March 04, 2011

मंगेश....!

राम राम मंडळी,

तानपुरा, तंबोरा...!

आपल्या भारतीय संगीताचा आधार...!



आपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...

या वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..!

ही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...

१) तानपुर्‍याच्या खुंट्या.



तानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..

२) तानपुर्‍याचा भोपळा.



तानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..

तानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..

३) घोडी किंवा ब्रिड्ज.



ह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.

४) जवार आणि मणी.



जवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच "जवारी लागली" असे म्हणतात.

जमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा "जवारी लागण्याला" देता येईल! हा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...!

वर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य! काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे!

घोडीच्या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.

५) तानपुर्‍याचे लागणे.

अरे देवा! हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही! उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.

असो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.

वर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..


असो,

तर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान! उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ "देवत्वा"चीच उपमा देईन..

सुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी!



स्वरभास्कर तानपुरा जुळवताहेत...!


मंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे! ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...

लतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,
"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का! त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...!



-- तात्या अभ्यंकर.

1 comment:

अ रसिक said...

तुमच्या सर्व यूटू :-) ब्रूटस् च्या फितीमध्ये फार खर्रखर्र असलेने ऐकून निखळ आनंद धेटला नाय...पण वाटले हे तरी तुमांस सांगितले नाय तर काय खर्र नाय...

आमच्या सारख्या भिकारदास मानसाला मात्र एवंढे कळले की तात्याला थोडेफार गायन येते बरं का... तर म्होरल्या टायमाला आपुनशान जरा जपूनच परतिक्रिया लिवू...

पन tatya's choice इज एकदम फर्मास...