांचा प्रसन्न चेहरा होता..

- तात्या अभ्यंकर.

April 14, 2012

मुडदा शिंपी भिवा..!

सारं काही तेच ते अन् तेच ते..! विंदांची कुठलीशी कविता आहे म्हणे ही. इथेही तसंच आहे. तोच तो मुंबैचा फोरास रोड. तोच तो तिथला झमझम देशी दारूचा बार अन् तोच तो तिथला कॅशियर तात्या..!

सायंकाळचे वाजले असतील सताठनऊ.. तात्या बारच्या गल्ल्यावर बाटल्यांचा हिशेब करीत बसला होता. बारमधली मंडळी निवांतपणे पीत होती. शिव्या ओव्या गप्पा सुरू होत्या. नेहमीचाच रूटीन कार्यक्रम सुरू होता..

"ए तात्या भडव्या चकणा दे ना..केव्हापासनं मागतोय कोण ऐकायला कबूल नाय..!"

कुणा गिर्‍हाईकाने मला छानशी शिवी दिली होती.. मीही लगेच दुसरी एक सणसणीत शिवी हासडून बारच्या पोर्‍याला त्या इसमाला चकणा द्यायला सांगितला. पोर्‍याने माझी शिवी खाताच त्या इसमाम्होरं चणे नेऊन ठेवले..

'कोण हा मला नावानिशी ओळखणारा? तसा मी त्या फोरासरोडवर 'तात्यासाब' म्हणून प्रसिद्ध होतो. पण आता येथे येणारी नियमित गिर्‍हाईकंही मला वळखू लागली होती म्हणायची! पण हा चक्क मराठीत एकेरीवर येऊन मला 'तात्या..भडव्या..' अशी फुलं वाहणारा कोण?

ती संध्याकाळ तशीच मावळली. पुन्यांदा दोन्चार दिसात पुन्हा तो शिवी देणारा बारमध्ये पियाला आला. तो आला. टेबलापाशी बसला. जीएम डॉक्टरचा त्यानं फुल्ल खंबा मागवला. मग मीच पुन्हा शिवी खायच्या आत चपळाईनं थोडे चणे अन् भाजलेला पापड घेऊन त्याच्या टेबलापाशी गेलो..

"सॉरी बॉस.. परवा चुकून शिवी गेली तोंडातनं.. काय सांगू, डोकं जाग्यावर नसतं.." असं म्हणून तो थोडासा ओशाळा हसला..

त्याच क्षणी मला तो आवडला अन् मीही त्याच्या टेबलापाशी त्याच्यासमोर बसलो..त्याला गप्पात रंगवायचा यत्न करू लागलो. लौकरच त्यात मला यश आलं..

हा कोण? कुठला? याची उत्तरं मिळतील अश्या बेतानं त्याच्यासोबत गप्पा विणू लागलो. जी एम डॉक्टरचा पयला पेग भर्कन संपवला गड्यानं.. दुसरा पेग सुरू झाला. अधुनमधुन मी गल्ल्यावर जात होतो, तिथलीही कामं सांभाळत होतो..

भिवा शिवराम लोहारी असं कायसंसं त्याचं नाव मला समजलं..

"ए तात्या, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खातो मी.. मा***द..!" भिवाच्या डोळ्यात आता पाणी होतं. स्वतःलाच त्यानं चांगली पंचाक्षरी छप्पर उडवणारी शिवी घातली होती..

"का रे बाबा? काय झालं..? रडतोस का? मला सांग की.."

माझ्या प्रश्नातली आपुलकी त्याला भावली असावी. त्यानंतर भिवा माझ्याशी बोलू लागला.. मोकळा झाला.

मुंबै शहर.. लाखोंच्या वस्तीचं.. हार्बर, मध्य व पश्चिम अश्या तीन तीन रेल्वेचं जाळं असलेलं. इथे हप्त्याला किमान सताठ रेल्वे अपघात ठरलेले... त्यात बरेचसे भिकारी-टाकारी, तर बरेचसे अगदी चांगल्या घरचेही. कुणी डोकं खांबाला आपटून चालत्या गाडीतनं पडलेले, कुणी जीव दिलेले, कुणी धावती गाडी पकडताना प्लॅटफॉर्मखाली गेलेले तर कुणी घाईघाईत रेल्वे रूळ ओलांडताना गाडीखाली आलेले..!

सर्वांवर उपाय एकच. पोलीस मयत व्यक्तीला त्याच्या तुटक्या अवयवांनिशी नजिकच्या मुल्शिपाल्टीच्या नायर/सायन/केम/कस्तुरबा इत्यादी रुग्णालयात पोचवतात. अन् तिथूनच नेमकं भिवाचं काम सुरू होतं.. ज्या डेडबॉडीज विविध रुग्णालयात पोहोचवल्या जातात, भिवा त्या सार्‍या रुग्णालयातला व्हिजिटिंग/फ्रीलान्सर मुडदा-शिंपी आहे.. !

एक जाडसर दाभण घेऊन त्याच्यात त्याच जाडीचा भक्कम दोरा ओवून प्रेतांचे तुटलेले हात-पाय-मुंडकी टेंपरवारी किंवा नेणार्‍याला बॉडी एकसंध नेता येईल इतपत शिवणे व त्या बदल्यात संबंधित रुग्णालयातून/मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणे हेच भिवाचं काम, त्याचं उत्पन्नाचं साधन, त्याचं मानधन, त्याची बिदागी...!

"काय करशील तात्या, हे काम पण कुणीतरी केलंच पायजेल ना? आपण करतो..!"

ती संध्याकाळही तशीच संपली.. पण भिवा हप्त्यातनं तीन्चार दिस तरी बारमध्ये येतच होता. "तात्या, फोकलीच्या आज आम्लेट मागव ना. पण तुझ्या पैशाने हां.!"," तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा"? असे आमचे दोस्तीतले संवाद सुरू झाले, हायहॅलो सुरू झालं.. माझी अन् भिवाची वेव्हलेंथ जमली.. भिवा यायचा, तासभर बसायचा.. कधी रडायचा, कधी फुल्ल टाईट झाल्यावर काहीतरी कारणाने कुणाला तरी जाम शिव्या द्यायचा..

मध्यम उंची, कुरूप चेहरा..साधेसुधे कधी बरे तर कधी मळके कपडे, साफ हडकुळा..वगैरे वगैरे. हे भिवाचं वर्णन.. पण चेहरा मात्र विलक्षण बोलका..!

" तात्या, तुझ्याकरताही मागवू का रे आज एक खंबा?"

"नको रे. मी देशी पीत नाही.."

थोड्या वेळाने भिवा टाईट. "मायझंव, इंग्लिश मागवू का तुझ्याकरता? पी ना रे फुकनीच्या.. आज दोन दोन पाय शिवलेत.. एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..!"

एकेका पायाचे तीन-तीनशे रुपये भेटलेत..???????????????????

"तात्या, एक लै भारी मालदार पार्टी होती रे ती.. काय कसा माहीत पण त्यांचा तरुण पोरगा गाडीखाली आला रे.. अरे भल्या घरची माणसं होती रे ती.. मुलाचा बाप/भाऊ/काका/मामा अन् कोण कोण.. सारीजण बॉडी न्यायला आल्ते रे पोराची.."

"मग..?"

"मग काय? ते आले तेव्हा मी नायरच्या मॉर्गमध्येच होतो. पोस्टमॉर्टेम होऊन त्या पोराची ताजी बॉडी नुकतीच आणून ठेवली होती मॉर्गमध्ये.. सोबत तुटलेले दोन पाय..! भडवीचं कार्ट कसं काय ट्रेनखाली आलं असणार कोण जाणे..!"

मी बगितलं.. पार्टी भली होती, पैशेवाली पण वाटत होती. मग त्या पोराचा कोण काका की मामा आत आला. बॉडीची ओळख पटवून बॉडी पायजेल म्हणाला. मी म्हटलं "घ्या ही बॉडी अन् ते पाय..!"

"नेहमीचा अनुभव रे तात्या.. तुला काय लेका, तू मस्त इथे बारमध्ये गल्ल्यांवर बसलेला असतोस..!"

दुनियेत सगळं सापेक्ष आहे मंडळी.. मला तेव्हा माझा कुणी सखा-सवंगडी सी ए होऊन त्याच्या एसी हापिसात बसलेला असतो त्याचा हेवा वाटतो, तर भिवाला माझा हेवा वाटतो..!

"बॉडी शिवायचे पैशे होतील.." भिवानं सुचवलं अन् एक पाय शिवायचे तीनशे रुपये या प्रमाणे दोन पायाचे सहाशे असा सौदा ठरला..!

"एक पाय शिवायचे तीनशे रुपये? अरे शिवणारा काय एकच पाय शिवून घेईल का?" मला विनोदीच वाटला तो प्रकार..

"आमच्यात असाच रेट सांगतात..!"

पण त्या दिवशी मात्र भिवा जामच अस्वस्थ वाटला..

"तात्या, मला पचतील का रे हे सहाशे रुपये? पण मी काय करू? मी माझं काम केलं आहे.."

सारं काही भिवाच बोलत होता..!

मला नेमकं काय बोलावं ते सुचत नव्हतं..

"अरे तात्या, तसा मी या कामाला चांगला सरावलो आहे. आजवर इतक्या बॉड्या शिवल्या की आता या कामाचं काही वाटत नाही. शिवायचे पैशेपण घेतो चांगले.. पण कधी कधी लैच त्रास होतो.."

थोडा वेळ तसाच गेला.. भिवाने बाटली संपवली.. बेभान टाईट झाला अन् तिथेच भडाभडा ओकला..!

मी काहीच बोललो नाही.. बारच्या पोर्‍याला सांगून ते सगळं साफ करून घेतलं.. भिवाच्या चेहेर्‍यावर सोडा मारला. अजूनही भिवा टाईटच होता..बरळत होता -

"तात्या, मला नाय पचले रे ते सहाशे रुपये.. ओकून पडले बघ! भांचोत, त्या पोराच्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो. पोरगंही गोड होतं रे.."

का माहीत नाही, पण भिवाचा माझ्यावर लोभ होता..एकदा केव्हातरी मी चिंचपोकळीला असणार्‍या त्रिवेणीसदन या त्याच्या चाळीतही गेलो होतो. भिवानं तेव्हा माझ्याकरता इंग्लिश मागवली होती..!

त्यानंतरही भिवा बारमध्ये येतच गेला, येतच गेला..

कधी कुणाचा पाय शिवून, तर कधी हात शिवून तर कधी पायाची जोडी किंवा हाताची जोडी शिवून व जोडीच्या हिशेबात पैसे घेऊन...!

- तात्या अभ्यंकर.

April 02, 2012

मैने तेरे लिये ही...

मैने तेरे लिये ही.. (येथे ऐका)

बाबूमोशाय अमिताभ, रमेश देव-सीमा, नोकर परंतु घरात एखाद्या वडीलधाऱ्यासारखा मान असणारा कुणी रामुकाका आणि राजेश खन्ना ऊर्फ आनंद सेहगल..


छान, सुंदर कौटुंबिक घरगुती वातावरण. असं घरगुती वातावरण तुमच्या-आमच्या घरातही अगदी सहज दिसू शकतं. आणि तुमच्या-आमच्या जीवनातल्या अशा साध्यासुध्या, आपुलकीच्या गोष्टी पडद्यावरही अगदी सहजसुंदरतेने दाखवणं हेच तर हृषिदांचं वैशिष्ट्य..!

आनंद सेहगल गाणं म्हणतो आहे - 'मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..'

छोटी बाते, छोटी छोटी बातों की है यादे बडी..!

ही खूप मोठी गोष्ट सांगतो आहे आनंद सेहगल. "बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहीये..! " -- असं म्हणणारा आनंद सेहगल. पण बाबूमोशायच्या चेहऱ्यावर कुठेतरी उदासी आहे. त्याला आनंदचं मरण स्पष्ट दिसतंय..!

दिल्लीहून उपचारांकरता मुंबईला आलेला आनंद सेहगल. आयुष्य भरभरून जगणारा, माणसांचा वेडा आनंद सेहगल. 'रोगाचं नाव असावं ते देखील कसं भारदस्त असावं..!', असं म्हणून आपल्याला Lymphosarcoma of the intestine झाला आहे असं सांगणारा आनंद सेहगल..!

मौत तू एक कविता है
मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको.. -- असं म्हणणारा आनंद..!

मुकेशचा हळवा, गोड गळा - सलीलदांचं संगीत, उत्तम कथा-पटकथा-अभिनय.. सारंच क्लासिक..

हृषिदा, तुम्ही प्लीज परत या हो.. तुमच्यासारखी माणसं सिनेजगताला कायमस्वरूपी हवी आहेत..!

"आनंद मरा नही, आनंद मरते नही..! "

हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.