February 21, 2007

लाडवांचा निकाल..

मनोगतावर मी एकदा मनोगतींच्या आवडत्या लाडवांवरून त्यांचा स्वभाव ओळखण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा हा वृत्तांत! ;)

राम राम मंडळी,

आपण बहुसंख्येने लाडवांच्या खेळात सहभागी झाल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून आभार. खरंच मंडळी, एवढा प्रतिसाद मिळेल असं मलाही वाटलं नव्हतं. मला आलेले काही काही व्य नि देखील खूप मजेदार होते. आमचे नामी विलास महाराज म्हणाले, "तात्या, बरा कामाला लावतोस एकेकाला!" कुणी लिहिलं, "तात्या मला अमुक लाडू आवडतो, पण जरा प्रेमाने हां!" जसं काही मी त्याला कुठलीतरी शिक्षाच करणार होतो!! एकानं लिहिलं, "तात्या, हे लाडवांवरून स्वभाव ओळखण्याचं खरं आहे का हो?:)" एकीने लिहिलं, "तात्या, रव्याच्या लाडू खवा घालून आणि न घालतासुद्धा करतात. खवा घातला तर स्वभाव बदलतो का हो?"!! :D एकीने लिहिलं, "तात्या, तुमचा आवडता लाडू कुठला? तोच माझा! ओहोहो, आपण साला खल्लास!!" :)

काही मंडळींनी तर लाडवांच्या नादात थेट मला 'मनोगताचं लाडकं व्यक्तिमत्त्व' ही पदवीदेखील बहाल केली! (गुरुवर्य भाईकाका, लाडू खा आणि यांना क्षमा करा!!!)

असो. मी आधीच म्हटलं होतं की हा एक खेळ आहे. जरा थोडी गंमत. मंडळी, मूळचा कुठलाच माणूस वाईट नसतो, आणि लाडू आवडणारी माणसं तर नक्कीच वाईट नसतात. चांगलीच असतात. मग तो लाडू कुठलाही असो! मी तर म्हणेन की प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगवेगळा असतो म्हणून तर जगण्यात मजा असते. सगळेच सारखे असते तर काय गंमत राहिली?
तर आता आपण निकालांकडे वळूया.

अ) रव्याचा लाडू आवडणारे मनोगती -

नंदन, स्वल्पविराम, सूर्य, महेश हतेळकर, अनिरुद्ध पटवर्धन, एकलव्य, सवाई, गौरी सुनील, प्राजक्ती, अनुप्रिता, कपिल९४२२०४५२४८, आसावरी.

मंडळी, रव्याचा लाडू दिसतो कसा पहा! साधा, पांढरा शुभ्र आणि सात्त्विक!! हा लाडू आवडणारी माणसंदेखील तशीच असतात. ही माझी अत्यंत आवडती माणसं! लोकं यांच्यावर मनापासून प्रेम करतात. ही माणसं अत्यंत साधी असतात. आपण बरं की आपलं काम बरं, अश्या स्वभावाची असतात. कुणाच्या अध्यात नाहीत की कुणाच्या मध्यात! आयुष्याकडून यांच्या फार अपेक्षा नसतात. हाती घेतलेलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे करणं आणि बाजूला होणं एवढंच यांना माहीत! ही माणसं वृत्तीने अत्यंत घरगुती आणि कुटुंबवत्सल असतात. कुटुंबात रमणारी असतात. यांचे पाय नेहमी जमीनीवर घट्ट रोवलेले असतात. उगाचच्या उगाच भलत्या उड्या आणि मोठमोठ्या गप्पा ही माणसं मारत नाहीत! एकंदरीतच कुठल्याही गोष्टीच्या आहारी जाणं यांना जमत नाही. वृत्तीने मात्र अत्यंत सेवाभावी, कामसू आणि कष्टाळू वृत्तीची असतात. स्वभावाने तशी गरीब असतात. एक गोष्ट मात्र खरी, ही माणसं अत्यंत विश्वासू असतात, मैत्रीला लाख असतात. यांच्यावर जरूर विसंबून रहावं, कधी निराशा पदरी येणार नाही! पहा मंडळी, काय गंमत आहे! इतर दोन लाडवांच्या तुलनेत ही मंडळी कमी आहेत. आपल्याला तरी प्रत्यक्ष जीवनात अशी मंडळी हल्ली कुठे फारशी पहायला मिळतात? आहे की नाही माझं अनॅलिसिस बरोब्बर? :)

ब) बेसनाचा लाडू आवडणारे मनोगती -

आदित्य पानसे, चक्रपाणी, संध्या पिसाळ, मेघदूत, परि आणि बदक, देवदत्त, अ-मोल, शशांक उपाध्ये, राधिका, तो, नामी विलास, नारद, अनु, साधना, रोहिणी, विनायक, मैत्री, शशांक, माधवी गाडगीळ, छावा, खादाड बोका.

काय मंडळी, नुसती नांवं वाचूनच कल्पना आली की नाही?!:) ही माणसं मात्र रव्याच्या लाडवाप्रमाणे साधी, गरीब वगैरे नाहीत बरं का! लई डेंजर जमात आहे ही. ही माणसं एकदम तल्लख बुद्धीची, आणि चाणाक्ष असतात. किंचित माथेफिरू जात आहे ही. यांच्या वाटेला कुणी जाऊ नये. यांच्या आवडीनिवडी अगदी ठराविक आणि टिपीकल असतात. अत्तर आहे म्हणून लावलं आपलं कुठलंही अत्तर, असं यांचं नाही. यांच्या आवडीचं असेल तरच लावतील. यांचं राहणीमानदेखील एकदम टिपीकल असतं. एकंदरीतच बावळटपणा यांना सहन होत नाही. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते सगळं यांना लागतं!स्वभावाने अत्यंत तऱ्हेवाईक माणसं असतात ही. यांच्या मनासारखं नाही झालं तर आरडाओरडा आणि आदळाआपट करतात. एक मात्र खरं, यांची जर एखाद्यावर मर्जी झाली तर त्याच्यासाठी मात्र काय वाट्टेल ते करतील. कुठल्याही गोष्टीचा सखोल आणि दांडगा अभ्यास असतो यांचा. एखाद्या गोष्टीतली नेमकी मेख यांना पटकन कळते. १० माणसांना डोकं खाजवून जर एखाद्या गोष्टीचं उत्तर माहीत नसेल तर यांच्याकडे जावं. क्षणांत उत्तर मिळेल! पण वरती "हे काय, एवढंही माहीत नाही?" असं ऐकूनही घ्यावं लागेल :) एक मात्र नक्की, की चार युक्तीच्या गोष्टी जर हव्या असतील तर यांच्याकडे अगदी हमखास जावं! बेसनाच्या लाडवांचंपण असंच आहे! हा लाडू दिसतो कसा पहा! खमंग रंगाचा! चवीलाही खमंग!! अगदी पाकातला! एकदम पेशल!! नीट जमला नाही तर खाताना टाळूला चिकटतो! पाक कच्चा असेल तर ढापकन् तोंडातल्या तोंडात फुटतो!! :) पण जर जमला तर बेसनाचा लाडू तो बेसनाचाच लाडू हो! मग याच्यासारखा दुसरा कोण नाही!!

क) मोतिचुराचा लाडू आवडणारे मनोगती -

सुलक्षणा, कैरी, परीक्षित, संवादिनी, व्यक्त-अव्यक्त, वरदा, सचिन म्हेत्रे, अमित कुलकर्णी, अभिजित पापळकर, मृदुला, टग्या, साती, राहूल१, सुखदा, लिखाळ, अदिती, सुचरिता, अंजली, लीना, माफी, पाटील.

मोतीचुराचा लाडू दिसतो कसा पहा! नुसतं याच्याकडे पहात रहावं असा!! एकदम आकर्षक खमंग़ पिवळ्या रंगाचा, मंगलमयी!! मध्येमध्ये बेदाणे, केशर असलेला, साजुक तुपातला!! नेहमी कोणती तरी मंगलमयी वार्ता सांगणारा!! हा लाडू आवडणारी माणसं म्हणजे काय विचारता मंडळी! उत्साहाचे झरेच असतात एक एक. एकदम उत्सवप्रिय माणसं. एकदम जिंदादिल जमात. दे धमाल सगळी! साला कल किसने देखा है? जे काय करायचं आहे ते आजच आणि आत्ता! पिकनिकला जायचंय? जागरणं, धमाल करायची आहे? नाटक-सिनेमाला जायचंय? या मंडळींना सोबत घेऊन जा! ज्यांच्या आजूबाजूला ही मंडळी असतील त्यांना अगदी छान कंपनी मिळते. दोस्ती-यारीला एकदम मस्त माणसं असतात ही. आयुष्याकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने बघतात. कुठलंही काम मनापासून आणि जीव लावून करतील. कशात तरी नेहमी झोकून देण्याची यांची वृत्ती असते. अगदी सगळ्यांना अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य करून दाखवण्याची क्षमता असते यांची. वृत्तीने तशी मनस्वी असतात. ज्या उत्साहाने पिकनिकला दोन दोन दिवस धमाल करतील त्याच उत्साहाने रूग्णालयात एखाद्याच्या खाटेपाशी रात्र रात्र बसून सेवाही करतील!

असो... तर मंडळी, हा झाला लाडवांचा अहवाल! माझे हे तीनही लाडू आपण गोड मानून घ्याल याची खात्री आहे. पहा, लाडवांच्या आवडीनिवडीतसुद्धा आपल्याला तीन प्रकारची वेगवेगळी माणसं पहायला मिळाली! माझं वरील विवेचन कुणाला पटेल, कुणाला पटणार नाही. रव्याच्या लाडवातला एखादा गुण मोतिचुरातदेखील सापडेल. तसा तो सापडला तर माझं काहीच म्हणणं नाही. नाहीतर लगेच मला धारेवर धराल! थोडी गंमत म्हणून वरील प्रकाराकडे पहा आणि मोकळे व्हा. अगदी नाही म्हटलं तरी कोणाला कोणता लाडू आवडतो ही माहिती तर मिळाली आपल्याला! हेही नसे थोडके..

मी आधीच म्हटलं आहे की मनुष्य स्वभाव हे एक अजब रसायन आहे. अनेक भावभावनांची ही एक मिसळ आहे. आपण आपलं शोध घेत रहायचं. मला हस्ताक्षराचं माध्यम खूप जवळचं वाटतं. पण ते इथे शक्य नव्हतं. मग म्हटलं करायचं काय? चला लाडवांचा प्रयोग करून पाहू. यातून माझा मात्र खूप फायदा झाला. अनेक मनोगतींचे मला अगदी आपुलकीचे व्य नि आले. अगदी आयुष्यातलं सर्वात मोठं गूज सांगावं अश्या थाटात मंडळींनी मला त्यांचे आवडते लाडू कळवले, या गोष्टीचं मला हे लिहिताना अगदी भरून आलं आहे.

एखाद्याला गोड साद घातली की प्रतिसाददेखील गोडच मिळतो. तो मला व्य निं च्या माध्यमातून भरभरून मिळाला इतकंच!!

--तात्या अभ्यंकर.

2 comments:

Saiprasad said...

Tatyasaheb,

Marathi sanskruticha mahatvacha Dua "DINKACHA LADOO" aapan namood karayche rahilaat...:)

Baki aamhi matra Danyachya ladvache premi aahot.

sonal m m said...

tatyasaheb...tumcha blog vachayla milala he aamche bhagya...tumcha likhan atishay aavadla...hoda khochak pan atishay sahaj...