August 28, 2006

बसंतचं लग्न..९ (मुलतानी)

राम राम मंडळी,
आज आपण बसंतच्या लग्नात 'मुलतानी' या रागाबद्दल बोलणार आहोत. मंडळी मुलतानी हा आपल्या संगीतातला एक अत्यंत भारदस्त राग. मला तर या रागाला "Rich' या शिवाय दुसरा शब्दच सुचत नाही. मुलतानी तो मुलतानी! पण मंडळी, हा नुसताच Rich नाही तर मला तो थोडासा अद्भुतही वाटतो. अगदी सुरवातीपासूनच यातल्या स्वरांचं वजन आणि त्याचा भारदस्तपणा मनाचा ताबा घेतो. आपल्याला या रागाची पटकन ओळख पटावी म्हणून हे ध्वनिमुद्रण ऐका.
"नैनमे आनबान कोनसी परी रे"
ही मुलतानीतली पारंपारिक बंदीश सौ श्रुती सडोलीकरांनी गायली आहे. त्यांनी मध्यलय एकतालात काय मस्त जमवली पहा ही बंदिश! काय पण स्वरांचं आणि लयीचं वजन! क्या बात है.. तीव्र मध्यम, मगरेसा, धप इत्यादी संगती काय सुरेख वाटतात!

या रागाशी आपला अजून परिचय व्हावा म्हणून दिनानाथरावांचं हे पद ऐका. 'प्रेम सेवा शरण' हे झपतालातलं विलक्षण ताकदीचं मुलतानीतलं पद आहे हे. यात फक्त एके ठिकाणी शुद्ध धैवत लावला आहे. पण सध्या आपण पहिल्या दोन ओळींकडे लक्ष देऊ. मंडळी, या पदातल्या मुलतानीच्या स्वरांचं वजन पाहूनच भारावून जायला होतं! 'सहज जिंकी मना' ही ओळ ऐका. काय सुरेख मुलतानी दिसतो या ओळीत. 'सहज' या शब्दातला निषाद हा खास मुलतानीचा निषाद. अगदी आमच्या अण्णांच्या तंबोऱ्यातला!! आहाहा..

हे पद मूळ भीमपलास या रागातलं. त्यातही हे पद अतिशय सुरेखच वाटतं. करीमखासाहेब हे पद भीमपलासातच फार सुरेख गात असत. पण मुलतानी या रागाने दिनानाथरावांवर अशी काही भुरळ घातली की त्यांनी हे पद मुलतानीत अत्यंत समर्थपणे बांधलं. पण क्या बात है, त्यामुळे श्रोत्यांची मात्र चंगळच झाली की हो! त्यांना भीमपलासातला प्रासादिकपणा, सोज्वळपणा आणि मुलतानीतला भारदस्तपणा हे दोन्ही अनुभवायला मिळालं!

'तरून जो जाईल सिंधू महान
असा हा एकच श्री हनुमान'

ओहोहो, क्या बात है! बाबुजींनी गीतरामायणातलं हे गाणं बांधताना मुलतानीचा फार सुरेख उपयोग केला आहे. हनुमानाचं वर्णन करायला हाच राग हवा हो! हनुमानाइतकाच अद्भुत! एकेका कडव्यातून यातला मुलतानी आपल्याला अधिकाधिक सुंदर दिसू लागतो.
बरं का मंडळी, या गाण्यातलं,
'शस्त्र न छेदील या समरांगणी,
विष्णुवराने इच्छामरणी,
ज्याच्या तेजे दिपे दिनमणी,
चिरतर आयुष्मान,
असा हा एकच श्री हनुमान..'

हे वर्णन रागदारी संगीताचा विचार केल्यास जसंच्या तसं आमच्या मुलतानीलाही लागू आहे हो. खरंच अत्यंत तेजस्वी राग. अगदी हनुमानाइतकाच! हा राग मैफलीचा एकदम ताबाच घेतो आणि अशी काही हवा करून टाकतो की क्या बात है!
या रागातल्या दोन स्वरांमधलं अंतरदेखील अत्यंत पारदर्शक आणि देखणं आहे. इतर रागांच्या तुलनेत हा राग गायलादेखील जरा कठीणच आहे. हा खास रियाजाचा, समाधीचा राग आहे. हा राग गाताना अगदी भल्या भल्या गायकांचा कस लागतो. मुलतानीला प्रसन्न करायचं म्हणजे महामुश्किल काम. पण एकदा का जमला की मात्र मुलतानी असा काही चढतो! आहाहा. भन्नाट जमलेल्या मुलतानीच्या ख्यालाची मैफल म्हणजे या पृथ्वीतलावावरील मैफलच नव्हे ती. मंडळी, एकूणच हा एक मस्तीभरा, चैनदार राग आहे. जमला तर याच्यासारखा दुसरा कोण नाही. दुपारी यथास्थित बासुंदी-पुरीचं जेवण, त्यानंतर ताणून झोप आणि पाचच्या सुमारास दोन तंबोऱ्यात जमलेला सुरेल मुलतानी. अजून काय पाहिजे आयुष्यात?!

बसंतच्या लग्नाच्या मंडपात याची शान आणि रुबाब काय विचारता मंडळी! सगळेजण त्याच्याकडे नवलाईनेच पहात आहेत. आपल्या बसंतला आनंदाचं कोण भरतं आलं आहे. मुलतानीनेही बसंताची उराउरी भेट घेतली आहे आणि आपल्याच मस्तीत मोठ्या ऐटीने मंडपात सोफ्यावर दरबारी, मालकंसाच्या शेजारी विराजमान झाला आहे. "हम जानते है के हम मुलतानी है!" अशी मिष्किली चेहऱ्यावर ठेवून!

कर्नाटकातल्या गदग गावचा भीमसेन जोशी नांवाचा एक मुलगा उठतो, गुरूगृही जातो, आणि सकाळी तोडी, दुपारी मुलतानी, आणि संध्याकाळी पुरिया या तीन रागांवर अक्षरशः भीमसेनी मेहनत करतो, आणि स्वरभास्कर पं भीमसेन जोशी होतो! ऐका मंडळी, अण्णांचा मुलतानी इथे ऐका आणि धन्य व्हा!
--तात्या अभ्यंकर.

1 comment:

Satya said...

Tumachya post madhalya kahi links aata chalat nahiyet..

tyachya alternative links deu shakal ka?