August 31, 2006

एका विद्वानाशी चर्चा..!

राम राम मंडळी,

एका विद्वानाशी झालेल्या चर्चेचा काही भाग येथे देत आहे. वाचा आणि सोडून द्या हो!
उगाच जास्त टेन्शन घेऊ नका! ;)

विद्वानाचं म्हणणं लाल अक्षरात, आपलं च्यामारी निळ्या!

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही.

अहो मालक, कुणी काय करवं हे लिहिणारे तुम्ही-आम्ही कोण? आणि मुळात तुमचा वर्णाश्रमच माझ्या मते फोल आहे.

वर्णाश्रमात व्याख्या केलेल्या ब्राह्मणाने मग आता काय करावे ह्याबद्दल कोणी लिहीत नाही. तो वर्ग (व्याख्येनुसार - रूढ अर्थानुसार नव्हे) आता लोप पावलेला आहे. आसारामबापू, मुरारीबापू, रमेशभाई ओझा, सुधांशु महाराज इ. इ. हे आता असणारे खरे ब्राह्मण.

खरे ब्राह्मण?? नाही, आपण म्हणता तर असतीलही हो ते खरे ब्राह्मण. पण आपण जी (ब्राह्मणांची!) चार नांवे लिहिली आहेत त्यापैकी दोन ब्राह्मण तर महाचालू आणि बाईलवेडे आहेत अशी खात्रीलायक बातमी मला आहे. मी नांवं कुणाचीच घेणार नाही. अर्थात असेनात का ते बाईलवेडे! अहो साक्षात तुमचा विश्वा जिथे मेनकेसमोर पाघळला तिथे इतरांचं काय? मेनका नाचायला लागल्यावर तुमच्या विश्वाने मनगटाला थुंकी लावत ध्यानधारणेला 'टाईमप्लीज' असं म्हटलंन आणि गेला फोकलिचा तिच्यामागे धावत.. ! :D

शूद्राची व्याख्या कशी करायची , आणि गवंडी (म्हणजे मिस्त्री नव्हे - मिस्त्री, सुतार, मेकॉनिक हे विशेष कला आवश्यक असणारे उद्योग आहेत, त्यासाठी काही वर्षेही घालवायवी लागतात ह्याची मला जाण आहे) वा पाट्या टाकणारे ह्यांना काय म्हणायचे ते सांगायची कोणी तसदी घेईल का ? का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो मालक, पण मला एक सांगा, मुळात कुणाची व्याख्या कराच कशाला? कुणाला काय म्हटलं पाहिजे आणि कुणाला काय नाही हा उद्योग पाहिजे कशाला? सगळी 'माणसं' आहेत एवढं पुरेसं नाही का?

का ते शूद्र नव्हेत आणि शास्त्रकारांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ज्यांना म्हटले तेही चूकच ?

अहो हे रांडेचे शास्त्रकारच तर सगळ्या आगी लावत आहेत. त्यांना नव्हता उद्योग, त्यामुळे बसले लिहीत लोकांना शहाणपणा शिकवत! शास्त्र सांगून वस्त्रात परसाकडला बसणारे ते शास्त्रकार!

कोण ब्राह्मण आहे, की क्षत्रिय आहे, की वैश्य आहे. की शूद्र आहे या गोष्टी कराच कशाला? कुणाचं काम काय, कुणाची व्याख्या काय करायची हे ठरवण्याचे अधिकार या शास्त्रकारांना जळ्ळे कुणी दिले?

असो, माझ्यापुरता हा चर्चाविषय मी थांबवत आहे.
मंडळी,
एकंदरीत अशी काहीशी झाली आमची चर्चा! नाही, माणूस तसा धर्मिक आणि विद्वानच हो. पण त्यांच्या विद्वत्तेची आमच्यासारख्या धर्मलंडांनी नोंद करायची ती कुठच्या खात्यावर?

असो...
चला मला आता मार्केटात जायचंय. चांगली सुरमई मिळते का ते बघतो. थोडीशी मांदेलीही घेईन म्हणतो. च्यामारी म्हावरं हल्ली लई महाग झालंय. सालं या कोळी लोकांच्यावर एकदा एखाद-दोन शास्त्रकारांना सोडले पाहिजेत. भीक नको पण धर्म आवर म्हणत सुतासारखे सरळ येतील! ;)
बराय तर मंडळी,

--तात्या.

August 29, 2006

दामू-गोविंदा जोड रे.. (पं गोविंदराव पटवर्धन.)

राम राम मंडळी,
१९९०/९१ चा सुमार असेल. मी तेव्हा मुंबईतल्या प्रभादेवी येथे एके ठिकाणी नोकरी करत होतो. शनिवारचा दिवस. संध्याकाळी कार्यालय सुटल्यावर दादरच्या फलाटावर ठाण्याच्या गाडीची वाट पहात उभा होतो. बघतो तर काय, माझ्या बाजुला गोविंदराव उभे. तेही गाडीची वाट पहात होते.

मंडळी गोविंदराव म्हणजे, नामवंत संवादिनीवादक पं गोविंदराव पटवर्धन. त्यांच्या अनेक मैफलीतला एक श्रोता या नात्याने त्यांचा माझा बऱ्यापैकी परिचय. माझा एक मित्र विघ्नेश जोशी हा त्यांचा शिष्य. विघ्नेशबरोबर एक-दोनदा मी त्यांच्या घरीही गेलो होतो.

मी फलाटावरच गोविंदरावांना वाकून नमस्कार केला.

"अरे तू इथे कुठे?"

"बुवा, इथेच प्रभादेवीला माझं कार्यालय आहे. ते संपून आता घरी चाललो आहे. आपण कुठे निघालात ?"

"अरे पद्माचं (सौ पद्मा तळवलकर) गाणं आहे डोंबिवलीला. साथीला मी आहे. गाणं रात्री नऊचं आहे. पण हॉल नवा आहे. रात्री अंधारात शोधाशोध कुठे करणार? अजून थोडा उजेड आहे म्हणून आत्ताच निघालो आहे."

"त्यात काय विशेष बुवा. मीही त्या गाण्याला जाणार आहे. मला हॉल ठाऊक आहे. मी आपल्याला तिथे व्यवस्थित घेऊन जाईन. आपण कृपया माझ्या घरी ठाण्याला जरा वेळ चलावं. मला खूप बरं वाटेल."
शेवटी हो, नाहीचे आढेवेढे घेत गोविंदराव वाटेत ठाण्याला जरा वेळ माझ्या घरी आले. माझ्याशी, माझ्या आईशी अगदी आपुलकीने भरपूर गप्पा मारल्या. माझ्याकडे असलेल्या पेटीवर माझ्या आग्रहाखातर सुरेखसं 'नाथ हा माझा' वाजवलं. आम्ही जेवलो, आणि एकत्रच कार्यक्रमाला निघालो.

पं गोविंदराव पटवर्धन!

संगीतक्षेत्रातला एक फार मोठा माणूस. मंडळी, या माणसाच्या बोटात जादू होती. गोविंदराव म्हणजे संवादिनी आणि संवादिनी म्हणजे गोविंदराव असं जणू समिकरणच झालेलं. अगदी लहानपणापासून, म्हणजे १२-१५ व्या वर्षीपासूनच गोविंदरावांनी संवादिनी वादनाला सुरवात केली. पण पेटीवादनाची कला त्यांच्यात उपजतच. पेटीवर त्यांची बोटं लीलया फिरायची. स्वरज्ञान उत्तम. गावात होणाऱ्या भजना-कीर्तनाच्या साथीला गोविंदराव हौसेखातर साथसंगत करू लागले. कधी पेटीवर, कधी पायपेटीवर, तर कधी ऑर्गनवर. गोविंदराव मूळचे कोकणातल्या गुहागर जवळील अडूर गावचे. लहानपणापासूनच ते गावतल्या त्यावेळच्या सांस्कृतीक वातावरणात रमले. गावात होणाऱ्या नाटकात हौसेखातर कामही करायचे. पण जीव मात्र पेटीतच रमलेला.

त्यानंतर गोविंदरावानी नोकरी धंद्याकरता मुंबई गाठली. मुंबईच्या पोलीस कमिशनरच्या हापिसात नोकरी आणि बिऱ्हाड गिरगावात. मंडळी, त्याकाळचं गिरगाव म्हणजे सदैव सुरू असलेली एक सांस्कृतीक चळवळच. कीर्तनं, नाटकं, गाणी यांची लयलूट. आणि इथेच गोविंदरावांतल्या कलाकाराला अगदी पोषक वातावरण मिळालं.

पं रामभाऊ मराठे, पं वसंतराव देशपांडे, आणि पं छोटा गंधर्व ही गोविंदरावांची श्रध्दास्थानं. या तिघांनाही गोविंदराव गुरूस्थानी मानत. तिघांच्याही शैलीतून गोविंदरावांनी खूप काही घेतलं.

एकंदरीतच 'गाणारा तो गुरू' असं गोविंदराव नेहमी म्हणत. म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या म्हणून साथीला ते बसत असत त्यालाच ते त्याक्षणी मनोमन गुरूस्थानी मानायचे. मग तो गायक लहान असो, कुणी नवशिका असो, की रामभाऊं, वसंतरावांसारखा कुणी दिग्गज असो!

मंडळी, गोविंदरावांची पेटीवरची साथसंगत हा फार मोठा आणि समस्त पेटीवादकांनी अभ्यास करावा असा विषय आहे. कीर्तनं, भजनं, नाट्यसंगीत, ख्याल यापैकी प्रत्येक गायन प्रकाराला ते तेवढीच समर्थ आणि अत्यंत रसाळ साथ करीत. गिरगावातल्या जयराम कानजी चाळीतल्या ट्रिनिटी क्लबात त्यावेळच्या बड्या बड्या गवयांचा सतत राबता आणि उठबस असे. पं रामभाऊ मराठे, पं सुरेश हळदणकर, पं कुमार गंधर्व यांसारख्या गवयांबरोबर गोविंदराव साथसंगत करू लागले.

त्यांच्या वादनाचा विशेष म्हणजे ज्या गायकाबरोबर साथसंगत करायची आहे त्याच्या शैलीचा त्यांचा अभ्यास असे. त्या शैलीतच त्यांचा हात फिरत असे. म्हणजे जेव्हा ते रामभाऊंबरोबर साथ करत तेव्हा ज्या आक्रमकतेने रामभाऊंच्या लयकारी, ताना चालायच्या, त्याच आक्रमकतेने गोविंदरावही जायचे. तेच आक्रमक गोविंदराव वसंतरावांबरोबर अगदी नटखट आणि नखरेल होत असत, तर तेच गोविंदराव छोटागंधर्वांसोबत वाजवताना फार लडीवाळ साथ करीत! मंडळी, माझ्या मते ही फार फार मोठी गोष्ट आहे.
गायक काय गातो आहे, कोणती सुरावट आहे, कोणता आलाप आहे, कोणती तान आहे हे ऐकून ते पुढच्याच क्षणी जसंच्या तसं हातातून वाजणं, या फार अवघड गोष्टीवर गोविंदरावांचं प्रभुत्व वादातीत होतं.

पं कुमार गंधर्व यांच्याबरोबरही गोविंदरावांनी खूप साथसंगत केली आहे. कुमारांच्या गाण्यात पेटीवादनाला तसा वाव कमी असे. ते बऱ्याचदा गोविंदरावांना नुसता षड्जच धरून ठेवायला सांगत असत. कुणीतरी एकदा सहज कुमारांना विचारलं, 'काय हो, नुसता सा धरायचा, तर त्याकरता तुम्हाला गोविंदरावच कशाला हवेत?' यावर कुमारांनी उत्तर दिलं होतं, 'अरे, आमचा गोविंदा नुसता 'सा' जसा धरतो ना, तसा 'सा' देखील कोणाला धरता येत नाही हो.'! जाणकारानी यातून काय तो अर्थ काढावा.

कुमारांचा गोविंदरावांवर फार जीव! मस्त काळी सातारी तंबाखू आणि चुना यावर दोघांचंही प्रेम. मूड लागला की कुमार गंमतीत म्हणायचे, 'अरे सुदाम्या, जरा तुझे दही-पोहे काढ पाहू'! :) कुमारांची ही एक मजेशीर आठवण मला गोविंदरावांनी सांगितली होती.

नाट्यसंगीताच्या क्षेत्रात एक ऑर्गनवादक म्हणून गोविंदरावांची कामगिरी ही अक्षरशः आभाळाएवढी मोठी आहे. अनेक संगीतनाटकं आणि त्याचे अक्षरशः हजारांनी प्रयोग गोविंदरावांनी ऑर्गनवर वाजवले आहेत. अहो, त्या नाटकातल्या पदांसकट अक्षरशः संपूर्ण नाटकं गोविंदरावांची पाठ झाली होती. रात्री उशिरापर्यंत चालणारे संगीतनाटकांचे प्रयोग, त्यानंतर दिवसभर ऑफीस, घरी येऊन जेवले की चालले पुन्हा प्रयोगाला साथ करायला. हे अक्षरशः वर्षानुवर्ष अव्ह्याहतपणे सुरू होतं!

बोलायचे अगदी कमी. पण अत्यंत विनम्र आणि मृदुभाषी. त्यांना स्वतःला कुणी 'गोविंदराव' म्हटलेलं आवडत नसे. ते नेहमी सांगायचे, 'अरे मला गोविंदा पटवर्धन पेटीवाला' एवढंच म्हणा. त्यांच्या मते गोविंद या नांवानंतर 'राव' हे बिरुद लावावं अशी एकच व्यक्ती होती. ती म्हणजे पं गोविंदराव टेंबे!

मंडळी, नाट्यसंगीताला साथसंगत करणं हे खरं तर महामुष्कील काम आहे. नाटक सुरू असताना खालून ऑर्गनवर साथ करणाऱ्या गोविंदरावांचं नाटकातल्या संवादांकडे फार बारकाईने लक्ष असे. जिथे संवाद संपून पद सुरू होणार त्याच क्षणी खालून ऑर्गनवाल्याने नेमका स्वर रंगमंचावरच्या गायकनटाला दिलाच पाहिजे. हे टायमिंग फार महत्वाचं आहे. नाटकातलं पद सुरू होण्याच्या अगदी बरोब्बर वेळेला तिथे गोविंदरावांनी ऑर्गनवर अगदी भरजरी स्वर दिलाच म्हणून समजा. आहाहा! ऑर्गनच्या स्वरांचा भरणा द्यावा तर गोविंदरावांनीच. नाटकातील पदं वाजवताना गोविंदरावांच्या वादनातून पदांतील शब्द तर वाजायचेच, अहो पण ऱ्ह्स्व-दीर्घ, जोडाक्षरंदेखील जशीच्या तशी वाजायची, असं पं सुरेश हळदणकरांसारखे जाणकार सांगतात तेव्हा या माणसापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही.
उदाहरणार्थ, 'सुजन कसा मन चोरी' हे पद जेव्हा गोविंदरावांच्या हातून वाजायचं तेव्हा सुजनतला 'सु' हा ऱ्ह्स्वच वाजायचा, किंवा 'स्वकुल तारक सुता' मधलं स्व हे जोडाक्षर वाजवताना त्यांचा हात पेटीवर अश्या रितीने पडायचा की स्वकुल तारक सुता असंच ऐकू यायचं. ते कधीही सकुल तारक असं वाजलं नाही!!
गोविंदरावांकडून पेटीवर नाट्यपदं ऐकणं हादेखील एक गायनानुभव असे हो! फार मोठा माणूस.. अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत. गोविंदरावांचा साठीचा सत्कार सोहळा फार सुरेख झाला होता. त्यात गोविंदराव आणि भाईकाका या दोघांची हार्मोनियमवादनाची जुगलबंदी होती. तेव्हा सुरवातीलाच भाईकाकांनी असं म्हटलं होतं की आज गोविंदाबरोबर वाजवायचंय ह्या जाणिवेने माझ्या पोटात नाही तरी बोटात गोळा आलाय!"
"पोलीस खात्यात इतके वर्ष काम करून इतका साफ हात असलेला दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही!" इति भाईकाका!

साहित्य संघातली एक घटना जिला ऐतिहासिक मोल आहे. पं सुरेश हळदणकरांचं 'श्रीरंगा कमलाकांता' सुरू होतं. हळदणकरबुवा नेहमी सारखेच रंगले होते. अप्रतीमच गायचे बुवा. काय आवाज, आणि काय गाण्यातली तडफ! अक्षरशः तोड नाही. साथीला गोविंदराव होते. तबल्याच्या साथीला दामुअण्णा पार्सेकर होते. तेही रंगून वाजवत होते. त्यादिवशी एकंदरीत 'श्रीरंगा कमलाकांता' अफाटच जमलं होतं. आणि विशेष म्हणजे हळदणकरबुवांच्या तोडीस तोड गोविंदरावही तेवढेच रंगून वाजवत होते. हळदणकरबुवांची प्रत्येक जागा, प्रत्येक हरकत अशी काही सही सही वाजत होती की खुद्द बुवाच आश्चर्यचकीत झाले. मंडळी त्या मूळ पदात शेवटी 'धोडो-सदाशिव जोड रे' अशी ओळ होती, तिथे ऐनवेळेला हळदणकरबुवांनी भारावून जाऊन 'दामू-गोविंदा जोड रे' असा बदल केला आणि सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. श्रीरंगा कमलाकांता या फार सुरेख पदात गोविंदरावांना अढळ स्थान मिळालं!

साल १९९६. (चूभूद्याघ्या). सकाळी ७ वाजता विघ्नेशचा फोन आला, "तात्या, गोविंदराव गेले."
मी शिवाजीपार्कची स्मशानभूमी गाठली. तयारी सुरू होती. अनेक कलावंत अंतयात्रेकरता जमले होते. गोविंदराव शांतपणे निजले होते. बाजुलाच हळदणकरबुवा सुन्नपणे उभे होते. एका क्षणी त्यांचा बांध फुटला आणि ते रडत रडत म्हणाले "माझ्या 'दामू-गोविंदा जोड रे' मधला गोविंदा गेला हो...."
--तात्या अभ्यंकर.

पं भाई गायतोंडे...

राम राम मंडळी,
पं भाई गायतोंडे! राहणारे आमच्या ठाण्यातलेच. संगीत क्षेत्रातलं एक मोठं नांव. त्यांचं खरं नांव सुरेश. 'भाई' हे त्यांचं टोपणनाव. सर्वजण त्यांना याच नांवाने ओळखतात. त्यांचा माझा खूप चांगला परिचय हे माझं भाग्य! त्यांना मी माझ्या गुरूस्थानी मानतो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, अजूनही बरंच काही शिकायचं आहे. मंडळी, भाईंबद्दल विचार करायला लागलो की किती लिहू आणि किती नाही असं होतं!

भाईंची तबला क्षेत्रातली कारकीर्द पाहिली की मन थक्क होतं. भाई मूळचे कोकणातले. कणकवली/कुडाळ भागातले. भाईंचे वडील व्यवसायाने डॉक्टर. त्याकाळी त्या लहानश्या गावातच त्यांची डॉक्टरकी चालायची. डॉक्टर स्वतः उत्तम पेटी वाजवायचे, गाण्याला साथसंगतही करायचे. त्यामुळे संगीताची आवड भाईंच्या घरातच होती. हौस म्हणून लहानश्या सुरेशनेही तबला शिकण्यास सुरवात केली.

त्यानंतर शिक्षणाकरता, आणि नोकरी-धंद्याकरता भाई कोल्हापुरात दाखल झाले. इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा अभ्यास त्यांनी कोल्हापुरातच केला. पण मन एकीकडे संगीतात, तबल्यात गुंतलं होतं. त्याला भरपूर खाद्य मिळालं ते कोल्हापुरातल्या देवल क्लबमध्ये. देवल क्लबात अनेक दिग्गजांची नेहमी गाणी-वाजवणी व्हायची. भाईंमधला गुणी विद्यार्थी ते सगळं टिपू लागला. भाईंची आणि भीमण्णांची प्रथम भेट कोल्हापुरातच झाली. एकीकडे तबल्याचा रियाज सुरू होताच. ऐकणं-वाजवणंही सुरू होतं. तरीदेखील कशाची तरी कमतरता होती. काहीतरी अजून हवं होतं! मंडळी, ती कमी होती एका चांगल्या गुरुची. कारण अजून खूप काही शिकायचं होतं/शिकायला हवं होतं. पण कोणाकडे?

आणि अशातच एक दिवस जगन्नाथबुवा पुरोहित हे भाईंना गुरू म्हणून लाभले. हिऱ्यालादेखील पैलू पाडणारा कोणीतरी लागतो! तो भाईंना जगन्नाथबुवांच्या रूपाने मिळाला. जगन्नाथबुवा तेव्हा कोल्हापुरातच होते. संगीतक्षेत्रात तेव्हा बुवांचा विलक्षण दबदबा होता. आग्र्याची घराणेदार गायकी, आणि तबला या दोन्ही क्षेत्रात बुवांचा अधिकार. लोक अंमळ वचकूनच असत बुवांना. अशातच एके दिवशी भाई गुरूगृही पोहोचले आणि तबला शिकायची इच्छा व्यक्त केली. बुवांनीही शिकवण्याचे मान्य केले.

आणि आपल्या 'गुरू-शिष्य' या वैभवशाली परंपरेनुसार रीतसर तालीम सुरू झाली. रियाज सुरू झाला. तबल्यातील मुळाक्षरांचा रियाज! अगदी चार चार, सहा सहा तास हा रियाज चाले. जगन्नाथबुवा समोर बसून शिकवत, आणि खडा रियाज करून घेत. तबल्यातील अक्षरांच्या निकासावर बुवांचा जबरदस्त भर असे. कायदे, गती नंतर! आधी अक्षरं! अक्षरं नीट वाजलीच पाहिजेत, दुगल असो की चौगल असो की आठपट असो. कुठल्याही लयीत तेवढ्याच सफाईने अक्षरांचा निकास झाला पाहिजे. शिकवणीबरोबरच बुवांनी स्वतः समोर बसून हा रियाज भाईंकडून करून घेतला हे बुवांचे डोंगराएवढे उपकार मानताना आजही भाईंचे डोळे पाणावतात! ८ ते ९, ९ ते १० असा गाण्याचा क्लास नव्हता तो. बुवा सांगतील तेवढा वेळ रियाज करावा लागे. कुठलंही क्रमिक पुस्तक भाईंच्या हाताशी नव्हतं. बुवांचा करडा चेहरा हेच क्रमिक पुस्तक! शिष्याचं कौतुक वगैरे करणे हा प्रकार तर बिचाऱ्या जगन्नाथबुवांना माहीतही नव्हता. कितीही जीव तोडून वाजवा, बुवा साधं 'ठीक!' एवढंही म्हणत नसत! पण बुवा आमच्या कोकणातल्या फणसासारखे होते. आतून अतिशय प्रेमळ आणि गऱ्यासारखे गोड आणि बाहेरून काटेरी.

उस्ताद अहमदजान थिरखवाखासाहेब यांचीही भाईंना फार उत्तम तालीम मिळाली. खासाहेबांकडून भाईंनी काय नी किती घेतलं याची काही गणतीच नाही. पण थिरखवासाहेबाचं आणि जगन्नाथबुवांचं नेमकं उलटं होतं. बुवा स्वतः लक्ष घालून तासंतास शिकवीत तसे खासाहेब शिकवत नसत. 'मी वाजवतोय. त्यातून तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या! जमलं तर ठीक, नाहीतर सोडून द्या!' अशीच खासाहेबांची भूमिका असे! पण भाईंनी अक्षरशः एखाद्या टीपकागदाने टिपाव्यात तश्या तबल्यातील बंदिशी, त्यातील सौंदर्यस्थळं टिपली. खासाहेबांचीही हळूहळू भाईंवर मर्जी बसू लागली. पेणचे पं विनायकबुवा घांग्रेकर यांच्याकडे भाई केवळ झपतालातल्या खासियती शिकण्याकरता गेले आणि तिथे झपतालाचे धडे गिरवले, तालीम घेतली.
हे सगळं करताना भाईंना विशेष अडचण वाटली नाही. कारण हात तयार होता. जगन्नाथबुवांकडे तासंतास केलेल्या अक्षरांच्या रियाजाचं हे फळ होतं! कुठलीही नवी बंदिश ऐकली की ती तशीच्या तशी त्यांच्या हातातून अगदी सहजपणे आणि तेवढ्याच सुंदरतेने वाजू लागली.

एक शिष्य घडत होता, गुरू-शिष्य परंपरा धन्य होत होती!
"आज आमच्या भाईंनी इतकं सुरेख वाजवलंय की 'घरी गेल्यावर भाईची नको, पण त्याच्या हातांची एकदा दृष्ट काढून टाका!' असं मी वहिनींना सांगणार आहे."!

वरील उद्गार कविवर्य विंदा करंदीकर यांचे आहेत. प्रसंग होता वांद्रे येथील कलामंदीरात झालेला भाईंच्या एकल-तबलावादनाच्या (तबला-सोलो) कार्यक्रमाचा. विंदा आणि भाईंची चांगली मैत्री. त्यांनीही पं विनायकबुवा घांग्रेकरांकडून काही काळ तबल्याचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना तबल्यातली उत्तम जाण आहे. विंदा राहतातही साहित्य-सहवासात. त्याच्या बाजूलाच कलामंदीर. त्यामुळे ते आवर्जून भाईंच्या कार्यक्रमाला आले होते. त्या कार्यक्रमाला माझ्या सुदैवाने मीही हजर होतो आणि भाईंच्या मागे तानपुऱ्याला बसलो होतो. त्यादिवशी भाईंनी झपताल इतका अप्रतिम वाजवला की कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यात बसलेले विंदा न राहून उठले आणि रंगमंचावर येऊन बोलू लागले. त्यादिवशी विंदा भाईंबद्दल खूप भरभरून बोलले. अगदी कोल्हापुरापासूनच्या आठवणी निघाल्या. विंदाही काही काळ कोल्हापुरात होते. बरं का मंडळी, करवीर ही केवळ चित्रनगरी नव्हती, तर देवलक्लबमुळे ती काही काळ संगीतनगरीही झाली होती! (मिसळनगरी तर ती आहेच!:)

गाण्याला साथसंगत तर भाई उत्तम करतातच, त्याशिवाय एकल तबलावादन हा तर भाईंचा हातखंडा आणि जिव्हाळ्याचा विषय.

साथसंगत करताना तबलावादकाला नुसता तबला येऊन चालत नाही, तर त्याला गाण्याचीही उत्तम जाण असावी लागते. शिवाय ज्याच्या गाण्याला साथ करायची आहे त्या गवयाच्या गायकीची, त्याच्या घराण्याची तबलजीला थोडीफार तरी माहिती असावी लागते. साथसंगतीचा तबला वाजवताना भाईंनी या सगळ्यावर अगदी बारकाईने विचार केला आहे. आपण कोणाला साथ करतो आहोत? त्याचं गाणं कसं आहे? किराण्याच्या संथ आलापीचं आहे, की ग्वाल्हेर अंगाचं तालाशी खेळणारं आहे, की जयपूरची लयप्रधान गायकी आहे, की बोलबनाव करत बंदिशीच्या अंगाने जाणारी आग्रा घराण्याची गायकी आहे? या सगळ्याचा विचार तबलजीच्या साथीत दिसला पाहिजे आणि त्या अंगानेच त्याची साथ झाली पाहिजे. तरच ते गाणं अधिक रंगतं. भाईंनी आजतागायत अनेक मोठमोठ्या गवयांना साथ केली आहे. यात पं रामभाऊ मराठे, पं कुमार गंधर्व, पं यशवंतबुवा जोशी यांची नावं तर अगदी आवर्जून घ्यावी लागतील.

एकदा एका मैफलीत ग्वाल्हेर घराण्याचे पं शरदचंद्र आरोलकर यांच्याबरोबर भाईंना साथ करायची होती. तस पाहता भाईंना गाण्यातलं ग्वाल्हेर अंग चांगलंच परिचयाचं होतं. पण मंडळी, ग्वाल्हेरातदेखील दोन पाती आहेत. एक विष्णू दिगंबरांचं आणि एक कृष्णराव शंकर पंडितांचं. (तज्ज्ञांनी अधिक खुलासा करावा.) तर काय सांगत होतो? आरोलकरबुवा दुसऱ्या पातीचे! (सध्या अधिक तपशिलात शिरत नाही.)
बरं का मंडळी, ग्वाल्हेरवाला गवई पटकन हमीर गातो असं म्हणणार नाही. तो म्हणणार, चला जरा झुमरा गाऊया आणि झुमऱ्यातलं 'चमेली फुली चंपा' सुरू करणार. तेच आग्रावाला म्हणणार 'चलो, जरा 'चमेली फुली चंपा' गायेंगे!' तोही 'हमीर' गातो असं म्हणणार नाही. वर 'हम राग नही गाते, हम बंदिश गाते है!' असंही म्हणणार :) याउलट आमचे किराण्याचे अण्णा 'ग म (नी)ध नी‌.ऽ प अशी अत्यंत सुरेल आलापी करून एका क्षणात हमिराचं फार मोहक दर्शन घडवणार! प्रत्येक घराण्याची वेगळी खासियत! असो..
तर कुठे होतो आपण मंडळी? हां, तर आरोलकरबुवांची मैफल होती. आपल्याला त्यांच्याबरोबर वाजवायचं आहे, ते वादन नीट त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे ही भाईंची भावना. भाई कलेशी इतके प्रामाणिक, की आदल्या दिवशी चक्क आरोलकरांच्या घरी गेले आणि म्हणाले, "बुवा, उद्या आपल्याबरोबर वाजवायचंय. आत्ता बसूया का जरा वेळ? आपल्याला काय हवं नको ते सांगा"!

मला सांगा मंडळी, आज किती लोकांजवळ हा गूण आहे? तसे भाईही साथसंगतीत तयार होतेच की. तशीच जर वेळ आली असती तर ऐनवेळेला प्रत्यक्ष मैफलीतही त्यांनी आरोलकरबुवांना अगदी उत्तमच साथसंगत केलीच असती की! मग अशी काय मोठी गरज होती की ते आरोलकरबुवांच्या घरी गेले?
मंडळी, मला वाटतं इथेच भाईंची संगीतकलेविषयीची तळमळ दिसते!
धीऽ क्ड्धींता तीत् धागे धीं....

सभागृह श्रोत्यांनी भरलं होतं. भाईंच्या एकल वादनाचा (तबला-सोलो) कार्यक्रम सुरू झाला आणि भाईंनी वरील पेशकार सुरू केला. आहाहा, मंडळी काय सांगू तुम्हाला!

या भागात आपण एक एकल तबलावादक म्हणून भाई कसे आहेत हे पाहणार आहोत. एकल तबलावादनात भाईंचं नांव विशेषत्वाने घेतलं जातं. भीमण्णा जसे यमन गाताना त्याच्या ख्यालातून तो राग फार सुंदरपणे दाखवतात, त्यांचे विचार मांडतात, तसंच आहे एकल तबलावादनाचं. एकल तबलावादनात एखाद्या कलाकाराचा तबल्यातील विचार दिसतो. त्याची दृष्टी कशी आहे हेही कळतं. हाताची तयारी दिसते. लयीवरचं प्रभुत्व दिसतं.

आयुष्यभर तबल्यावर केलेला विचार, चिंतन, आणि रियाज ह्या सगळ्या गोष्टी भाईंच्या एकल तबला वादनातून अगदी पुरेपूर दिसतात. मंडळी, भाईंचं एकल तबलावादन ऐकायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. अक्षरशः एखादा यज्ञ सुरू आहे असं वाटतं. नादब्रह्मच ते! अहो वर उल्लेखलेला पेशकार नुसता सुरू झाला तरी सभागृह भारून जातं. एखादा सार्वभौम राजा सोन्याची अंबारी असलेल्या हत्तीवर बसून जात आहे आणि दुतर्फा माणिकमोती उधळत आहे असं भाईंचा पेशकार सुरू झाला की वाटतं!
धींऽ धाऽग्ड् धा तत् धाऽग्ड्धातीं ताक्ड् ता तत् धाग्ड्धा

ओहोहो, मंडळी हाही एक पेशकाराचाच प्रकार. हा प्रकार थिरखवाखासाहेबांनी बांधला आहे. हा खेमट्या अंगाचा पेशकार. तसं म्हटलं तर खेमटा हा लोकसंगीतातीलच एक तालप्रकार. यावरूनच हा पेशकार खासाहेबांनी बांधला आहे. आपल्या रागसंगीताचं, शास्त्रीय संगीताचं कुठेतरी आपलं लोकसंगीत हेच मूळ आहे असं म्हणतात ते पटतं! हा पेशकार जेव्हा भाईंच्या हातातून वाजू लागतो तेव्हा सभागृह अक्षरशः डोलू लागतं. काय हाताचं वजन, दाह्याबाह्याचं किती सुरेख बॅलंसींग़! दादऱ्या अंगाचा रेला हा तर केवळ भाईंनीच वाजवावा! रेला वाजवताना लयीवरचं आणि अक्षराच्या निकासावरचं त्यांचं प्रभुत्व पाहिलं की थक्क व्हायला होतं. भाईंची पढंतही अत्यंत रंजक आणि नाट्यपूर्ण असते. अगदी ऐकत राहावीशी वाटते. अहो तबल्यावरचे हातदेखील अगदी देखणे दिसले पाहिजेत असं भाई म्हणतात.

मंडळी, भाईंनी नेहमी वेगवेगळ्या गतींना, बंदिशींना एक काव्य मानलं. 'ही बंदिश बघ, ही गत बघ. अरे यार सुरेख कविता आहे रे ही" असं भाई म्हणतात. आणि खरंच मंडळी, आज अशी अनेक काव्य भाईंच्या हातात सुरक्षित आहेत. नव्हे, ती त्यांनी आयुष्यभर जपली आहेत.

आपल्या गुरुंव्यतिरिक्त, घराण्याव्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गजांचा आणि घराण्यांचा भाईंचा अभ्यास आहे. आमिरहुसेनखासाहेबांकडे भाई कधी शिकले नाहीत, पण खासाहेबांचा भाईंवर फार जीव! अल्लारखासाहेबांचं भाईंवर अतिशय प्रेम होतं. भाईकाकांनी, कुमारांनी भाईंच्या तबल्यावर मनापासून प्रेम केलं. आज उ झाकीर हुसेन, पं सुरेशदादा तळवलकर, पं विभव नागेशकर, यांच्यासारखी दिग्गज मंडळी भाईंना खूप मानतात.
अर्जुन शेजवलांसारखे अत्यंत थोर पखवाजिया भाईंचा फार आदर करीत. अलीकडच्या पिढीतले ओंकार गुलवडी, योगेश समसी यांच्यासारखे गुणी तबलजी भाईंकडे एक आदर्श म्हणून पाहतात. याचं कारण एकच. ते म्हणजे भाईंचा रियाज आणि तबल्यावरचा विचार. काय नी किती लिहू भाईंबद्दल!

मंडळी, आमचे भाई स्वभावानेही अगदी साधे, निगर्वी आणि प्रसिध्दीपऱमुख आहेत. आमच्या उषाकाकूही अगदी साध्या आहेत. भाईंचे चिरंजीव डॉ दिलिप गायतोंडे हे ठाण्यातले एक यशस्वी नेत्रशल्यविशारद आहेत. तेही फार छान पेटी वाजवतात. त्यांनी पं बाबुराव पेंढारकरांकडे पेटीची रीतसर तालीम घेतली आहे.
आजही काही अडलं की कोणीही भाईंकडे जावं. ती व्यक्ती विन्मुख परत येणं शक्य नाही. गेली अनेक वर्ष भाई तबल्याची विद्या सर्व शिष्यांना मुक्तहस्ते वाटत आहेत. ते नेहमी सर्वांना सांगतात, "बाबानो माझ्याकडे जे काय आहे ते मी द्यायला, वाटायला तयार आहे. तुम्ही या आणि घ्या!" अगदी भाई स्वतःदेखील आत्ता आत्ता पर्यंत पुण्याच्या पं लालजी गोखल्यांकडे मार्गदर्शनाकरता जायचे. लालजी आता नाहीत.

वयाच्या पंचाहत्तरीतदेखील भाईंचा स्टॅमिना आणि उत्साह वाखाणण्याजोगा आहे. आजपर्यंत भारतभर तबल्याच्या अनेक शिबिरांत, प्रात्यक्षिक-व्याख्यानासारख्या कार्यक्रमांत भाईंनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. आपले विचार लोकांना ऐकवले आहेत. काही काही वेळेला जोडून सुट्टी वगैरे आली की सर्व शिष्यांना घेऊन भाई बाहेरगावी जातात. तिथे त्यांच्याकडून ३-३ दिवस रियाज करून घेतात. जगन्नाथबुवांनी भाईंकडून असाच रियाज करून घेतला होता. भाई आज तेच करत आहेत. गुरू शिष्य परंपरा!!
मला माझ्या सुदैवाने भाईंचं खूप प्रेम मिळालं. गाण्यातल्या, तबल्यातल्या अनेक गोष्टींवर भाई माझ्याशी अगदी भरभरून बोलले आहेत. कधीही भेटलो की कौतुकाने "काय तात्या, काय म्हणतोस" असं विचारणार. मग मी हळूच त्यांचं पान त्यांना देणार. मग मला म्हणणार "क्या बात है! आणलंस का पान! अरे पण तंबाखू फार नाही ना घातलास?:)

त्यांच्या एकलतबलावादनात त्यांच्या मागे मी अनेकदा तंबोऱ्याला बसलो आहे. तंबोरा छान लागला की लगेच "क्या बात है" असं म्हणून कौतुक करणार! इतक्या मोठ्या मनाचे आहेत आमचे भाई. ठाण्यात माझा एक बंदिशींचा कार्यक्रम झाला होता. त्याला ते आवर्जून आले होते. "चांगल्या बांधल्या आहेस बंदिशी" असं कौतुक केलं आणि पाठीवरून हात फिरवला. "नेह