August 26, 2006

बसंतचं लग्न..३ (भूप)

नमस्कार मंडळी,
तर आपण बसंतच्या लग्नाच्या वरातीबद्दल बोलत होतो. "दुल्हा" बसंत घोड्यावर बसला आहे, आणि इतर सगळे राग या वरातींत सहभागी झालेले आहेत. गेल्या लेखांत आपण त्या वरातीमधल्या यमन आणि यमनकल्याण या दोन रागांबद्दल बोललो.

आणखी कोण बरं आहे या वरातीमध्ये?(मध्ये= कर्टसी-वरदा!!;) अरे खरंच की, यमनच्या मागे तो कोण चाललांय? ओहोहो, अरे हा तर आपला भूप! भूप रागाबद्दल काय बोलायचं महाराजा? साक्षांत भूपच तो! तुम्हांला सांगतो मंडळी, अत्यंत गुणी स्वभावाचा राग आहे बरं का हा. गाणं शिकवतांना सुरवातीलाच यमन आणि भूप या सारखे राग शिकवले जातात. राग-संगीताच्या खजिन्याकडे वाटचाल करतांना प्रेमाने आपला हात धरतो तो भूप! भूपाचा हात धरूनच आपल्याला पुढे जायचं असतं. हा भूप आपली आयुष्यभर फार छान साथ करतो.

आपण पाहिलं की यमन प्रसन्न आणि हळवा आहे. पण भूपाचा मला सर्वांत प्रकर्षाने जाणवणारा स्वभाव म्हणजे हा अत्यंत "प्रेमळ"आहे! तुम्हांला सांगतो मंडळी, या आमच्या भूपासारखं प्रेमळ आणि कौतुक करणारं दुसरं कोणी नाही हो. तसा हा राग शृंगाररसप्रधानदेखिल आहे. एकूणच लडिवाळता हा याचा स्थायीभाव आहे.

बरं परत, ना हा कोणाच्या अध्यांत, ना मध्यांत. कुठे आदळआपट नाही, कुणाशी भांडण नाही, की कुणाशी स्पर्धा नाही. स्वतःच्याच पाच स्वरांच्या दुनियेंत हा मग्न असतो. आणि खरं सांगतो मंडळी, विलक्षण जादुई दुनिया आहे या भूपाची.

पटकन एक उदाहरण देऊ? बाबुजींनी बांधलेलं आणि लतादिदींनी गायलेलं भूपातलं "ज्योती कलश छलके" (चित्रपट-भाभी की चुडिया) हे गाणं ऐका. त्या गाण्याच्या अगदी सुरवातीलाच दिदींनी घेतलेली तान ऐका म्हणजे मी "विलक्षण जादुई दुनिया" हे शब्द का वापरले हे कळेल. आपण ते गाणं ऐकतांना बाबुजींना आणि दिदींना दाद देतो, आणि ती द्यायलाच पाहिजे. अहो पण मंडळी, त्यातली थोडीशी दाद आमच्या भूपालाही द्या की!! ;) "हुए गुलाबी, लाल सुनेहरे " ही ओळ ऐकतांना डोळ्यांत पाणी येतं हो! मी म्हटलं ना, की अत्यंत प्रमळ स्वभाव, तो हा!

मंडळी मला आठवतंय, मला दहावी ईयत्तेत सर्वसाधारणच मार्क मिळाले होते. पण दहावी पास झालो म्हटल्यांवर आमच्या आज्जीनी अत्यंत प्रेमळतेने स्वतःच्या हाताने केलेली बेसनाची वडी माझ्या हातावंर ठेवली होती!! भूप म्हणजे तरी दुसरं काय हो, त्या म्हाताऱ्या आज्जीनी केलेलं कौतुक आणि चारोळी घालून केलेल्या त्या बेसनाच्या वडीचा गोडवा!!

मंडळी, तुम्हांला अजून सोप्प करून सांगू का भूपाबद्दल? नारायणरांव बालगंधर्वांचं "सुजन कसा मन चोरी" हे स्वयंवरातलं पद ऐका. "सुजन कसा मन चोरी, अगं हा चोरी यदुकुलनंदन.."! भास्करबुवांनी "फुलबनं सेज बिछाई" या मूळ बंदिशीवरून हे पद बांधलं. भास्करबुवांसारख्या देवगंधर्वाची बांधणी, भूपासारखा राग आणि गाणांर साक्षात श्रीपाद नारायण राजहंस, अर्थांत नारायणराव बालगंधर्व!! मंडळी, श्रीमंती-श्रीमंती का काय ते म्हणतांत ना, ती हीच! दुसरं काही नाही!!

अजून काय बरं लिहू भूपाबद्दल? किशोरीताईंची भूपातली "सहेला रे, आ मिल गायेसप्तं सूरन के भेद सुनावे, सहेला रे..जनम जनम को संग ना भुले,अबके मिले सो, बिछूर न जाए, सहेला रे..

ही बंदिश ऐका. किशोरीताईंसारखी विलक्षण प्रतिभा लाभलेली गानसरस्वती आणि भूपाचा ऐसपैस कॅनव्हास!! अजून काय पाहिजे?
"स्वये श्री रामप्रभू ऐकती" हे गाणं ऐका. म्हणजे भूपाचा आवाका लक्षात येईल! "ज्योतीने तेजाची आरती" हे शब्द फक्त भूपातंच बसू शकतांत!

"सोडुन आसन उठले राघव,उठुन कवळीती आपुले शैशव,पुत्रभेटिचा घडे महोत्सव,परि तो उभयानच माहिती.."
मंडळी, हा तर भूपाचाच महोत्सव!! कोणाकोणाला दाद देणांर? महाकवी गदिमांना, बाबुजींना की भूपाला?

जाता जाता शेवटचं सांगतो. तुम्हाला सकाळी झोपेतून उठवतांना, "रे गधड्या उठ, उन्हं अंगावर आली", असं खेकसून उठवलेलं आवडेल की भूपातल्या "उठी लवकरी वनमाळी, उदयाचळी मित्र आला" हे आवडेल? तुम्हीच सांगा, आणि तुम्हीच ठरवा काय करायचं या भूपाचं ते! मी गेले २० वर्ष गाणं ऐकतोय, श्रवणभक्ति करतोय, पण अजूनही या भूपाचा ठांव मला लागलेला नाही आणि कधी लागणांर्ही नाही. आणि न लागलेलाच बरा!!

बेसनाची वडी देणारी आमची आज्जी नेहमी एक म्हण मला सांगायची, "तातोबा, माणसानं दिलेलं कधी पुरत नाही आणि देवानं दिलेलं कधी सरत नाही"!!!

--तात्या अभ्यंकर.

2 comments:

Arjun Deshpande said...

खूप छान - तात्या काका! :)

Satya said...

Apratim!