August 27, 2006

बसंतचं लग्न..७ (हमीर)

राम राम मंडळी,
आपण सगळेजण बसंतच्या लग्नाला जमलो आहोत. आत्तापर्यंत भले भले राग मांडवात येऊन बसले आहेत. सुरेख माहोल जमला आहे. नवऱ्यामुलाजवळ नंद, बिहाग, केदार, शामकल्याण, कामोद, नट, छायानट, गौडसारंग ही त्याची सगळी मित्रमंडळी धमाल करत बसली आहेत!
हे काय? तो कुठला राग त्यांच्यात बसला आहे हो? त्याचा उत्साह तर नुसता ओसंडून वाहतोय! त्या सगळ्यात तो अगदी विशेष उठून दिसतोय? कोण आहे तो?
मंडळी, तो आहे राग हमीर! ओहोहो, क्या केहेने!! अहो हमीर रागाबद्दल किती बोलू अन् किती नको! आपल्या हिंदुस्थानी राग संगीतातला एक फार सुरेख राग. याचा मूळ स्वभाव शृंगारीक. पण प्रसन्नता, उमद्या वृत्तीचा या याच्या स्वभावाच्या इतरही बाजू आहेत. आज मी इथे माझ्या परीने हमीर समजावून सांगणार आहे. वर उल्लेख केलेल्या त्याच्या मित्रमंडळींबद्दल सवडीने लिहिणारच आहे, पण आज आपण हमीर या रागाबद्दल बोलूया. आधी आपली या रागाशी पटकन तोंडओळख व्हावी म्हणून हे रागाचं एक लहानसं क्लिपिंग ऐका. हे ध्वनिमुद्रण आपल्याला रागाची बेसिक माहिती देईल."धीट लंगरवा कैसे घर जाऊ" ही एक फार सुरेख पारंपारीक बंदीश आपल्याला ऐकायला मिळेल. पहा किती प्रसन्न स्वभाव आहे आमच्या हमीरचा!!
मंडळी, आता आपण हमीराचं शास्त्रीय संगीताच्या दुनियेतलं स्थान पाहू. हा राग जास्त करून ग्वाल्हेर घराण्यात गायला जातो, इतरही घराण्याची मंडळी हा राग गातात, नाही असं नाही. परंतु या रागाची तालीम प्रामुख्याने ग्वाल्हेर घराण्यात दिली जाते. "चमेली फूली चंपा" ही हमीरातली झुमऱ्यातली पारंपारीक बंदीश फार प्रसिध्द आहे. वा वा! गायकाने स्थायी भरून चंपा या शब्दावर प्रथम सम गाठली की मैफल हमीरच्या ताब्यात गेलीच म्हणून समजा. मला पं उल्हास कशाळकर, पं यशवंतबुवा जोशी, सौ पद्मा तळवलकर, आमचे पं मधुभैय्या जोशी यांच्या मैफलीत भरपूर हमीर ऐकायला मिळाला आहे. पं गजाननबुवा जोशी व्हायोलीनवर हा राग काय सुरेख वाजवायचे!वा! फारच श्रीमंत राग हो! ऐकून मन कसं प्रसन्न होतं!! ग्वाल्हेरवाली मंडळी मस्तपैकी झुमऱ्याबरोबर खेळत खेळत असा सुंदर हमीर रंगवतात, वा! अगदी ग्वाल्हेर घराण्याचे एक अध्वर्यु पं विष्णू दिगंबर पलुसकर यांचे तितकेच गुणी चिरंजीव पं दिगंबर विष्णू, अर्थात बापुराव पलुसकर यांची 'सुरझा रही हो' ही हमीरमधली बंदीश ऐका! बघा, त्यांनी हमीर काय सुरेख गायला आहे! एक तर बापुरावांचा आवाज म्हणजे खडीसाखर, त्यात त्यांचं ग्वाल्हेर गायकीवरील प्रभूत्व आणि त्यात हमीरसारखा उमदा राग! का नाही गाणं रंगणार महाराजा?
मंडळी, आपल्या नाट्यसंगीतातदेखील हमीर रागाचा उत्तम उपयोग करून घेतला गेला आहे. पटकन एक उदाहरण देऊ? पं सुरेश हळदणकरांचं "विमलाधर निकटी मोह हा" हे संगीत विद्याहरणातलं पद ऐका. बघा, हमीर किती उठून दिसतो यात. आणि त्यात हळदणकरबुवांसारखा समर्थ गायक! आणि हो, "नमन नटवरा विस्मयकारा" ही नांदीदेखील आपल्या हमीरातीलंच की! वा वा!!
मंडळी, ही झाली हमीर रागाची रागसंगीतातली बाजू. काय म्हणता? तुम्हाला लाईट संगीत जास्त आवडतं? मग इथेही हमीर आहेच की! अगदी प्रसिध्द उदाहरण म्हणजे रफीसाहेबांचं हे गाणं!
काय? पटली की नाही हमीरची पुरती ओळख?:) क्या केहेने! या सुंदर गाण्याबद्दल नौशादसाहेबांना, रफीसाहेबांना आणि आपल्या हमीरला कितीही दाद दिली तरी कमीच!
"पगमे घुंगर बांधके,
घुंगटा मुखपर डारके,
नैनमे कजरा लगाके
रे मधुबन मे राधिका नाचे रे"!!

ओहोहो! हे गाणं ऐकून डोळ्यात आनंदश्रू उभे रहातात हो! मंडळी, काय गोड गळा! काय सुरेख गायचे हो रफीसाहेब! इतका मधुर पण तयारीचा आवाज! रफीसाहेबांना आपला सलाम!! नौशादसाहेबांनी तर यात हमीराचं सोनं अक्षरशः मुक्तहस्ते लुटलं आहे हो! पण काय सांगू? कितीही लुटली, तरी हमीराची श्रीमंती जराही कमी व्हायची नाही! खरंच मंडळी, आपलं रागसंगीत फार फार श्रीमंत आहे.
आणि मंडळी राग म्हणजे तरी काय हो? तर एक ठरावीक स्वरसंगती, आणि त्यातून निघालेला एक विचार. प्रत्येक रागाला स्वतःचा असा एक चेहरा असतो. एखादा राग ऐकतांना आपल्या कानांना तो कसा लागतो, त्यातून आपल्या मनात कोणते विचार येतात, कोणत्या भावना निर्माण होतात हे महत्वाचं!
आता हमीरचंच उदाहरण घेऊ. मी तात्या अभ्यंकर, या हमीरचा एक श्रोता. त्याच्या प्रेमात पडलेला. आता हमीर हा राग मला जसा वाटेल, अगदी तसाच तो प्रत्येकाला वाटेल असं नाही. पण हा राग मला कसा वाटला याची मी काही उदाहरणं देऊ शकेन. आता बघा हां, हमीर ऐकून तो समजून घेतांना माझ्या मनात आलेली एक situation. अगदी साधं उदाहरण. बघा आपल्याला पटतंय का!
समजा मी २४-२५ वर्षांचा एक तरूण मुलगा आहे. घरदार, पै-पैसा, नोकरीधंदा सगळं व्यवस्थित आहे. घरची मंडळी आता माझ्या लग्नाचं बघू लागली आहेत.(समजा हां! :D) स्थळं येत आहेत. पिताश्री हळूच विचारत आहेत, "काय रे, तुझं तू कुठे जमवलं नाहीयेस ना? बघू ना तुझ्याकरता स्थळं?" मी त्यांना स्थळं बघायला सांगतो. वास्तवीक मी एका मित्राच्या लग्नात गेलो असतांना तिथे वधूची एक मैत्रीण माझ्या मनांत भरली होती!;). ओहोहो, काय सुरेख होती ती! गोरीपान, बोलके डोळे. पण मंडळी मी थोडा बुजरा आहे. तिच्याकरता पण स्थळं बघताहेत अशी जुजबी माहिती मला खरं तर मिळाली होती, पण ओळख काढून तिला डायरेक्ट विचारायची हिंमत नाही. आता मनांत भरली होती खरी, पण काय करणार? त्यापेक्षा पिताश्री स्थळं बघतच आहेत त्यातल्याच एकीशी चुपचाप लग्न करावं, असा पापभिरू विचार मी केला आहे!!
एक एक स्थळं बघतो आहे, आणि काय सांगू महाराजा!! ज्या संस्थेत नांव नोंदवलं होतं तिथून नेमकी तीच मुलगी मला सांगून आली!! ती हो.., मांडवात दिसलेली!!
झालं. हवेत तरंगतच आमचा पाहण्याचा कार्यक्रम पार पडला, आणि तिचा होकारही आला. साखरपुडा झाला, आणि आम्ही दोघे प्रथमच बाहेर फिरायला गेलो. तेव्हा तिने मिष्किलपणे मला विचारलं,
"खरं सांग. त्या लग्नात चोरून चोरून सारखा माझ्याकडे बघत होतास ना? मला तेव्हाच लक्षात आलं होतं! आणि खरं सांगायचं तर मलाही तू तेव्हा आवडला होतास!!
ओहोहो मंडळी, आपण खल्लास! अहो हमीर हमीर म्हणतात तो हाच की!! :)
अशी आणखीही काही उदाहरणं देता येतील. तेवढी ताकद आपल्या रागसंगीतात आहे. आपल्या प्रत्येक भाव-भावनांचं फार सुरेख दर्शन आपल्याला रागसंगीतातून होतं. नाही, मायकेल जॅक्सन मोठा असेल हो! मी नाही म्हणत नाही, पण प्रथम आपण आपल्या घरी काय खजिना भरून ठेवला आहे तो नको का बघायला? पिझ्झा, बर्गर जरूर खा, पण त्याआधी थालिपीठ, खरवस, अळूवड्या खाऊन तर बघा!!!
मग? करणार ना हमीरशी दोस्ती? करूनच पहा. आयुष्यभर साथ सोडणार नाही असा मित्र लाभेल तुम्हाला!!

धन्यवाद,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक आणि प्रचारक,
हिंदुस्थानी रागसंगीत.

1 comment:

धनंजय देव said...

फारच सुंदर रसग्रहण करायला शिकायला मिळत आहे ही रसिक रागओळख वाचुन.

पुढील लेखांची आतुरतेनी वाट बघत आहे.