August 27, 2006

बसंतचं लग्न..५ (बिहाग)

नमस्कार मंडळी,

और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!

आपल्या बसंतचं लग्न थाटामाटांत सुरू आहे. या लग्नाला सगळे रथी महारथी राग व रागिण्या आल्या आहेत, येत आहेत. भले भले राग येऊन आपापली आसने ग्रहण करत आहेत. तो कोण आहे बरं? एखाद्या हिरोसारखा? देखणा, रुबाबदार, सुंदर डोळ्यांचा? मांडवातल्या सगळ्या मुली तर त्याच्याकडेच बघत आहेत!
नाही ओळखलंत? अहो तो तर आपला बिहाग!! बिहागची शोभा काय वर्णावी महाराजा!! माणसांतली रसिकता, आयुष्याचा भरभरून आस्वाद घेण्याची वृत्ती म्हणजे बिहाग. एक अत्यंत रसाळ, शृंगाररसप्रधान राग. बिहाग म्हणजे चाहत!
बरेच दिवसांची नजरानजर, मग ओळख, मग चोरून भेटीगाठी, आणि मग एका सुरेख संध्याकाळी, निसर्गरम्य एकांती तीने भरलेला होकार! खल्लास!! अहो, बिहाग बिहाग म्हणतांत तो म्हणजे हा होकार!
"तुझा तो अमक्या अमक्या रंगाचा ड्रेस आहे ना? तो जाम आवडतो आपल्याला. त्यात तू एकदम फाकडू दिसतेस. तो घालशील उद्याच्या गॅदरींग ला?" तो."तो नको रे, मी तो नाही घालणांर. माझा अमका अमका घालायचं ठरलं आहे, मी तोच घालून येणार. तू सांगशील तसं सगळं होणार नाही!!" ती.
आणि मग गॅदरींगच्या दिवशी ती नेमका त्याने सांगीतलेलाच ड्रेस घालून येते!! मैत्रीणीदेखील त्याच ड्रेसचं कौतुक करतांत! ती हळूच त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल विजयी भाव! त्याने सांगीतलं म्हणून तर तीने हा ड्रेस घातला होता, हे त्या मैत्रीणींना कुठे माहीत होतं? ते फक्त त्या दोघातलंच गूज होतं!! रोमँटीक शिक्रेटच म्हणा ना! :) मंडळी, हे त्या दोघातलं गूज म्हणजेच बिहाग!!
या ओळी पहा,
"धडकन मे तू है समाया हुआ,
खयालो मे तू ही तू छाया हुआ
दुनिया के मेले मे लाखो मिले,
मगर तू ही तू दिल को भाया हुआ"!!

वसंत देसाईंचं संगीत असलेल्या, लतादीदींनी गायलेल्या बिहाग रागातल्यांच या ओळी आहेत. त्यातल्या "मगर तू ही तू दिल को भाया हुआ" मधलं ते "भाणं" आहे ना? तोच बिहाग!! "दुनिया के मेले मे लाखो मिले"! अरे लाख असतील, पण तू म्हणजे तूच. दुसरं कोणी नाही!! मंडळी, बिहाग म्हणजे शृंगारातलं un-conditional surrender!!

बिहाग रागातलं नारायणराव बालगंधर्वांचं "मम आत्मा गमला" हे गाणं ऐका! नारायणरावांच्या गळ्यात फार शोभून दिसतो बिहाग! बालगंधर्वांनी "मम आत्मा गमला" या बिहागमधल्या पदामध्ये फार सुरेख रितीने कोमल निषादाचा एके ठिकाणी वापर केला आहे! वास्तवीक हा स्वर बिहागांत वर्ज्य आहे. पण नारायणरावांनी इतक्या चपखलपणे ही जागा घेतली आहे की क्या केहेने!! आता गाण्यामध्ये २+२=४ असं करणारी काही जन्मजांत क्लिष्ट मंडळी कपाळाला आठ्या घालतील! अहो पण बालगंधर्वांसारख्या, ज्याला खुद्द गाण्याचाच आत्मा गमला आहे त्याला मम आत्मा गमलातल्या बिहागात असं करायची मुभा आहे! असो.
"अब हू लालन मै का,
जुग बीत गये रे,
तुमरे मिलन को
जियरा तरसे रे.."
ही बिहागमधली पारंपारीक बंदीश आहे. फार सुरेख बंदीश आहे ही! येथे ऐका

"बोलीये सुरीली बोलीया,खठ्ठीमिठी आखो की रसिली बोलिया"
गृहप्रवेश या सिनेमातलं हे एक फार अप्रतीम गाणं आहे. यातला बिहाग फारच छान आहे. हे गाणं येथे ऐका

बिहागची नुसती सुरावट जरी कानी आली तरी मनुष्य लगेच फ्रेश होतो. शुध्द गंधाराची आणि षड्जाची अवरोही संगती, शुध्द मध्यमाची आणि मिंडेतल्या तीव्र मध्यमाची गंधार व पंचमामधली चाललेली लपाछपी, आश्वासक पंचम, सांभाळा हो, असं म्हणणारा शुध्द धैवत, सुरेखसं शृंगारीक अवरोही वळण असलेला शुध्द निषाद, आणि सगळे क्लायमॅक्स् उधळून लावणारा तार षड्ज! अरे यार काय सांगू बिहागची नशा!! मला तर आत्ता हे लिहितानांच खास खास मित्रमंडळी गोळा करून, झकासपैकी पान जमवून, तंबोऱ्याचा सुरेल जोडीच्या सानिध्यांत बिहाग गावासा वाटतोय! मनोगतींनो, येतांय का आत्ता माझ्या घरी? मस्तपैकी काहीतरी चमचमीत हादडू आणि सगळे मिळून बिहाग enjoy करू!!
असो, अजून काय नी किती लिहू बिहागबद्दल. मंडळी एकच सांगतो, हा राग माणसाला जिंदादिलीने जगायला शिकवतो. खरंच, आपलं गाणं खूप मोठं आहे. त्याची कास धरा! आत्तापर्यंतच्या माझ्या तोकड्या श्रवणभक्तीत मी अनेक दिग्गजांचा बिहाग अगदी मनापासून enjoy केला आहे. अजून खूप काही ऐकायचं आहे, शिकायचं आहे!

--तात्या अभ्यंकर.

2 comments:

शंतनु said...

तुम्ही म्हणता ते अगदी मनापासून पटलं. बिहाग राग हा हुबेहूब असाच आहे.
अवांतर- जसराजजींची "लट उलझी सुलझाऊ बालम" ही बंदीश ऐकायला मिळाली. त्याच्याच पाठोपाठ ’देखो मोरी रंगमें भिगोये डारी’ या आणखी द्रुतलयीतल्या बंदिशीने तर बिहागचं अंतरंगच दाखवलं. ’कुंवर श्याम’ ने केलेला नटखटपणा आणि राधेने (की कुठल्या गवळ्णीने) लटक्या रागाने दिलेली ’गारी’ आणि हे सगळं मांडताना जसराजजींनी केलेली ३ सप्तकातली सहल,चार षड्जांची केलेली चारधाम यात्रा, सगळंच सुरेख.

लेखमाला आवडली.
आपला,
पुष्कर (पुष्कराक्ष)

Anonymous said...

तुम्ही केलेलं बिहागचं वर्णन अगदी तंतोतंत आहे.
मागे एकदा जसराजजींची ’लट उलझी सुलझा’ ही बंदीश ऐकायला मिळाली. त्याचपाठोपाठ त्यांनी आणखी द्रुतलयीत ’देखो मोरी रंग में भिगोये डारी’ ही बंदीश सादर केली. त्यात तर त्यांनी बिहागचं अंतरंगच उलगडून दाखवलं. ’कुंवर श्याम’ने केलेला नटखटपणा, राधेने (की कुठल्या गवळणीने) लटक्या रागाने दिलेली ’गारी’,ह्या सगळ्याचं वर्णन करण्यासाठी जसराजजींनी ’तीन सप्तक यात्रा कंपनी बरोबर’ काढलेली सहल आणि चार षड्जांचं केलेलं चारधाम दर्शन.... सगळंच सुरेख.

आपली लेखमाला खूप आवडली.