August 26, 2006

बसंतचं लग्न..१ (ओळख)

नमस्कार मंडळी,
आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीतात बसंत हा एक मन उल्हासित करणारा राग. अनेक बडे बडे गवई हा राग आवडीने गातात. मंडळी, तसं पाहिलं तर आपल्याकडे हा राग ऋतुकालीन मानला जातो. नावावरुनच कळतं की हा खास वसंत ऋतुत गाण्याचा राग आहे. वसंत सुरू झाला की आपल्याला अनेक मैफ़लींतून बसंत ऐकायला मिळतो. बसंत-बहार, बसंती-केदार, धन-बसंती सारख्या जोड रागातसुद्धा हा राग खूप मौज आणतो.
मी एकदा सवाई गंधर्व महोत्सवात पं. जसराज यांचा बसंत ऐकला होता. जसराजजींनी बसंतची मस्तपैकी भट्टी जमवली होती. बसंतमधली एक फार सुरेख बंदिश ते गायले होते. तीचे शब्द असे होते,
"और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!
मदन महोत्सव आज सखीरी,
बिदा भयो हेमंत...."!!!!!

क्या बात है! काय सुंदर कल्पना आहे पहा. आमच्या बसंतचं लग्नं! दुल्हा बसंत घोड्यावर बसला आहे आणि बाकी सगळे राग त्याचे बाराती!!! मंडळी किती सुरेख बंदिश आहे ही!
मग काय? माझ्या डोळ्यासमोर ती बारात साक्षात उभी राहिली. इतर कोणकोणते राग या वरातीला आले असतील बरं? मी माझ्या मनाशी सहज कल्पना करु लागलो आणि काही विचार माझ्या मनांत आले ते इथे मांडत आहे.
सर्वात प्रथम म्हणजे आपले यमन आणि भूप सर्वांत पुढे असतील या बारातीत. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व आहेत ही. यमन तर खुपच खुष असेल त्याच्या लाडक्या बसंतचं लग्न आहे म्हणून! आणि बरंका मंडळी, आपला यमन जितका प्रसन्न आहे तितकाच तो हळवाही आहे. नवऱ्यामुलाकडचा असुनही नवी नवरी सासरी जातांना पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील!
(क्रमशः)
टिपः या लेखांद्वारे आपल्या रागसंगीतामधल्या रागांमध्ये किती वैविध्य आहे हे इथे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. जो राग मला जसा भावला तसा तो मी इथे मांडणार आहे.
तात्या अभ्यंकर.

4 comments:

Gayatri said...

नमस्कार. तुमची जालनिशी फार आवडली. भारतीय शास्त्रीय संगीतावर तुम्ही जीव उधळून प्रेम केलंय हे दिसतं आहेच..आणि त्या संगीतातली माणकं एक-एक करून दाखवणाऱ्या या ललित लेखांची संकल्पना तर महान आहे! मनापासून आभार.

--गायत्री

Tatyaa.. said...

Dhanyavaad, Gayatree...
--Tatyaa.

Gayatri said...

पण तात्या, तोडीवरच का थांबलात? अजून राजमाता जयजयवंती, हळवा मारवा, खमाजभाई, मियां काफ़ी, सारंगराज..कितीतरी मंडळी तिष्ठताहेत तुम्ही ओळख करून द्यावी म्हणून. लिहा नं आणखीन.
शास्त्रीय संगीतातलं सा की रे कळत नसूनही ते ऐकायला मनापासून आवडतं, म्हणून तुमची लेखमाला एका बैठकीत वाचून काढली. वाचता वाचता 'आता यात नीट 'seriously' घुसलंच पाहिजे', असं वाटायला लागलंय.

Tatyaa.. said...

गायत्री,

प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा आभार..

-तात्या.