February 18, 2007

दोन ओळींचं ऋण...

प्रिय महेश वेलणकर/प्रशासक,

मी तात्या अभ्यंकर, तुझ्या संकेतस्थळावरचा एक सभासद. गेले बरेच दिवस तुला एक जाहीर पत्र लिहीन म्हणत होतो. आज योग आला!

सर्वप्रथम अहो-जाहो, किंवा अरे-तुरे बद्दल. तुझं वय किती आहे हे मला माहीत नाही, ना मला ते जाणून घ्यायचं आहे. जरी तू माझ्यापेक्षा वयाने मोठा असलास तरी मी तुला अरे-तुरेच करणार आहे. तुझ्याबद्दल वाटणारी आपुलकी, हे एकच कारण यामागे आहे एवढंच लक्षात घे.

गेले काही दिवस मनोगत बंद होते. ते बंद व्ह्यायच्या आधी काही दिवस येथे लिहिल्या जाणाऱ्या लेखांना आणि प्रतिसादांना प्रशासकीय अनुमतीची अट नव्यानेच सुरू झाली. त्या आधी माझ्या आठवणीप्रमाणे कधीच या प्रकारची प्रशासकीय अनुमती मनोगतावर लिहितांना लागत नव्हती. त्यानंतर मनोगत बंद झाले, आणि काही दिवसांनी पुन्हा सुरू झाले. परंतु प्रशासकीय अनुमती, जी मनोगत बंद व्हायच्या आधी सुरू झाली होती, ती अजूनही तशीच आहे.

मी वेळोवेळी, जमेल तसा या प्रशासकीय अनुमतीचा विरोधच केला आहे. याचं प्रमूख कारण म्हणजे आम्ही लेख किंवा प्रतिसाद लिहिल्यावर तो छापून येण्यास ८ ते १० तास लागतात. त्यामुळे लेखनातील, विशेषत: प्रतिसादातील उत्स्फुर्तता निघून जाते. तू किंवा प्रशासक, (तू मालक आहेस, आणि प्रशासक म्हणून तू अन्य कुणाला नेमले आहेस, असा माझा समज आहे) जेव्हा मनोगतावर येता तेव्हाच प्रशासकीय अनुमतीच्या प्रतिक्षेत असलेले लिखाण प्रसिद्ध करता.

आत्तापर्यंत मी एक दोन वेळा याचा मनोगतावरही याचा जाहीर निषेध केला आहे. बरं, प्रशासकीय अनुमती लावलीस ती लावलीस पण त्यामागचं नक्की कारण काय, ती किती वेळा करता आहे, की कायमस्वरुपी आहे काय, याबद्दल एकदाही साधा दोन ओळींचा खुलासाही तू करू नयेस याचं खरंच खूप वाईट वाटतं रे!

मला हे मान्य आहे की हे संकेतस्थळ पूर्णत: तुझे आहे, आणि कुठलाही खुलासा करायला तू कुणालाही बांधील नाहीस. अरे पण आम्ही सगळे मनोगती तुझे कुणीच नाही का रे? अरे आजपर्यंत तुझ्या या संकेतस्थळावर आम्ही सगळे मनोगती एक कुटुंबीय म्हणूनच वावरलो ना? मग मालक म्हणून, किंवा एक कुटुंबप्रमूख म्हणून आमच्या एखाद्या तक्रारीवर खुलासा करण्याकरता साध्या दोन ओळींचंही तू देणं लागत नाहीस का रे?

"प्रशासकीय अनुमती" ही माझ्यासारख्या अनेक मनोगतींना पसंत नाही. पण कुणी उघडपणे बोलून दाखवत नाही. अरे सगळेच माझ्यासारखे तोंडाळ आणि शिवराळ नसतात रे! तुझ्या या तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम असलेल्या संकेतस्थळाच्या रुपाने लोकांना आपापले विचार व्यक्त करायला एक मुक्त व्यासपीठ मिळतं आणि "जाऊ द्या, प्रशासकीय अनुमती तर प्रशासकीय अनुमती, पण आपण लिहू या" असा साधा विचार करून मंडळी गप्प बसतात रे!

कोण आहेत ही सर्व मंडळी? हे मनोगती? तर सर्व मराठी माणसं! ज्यांना लिहायला, वाचायला तुझ्यामुळे एक सुंदर संकेतस्थळ मिळालं! मानतो बॊस, आम्ही सगळेच ते मानतो! अरे पण आमच्या एखाद्या तक्रारीवर मालक म्हणून तू किंवा तुझ्या प्रशासकानी आमच्याशी अवघ्या दोन ओळींचाही संवाद साधू नये? अरे इतके कोरडे कसे रे तुम्ही? तुम्हाला काय वाटतं आमच्याशी थोडाफार संवाद साधला, आमच्या शंकांना उत्तरं दिली की आम्ही तुमच्या गळ्यात पडू? तुमचं लांगूलचालन करायला लागू? तसं काही नाही रे. आम्ही इथे येतो ते केवळ मराठीच्या प्रेमापोटी. इथे आम्हाला लिहायला मिळतं आणि चागलंचुंगलं वाचायला मिळतं म्हणून! दुसरं काहीच कारण नाही एवढा विश्वस बाळग!

आता माझ्यापुरतं बोलतो. मी जे काही वेडंवाकडं लेखन करतो त्याला तुझ्या संकेतस्थळामुळेच आजपर्यंत प्रसिद्धी मिळाली. अनेक लोकांना माझं लेखन आवडलं आणि मला थोडीफार लोकप्रियताही मिळाली ती देखील केवळ आणि केवळ मनोगतामुळेच! जोपर्यंत मी मनोगतावर लिहीत होतो, तोपर्यंत इथे खूप धमाल केली, मजा केली. स्वत: भरभरून लिहिलं, इतरांच्याही लेखनाला मनमोकळे, दिलखुलास प्रतिसाद दिले. राजकारण केलं, कंपूबाजीही केली! ;)

मनोगताप्रमाणेच इतरही काही संकेतस्थळं आहेत, ब्लॊगची सोय आहे, मराठी माणसांचे १४ विद्या ६४ कला, पुलकीत सारखे याहू ग्रुपही आहेत. मी तिथेही लिहू शकतो. लोकांना माझं लेखन आवडलं तर ते तिथेही आवडीने वाचलं जाईल. नाही असं नाही. पण या सगळ्यात मला मनोगतावरच लिहायला सर्वात जास्त आवडतं ही वस्तुस्थिती मी कधीही नाकारली नाही, आजही नाकारत नाही!

आणि या सगळ्याच्या बदल्यात मी तुझ्याकडे काय मगितलं रे? तर फक्त प्रशासकीय अनुमती रद्द करावी इतकंच ना? बरं बदललेल्या मनोगताच्या धोरणां, तत्वांनुसार ही प्रशासकीय अनुमती तशीच राहणार असेल तर निदान तसं तरी लिही रे एखाददा! एक हाडाचा मनोगती म्हणून मी तेही मान्य करीन!

आता राहता राहिलं माझं तोंडाळपण आणि शिवराळपण. अरे पण खरं सांगू का? काही काही वेळा तुझ्या या सोवळ्या, कोरड्या, शिष्ठ वागणूकीचा, तुझ्या मौनाचा खूप राग येतो रे आणि मग माझ्या तोंडातून दोनचार शेलक्या कोकणी शिव्या निघून जातात! त्याबद्दल मी तुझी माफी मागू का रे? म्हणत असशील तर मागतो बुवा! अगदी बिनशर्त माफी मागतो!

असो, जे काही मनांत आलं ते इथे खरडलं आहे. कधी भारतात आलास तर भेटू आपण. अमेरिकेत परत जातांना तुला आमच्या देवगडी आंब्यांची एक पाटी भेट म्हणून देईन हो! ;)

शेवटी निर्णय तुझा आहे. कारंण मनोगत तुझं आहे, तू मालक आहेस! मला अपेक्षा आहे ती फक्त तुझ्या दोन ओळींची! आणि तेवढ्या दोनच ओळींचं तू माझं देणं लागतोस रे! तुझ्या प्रशासकामार्फत जरी या दोन ऒळी लिहिल्यास तरी माझी काही हरकत नाही. 'महेश' या नांवनेच लॊगीन व्हायला पाहिजे असा माझा आग्रह नाही! ;)

असो, तुझ्या ऋणाची आठवण करून देण्याकरता हा लेखनप्रपंच!

तुझा,
तात्या.

5 comments:

Anonymous said...

प्रशासकांनी त्यांची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.
http://www.manogat.com/node/8350

Tatyaa.. said...

हितचिंतकराव,
आपण जो दुवा दिला आहे त्यात प्रशासकांनी,

"जर एखाद्या सदस्याचे असे लेखन वारंवार काढून टाकावे लागले किंवा संपादित केले जाऊनही योग्य तो बोध घेऊन लेखनपद्धतीत बदल करण्यात असमर्थता दिसली तर अशा सदस्याचे लेखन प्रकाशनपूर्व परीक्षणासाठी ठेवून घेण्याचा उपाय केला जातो. ह्या धोरणाचाही अनेक सदस्यांना फायदा झालेला आहे.

ह्या धोरणात व/वा त्याच्या अवलंबात प्रसंगानुरूप बदल, अपवाद करण्याचे तारतम्य, क्षमता आणि अधिकार हे सर्व प्रशासनाकडे आहेच. मनोगतावरील लेखनाचे सार्वजनिक आणि सुसंबद्ध स्वरूप टिकवण्याचा प्रशासनाचा उद्देश ह्याद्वारे स्पष्ट होईल अशी आशा आहे."

असे म्हटले आहे. यात सरसकट सर्वांनाच प्रशासकीय अनुमती खाली ठेवले जाईल असे कुठेही म्हटलेले नाही!

असो, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण माझे हितचिंतक आहात असे मी समजतो. सबब, आपल्यासारख्या हितचिंतकाचे नांव समजले तर मला अधिक आनंद होईल. ते आपण मला माझ्या tatya7@gmail.com या पत्त्यावर कळवू शकता!

धन्यवाद,
तात्या.

thelaukik said...

taatya. AapaN halli maraThicha premapoTi lihayla lagloy hi tula chintechi baab nahi waTat?
te diwas gele ka jevha pulansarkha maNus fakt sahityacha premasaaThi lihaycha...bangali suddha shikle te tevdhyasaaThi. Sahaj manat aal mhaNun..
oLakhlas ka?
Laukik

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

तात्या,
मनापासून आवडलय मला आपलं मनोगत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे said...

तात्या,
मनापासुन आवड्लीय आपल्याला आपली दिल की बात.