December 22, 2010

कृष्णा नी बेगने..

कृष्णा नी बेगने..(येथे ऐका)

(हे माझं रसग्रहण हे मूलत: गाण्याच्या सांगीतिक भागावर आहे..काही वर्षांपूर्वी एकदा अण्णांशी निवांतपणे संवाद साधायची संधी मिळाली होती.. बोलताना अण्णांनी मला 'भाग्यदा लक्ष्मी बारम्मा' आणि 'कृष्णा नी बेगने..' या कन्नड गाण्यांचा मराठीत अर्थ समजावून सांगितला होता, तो पुसटसा आठवतो आहे, तसा लिहितो आहे. येथे कुणी कन्नड जाणणारा/जाणणारी असल्यास मी जे कानडी शब्द लिहिले आहेत, आणि पदाचा जो अर्थ लिहिला आहे त्यात अवश्य सुधारणा करावी. त्याचं स्वागतच आहे..)

कानडी भाषेतलं कृष्णावरचं फार सुंदर गाणं.. व्यासतीर्थांची रचना.. यमुना कल्याणी रागातलं.. कर्नाटक-संगीतातला यमुना कल्याणी, आपल्या हिंदुस्थानी संगीतातला यमन कल्याण! दाक्षिणात्य गायिका चित्राने गायलं आहे हे गाणं..

साजूक तुपातली मिठाई तीच.. यमनची! फक्त बॉक्सेस वेगवेगळे! :)

'कृष्णा नी बेगने बारो' - रे कृष्णा इकडे (माझ्याकडे ) ये रे लवकर..!

'ष्णा' अक्षरावरच्या शुद्ध गंधारात अक्षरशः देवत्व आहे.. साक्षात श्रीकृष्णच वस्ती करून राहिला आहे त्या स्वरात.. किती कौतुक आहे त्या 'कृष्णा' शब्दात.. किती गोडवा आहे! एखादी आई आपल्या लाडक्या लेकाला ज्या ममत्वाने हाक मारते तेच ममत्व या 'कृष्णा' च्या स्वरात आहे.. फक्त दोनच स्वर - सा आणि ग!
'बेगने बारो..' तल्या 'बारो' शब्दावरची 'प रे' संगती म्हणजे अगदी ऑथेन्टिक यमन! :)

'बेगने बारो मुखवन्ने तोरो' - रे कृष्णा लौकर इकडे ये रे आणि मला तुझं मुखावलोकन करू दे..

खूप छान गायली आहे ही ओळ.. ह्यातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? यमनकल्याणातल्या शुद्ध मध्यमाबद्दल मी काय बोलावं? इतकंच सांगेन की तो शुद्ध मध्यम म्हणजे यमनाच्या गालावरचा सुरेखसा तीळ! हवं तर आपण त्याला बाळकृष्णाच्या गालावरील तीट म्हणू.. जी असते दृष्ट लागू नये म्हणून, कुठलंही अमंगल टाळण्याकरता असते ती.. परंतु ती तिट स्वत: मात्र अतिशय पवित्र.. सुमंगल आणि देखणी! तसा आहे यमनकल्याणातला शुद्ध मध्यम! :)

'बेगने बारो' गाताना चित्राने 'ध़नी़रेग..' ची एक सुरावट अशी घेतली आहे की नारायणरावांच्या 'नयने लाजवीत..' पदातल्या 'जणु धैर्यधर धरित धनदासम धन' मधल्या 'धनदासम' ची आठवण व्हावी! :)

काशी पितांबर कैयल्ली कोळलू
मीयोळू पुसिद श्रीगंध घमघम..



रे कृष्णा, तू सुरेखसं काशीचं केशरी पितांबर नेसला आहेस आणि तुझ्या हातात बासरी आहे..चंदनलेपाने अभ्यंगित अशी तुझी कांती आहे!..

मंडळी, हे अभ्यंग चंदनलेपाचं नव्हे, ते आहे यमनकल्याणच्या स्वरांचं.. काशीच्या भरजरी केशरी कदाचं जे सौंदर्य, तेच सौंदर्य यमनकल्याणचं..! :)

तायिगे बायल्ली मुज्जगवन्ने तोरिद
जगदोद्धारक नम्म उडुपीय श्रीकृष्ण..

कृष्ण, ज्याने बालपणी आपल्या मातेला आपल्या मुखात सार्‍या विश्वाचं दर्शन घडवलं होतं, असा सार्‍या जगाचा उद्धार करणारा असा उडुपीचा श्रीकृष्ण!



कृष्णाने सार्‍या जगाचा उद्धार केला आहे की नाही ते माहीत नाही, परंतु हिंदुस्थानी रागसंगीताचा प्रसाद वाटून सार्‍या संगीत रसिकांचा मात्र त्याने उद्धार केला आहे.. आपलं रागसंगीत हे त्यानं आपल्या पदरी घातलेलं सर्वात मोठं दान!

असो,

कन्नड भाषेतलं हे फार सुंदर गाणं.. याचं हरिहरनने फ्यूजन केलं आहे तेही खूपच सुंदर आहे.. येशूदासही सुंदर गातो हे गाणं..

सदरच्या ध्वनिफितीत चित्रानेही हे गाणं अगदी मन लावून गायलं आहे.. सोबतची बासरी आणि सतारदेखील खूप छान! बरं वाटतं हे गाणं ऐकून, समाधान वाटतं, पवित्र वाटतं, मंगल वाटतं..! हे देणं देवाघरचं, हे स्वरसामर्थ्य यमनकल्याणाचं..!

अण्णांशी जेव्हा या गाण्याबद्दल बोललो तेव्हा अर्थ सांगताना अण्णांनीही सहजच गुणगुणलं होतं हे गाणं. पण अक्षरश: शब्दातीत गुणगुणलं होतं..! फक्त माझ्यासाठी.. मी एकटा श्रोता, त्या अलौकिक स्वरांचा साक्षीदार!
अहो, सबंध गाणं तर सोडाच.. अण्णांनी सुरवातीचे नुसते 'कृष्णा नी ' हे शब्द गायले आणि मी जागीच संपलो.. कल्पना करा - अण्णांचा आवाज आणि कृष्णा नी मधले षड्ज, गंधार! अक्षरश: शंखध्वनी, नादब्रह्म!



असो..
हा लेख मी त्या जादुगार कृष्णाच्या, कानडाऊ विठ्ठलू असणार्‍या आमच्या पांडुरंगाच्या आणि कानडाऊ भीमसेनूंच्या चरणी अर्पण करत आहे..

-- तात्या अभ्यंकर.

4 comments:

Athavale said...

Dear Tatya Abhyankar,
I am a regular reader of your blog and it seems that our interests in classical music and singers are alike.
Since you have invited comments on the translation of the Kannada bhajan in Marathi, I venture to suggest the following.
Instead of saying Pitambar from Kashi (Varanasi), the meaning could be similar to that of the marathi word Kase (waist)as in -Kase Pitambar Kastur Lallati. Some one knowng both Kannada and Marathi may beable to comment on this.
Regards,
Ramesh Athavale.

Tatyaa.. said...

Dear Athavale Sir,


Thx for your reply. It's very valuable for me..

Regards,
Tatyaa.

प्रदीप पोवार. Pradeep Powar said...

प्रिय तात्या,
मला हे गाणे खुप आवडते. मी हे नेहमी गुणगुणत असतो. पण मला त्याच्या ओळी माहीत नव्हत्या त्यामुळे मी ते गाणे शोधू शकत नव्हतो.
हरीहरणने गायिलेले हे गाणे भारतीय बनावटीच्या एका इंग्लिश चित्रपटातही आहे.
आभारी आहे.
आपला,
प्रदीप

Tatyaa.. said...

saglyana dhanyavaad..

Tatyaa.