November 10, 2011

वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?

राम राम मंडळी,

मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.

परंतु दादासाहेब फाळके पारितोषक विजेत्या २२ जून १८९७ या सुंदर चित्रपटात दाखवलं गेल्याप्रमाणे मुलीचं हे ऋतुचक्र सुरू झालं की त्या घरात एक छोटेखानी समारंभवजा प्रसंगच साजरा केला जात असे. एक तर त्या काळात मुलगी वयात यायच्या आधीच तिचं लग्न केलं जात असे, (किंबहुना मुलगी वयात येईपर्यंत बिनलग्नाची राहिल्यास तो एक चर्चेचा विषय होई आणि प्रसंगी तिची व तिच्या आईवडिलांची कुचंबणाही होत असे - संदर्भ - शिरुभाऊंची तुंबाडचे खोत ही कादंबरी) त्यामुळे जेव्हा मुलगी वयात येत असे तेव्हा ती आईऐवजी सासूच्याच सान्निध्यात असे.

२२ जून १८९७ या चित्रपटात मात्र चाफेकरांच्या घरातील एक सूनबाई सीता, (बहुधा चाफेकर बंधुंपैकी वासुदेव हरि तथा बापुराव चाफेकर यांची पत्नी) जेव्हा वयात येते तो समारंभवजा प्रसंग चित्रित केला आहे आणि सोबत एक छान गाणंही आहे. माझा हा लेख मुख्यत्वेकरून त्या गाण्याबाबत आहे. त्या काळात मुलगी वयात आली म्हणजे तिला 'न्हाणं' अथवा 'नहाण आलं', 'ती मखरात बसली', 'तिला पदर आला', इत्यादी शब्दप्रयोग वापरात असायचे. त्यापैकीच 'न्हाणं आलं' हे शब्द सदर गाण्यात वापरले आहेत..

सीताबाईला चाफेकळीला न्हाणं आलं.. (येथे ऐका - चित्रफितीतील गाण्याची सुरवात ४ मिनिटे व १८ सेकंदांनी)

आता मंडळी, खरं सांगायचं म्हणजे या गाण्यात काही गहन अर्थबिर्थ आहे असं मुळीच नाही. आपण फार तर याला माजघरातलं एक गाणं, असं म्हणू शकतो. तरीही या गाण्याची चाल छान आहे, शब्द साधे परंतु मस्त आहेत आणि विशेष म्हणजे यातली यमकं एकदम फक्कड आहेत. लयीची गुंफण तर झकासच आहे. सोबत तालाकरता फक्त एक चौघडाटाईप वाद्य आणि चाळ किंवा घुंगरू. तरीही हे गाणं जमून गेलं आहे..! :)

हम्म. पुण्यातल्या एका रस्त्यावरून मी चाललो आहे. वाटेत खास सदाशिवपेठी एक वाडा लागला आहे. पण त्यातून हा वाजंत्य्रांचा कसला आवाज येतो आहे? काही लग्नबिग्न आहे क्काय त्या वाड्यात..?

छे हो..!

वाजंत्री वाजतात वाड्यात काय झालं?
सीताबाईल चाफेकळीला न्हाणं आलं..! :)

'वाड्यात काय झालं..' मधली 'पपप मगरेग' संगती एकदम मस्त! आणि 'न्हाणं आलं' चा षड्जावरचा न्यास एकदम खणखणीत बरं का. कुणी गायलंय ते माहीत नाही, पण बाईचा आवाज सुरेल आहे, मोकळा आहे. अगदी चित्पावनी आहे असं म्ह्टलंत तरी चालेल! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते साखर
सीताबाई हिचा दीर गुंफितो गं मखर..!

सूनबाईला न्हाणं आलं म्हणून आता सासू काय काय वाटते आहे पाहा. सर्वप्रथम ती साखर वाटते आहे. सीताबाईचा दीर आपल्या भावजयीला मखरात बसण्याकरता तिच्याकरता मखर गुंफतो आहे. इथे साखर आणि मखर हे साधं शिंपल यमक जुळवलं आहे. बाय द वे, दीर या शब्दातली 'मध' ही संगती अंमळ सुरेखच..! :)

पहिल्यानं न्हाणं आलं सासू वाटिते बत्तासे
सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!

साखर झाली. आता बत्तासे! मज्जा आहे बॉ सीताबाईची. मंडळी बाकी काय पण म्हणा, बत्तासे मात्र चवीला झकासच लागतात हो! आणि आरसे/बत्तासे हे यमकही मस्त! :)

बाय द वे, 'सीताबाई जरी तुझ्या मखरी आरसे..!' ह्या ओळीची लय मात्र विशेष सुरेख आहे. आणि सोबत छुन छुन छुन असा घुंगरांचा ठेका.. सी ता बा ई जरी तुझ्या मखरी आरसे हे शब्द किती सुरेख लयीत पडले आहेत पाहा..!

ह्या गाण्याची चाल कुणी बांधली आहे ते माहीत नाही. की पारंपारिकच आहे..?

पहिल्यानं न्हाणं आलं सासू करिते सोहळा
सीताबाई तरी नेस पाटव गं पिवळा..

अगो सीताबाई, अगो रांडच्ये तुझी सासू तुला न्हाणं आलं म्हणून एवढा सोहळा करत्ये, अगो तो पिवळा पाटव तरी नेस गो बये..! :)

मला 'पाटव' या शब्दाचा एक्झॅक्ट अर्थ माहीत नाही परंतु हा शब्द मात्र एकदम मस्त वाटतो. पुन्हा सोहळा-पिवळा हे यमक झकास..! :)

पिव्ळं पिवळं गं पातळ सार्‍यांना सांगितलं
सीताबाई हिला न्हाणं आलं आईकलं..!

धत तेरीकी..! अहो तिला नहाण आल्याचा एवढा सोहळा केलात आणि वर म्हणता काय? तर,

सीताबाई चाफेकरणीला नहाण आलं असं ऐकलं खरं! :)

'पिवळं पिवळं पातळ' हे शब्द लयीत छान बसावेत म्हणून 'पिव्ळं पि व ळं पातळ' असे टाकले आहेत. या गाण्याची सांगितिक बाजू वरकरणी जरी साधी सोपी वाटली, तरी तिला सुरालयीचा भक्कम पाया लाभला आहे हे निर्विवाद..!

'ऐकलं' या शब्दाकरता 'आ ई क लं' ही चार लयदार अक्षरं गाण्यात अधिक छान शोभतात..! :)

पण मंडळी, क्षणभर यातला मजेचा वा सांगितिक भाग सोडून द्या, पण ज्या पार्श्वभूमीवर हे गाणं चित्रित केलं आहे ती पार्श्वभूमी खूप गंभीर आणि भयानक आहे. चाफेकरांच्या घरातल्या आणि इतर चार घरच्या लेकीसुना हा नहाण प्रसंग त्याकाळची एक रीतभात म्हणून निभावतात खरा परंतु,

थोरले चाफेकर दामोदर हरि चाफेकर फासावर गेले आहेत, त्यांची विधवा गाण्यातल्या एका चित्रात सुन्न बसलेली दाखवली आहे. इतर दोघा चाफेकर बंधुंची फाशीही निश्चित आहे. एकाच घरातील तीन तीन तरूण मुलं फासावर जात आहेत त्या बापाची अवस्था काय असेल..? एक साधा कीर्तनकार तो. उद्या मुलं कीर्तन शिकतील, काही कामधंदा करतील यावरच सारी मदार असणारा..! गाण्यातल्या एका चित्रात तो खिन्न, हारलेला, हताश बापही बसलेला दाखवला आहे..!



असो..

कुठून विषय सुरू केला होता, अन् कुठे येऊन पोहोचलो पाहा..!

आता अधिक काही लिहित नाही.. माझा त्या तिघा चाफेकर बंधुंना मानाचा मुजरा..!

-- तात्या अभ्यंकर.

November 01, 2011

..पर अंधेरे से डरता हु मै मां..!

मेरी मां.. (येथे ऐका)


"आई नको ना गं मला इथे एकट्याला ठेऊन जाऊस! मी तसं कधी बोलून दाखवत नाही पण मी अंधाराला खूप घाबरतो गं आई. इथे खूप अंधार आहे.
हो, आहे मी थोडासा खोडकर, पण तू मला खूप आवडतेस आणि मला तुझी खूप काळजीही वाटते. आता हे कसं तुला समजावून सांगू..? पण तुला तर हे सगळं माहित्ये ना आई? मग मला इथे एकट्याला का ठेऊन जातेस? आता खरंच मी चांगला वागेन. मस्ती, द्वाडपणा करणार नाही. प्रॉमिस..! पण मला इथे नाही रहायचं..!"

tjp

"इथे सगळी खूप अनोळखी मुलं आहेत. मला भिती वाटते इथली.. मला इथे ठेऊन जाऊ नकोस. ही गर्दी आहे ना, ती मला काहितरी करेल मग मी परत घरी कसा येऊ शकेन..? मला तुझ्यापासून इतका दूर करू नकोस की माझी आठवणही तुला येणार नाही.. खरंच मी इतका वाईट आहे का गं आई..? सांगा ना..!"

"आई, मला माहित्ये मी तुझा खूप लाडका आहे. बाबा जेव्हा जेव्हा मला जोरांने ओरडतात ना, तेव्हा तू येऊन माझी बाजू घेशील, मला सांभाळशील याची खात्री असते मला! तू जवळ असलीस ना आई, की खूप सुरक्षित वाटतं मला! पण मी बाबांना हे काही सांगू शकत नाही. तुला हे सगळं माहित्ये ना आई..? मला भिती वाटते त्यांची. खरंच भिती वाटते.."

tjp

चवथी-पाचवी पर्यंत आईच्या पदराखाली लाडाकोडात वाढलेला ईशान अवस्थी. एक खोडकर मुलगा. अक्षरं/आकडे समजण्याची आकलनशक्ती क्षीण असलेला, ती समजून घेतांना गडबड होणारा आणि त्यामुळेच 'लेटर्स आर डान्सिंग' असं म्हणणारा ईशान.. तो सुधारावा म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला आता शाळेतून काढून लांब बोर्डिंग शाळेत ठेवला आहे. तिथे सगळं नवीन. मुलं/सवंगडी नवीन. जाड चश्मावाले अन् मिश्यावाले कडक मास्तर. तिथे आता लाड करणारी आई नाही..!

हे गाणं म्हणजे त्या लहानग्याचं मनोगत..! आईवेडं पोर आहे ते. गाण्याचं चित्रिकरण केवळ अप्रतिम...रडवेलं झालेलं ते पोरगं, आता एकटं, एकाकी. आत्तापर्यंत अगदी सकाळी उठवण्यापासून ते पायात मोजे-बुट चढवणारी आई होती. आता हे लाड नाहीत. कडक मास्तरांच्या निगराणीखाली सगळं आपलं आपण करायचं! आत्तापर्यंत कौतुकानं गरम गरम भरवायला आई होती, आता मेसच्या शिस्तीत आपलं आपण जेवायचं! :)

पोरगं खरंच बावरलं आहे, घाबरलं आहे. शेवटी नळ सोडून आपला रडवेला चेहेरा घुतं आणि चुपचाप झोपतं आणि आईविना पहिला दिवस संपतो..! :)

'तारे जमी पर'. एक सुरेख, देखणा, अप्रतिम चित्रपट आणि त्यातलं शंकर महादेवन ने गायलेलं हे अप्रतिम गाणं. जियो..!

पण खरंच मंडळी, हे गाणं ऐकताना/पाहताना पोटात कुठेतरी खूप तुटतं..पडद्यावर हे गाण पाहताना कुठेतरी आपल्या आईची आठवण होते आणि पडद्यावरचं चित्र क्षणभर धुसर होतं.. परमेश्वराने आई अन् तिचं लेकरू हे नक्की कसलं नातं निर्माण करून ठेवलं आहे हे खरंच समजत नाही...!

-- तात्या अभ्यंकर.

October 31, 2011

हाल ए दिल..

राम राम मंडळी,

हाल ए दिल.. (येथे ऐका)

श्री अमिताब बच्चन ऊर्फ अमिताब श्रीवास्तव (यूपीतल्या इलाहाबादच्या या भैय्याचं 'श्रीवास्तव' हे मूळ आडनांव, जे हरिवंशरायांनी 'बच्चन' असं बदलून घेतलं), ऊर्फ बीग बी, ऊर्फ बच्चनसाहेब हा खरोखर एक अजब माणूस आहे. अत्यंत गुणी कलाकार, एक मोठा कलाकार, एक निर्विवाद दिग्गज! गेली ४० दशकं हा बुढ्ढा म्हातारा होतच नाहीये. त्याचा अभिनय, त्याचा आवाज सगळंच जबरा! आणि मुख्य म्हणजे आजही सर्व जुन्या नव्या माणसांना जमवून घेत हा इसम पुढेपुढेच चालला आहे. मग त्याचा केबीसीचा चौथा की पाचवा सीजन असो, की अलिकडेच प्रदर्शित झालेला 'बुढ्ढा होगा तेरा बाप' हा चित्रपट असो..इतका मोठा कालावधी प्रकाशाच्या झोतात रहाणं आणि लौकिकार्थाने 'नंबर वन' पदावर रहाणं फारच कमी लोकांना जमतं त्यापैकीच बच्चन साहेब एक.

तूर्तास मी हे अमिताब पुराण इथेच आवरतं घेतो आणि वळतो एका छानश्या गाण्याकडे. 'बुढ्ढा होगा..' चित्रपटातलंच विशाल-शेखरचं संगीत असलेलं आणि खुद्द बचन साहेबांनी गायलेलं 'हाल ए दिल..' हे यमन रागातलं गाणं. यमन आला रे आला की माझ्यासारख्या यमनभक्तांची समाधी लागलीच म्हणून समजा. मग तो यमन मदनमोहनच्या अनपढ मधला 'जिया ले गयो जी मोरा सावरिया असो', की बाबूजींच्या 'समाधी साधना' तला असो की विशाल-शेखर च्या 'हाल ए दिल..' मधला असो. यमनला तोड नाही, यमनला पर्याय नाही. आपल्या अभिजात रागसंगीताला पर्याय नाही. फक्त काही वेळेस खंत एकाच गोष्टीची वाटते की अलिकडचे संगीतकार त्याची ताकद, त्यातलं अफाट-अनंत असं पोटेन्शियल ओळखू शकत नाहीत, पाहू शकत नाहीत, किंबहुना त्यांची कुवतदेखील कुठेतरी कमी पडत असावी. मला नक्की माहीत नाही.. असो..

या पार्श्वभूमीवर विशाल-शेखरचं नक्कीच कौतुक आणि अभिनंदन की त्यांनी हा छोटेखानी यमन आम्हाला दिला..

हाल ए दिल तुमसे कैसे कहू..

स्वभावत:च हे गाणं म्हणजे एक गुणगुणणं आहे. स्वत:शीच साधलेला संवाद आहे. माझं 'हाल ए दिल..' बाई गं तुला कसं सांगू? 'नी़रेग' ही यमनची अगदी 'बेसिक लेसन' असलेली संगती छानच गायली आहे बच्चनसाहेबांनी. त्याच 'हाल ए दिल' ची 'प परे' ही अजून एक संगती. आणि 'कैसे कहू..' तला षड्ज. व्वा बच्चबबुवा!

यादो मे ख्वाबों मे..

डायरेक्ट धैवतावर न्यास असलेली 'यादो मे' तली 'गपध' संगती पुन्हा छान आणि 'ख्वाबो मे' तली 'धनीनीध..' ही सुरावट घेऊन बच्चनसाहेब ज्या रितीने पंचमावर स्थिरावतात ते केवळ सुरेख आणि कौतुकास्पद. हा पंचम अत्यंत सुरीला..!

'आपकी छब मे रहे..'

इथे 'आप की' शब्दातली पपम' संगती. हा तीव्र मध्यम यमनाची खुमारी वाढवतो, जादुई तीव्र मध्यम हा..! आणि 'छब मे रहे..' मध्ये हळूच लागलेला शुद्ध मध्यम आणि शुद्ध गंधारावरचा नाजूक न्यास! हा शुद्ध मध्यम आल्यामुळे मात्र आमचा यमन हळूच लाजतो आणि क्षणात त्याचा 'यमनकल्याण..' होतो. सांगा पाहू, कोणता बरं हा शुद्ध मध्यम? 'क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा..' ही ओळ आठवा पाहू क्षणभर. यातल्या 'मेळ' या शब्दात तुम्हाला हाच शुद्ध मध्यम सापडेल. हे आपले उगीच तात्यामास्तरांच्या शिकवणीतले दोन बोल, जे वाचक संगीताचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता बर्र् का! :)

'आठवणीत आणि स्वप्नात मी तुझ्याच 'छब' मध्ये राहतो गं बये. आता काय नी कसं सांगू तुला..!' :)

आणि ही बया तरी कोण..? तर साक्षात ड्रीमगर्ल हेमा. हो, आमच्या धर्मा मांडवकाराची हेमा! खरंच कमाल आहे बुवा या बाईची. इतकं वय झालं तरी अजूनही काय दमखमातली दिसते!


तर अशी ही दमखमातली हेमा आणि आमचा पिकल्या फ्रेन्च कट मधला गॉगल लावलेला बुढ्ढा जवान बच्चन यांच्यावरचं या गाण्याचं चित्रिकरणही छान. आणि सोबत बच्चनचा सादगीभरा सुरीला आवाज, छान सुरेल लागलेले यमनाचे स्वर आणि हाल ए दिल सांगणारे शब्द..!

विशाल शेखर, तुमचं अभिनंदन आणि कौतुक. अशीच चांगली चांगली गाणी, सुरावटी अजूनही बांधा रे बाबांनो. थांबू नका. हल्लीच्या काळात चांगलं सिनेसंगीत ऐकायला मिळत नाही. आम्ही भुकेले आहोत. चांगली चांगली गाणी बांधा, तुमच्या उष्ट्याकरता नक्की येऊ..!

-- तात्या अभ्यंकर.

October 26, 2011

मोरा गोरा रंग..

माझ्या सर्व मायबाप वाचकांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

मोरा गोरा रंग.. (येथे ऐका)


थोरल्या बर्मनदांचं बंदिनी चित्रपटातलं एक अप्रतीम गाणं. दिग्दर्शक बिमलदा, गीत- गुलजारसाहेब, संगीतकार थोरले बर्मनदा, सोज्वळ सौंदर्यवती नूतन आणि मा दिनानाथरावांची थोरली हृदया, अर्थात लतादिदि मंगेशकर. (आपल्या महितीसाठी - दिदिचं पाळण्यातलं नांव - 'हृदया' हे होय.)

सगळी टीमच भन्नाट. फक्त आणि फक्त उत्कट कलेशी बांधिलकी असलेली. यातलं ना कुणी त्या बापुडवाण्या झी/सोनी वहिनीच्या उथळ इंडियन आयडॉलच्या स्पर्धेतलं, ना कुणी महागायक/महागयिका, महाराष्ट्राचा गौरव इत्यादी समस चा लाचारी जोगवा मागणर्‍या खेदजनक स्पर्धेतलं. तरीही सारेच अव्वल..!

मोरा गोरा अंग लइ ले
मोहे शाम रंग दइ दे
छुप जाऊँगी रात ही में
मोहे पी का संग दइ दे

एका तरुणीचं मनोगत. लइ ले आणि दइ दे ही क्रियापदं अगदी वळणदार..किती सुरेख शब्द आहेत या गाण्यात! हिंदी भाषेचा गोडवा काही औरच आणि त्यातले लइ दे, दइ दे, हमका बताइ दे इत्यादी उच्चार केवळ दिदिनेच करावेत..

एक लाज रोके पैयाँ
एक मोह खींचे बैयाँ

क्या बात है! जेवढा मोठा मोह, तितकीच मोठी अदब आणि संस्कार..! मोहाने बाही खेचली जातेय परंतु संस्कार पाउलांना थांबवताहेत..! 'एक मोह खिचे पैया' तल्या दिदिच्या कोमल गंधाराबाबत काही भाष्य करायला मी फार छोटा माणूस आहे! 'बैयाँ' शब्दातली 'नीसां' संगती केवळ लाजवाब. आणि त्यानंतरचं दिदिचं 'हाए..!'

असं 'हाए' गेल्या दहा हज्जार वर्षात झालं नाही आणि पुढे होणार नाही..! (जाता जाता - तेच 'हाए' अनुराधा या अप्रतीम चित्रपटात पं रवीशंकरांनी दिदिच्या 'कैसे दिन बिते कैसे बिती रतिया..' या गाण्यात घेतलं आहे!)



जाऊँ किधर न जानूँ
हम का कोई बताई दे

'जाऊँ किधर न जानूँ..' या ओळीतलं कोमल निषाद आणि शुद्ध धैवताचं तसं अनोखं परंतु छान अद्वैत..आणि त्याच नीध चं 'हम का कोई बताई दे' या ओळीनं पंचमावर न्यास करून केलेलं छान समाधान..!

बदरी हटा के चंदा
चुप के से झाँके चंदा

हम्म! इतका वेळ ढगाआड लपलेला चंदा आता हळूच त्या मुलीचं मनोगत ऐकायला आला आहे. प्रकट झाला आहे.

तोहे राहू लागे बैरी
मुस्काये जी जलाइ के

पण तिला ते तेवढंसं आवडलेलं नाहीये. तिच्या चेहेर्‍यावरचा तो लटका राग केवळ क्लास! आणि मग 'तोहे राहू लागे बैरी..' असं म्हणून त्या चंद्राला 'तुझ्यामागे राहूचं शुक्लकाष्ट लागो..' अशी दिलेली प्रेमळ धमकी!

आपले गुलजारसाहेब शनीच्या ऐवजी बहुधा राहूला अधिक घाबरत असावेत. म्हणूनच ते नायिकेकरवी चंद्राच्या मागे चक्क राहूची पीडा लावू इच्छितात..! :)

कुठे अवखळपणा तर कुठे थोडा नखरा, कुठे लटकेपणा तर कुठे 'मोहे पी का संग..' किंवा 'तोहे राहू लागे बैरी..' तली मनलुभावणी मेलडी. एखादं गाणं किती देखणं असावं, सुरेख असावं..?

कहाँ ले चला है मनवा
मोहे बाँवरी बनाइ के

क्या केहेने! इथे किती मोठी गोष्ट सांगून गेलेत गुलजारसाहेब! प्रत्येक तरुणीच्या आयुष्यात असं एक वेडं वय येतं जेव्हा कुणीतरी भेटावसं वाटतं, कुणासोबततरी हातात हात धरून कुठेसं जावसं वाटतं. मस्त वार्‍यावर फडफडणारं मन. अगदी खरोखर 'बाँवरी' बनवणारं ते वय..!

मंडळी, एखादं गाणं आपल्याला ऐकायला आवडतं, कानांना गोड वाटतं. परंतु मी इथे इतकंच सांगेन की आपण त्याही पुढे जाऊन त्या गाण्याकडे कसं बघतो, त्यातल्या स्वरसंगती, न्यासस्वर, लयतालाची बाजू, त्यातले शब्द अन् त्याची चाल कशी समजून घेतो हेही महत्तवाचं आहे. त्यामुळे ते गाणं आपल्याला निश्चितच अधिकाधिक आनंद देऊन जाईल..

उगाच कुठेही गोंगाट नसलेला कमीतकमी वाद्यमेळ, सुंदर शब्द, वजनदार ठेका, तरीही अगदी भरपूर मेलडी असलेलं हे गाणं. नूतनची मोहक छबी आणि तिचा सहजसुंदर गाण्यानुरूप अभिनय. का माहीत नाही परंतु नूतनकडे बघताना मला उगाचंच आमच्या मुमताज जहान बेगम दहलवी 'आपा'ची आठवण झाली! :)

आता कुठे गेली हो अशी गाणी? खरंच, कुठे गेली..? :(

आहे तो केवळ बराचसा गोंगाट अन् मेलडीचा अभाव असलेले भडक वाद्यमेळ..!

असो..

-- (दिदिची व्यक्तिपूजा, विभूतीपूजा करणारा तिचा एक लोटांगणवादी चाहता) तात्या अभ्यंकर.

October 10, 2011

हाथ छुटे भी तो...


आज पुन्हा एकदा खूप काही हरवलं आहे. पोटात खूप काही तुटतं आहे. जगजीत सिंग साहेबांसारख्या एका मनस्वी सुरील्या, भावतरल गळ्याच्या धन्याला आज आपण मुकलो आहोत. एक खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेला आहे.

जगजित सिंग यांच्याच एका गाण्याचे रसग्रहण करण्याचा माझा हा एक प्रयत्न. हीच माझी त्यांना विनम्र आदरांजली..!

हाथ छुटे भी तो..!
(इथे ऐका)

'पिंजर' चित्रपटातलं उतम सिंग यांचं संगीत असलेलं जगजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं. केवळ अप्रतीम. हे गाणं ऐकलं की काव्य, संगीत आणि गायन या सर्वार्थाने एक अत्यंत उच्च दर्जाचं गाणं ऐकल्याचं समाधान मिळतं, जीव तृप्त होतो!

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

पुरियाधनाश्रीचे बेचैन स्वर. राग पुरियाधनाश्री. समाधीचा राग..!

'वक्त की शाख से लम्हे..' या ओळीतील 'लम्हे'वर कोमल धैवत विसावतो, उदास सायंकालच्या सावल्या लांबतात आणि ते 'लम्हे' काळजात घर करतात..!

जिसने पैरों के निशा भी नही छोडे पिछे,
उस मुसाफिर का पता भी नही पुछा करते..!

क्या केहेने..! या ओळीचं चित्रिकरण तर विशेष सुरेख आहे!

जिसने पैरो के..' ही ओळ जेव्हा तार षड्जाला स्पर्ष करते तिथे पुरियाधनाश्री जीव कासावीस करतो. ते पुरियाधनाश्रीचं समर्पण! आणि त्यानंतरची पंचामवरची अवरोही विश्रांती. हा खास पुरियाधनाश्रीतील पंचम. प्रार्थनेचा पंचम..! आणि ही सारी जगजितसिंग साहेबांच्या सुरांची आणि त्यांच्या विलक्षण भावपूर्णता असलेल्या ओल्या रसिल्या गळ्याची किमया..!

'छुट गये यार ना छुटी यारी मौला..' चा कोरस सुंदर. कोरसचं सरगम गायनही अगदी परिणामकारक. गाण्याच्या चित्रिकरणातील उर्मिला अभिनयात, दिसण्यात नेहमीप्रमाणेच लाजवाब!

प्रिय जगजित सिंग साहेब,

हाथ छुटे भी तो रिश्ते नही छुटा करते,
वक्त की शाख से लम्हे नही टुटा करते!

खरं आहे आपण म्हणता ते. आज आपण आम्हा सर्वांचा हात सोडून निघून गेला आहात, परंतु आपल्यातलं सुराच नातं कधीही तुटणार नाही. आम्हाला तृप्ती, समाधान आणि आनंद देणर्‍या आपल्या अनेक मैफलींमधले, गायकीमधले लम्हे कधीही पुसले जाणार नाहीत, विसरले जाणार नाहीत.

सुरांनी बांधलेली नाती कधीही तुटत नाहीत हेच खरं..!

-- तात्या अभ्यंकर.

August 05, 2011

नंदावैनी...

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

"राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.."

"अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?"

"अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते!

"प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू? अरे अद्वैत, मारू नको ना त्याला. मी आता उठले ना, की झोडून काढेन हां सर्वांना!"

"मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

दुपारचे काहितरी बारा-साडेबारा वाजलेले असतात आणि नंदावैनी मुक्त कंठाने घरातलं पाळणाघर हाकत असते. एकिकडे,

"गोविंदा माझा कृष्णमुरारी..." असं कुठलंसं गाणं म्हणत मांडीवरल्या कुणा तान्ह्या आर्चिसला खेळवत असते, त्याला ग्राईपवॉटर का कायसं पाजत असते! चिन्मय, प्रसाद, नेहा, राहूल, अस्मिता, अथर्व, चैत्राली अशी दहापंधरा बाळगोपाळ मंडळी नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. या सार्यांचे आईवडिल मोठ्या विश्वासाने आपापली पिल्लं नंदावैनीकडे सोपवतात आणि दिवसभरच्या रोजीरोटीकरता मुंबईत कुठे कुठे कामावर निघून जातात. आता त्या पिल्लांची आई, बाप, काकू, मावशी सारं काही नंदावैनीच असते!

नंदावैनी..!

आमचीच चाळकरी. दोन मुलींना मागे ठेवून नवरा या जगातून चालता झाल्यावर शिवणकामाच्या मिळणार्‍या तुटपुंज्या पैशात नंदावैनीचं भागेनासं झालं. सुरवातीला एक, मग दोन, असं करत करत नंदावैनीचं सगळं घरच मुलांनी भरलं, त्या घराचं पाळणाघर झालं! अगदी चार-सहा महिन्यांच्या तान्ह्या आर्चिसपासून ते दुसरी-तिसरीत शिकणार्या प्रसाद -अस्मितेपर्यंत सर्व वयांची मुलं आज नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. आमची नंदावैनी या सार्‍यांची रिंगमास्टर! सकाळची-दुपारची शाळा सांभाळून आठवी/नववीत असलेल्या नंदावैनीच्या दोन मुलीही या बाळगोपाळांची अगदी प्रेमाने काळजी घेतात, त्यांना सांभाळतात.

नंदावैनी तशी फटकळ, परंतु प्रेमळही तेवढीच. एखाद्या मुलाच्या आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले आहेत म्हणूनच केवळ त्यांना सांभाळलं पाहिजे अशी कोरडी कर्तव्यभावना तिच्यापाशी कधीच नसे. नंदावैनी त्या सर्व मुलांचं अतिशय प्रेमाने करायची, प्रेमाने सांभाळायची! परंतु शेवटी मुलंच ती! त्यामुळे दंगामस्तीही अगदी भरपूर करत. त्यामुळे मग नंदावैनीचा तोंडपट्टाही सुरू व्हायचा. कुणाला रागव, कुणला धपाटा मार, कुणी अगदी छान, निमूट वागलं की त्याचं भरभरून कौतुक कर, "तू का त्याला उलट बोललास? दादा आहे ना तो तुझा?" असे मुलांवर नकळत संस्कार कर.. असे नानाप्रकार नंदावैनीकडे दिवसभर चालत असत. पाळणघर कसलं, नंदावैनीकडे रोज सकाळी भरणारं गोकूळच होतं ते! आणि का कुणास ठाऊक, परंतु मुलांनाही नंदावैनीचा लळा फार लौकर लागायचा. मग नंदावैनी कितीही ओरडू देत, रागावू देत, मुलांना नंदावैनी कधी परकी वाटायची नाही..

छान बोलका चेहेरा, दिसायला आखीव-रेखीव, मध्यम उंची, मध्यम बांधा असलेली पंचेचाळीशीतल्या घरातली आमची नंदावैनी आणि तिचं पाळणाघर हा आमच्या चाळीतला एक जिवंत झरा. नंदावैनी मुलांना सांभाळायचे जे पैसे घ्यायची त्यात त्या मुलांचं दुपारचं जेवण, मधल्यावेळचं खाणंही असे. दुपारच्या जेवणात वरणभात-तूप-मीठ-लिंबू हा पूर्णाहार कंपलसरी! तो प्रत्येक मुलाने खाल्लाच पाहिजे असा नंदावैनीचा कायदा असे. शिवाय सोबत भाजी पोळी, कधी तूपसाखरेच्या किंवा लसूणचटणी घातलेल्या पोळीची गुंडाळी मुलांनी खाल्लीच पाहिजे असाही नंदावैनीचा नियम असे. मॅगी, केलॉग्ज्स वगैरे शब्दांनादेखील त्या घरात बंदी होती! विविध वयोगटाच्या दहापंधरा मुलांचा त्या घरात मुक्त वावर असूनही नंदावैनीचं घर नेहमीच अतिशय स्वच्छ व टापटीप असे. आपल्याकडे लहान मुलं असतात तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे स्वच्छता असलीच पाहिजे अशीच नंदावैनीची तिच्या दोन्ही मुलींना शिकवण होती..

दुपारच्या वेळेस ती बालगोपाळ मंडळी जरा वेळ झोपायची तेवढाच काय तो नंदावैनीला थोडा आराम. मग पुन्हा नंदावैनी मधल्या वेळच्या खाण्याच्या मागे असे. कधी उकड, कधी मोकळी भाजणी, कधी तिखटामिठाचा शिरा असा बेत असे. मग त्या सर्व मुलांचं मधल्यावेळचं खाणं चालायचं. त्यानंतर कुणाकडून कविता म्हणून घे, कुणाकडून पाढे म्हणून घे, एखाद्या लहानग्याला तुकडेतुकडे जोडून वाघ किंवा हत्ती पूर्ण करायला सांग, असे नानाप्रकार चालायचे. कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची!

मुंबईच्या धकाधकीच्या दुनियेत कामावरून घरी परतायला आईवडिलांना संध्याकाळचे सात साडेसात तरी वाजत. इकडे संध्याकाळ होऊ लागली की नंदावैनी पुन्हा एकदा रिंगमास्टर बनायची.

"चला, प्रत्येकाने स्वच्छ हातपायतोंड घुवून घ्या, पर्वचा म्हणायचा आहे ना? मग जायचंय ना सर्वांना आपाल्या घरी?"

असं म्हणून कडेवरच्या कुणा लहानग्या अर्चनाचा पापा घेऊन, "आता जायच्ययं ना आईकडे?" असं म्हणायची. ती लहानगी अर्चना काही कळल्यासारखं अगदी गोड हसायची! नंदावैनीसकट घरातल्या सगळ्याच बाळगोपाळांना ते निरागस हास्य निखळ, निर्विष आनंद देऊन जायचं!

मग नंदावैनी स्वत:च प्रत्येक मुलाला फ्रेश करायची, स्वच्छ करायची. ती आणि तिच्या मुली प्रत्येकाचा भांग, पावडरकुंकू वगैरे करायच्या. मग सगळ्यांनी हात जोडून देवापुढे बसायचं. एखादी सुरेखशी उदबत्ती आणि मंद ज्योतीची समई नंदावैनीच्या देवघरात तेवत असायची. आणि मग सुरू व्हायचं -

"शुभंकरोति कल्याणम्.."

तोवर एकेका आईवडिलांचं आपापल्या पिल्लाला नेण्याकरता नंदावैनीच्या घरी येणं सुरू झालेलं असायचं. मग,

"आज काही जेवलाच नाही.."

"आज एक मुलगा मुळ्ळीसुद्धा रडला नाही बरं का!"

"आज प्रणवला चांगला धपाटलाय बरं का! पाढे पाठ करत नाहीत आणि दिवसभर नुसती मस्ती..!"

"आज जरा डॉक्टरलाच दाखवा, दिवसभर रेघा मारतोय..!"

असा प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या आईवडिलांकडे त्या त्या मुलाचा नंदावैनी रिपोर्ट करायची!

आपलं पोरगं नंदावैनीकडे आहे म्हणजे सुखरूप आहे असा विश्वास प्रत्येक आईवडिलांना होता. नंदावैनीने रट्टा मारलेला असणार म्हणजे आपल्याच लेकाचं काहीतरी चुकलेलं असणार.. अशी खात्री होती प्रत्येकाची! २६ जुलै सारख्या प्रलयातही, जेव्हा कुणाच मुलाचे आईवडिल रात्रभर घरी येऊ शकले नव्हते तेव्हाही ते मुलांच्या बाबतीत मात्र निश्चिंत होते. "अगदी रात्रभर जरी मुलांना नंदावैनीकडे रहायला लागलं तरी चिंता नको.." अशी त्यांची निचिंती होती. नंदावैनीवरचा तो विश्वास होता..!

त्या दिवशी संध्याकाळी कुणा प्रणवचे आईवडिल नंदावैनीचा निरोप घ्यायला आले होते. लाडक्या प्रणवला नंदावैनीकडून सेन्डऑफ होता.. अगदी ३-४ महिन्यांचा असल्यापासून ते ३ वर्षांचा होईस्तोवर प्रंणव नंदावैनीकडेच सांभाळायला होता. आता प्रणवचे आईवडिल दोघेही त्याला घेऊन अमेरीकेला चालले होते..! निरोपाची वेळ आली. नंदावैनीनी कपाटातून छानश्या सोनेरी कागदात पॅक केलेली कुठलीशी एक भेटवस्तू काढली आणि प्रणवला जवळ बोलावलं. काहीतरी वेगळं जाणवून छोटासा प्रंणवही जरा कावराबावराच झाला होता..

नंदावैनीनी प्रणवला उचलून कडेवर घेतला. त्याचा एक गोड पापा घेऊन हातातली भेटवस्तू त्याच्या हातात दिली,

"पुन्हा येशील ना रे मला भेटायला? अमेरिकेला गेल्यावर नंदावैनीला विसरणार नाहीस ना रे? की विसरशील गधड्या मला?"

"मी तुला खूप मारलं ना रे लहानपणी?"

असं म्हणून त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

नेहमीप्रमाणेच दुसरा दिवस उजाडला आणि नंदावैनीकडचं गोकूळ पुन्हा एकदा भरलं..!

आज त्या गोकुळात प्रंणव नव्हता. उद्या तो चांगला शिकून कुणीतरी मोठा यशस्वी डॉक्टर/विंजिनियर होईल, त्याचं नांव होईल, त्याच्या आईवडिलांचं नांव होईल. पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!

-- तात्या अभ्यंकर.

July 14, 2011

जियो मुंबै आणि एका देवमाणसाचा हस्तस्पर्श..!

काल संध्याकाळीच मुंबैतील स्फोटांच्या बातम्या विविध वाहिन्यांवरून पाहिला मिळाल्या. निरपराध नागरिकांवरील अमानुष हल्ल्यामुळे मन सुन्न झाले. २६/११ च्या आठवणी जाग्या झाल्या.
२६/११ च्या वेळी रात्री उशिरा जशी रक्तदानाकरता धावपळ केली होती तेच विचार पुन्हा एकदा मनात घोळू लागले. झाल्या प्रकारात आपण काय करू शकतो तर ते इतकंच की रक्तदानाकरता थोडीशी धावपळ. अस्वस्थ मनाने दादर विभागातल्याच ४-५ ओळखिच्यांना, मित्रांना फोन केले आणि आम्ही एकूण ३ मंडळी रात्री ९ च्या सुमारास जे जे ला पोहोचलो.
पोटात खड्डा पडावा, तुटावं अशी तेथील काही दृष्य बघितली. जखमींकडे बघवत नव्हते. पोलिस, डॉक्टर्स, परिचारिका यांची धावपळ सुरू होती. आम्ही प्रवेशद्वारातून आत पोहोचलो. आजूबाजूला गर्दी तर बरीच होती. रक्तदानाबाबत कुणाला विचारावं, रक्त कुठे घेत आहेत हा विचार सुरू असतानाच माझ्या पाठमोर्‍या एका खोलीतून जे जे चा काही कर्मचारी वर्ग बाहेर आला. मागून माझ्या खांद्यावर हलकेच एक हात पडला आणि गर्दीतून वाट काढत असताना माझ्या खांद्यावर हात ठेऊन ती व्यक्ति मला म्हणत होती..
"जरा वाट द्या प्लीज. जाऊ द्या प्लीज.."
मी त्या व्यक्तिकडे बघितलं आणि त्या प्रसंगात, त्या गर्देतदेखील मला क्षणभर भरून आलं. माझ्या खांद्यावर हात ठेवत वाट काढू पाहणारी ती व्यक्ति होती डॉ तात्याराव लहाने..! ते सध्या जेजे रुग्णालयाचे डीन आहेत.
"कृपया नातेवाईकांनी काळजी करू नये. येथे दाखल झालेल्या व्यक्ति या आमच्या भाऊबहिण आहेत याच भावनेने आम्ही सर्व ते उपचार करत आहोत. आमच्याकडून कसलिही कसूर होणार नाही.."
डॉ तात्याराव लहाने गर्दीला उद्देशून सांगत होते...!
किती मृदु परंतु आश्वासक स्वर! किती विनम्रपणा! किती साधेपणा..! आजपावेतो अक्षरश: हजारो डोळ्यांना प्रकाश दाखवणारा तो देवमाणूस..! भला माणूस, लाख माणूस..!
खरं तर एकदा मिपावर त्यांचं व्यक्तिचित्र/व्यक्तिमत्वचित्र या बद्दल एखादा विस्तृत मुलाखतवजा लेख लिहायचा असं डोक्यात होतंच परंतु काल असं अचानक त्यांचं क्षणिक दर्शन झालं, हजारोंना दृष्टी देणारा त्यांचा हात माझ्या खांद्यावर पडला आणि धन्य झालो. देवाघरचाच हात तो..!
त्यानंतर रक्तदानाकरता माहिती मिळाली आणि आम्हाला ..'तूर्तास जरूर नाही, तरीही वाटल्यास बाहेरच्या व्हरांड्यात थांबा..' असं सांगण्यात आलं. बाहेर येऊन पाहतो तर जवळ जवळ दीड-दोनशे माणसं आधीच तेथे रक्तदान करण्याकरता आली होती. अगदी स्वखुशीने, कुणीही न बोलावता, कुणीही कसलंही आवाहन न करता..!
पाऊस जोरावर होता. मुख्य व्हरांड्यात रुग्णवाहिकांमधून जखमींना दाखल करणारे अनेक सामान्य मुंबैकर आणि रक्तदानाकरता जमलेलेही सामान्य मुंबैकर..!
कालच्या घटनेत सामान्य परंतु धीरोदात्त मुंबैकराने पावसापाण्यात केलेली धावपळ बघितली, अनुभवली. आणि म्हणूनच आम्हाला अभिमान आहे मुंबै नामक या आमच्या अजब-गजब नगरीचा..! म्हणूनच आमचं विलक्षण प्रेम आहे आमच्या मुंबापुरीवर..! जियो मुंबै..!
कालच्या मुंबै हल्ल्यात शहीद झालेल्यांना विनम्र आदरांजली आणि जखमींना लौकरात लौकर आराम मिळो, हीव आई मुंबादेवीपाशी प्रार्थना..!
-- तात्या अभ्यंकर.

June 18, 2011

आजची खादाडी, आजची बाई..१

लोकहो,

राम राम..

'आजची खादाडी, आजची बाई..' हे नवं सदर आम्ही आजपासून सुरू करत आहोत. अर्थात, वेळेच्या अभावी आम्ही हे सदर अगदी रोजच्या रोज लिहू शकू याची शाश्वती नाही. तरीही आमचा प्रयत्न मात्र तोच असेल.

मुळात खादाडी आणि बाई या दोन्ही गोष्टी आमच्या आणि इतरही अनेकांच्या इंटरेस्ष्टच्या आहेत, आवडत्या आहेत असा आमचा विश्वास आहे.. आता सभ्य आणि सुसंस्कृतपणाचे नसते ढोंगी बुरखे पांघरलेला कुणी म्हणेल की 'तात्याने हे नवं काय आरंभलं आहे? हे स्त्री-प्रदर्शन कशाकरता..?' वगैरे वगैरे..!

त्यावर आमचं इतकंच उत्तर आहे की आवडत्या खाद्यपदार्थासोबत आवडत्या बाईचंही चित्रं टाकलं आणि त्यावर दोन शब्द लिहिले म्हणजे आम्ही फार मोठ्ठं काही पापकर्म करत आहोत असं आम्ही तरी समजत नाही..

तेव्हा कुणी काय म्हणेल याची आम्हाला शाटमारी पर्वा नाही..

ते असो..

आज शनिवार. आठवडाखेर. आज जरा छानश्या चुलबुल्या मिनिशा लांबा सोबत गरमागरम कोंबडी टिक्का खाउया... :)



आमची मिनिशा तशी मुळातच चटपटीत आणि चुलबुलीत.
अवखळ आहे. पटदिशी लाडात काय येईल, तुमचा गालगुच्चा काय घेईल, मुका काय घेईल.. काही विचारू नका..! :)



किडन्यॅप चित्रपटात तिच्या पोहण्याचा एक शीन आहे त्यात ती फारच आकर्षक दिसते बुवा.

आम्ही जळ्ळं चुकून पाण्यात पडलो तर आम्हाला पैशे तर सोडाच, आम्हाला बाझवला साधं वाचवायलाही कुणी येणार नाही. मिनिशाला मात्र छानपैकी पोहायचे छानपैकी पैशेही भेटले असतील..! :)

असो..

मिनिशा मात्र आम्ही लाडकी आहे हो. तिला अनेकोत्तम शुभेच्छा..!

तात्या.

June 07, 2011

एक आठवण, धुळीतली...!

परवाच कुठेतरी नभोवाणीवर कुणी गात असलेली बिलावलमधली 'कवन बटरिया गईलो..' ही बंदिश कानावर पडली आणि माझं मन एकदम काही वर्ष मागे गेलं. वर्ष आता आठवत नाही परंतु सवाई गंधर्व महोत्सवातील आठवण आहे ही..अण्णांनी खास करीमखासाहेबांची 'प्यारा नजर नही..' ही बंदिश आणि त्यालाच जोडून 'कवन बटरिया..' फार सुरेख गायली होती त्याची आठवण झाली.

पं अच्युतराव अभ्यंकर यांनी माझ्या कानावर केलेले किराणा गायकीचे संस्कार आणि वारंवार समजावून दिलेले करीमखासाहेब आणि पुढे जाऊन त्याच गायकीतील भक्कम वीण समाजावून देणारे आमचे दस्तुरबुवा आणि अण्णा. दस्तुरबुवांचं अत्यंत सुरेल किराण्याचं गाणं. कधी त्यांचा स्वराचा एकेक मोती उलगडून दाखवणारा यमन, तर कधी खासाहेबी गोपाला मेरी करुना, किंवा जादू भरेली कौन अलबेली..! तर कधी अण्णांनी अनेकदा उलगडून दाखवलेला शुद्ध कल्याण किंवा तोडी. झालंच तर पुरीया.!

सवाईं गंधर्वांची ही शिष्यजोडी मलाही अगदी भरपूर लाभली. तो दिसच माझ्या आयुष्यातला खूप भाग्याचा दिस होता. अण्णांच्या आणि दस्तुरबुवांच्या पायाशी बसण्याचे खूप दिवस मनात होते, अखेर ती इच्छा पूर्ण झाली. आमचे दस्तुरबुवा म्हणजे ख्वाजा मोईउद्दीन चिस्तीने पाठवलेला एक अवलिया स्वर-जादुगार; तर आमचे अण्णा म्हणजे माझ्याकरता साक्षात पंढरीचा विठोबाच..!



त्या दिवशी खरंतर अण्णा माझ्यावर जरा वैतागलेलेच होते. का? तर मी मस्त मांडी ठोकून खाली धुळीत बसलो म्हणून..! :)

"च्च.. अरे इथे धुळीत काय बसतोस? कपडे मळतील की? तुला आमच्यासोबत फोटोच काढायचा आहे ना? मग बाजूला खुर्चीत बस की..!"

"नको हो अण्णा, मी आपला धुळीतच बरा..!" :)

असो..

आता अश्या अनेक आठवणी निघतात आणि मन उदास होतं. आजही कधी ग्रँटरोडला जाणं होतं. दस्तुरबुवा राहायचे त्या बिल्डिंगपाशी दोन क्षण उभा राहतो. पटकन दोन जिने चढून जावं आणि दस्तुरबुवा भेटावेत, त्यांच्या पायांना मिठी मारावी असं वाटतं. तर कधी दादरच्या प्रकाशचा बटाटवडा बाबुजी-ललीमावशीची आठवण करून देतो..!

चार-आठ दिसांपूर्वीच पुण्याला गेलो होतो. पाय नकळत कलाश्री बंगल्याकडे वळले. क्षणभर वाटलं की बंगल्यात जावं आणि किमान अण्णांच्या तंबोर्‍यांना तरी नमस्कार करावा. पण धीर नाही झाला. वळलो तसाच माघारी..!

-- तात्या अभ्यंकर.

बाबा रामदेव, वेळीच जागा हो..! :)

१) मी स्वत: कट्टर काँग्रेस अन् सोनिया विरोधी आहे,
२) भ्रष्टाचार हटवण्याची किंवा काळा पैसा भारतात आणण्याची आजच्या केन्द्र सरकारची मानसिकता नाही आणि तशी प्रबळ राजकीय इच्छाशक्तिही नाही हेही मी ठामपणे नमूद करतो.
३) मी स्वत: रामबाबाच्या योगविद्येचा आदर करतो आणि त्याकरता माझा त्याला दंडवतच आहे.

तरीही असे लिहावेसे वाटते की,

पोलिसांनी आंदोलकांना रामलीला मैदानातून हाकलताना बायकांना आणि लहान मुलांना मारले असे रामबाबा सांगत आहे. परंतु त्यात फारसे तथ्य दिसत नाही. अन्यथा पोलिस लहानमुलांना आणि बायकांना फटकावताहेत, हे चित्र कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर नक्कीच दिसले असते; कारण प्रत्येकच वाहिनी मध्यरात्रीची ती प्रत्यक्ष दृष्ये दाखवत होती. अर्थात, खरोखरच जर त्यांना मार पडला असेल तर ती सरकारची केव्हाही चूकच आहे..

तरीही पोलिस हरकत में आ गई आणि केवळ शक्तिप्रदर्शनाकरता जमवलेल्या ५०००० च्या त्या गर्दीला तेथून रातोरात हाकलले ते एका अर्थी बरेच झाले. त्या गर्दीत फुकाचे साधुसंत आणि यूपीतले बरेचसे रेमेडोके भय्येच अधिक दिसत होते हे आग्रहाने नमूद करावेसे वाटते..!

बाकी सांगायचे म्हणजे एकूणच रामबाबाच्या ह्या आंदोलनात त्याने **अत्यंत ढोबळ अन् बेफाट** मागण्यांच्या निमित्ताने केलेले राजकीय (?) शक्तिप्रदर्शनच अधिक होते.

** १) आत्ताच्या आत्ता परदेशात जा अन् तेथील बँकातील काळा पैसा घेऊन या..!
-  म्हणजे पोतीच्या पोती घेऊन परदेशात गेले आणि तेथील सारा काळा पैसा घेऊन पुढच्याच विमानाने भारतात परत आले इतके हे सोप्पे आहे का?

**२) ५०० आणि १००० च्या नोटा लग्गेच फर्मान काढून रद्द करा..!
- अहो पण याला काही अन्य पर्याय..?

**३) वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांत द्या..
- पण तुमच्याकडे तसा अभ्यासक्रम तयार आहे का? तसे शिक्षक आहेत का? तश्या काही ठोस योजना तयार आहेत का?

वगैरे वगैरे.. **

योगविद्या शिकवणारा रामबाबा गेल्या काही काळापासून भलताच अहंकारी होत चालला होता. शिवाय तो एक हलक्या कानाचा अन् हुऱळून जाणारा साधूही आहे. त्याला आंदोलनाच्या ह्या हरबर्‍याच्या झाडावर कुणीतरी चढवला आणि तो सुसाट चढत सुटला. त्यातच अण्णांच्या आंदोलनाला सार्‍या देशाने आणि आंतरजाल जगताने दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्याद्वारे रातोरात ष्टार झालेले अण्णा, हे पाहून रामबाबाही अंमळ खुळावला असावा, किंबहुना त्याचा जळफळाटच अधिक झाला असावा. आणि त्यामुळेच अण्णांचे हे आंदोलन तो काहीही करून हायजॅक करू पाहू लागला. मिडियाचे आपल्याकडे लक्ष जाऊन आपण सतत प्रकाशाच्या झोतात कसे राहू हे तो पाहू लागला.

अण्णांच्या आंदोलनाला/उपोषणाला जशी काही एक भक्कम वैचारीक बैठक आहे तशी काहीही बैठक रामबाबाची नाही. शिवाय अण्णांच्या मागे अरविंद केजरीवाल नामक एक चाणक्यही आहे जो अत्यंत हुशार मनुष्य आहे, काही एक चांगले करू पाहणारा आहे. अत्यंत कर्तबगार आणि निस्पृह पोलिस अधिकारी असलेल्या डॉ किरण बेदी याही अण्णांच्या पाठीशी आहेत. तसे या रामबाबाच्या मागे कुणी आहे का?

रामलीला मैदानावरील आंदोलनाच्या मंचावर ही ऋतंबरा कशाकरता आली होती? (तिला सारेजण 'साध्वी' ऋतंबरा असे संबोधतात. परंतु तिच्याबद्दल कुठलीही व्यक्तिगत माहिती मला नसताना मला व्यक्तिश: तिला 'साध्वी' असे संबोधणे उचित वाटत नाही. मनुष्यप्राणी हा जबर स्खलनशील आहे असा माझा ठाम विश्वास आहे. असो..!) :)

दिल्लीहून हुसकून हरिद्वारला पाठवलेला रामबाबा तिथे गेल्यावर अजूनही काही वाट्टेल ते बरळतो आहे. म्हणे ५००० माणसे बेपत्ता आहेत, मला ठार मारण्याचा सरकारचा डाव होता वगैरे वगैरे..

अरे रामबाबा, मेल्या योगी ना तू? मग तू कसा काय इतका जबर अहंकारी? अण्णा हजारेंवर जळ जळ जळून तुझा नक्की काय फायदा होणार आहे? 'तुझे आहे तुजपाशी' नाटकात पुलं म्हणाले होते की सन्याशाची वस्त्र ही भयंकर असतात, ती सारे अंग भाजून काढतात. रामबाबा, तूर्तास तुझीही नेमकी तशीच अवस्था झाली आहे. लेका, तुझ्यासारख्या योग्यापेक्षा आठवड्याला एक-दोनदा क्वार्टर अन् मच्छीचं जेवण जेवणारे, सुंदर-आकर्षक आणि कमनीय बायकांकडे पाहून मनातल्या मनात पाघळणारे आमच्यासारखे भोगी बरे की रे..! :)

तेव्हा रामबाबा, जागा हो. आजही तू एक मोठा योगाचार्य आहेस. तेव्हा तू आपला तुझी योग्यविद्याच आम्हा सार्‍या भारतीयांना शिकवून सोड कसा..!

जमल्यास तुझ्या योगसामर्थ्याच्या बळावर मस्तपैकी एकसे एक स्त्री शिष्यांना पटव ( तूर्तास तसं काही नसावं हा माझा अंदाज! ;) ) आणि मस्त मजा कर, असा आपला जाता जाता माझा तुला एक व्यक्तिगत सल्ला..! ;)

काय बोल्तो..? :)

तुझा,
तात्या.