August 26, 2006

बसंतचं लग्न..४ (मिया मल्हार)

नमस्कार मंडळी,
मी निघालो होतो बसंतच्या लग्नाला. इतर सर्व राग तर होतेच, पण आम्हा काही बसंतप्रेमी मंडळींना सुध्दा बसंतने आमंत्रण केलं होतं, म्हणून मीही चाललो होतो. चालतां चालतां दुपार झाली म्हणून एका गावांत भाजी भाकरी खाल्ली आणि तसांच पुढे निघालो. संध्याकाळपर्यंत तरी वऱ्हाडाच्या ठिकाणी पोचायचं होतं.
गावाबाहेर पडलो. पुढचा सगळा रस्ता मोकळ्या रानांतला, पायवाटेचा होता. दुपारचा दीड वाजला असेल. मस्त मोकळी राना-शेताडीची वाट. मी एकटाच. दूरदूर पर्यंत कोणी दिसत नव्हतं. वाराही सुटला होता, त्यामुळे वातावरणांत सुखद गारवा होता. मी माझ्याच तंद्रीत मस्त मजेत काहीबाही गुणगुणंत चाललो होतो.
पण हळुहळू अंधारून यायला लागलं. तेवढ्यांत जोराचं गडगडलं, आणि लखकंन वीज चमकली. आता मात्रं चांगलंच अंधारून आलं. सहज माझं लक्ष वरती आकाशाकडे गेलं. पाहतो तर काय, आकाशांत कृष्णमेघांची चांगलीच दाटिवाटी झाली होती. सूर्यमहाराज माझी साथ सोडुन केव्हांच त्या ढगाआड लपले होते. विजांचा चमचमाट आणि ढगांचं गडगडणं घाबरवायला लागलं. मगासच्या स्वच्छंदपणाच्या जागी थोडीशी भितीही वाटायला लागली. आणि नकळंत मला मंद्रसप्तकातले म प नि ध नी सा हे स्वर ऐकू यायला लागले!! सुरवातीचा गूढ कोमल निषांद आणि त्यानंतरचा शुध्द निषांद! मध्यातल्या कोमल गंधाराचा आणि शुध्द मध्यमाचा बेहलावा!! माझ्या मागून कोणतरी येतंय असं जाणवलं मला. तेवढ्यांत त्याने गाठलंच मला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला!! मंडळी, कोण होतं ते?ओहोहो, अहो तो तर मिया मल्हार!! त्या भरदुपारी अंधारल्या कुंद वातावरणांत मल्हारही निघाला होता बसंतच्या लग्नाला!!
मंडळी, काय लिहू मल्हारबद्दल? आपल्या रागसंगीतांतला विलक्षण ताकदीचा एक बलाढ्य राग! अंधारून येणं, सोबतीला कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट, वीजांचा चमचमाट, समोरचंही दिसू नये असा पाऊस, त्याचं ते रौद्र रूप हे सगळं मंद्र ते तार सप्तकातून दाखवण्याची ताकद मल्हारांत आहे. मंडळी, आपल्याला सृष्टीच्या सौंदर्याची अनोखी रुपं माहित आहेत. छान कोवळं ऊन, सुरेखसा गुलमोहर, स्वच्छ सुंदर हवा, पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे वगैरे. पण आमच्या मल्हारनी एकदा ताबा घेतला, की या सगळ्यांची छुट्टी!आहे की, मल्हारचंही सौंदर्य आहे, पण ते रौद्र आहे. ते झेलायला माणूसही तेवढांच Dashing पाहिजे. येरागबाळ्याचं काम नाही ते!! "कर तुला हवा तितका गडगडाट, पाड विजा, कोसळ रात्रंदिवस. मी enjoy करतोय" असं म्हणणारा कोणीतरी हवा!!
मंडळी, येथे मला आग्रा गायकीचे बुजुर्ग पं दिनकर कायकिणी यांची मिया मल्हारमधील एक बंदिश आठवते. बुवा "दिनकर" या नावांने बंदिशी लिहितांत आणि बांधतात. अहो हा मल्हार त्या प्रेयसीला तिच्या पियाकडे जाऊ देत नाहिये!! बघा दिनकररावांनी काय सुंदर बंदिश बांधली आहे..
कारी रे बदरिया,
दामनी दमकत चमकत.
धधक उठत जिया मोरा,
अंग थरथर कापे, कारी रे बदरिया....
घन गरजे, मेहा बरसे
पी मिलन नैना तरसे
जाउ अब कैसे दिनरंग कहो,
मोरा मन, धीरज, धर धर तापे, कारी रे बदरिया....
क्या बांत है!! मंडळी, आत्तापर्यंतच्या वाटचालीत मल्हार खूप अनुभवलाय मी. तो चाललेला असतो त्याच्या वाटेने, कोणाशी बोलंत नाही आणि दुसरं कोणी त्याच्याशी बोलण्याची हिम्मत करत नाही! छान रिमझीम पाऊस पडणे, त्यात मस्तपैकी भिजणे, छोट्या ओहोळांत कागदी बोटी सोडणे, आणि नंतर घरी येऊन गरमागरम कांदाभजी खाणे व वाफाळलेली कॉफी पिणे म्हणजे मल्हार नव्हे, एवढं लक्षांत घ्या.
"आकाशांत ढगांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू झाला होता" असं फार सुरेख वर्णन पुलंनी तुझं आहे तुजपाशी नाटकांत केलं आहे, तो खरा मल्हार!!!गौड मल्हार, शुध्द मल्हार, सूर मल्हार, मीरा मल्हार ही काही नातलंग मंडळी आहेत मिया मल्हारची. त्यांच्याशी मात्र थोडीफार दोस्ती करता येते. ही मात्र पाऊसाचे छान छान रंग दाखवतांत. आषाढांत आमचे मल्हारबा बरसून गेले की श्रावणांत हे नातलंग येऊन छानसं इंद्रधनुष्य पाडतांत!!
असो. मंडळी, मी मल्हारबद्दल कितीही लिहिलं आणि तुम्ही कितीही वाचलंत तरी आपण त्याचा lively अनुभव घ्यायला हवा, हेच खरं! मल्हार कोणी गावा? अरे क्या बात है, तो तर आमच्या भीमण्णांनीच गावा. मी मगाशी म्हटलं ना, येरागबाळ्याचं ते काम नाही. तिथे आमच्या भीमण्णांचाच बुलंद आणि धीरगंभीर आवाज हवा!!!
और राग सब बने बाराती,
दुल्हा राग बसंत!!

मंडळी, काय सांगू कौतुक त्या बसंतचे, त्याच्या लग्नाला आणि त्याला आशिर्वाद द्यायला आमचे मल्हार महाराजही निघाले आहेत! मला खात्री आहे, की लग्न मंडपात दाखल झाल्यावर भले भले आदबीने बाजुला होऊन आपल्या मल्हार महाराजांना सर्वांत पुढच्या सोफ्यावर बसवतील आणि आदरयुक्त भितीने चुपचाप बाजुला उभे राहतील!!!

--तात्या अभ्यंकर.

No comments: