August 26, 2006

संगीताचे ऋणानुबंध..

नमस्कार,
मंडळी, ही साधारणपणे १९९८ सालची गोष्ट आहे. एका मित्राशी (सुनील टेंबे) बोलतांना गाण्याबद्दल गप्पा सुरू होत्या, आणि गप्पांच्या ओघात स्व पं निवृत्तीबुवा सरनाईक यांचा विषय निघाला. निवृत्तीबुवा माझे अतिशय आवडते गवई. त्यांना प्रत्यक्षात ऐकण्याची कधी संधी मिळाली नाही, पण त्यांचे काही जुने ध्वनिमुद्रण नेहमी ऐकतो. बुवा छानच गायचे. अत्यंत कसदार परंतु सहजसुंदर गाणं होतं बुवांचं! मुष्किल तानक्रिया असलेल्या जयपूर गायकीवर बुवांचं प्रभुत्व.
सुनील मला म्हणाला, "अरे डोंबिवलीला एक पुरोहीत नावाचे गृहस्थ राहतात. त्यांचा फोन नं. तुला देतो. तू त्यांना फोन कर. त्यांच्याकडे निवृत्तीबुवांचं आणि इतरही बरचसं जुनं ध्वनिमुद्रण आहे"
झालं. एका रविवारी सकाळी मी पुरोहितांच्या घरी फोन लावला. सुनीलचा संदर्भ दिला आणि फोन करण्याचं कारण सांगीतलं. ते एकदम आनंदीत होऊन म्हणाले, "अरे वा वा! तुम्ही केव्हाही या. गाण्याची आवड असणारं कोणी भेटलं की खूप आनंद होतो मला. आज मलाही भरपूर वेळ आहे. मस्तंपैकी गाणं ऐकू. नक्की या, वाट पहात आहे."
मी डोंबिवलीला निघालो आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. ते रहात असलेल्या सोसायटीत पोहोचलो तर खाली १०-१२ माणसं उभी. त्यापैकी एकाला मी पुरोहितांचं घर कुठलं असं विचारलं तर तो म्हणाला, "कोण पुरोहित ना? पहिल्या मजल्यावर. आत्ताच १५ मिनिटापूर्वी गेले हो. तसे आजारीच असायचे. अचानक ऍटॅक आला. आत्ताच डॉक्टर येऊन गेले"!
????! आज सकाळीच तर मी या माणसाशी बोललो होतो! क्षणभर मला काय करावं ते सुचेना. सुनीलला फोन करावा का? पण तो तर पुण्याला गेला होता.
तसाच त्यांच्या घरी गेलो. घरीदेखील ८-१० बायका आणि पुरुष मंडळींची गर्दी. माझ्या ओळखीचं तर कुणीच नाही. जमीनीवर शांतपणे पहुडलेले पुरोहित! मल उगाचंच भरून आलं! त्यांना नमस्कार करून पुन्हा खाली आलो. काय करावं ते कळेना. "आज हा गृहस्थ जर मला भेटला असता तर आमची ओळख झाली असतीच की नाही? नाही नाही, याला पोचवायला गेलंच पाहिजे मला"! असा विचार मनाशी करून तिथेच दोन तीन तास घुटमळलो, आणि कधीही न भेटलेल्या त्या गृहस्थांचा अंत्यविधी आटपून घरी परतलो.
त्यानंतर साधारणपणे दोन महिन्यांनी मला एक फोन आला. "हॅलो, अभ्यंकर का? मी डोंबिवलीहून सुधा पुरोहित बोलत्ये. सुनील टेंबेंकडून तुमचा नं घेतला"!
"हो हो, आलं लक्षात".
"आपल्याला शक्य असेल तर एकदा घरी याल का? आपल्याला निवृत्तीबुवांच्या कॅसेटस् द्यायच्या आहेत. तुम्ही येणार असं मला पुरोहित त्या दिवशी बोलले होते. त्यांनी मुद्दाम तुम्हाला देण्याकरता या कॅसेटस् वेगळ्या काढल्या होत्या"!
मला पुन्हा काय बोलावं ते कळेना. "हो का? वा वा, नक्की येतो, असं म्हणणार होतो मी?"! ही पुरोहित मंडळी माझी सारखी परीक्षा का घेत होती ते कळेना!
पुरोहित गेल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी मुद्दामून कॅसेटस् आणायला जायचं हे काही मनाला पटेना. पण सुधाताईंचा पुन्हा एकदा फोन आला, आणि एकदा धीर करून त्यांच्या घरी गेलो. सुधाताई या खूपच शांत स्वभावाच्या बाई होत्या. आता पुष्कळच सावरलेल्या दिसत होत्या. त्या दोघांनाही गाण्याची खूप आवड होती असं त्यांच्या बोलण्यातून कळलं. सुधाताईंना गाण्याबरोबरच वाचनाचीदेखील खूप आवड होती. त्या मूळच्या सांगलीच्या. हौस म्हणून काही वेळ काणेबुवांकडे गाणंही शिकलेल्या. काणेबुवा आता नाहीत, पण ग्वाल्हेर गायकी फार उत्तम गायचे. आसावरी ही सुधाताईंची एकुलती एक लग्न झालेली लेक मद्रासला असायची.
त्यानंतर त्या मला नेहमी घरी बोलवायच्या. गाण्यावर आणि इतर गोष्टींवरही खूप बोलायच्या. माझ्या आईशीही त्या एक-दोनदा बोलल्या होत्या. डोंबिवलीत कुठे कुणाचं चांगलं गाणं आहे असं कळलं की "येशील माझ्याबरेबर?" असं विचारायच्या. गाणं झाल्यावर "आता घरीच चल, गरम गरम आमटीभात खाऊनच जा" असं सांगायच्या! कुणा चांगल्या कलाकाराची नवीन कॅसेट आली की मला सांगायच्या, "तू घेऊ नकोस, मी घेतली आहे. तुला कॉपी करून देईन." अनवट रागांबद्दल आम्ही खूप बोलायचो. खूप मायेने वागायच्या माझ्याशी.
दोन महीन्यापूर्वीच त्या अमेरिकेत लेकीकडे रहायला गेल्या होत्या. आसावरी हल्ली अमेरिकेला असते. आज सकळीच आसवरीचा मला त्या गेल्या असा फोन आला! त्यांना तिथे किडनीचा विकार जडला होता. २ दिवसांपूर्वीच त्यांन रुग्णालयात दाखल केले होते. काहीच सुचेना म्हणून हा लेख लिहित आहे.
मंडळी, कसा योग असतो पहा, पुरोहितांची आणि माझी एकदाही भेट नाही, पण तरीही त्यांच्या अंतयात्रेस मी गेलो होतो, आणि सुधाताईंचं साधं अंत्यदर्शनही मला मिळू नये?
यापुढे कधीही कुणाच्या गाण्याला डोंबिवलीला गेलो की सुधाताईंची खूप आठवण येईल. "आता घरीच चल, गरम गरम आमटीभात खाऊनच जा" असं म्हणणारं तिथे कुणीच नसेल!
तात्या.

2 comments:

धोंडोपंत said...

तात्या,

फार फार भिडलं रे हे लेखन. काय अनुभव लिहिला आहेस?. नुसतं वाचुनसुध्दा डोळे पाणावले, तू तर प्रत्यक्ष अनुभवलसं, तुझी काय अवस्था झाली असेल याची कल्पना करवत नाही.

शुभेच्छा

अगस्ती

Abhi said...

खूपच संवेदनशील आहे ................