February 04, 2007

ओम् स्वरभास्कराय नम:


राम राम मंडळी,

आज ४ फेब्रुवारी. सकाळ झाली. नेहमीप्रमाणे उदयाचळी मित्र आला. त्या भास्कराची किरणे माझ्या मायभूला न्हाऊमाखू घालू लागली, आणि मला आठवण झाली ती एका स्वरभास्कराची! स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांची. आमच्या अण्णांची!

अण्णांनी आज वयाची ८५ वर्ष पूर्ण केली. पण मंडळी, कुठल्याही कलाकाराच्या बाबतीत वय हा तसा गौण मुद्दा. कलाकार वृद्ध होतो, पण त्याची 'कला' ही केव्हाही वयातीतच असते. लौकिकार्थाने अण्णांची कला आज ८५ वर्षांची झाली हे खरेच. पण त्या कलाविष्कारातील प्रत्येक क्षणाने माझ्यासारख्या कित्येकांना, "आज मी माझं संपूर्ण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलो" असंच वाटलं! अण्णांचा प्रत्येक स्वर अगणितांची आयुष्ये क्षणार्धात उजळून गेला, हा हिशोब कुठल्या कालगणनेत करणार आणि कुठल्या मापाने?

भारताच्या या अनभिषिक्त स्वरसम्राटाला माझा मानाचा मुजरा.

"भारतीय शास्त्रीय संगीताचा मानदंड", "भारतीय शास्त्रीय संगीताचा अध्वर्यू" अशी अनेक बिरुदं अण्णांच्या नांवामागे लावता येतील. पण अण्णांचं गाणं ऐकू लागलो की शब्दच तोकडे पडतात, किंबहुना संपतात!
जुनी पिढी आम्हाला नेहमी त्यांनी ऐकलेल्या कलाकारांचे दाखले देते. दुर्दैवाने आम्हाला ते कलाकार प्रत्यक्ष ऐकायला मिळाले नाहीत. एकिकडे या गोष्टीचं दु:खही वाटतं. पण त्याच वेळेला अण्णांचा स्वर कानी पडतो आणि आम्हीही किती भाग्यवंत आहोत याचा प्रत्यय येतो!

देवानं अलौकिक सुरांचं हे दान अगदी भरभरून, हातचं काहीही राखून न ठेवता, आमच्या पदरात घातलं ही किती भाग्याची गोष्ट! भीमसेनजींच्या स्वराने आमची ओटी भरली गेली. अण्णांचा मंग़लमयी स्वराने अवघा आसमंत भारावला, शुचिर्भूत झाला! साक्षात ब्रह्मस्वरच तो.. झाले बहु, होतील बहु, परंत यासम हा!
अण्णांच्या स्वरसमिधांनी सिद्ध केलेला हा "भीमसेन जोशी" नांवाचा गानयज्ञ गेली ८५ वर्ष अखंड सुरू आहे!!

मंडळी, शब्दांचं देणं मला नाही. काही अक्षरांची मोडकीतोडकी, कशीबशी जुळवाजुळव करून काहीबाही लिहितो झालं. आज अण्णांबद्दल दोन शब्द लिहयला बसलो आहे खरा, पण शब्दांची चणचण भासते आहे. हे माझ्यासारख्याचे काम नोहेच! याकरता कुसुमाग्रजांची, विंदांची, पुलंची प्रतिभाच हवी!
कविवर्य विंदा करंदीकर एके ठिकाणी अण्णांच्या सन्मानार्थ म्हणतात,

प्रिय भीमसेनजी,
अमृताचे डोही बुडविले तुम्ही
बुडताना आम्ही धन्य झालो
मीपण संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा..!!

--तात्या.

1 comment:

yogesh said...

आण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा