August 30, 2010

बेहती हवा सा था वो..


बेहती हवा सा था वो...(येथे ऐका..)

३ इडियटस् चित्रपटातलं हे अप्रतिम गाणं. एका हरवलेल्या मित्राबद्दलचं हे मनोगत.. 

विशुद्ध, निरपेक्ष मैत्रीसारखं या दुनियेत दुसरं काही नाही. महाविद्यालयीन दिवसातली मैत्री.. सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळची..

कोण आहे हा मित्र? कोण आहे हा मनाला कायमची रुखरुख लावून गेलेला..? कोण आहे हा दोस्तीचा प्रसन्न शिडकावा करून गेलेला? कसा आहे तो? कसा होता तो?
मंद-मोकळ्या झुळुकेसारखा..वा-याची एक झुळूक. जी फक्त सुख आणि सुखच घालते आपल्या पदरात..! अगदी सहज कुठेही स्वच्छंदपणे हेलकावणा-या पतंगासारखा..! स्वत:च स्वत:ची वाट शोधणारा.. वेळप्रसंगी धडपडणारा पण सावरून पुन्हा आपल्याच मस्तीत मार्गक्रमणा करणारा..! आताचा क्षणच काय तो महत्वाचा, उद्याचं माहीत नाही असं म्हणून मस्त मजेत जगणारा..!

कहा से आया था वो?
छुके हमारे दिलको
कहा गया उसे ढुंडो..!


कुठून आला माहीत नाही... पण जीव लावून गेला.. आता शोधायला हवा त्याला..!
हास्य
तळपत्या उन्हातल्या एखाद्या शांत सावलीसारखा होता तो.. दूरदूरपर्यंत पसरलेल्या वैराण वाळवंटात एखादं गाव लागावं त्या गावासारखा आश्वासक होता तो..

आम्ही तसे थोडेसे कुपमंडूकच.. थोडेसे घाबरलेले, थोडेसे बावरलेले.. पण तो तसा नव्हता. तो वेळप्रसंगी गोते खायचा, पण आमच्या सारखा लहानश्या बावडीत नव्हे, तर नदीच्या अथांग पात्रात.. आणि गोते खाऊनदेखील पुन्हा प्रवाहाविरुद्ध पोहणारा..!

विंदांनी 'वेड्यापिश्या ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावे..' असं म्हटलंय.. तो अगदी तसाच होता.. आमचा होता तो.. अगदी खूप आमचा..! त्याला शोधायला हवा..!

मंडळी, खूप जीव लावणारं गाणं आहे हे.. अगदी हळवं करणारं...

आमिरखानचं, शरमन जोशीचं, मॅन्डी माधवनचं, बोमनचं... सा-यांचंच खूप खूप कौतुक करावसं वाटतं..

आणि अर्थातच.. राजू हिरानीचं..!

प्रिय राजू हिरानी, 

अरे 'हृषिदा' नावाचा एक खूप मोठा माणूस होऊन गेला, तू वावरतोस त्या चित्रसृष्टीत.. !
तुझ्याकडूनही फार अपेक्षा आहेत रे.. हृषिदांनी जसा आम्हाला निखळ आनंद दिला तसाच तू ही द्यावास इतकंच वाटतं रे..!

- तात्या अभ्यंकर.

August 28, 2010

ननदीके बचनवा..

I स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

'ननदीके बचनवा..'

यमन रागातली ग्वाल्हेर परंपरेची ही सुरेख बंदिश येथे ऐका.. शशांक मक्तेदारने गायली आहे.

'छे बाई... या नणंदेचे बोल काही सहन होत नाहीत हो आता... काय करणार?, आमच्या खाष्ट सासूबाईंची लाडकी लेक ना! जळ्ळी मेली..! आईचे संस्कार अगदी पुरेपूर उतरलेत हो लेकीमध्ये. त्याच मेलीची फूस आहे हिला.!' हास्य

'आपण आपलं 'वन्स' वन्स' म्हणून कौतुक करायला जावं तर जास्तच शेफारते ही.. चारचौघात अगदी घालूनपाडून बोलण्याची एकही संधी सोडत नाही हो..!' हास्य

'पण काय करणार बाई.. इकडूनही तिला काही सांगणं होत नाही.. लाडकी बहीण ना? आपलंच नाणं खोटं त्याला काय करायचं..?' हास्य

मंडळी, ही तक्रार आहे, एक स्वगत आहे नव्यानवर्‍या सुनबाईंचं..

'ननदीके बचनवा सहे न जात
सोच सोच कछु ना जाए हमसो
उमग उमग असूवन बरसत नीर..'


किती सुरेख बंदिश आहे ही! आपल्या हिंदुस्थानी संगीतातली ग्वाल्हेर परंपरा.. आमच्या अन्तुबुवांची, गजाननबुवांची, मधुबुवांची, उल्हासकाकांची ग्वाल्हेर परंपरा..!

यमनसारखा प्रसन्न राग.. ही बंदिश म्हणजे यमनातली एक सुरेख रांगोळी!

आमच्या अन्तुबुवा जोशींची ही बंदिश.. तिथून त्यांचे चिरंजिव पं गजाननबुवा जोशी, गजाननबुवांकडून त्यांचे शिष्योत्तम पं उल्हास कशाळकर आणि तिथून उल्हासकाकांचा शिष्य शशांक मक्तेदार.. असा हा या बंदिशीचा प्रवास.. याला म्हणतात घराण्याची परपरा... अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीची परंपरा..! याला म्हणतात गुरुशिष्य परंपरा..!

त्रितालातली ही बंदिश.. तशी ऑड असलेली चवथ्या मात्रेपासूनची तिची उठवण..'सहे न जात..' ची गंधारावरची सुरेख सम..'उमग उमग असूवन बरसत नीर..' क्या बात है.. हे शब्द किती सुरेख पडलेत पाहा.. किती सुंदर बांधलेत पाहा..!

अंतराही अगदी तितकाच सुंदर..

'एक तो बैरन मोरी सास-ननदीया
दोरनिया, जठनिया रैनदिन
सब मिल हमसन जियरा मोरा डरावे
ननदिके बचनवा सहे न जात..'


'रात्रंदिवस सगळा सासूरवास आहे ओ अगदी.. जळ्ळ्या मेल्या मोरा जियरा अगदी डरावून टाकतात..!' हास्य

शशांकच कौतुक वाटतं मला..त्याने अगदी सुंदर गायली आहे ही बंदिश..तो सुरेल आहे, आलाप, लयकारी, तान, बोलतान.. नक्कीच चांगली आहे.. तो पं उल्हास कशाळकर यांच्याकडे कलकत्त्याला आयटीसीएसआरए मध्ये शिकला आहे.. उल्हासकाकांकडून खूप छान तालिम मिळाली आहे त्याला.

मंडळी, अंतुबुवा जाऊन आज खूप वर्ष झाली..त्यानंतर गजाननबुवाही गेले.. तरीही त्यांच्या परंपरेतली ही बंदिश आजही अक्षय आहे, तितकीच ताजी टवटवीत आहे. ही पुण्याई, ही श्रीमंती ग्वाल्हेर परंपरेची, आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताची..मंडळी, ही मिठाई आहे.. अगदी साजूक तुपातली!

हिंदुस्थानी रागदारी संगीत हा आपला अनमोल ठेवा.. याची सर्वांनी कास धरा.. आयुष्य खूप समृद्ध होईल.. इतकेच विनंतीवजा सांगणे...

-- तात्या अभ्यंकर.

August 25, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (४०) - माता सरस्वती शारदा..

माता सरस्वती शारदा..!


(येथे ऐका..)

माता सरस्वती-दीदी शारदा..!

नुकताच दीदीचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा अगदी घरगुती वातावरणात साजरा झाला...

भारतरत्न लता मंगेशकर.. म्हणजे आपली सर्वांची लाडकी दीदी.!
 

लता मंगेशकर! हे नांव म्हणजे भारतीय संगीत..! हे नांव म्हणजे भारतीय संगीताची ओळख - भारतीय संगीतातलं सर्वोच्च बिरुद..!

गेली ८० वर्ष जिच्या कंठी साक्षात सरस्वतीने निवास केला आहे, तानपुर्‍यातला नैसर्गिक गंधार - ज्याने आपलं बिर्‍हाड जिच्या कंठी थाटलं आहे अशी दीदी..! जिथे सारे स्वर अदबीने 'मेरे लायक कुच्छ सेवा?' असा प्रश्न जिला विचारत आहेत अशी दीदी..! जिथे शब्द संपतात आणि उरतात केवळ सच्चे दैवी सूर.. अशी दीदी..!

'माता सरस्वती शारदा..!' - 'आलाप' चित्रपटातील दीदीनं गायलेली सुरेल भैरवी.. राग भैरवी. राग भैरवी म्हणजे भारतीय संस्कृती..

राग भैरवी.. जिथे सारे भारतीय एकवटतात, जिथे सारे भारतीय- सार्‍या भारतीय परंपरा, सण-उत्सव, भारतीय कला एक होतात अशी भैरवी..!

'विद्या दानी, दयानी दु:ख हरिणी' हे शब्द केवळ दीदीनेच गावेत. 'सरस्वती शारदा' हे शब्द म्हणून दीदी जिथे सम गाठते तेच भारत दर्शन..! 'इतना वरदान दिजे..' गाताना जे भाव उमटतात त्यालाच आवाजातलं लाघव म्हणतात, मार्दव म्हणतात, त्यालाच स्वरांतील 'अदब' म्हणतात..! आणि 'बुद्धी अनंता..' म्हणतानाची तान ही साक्षात आभाळातल्या विद्द्युलतेला लाजवील अशी..! सारंच अद्भूत..!

-- तात्या अभ्यंकर.

August 05, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३९) - चांद फिर निकला..


चांद फिर निकला.. (येथे ऐका)

गाणं कसं गावं, कसं मांडावं, स्वर कसे ठेवावेत, गाण्याच्या शब्दांतून त्यातली अदृष्य लय कशी जपावी... इत्यादी सा-या प्रश्नांची उत्तरं म्हणजे हे गाणं..हे गाणं म्हणजे तरलता.. हे गाणं म्हणजे एक कैफियत.. कैफियत इतकी सुंदर असू शकते?!


एखादं गाणं शब्दांच्या मुठीत पकडणं, त्याला व्याख्येत बसवणं हे मुश्किल काम..परंतु अप्रतिम गाण्याची व्याख्या करायचीच जर झाली तर त्याचं उत्तर म्हणजे हे गाणं..!


भूप रागावर आधारीत असलेलं हे गाणं.. हे गाणं म्हणजे 'ज्योती कलश छलके' चं भावंडं.. राग भूप! भूपाबद्दल काय बोलावं? त्याची सारी श्रीमंती त्याच्या नावातच! 'सारेगपधसां..' या त्याच्या सोन्याच्या मोहरा..! 'मनी' वर्ज्य असले म्हणून बिघडलं कुठं?!Smile

ये रात केहेती है वो दिन गये तेरे,
ये जानता है दिल के तुम नही मेरे
खडी हू मै फिर भी
निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..


'ये जानता है दिल' मधले स्वरभाव केवळ शब्दातीत! 'खडी हू मै फिर भी..' मधल्या अनपेक्षित तार गंधाराचं तेज सूर्याला लाजवेल असं.. 'निगाहे बिछाए, मै क्या करू हाए, के तुम याद आये..' च्या अवरोही बॅलन्सिंग बद्दल काय बोलावं?!

थोरल्या बर्मनदांना, नूतनच्या निरागस सौंदर्याला आणि 'दीदी'नामक आश्चर्याला सलाम.!


-- तात्या अभ्यंकर.

July 24, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३८) - साद कोकिळ घालतो..


साद कोकिळ घालतो.. (येथे ऐका)

नंद रागातला एक सुरेख मुखडा..

राग नंद! राग नंद म्हणजे प्रसन्नता, राग नंद म्हणजे शृंगार, राग नंद म्हणजे प्रियकर-प्रेयसीतला एक अवखळ संवाद, राग नंद म्हणजे सुगीच्या दिवसातलं शरदाचं चांदणं!

गाण्याच्या सुरवातीलाच नंदचा अगदी प्रसन्न आलाप..

साद कोकिळ घालतो
कधी वसंत येईल
पानगळल्या तरुला
नवी पालवी देईल..


सुंदर शब्द, सुंदर गायकी..तब्बलजीचा अगदी दमदार ठेका..'साद' या शब्दावरच्या तानवजा हरकती छानच! गाणं तसं अगदी छोटेखानीच.. परंतु प्रसन्नतेचा छान शिडकावा करणारं..

प्रतिभावंत संगीतकार आनंद मोडक आणि गायिका जयश्री शिवराम - दोघांचेही आभार.. मराठी चित्रसंगीताला अशीच सुंदर गाणी यापुढेही मिळू देत इतकीच इच्छा..
 
-- तात्या अभ्यंकर.

July 09, 2010

जीवन डोर तुम्ही संग बांधी..! (अवांतर - रौशनी, पुढची पिढी!)

पूर्वसंदर्भ -    रौशनी..१
                    रौशनी..२
                    रौशनी..३
                    रौशनी..४
                    रौशनी..५  (अपूर्ण..)


पूर्वसंदर्भ -    ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)


खूप वर्ष झाली फोरास रोड सोडल्याला! तेथील मी नौकरी करत असलेला झमझम देशी दारू बार, रोजच्या मारामार्‍या, गुंड, पोलिस, दारुवाले, मटकेवाले, आसपासच्या रांडा अन् त्यांचे भडवे, ती रौशनीची चाळ, ती रौशनी, रौशनीच्याच परिचयातली अजून एक कुणीशी मावशी (आम्ही तिला परवीनदिदी म्हणत असू,) आणि परकर पोलक्यात पाहिलेली आमच्या रौशनीची मुलगी नीलम!


एकदा केव्हातरी फॉकलंड रोडवरील दिल्ली दरबार हॉटेलच्या बाहेर मन्सूर भेटला होता. रांडांकरता बिर्याणी पॅक करून घेऊन चालला होता! मला तिथे पाहताच,


"अरे तात्यासाब आप? कैसे है?"असं ओरडत आनंदाने गळ्यात पडला होता.


"साला भोसडिके मन्सूर तू! कितने सालो बाद मिल रहा है?! चल, बिर्यानी खायेंगे..!" असं म्हणून मी मन्सूरला बिर्याणी खिलवली. रौशनीच्या आठवणी निघाल्या.


"तात्यासाब, नीलम अब परवीनदिदीके कोठेपे नाचती है. अपने बनारसी चालमैइच लगता है परवीनका कोठा!"


"अल्ला की मेहेरबानीसे नीलम अब बडी हो गई है, अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! गातीभी अच्छा है!" असं म्हणून भडवा छद्मीपणे हसला होता!


"और ठुमकेभी भोत सही लगाती है! साला, यू पैसा उडता है..!" मन्सूर.


अच्छी खानेखिलाने लायक हो गई है! ??


पण दोष मन्सूरचा नव्हता! तो अजून त्याच वस्तीत रांडांच्या पाठीला साबण चोळण्याचं काम करत होता. मी तेथून बाहेर पडलो होतो! पुन्हा माझ्या पांढरपेशा, सुसंस्कृत, सभ्य समाजात!


नीलम!


आमच्या रौशनीची पोर. एका जमान्यात मी त्या पोरीचे खूप लाड केले होते! लहानपणीची "तात्यासाब..." म्हणून गळ्यात पडणारी नीलम मला आठवली. तेव्हा मन्सूरपासून ते रौशनीपर्यंत सर्वजण मला "तात्यासाब" याच नावाने ओळखत असत. त्यामुळे भाबडी लहानगी नीलमही मला 'तात्यासाब'च म्हणे! :)


आज काही कामानिमित्त मुंबई सेन्ट्रलला गेलो होतो आणि अचानक जुन्या आठवणी जाग्या झाल्या! डेअरी मिल्कचं एक चॉकलेट खरेदी केलं आणि सरळ एक टॅक्सी पकडली आणि म्हटलं,


"चलो बनारसी चाल. फोरास रोड!"


बनारसी चाळ जवळच होती. माझं सुसंस्कृत, पांढरपेशा मन पुन्हा एकदा चरकलं! आज कित्येक वर्षांनी पुन्हा त्या कोठ्याच्या पायर्‍या चढत होतो! बनारसी चाळ हा कोठा आहे, जिथे मुजरा होतो, गाणंबजावणं होतं. तिथे शरीरविक्रय तेव्हाही होत नसे, आजही होत नाही!


पहिल्या मजल्यावरील परवीनदिदीच्या कोठ्यावर गेलो. परवीनही आता हयात नसल्याचं समजलं.


खोलीत शिरलो. दोनचार तरण्याताठ्या नर्तिकांनी माझं स्वागत केलं, या बसा म्हटलं! त्यांना वाटलं कुणी पाहुणा आला आहे मुजरा बघायला!


"नीलम कहा है? यहीपे रेहती है ना?"


असं विचारलं तितक्यात आतल्या खोलीतून नीलमच बाहेर आली! रौशनीची मुलगी! खूप वर्षांनी तिला पाहात होतो. रंगरुपाने रौशनीसारखीच गोरी दिसत होती, सुरेख दिसत होती!






"पेहेचाना??"


क्षणभर विचार करून "तात्यासाब.." असं म्हणत तेव्हा जशी पडायची तशी आताही गळ्यात पडली! मीच क्षणभर हबकलो. तेव्हाची नीलम खूप लहान होती, परकर-पोलक्यातली होती!


खूप आनंद झाला होता पोरीला. मी खिशातनं डेअरी मिल्कचं चॉकलेट काढलं आणि तिला दिलं! पाणी आलं पोरीच्या डोळ्यात!


चहा झाला.


"तात्यासाब क्या सुनोगे?"


"मन्सूर बोल रहा था की तुम बहोत अच्छा गाती हो!"


मी तिला थोडं गायचा आग्रह केला. मलाही तिथे फार वेळ बसायचं नव्हतंच! तसं म्हटलं तर आता तिथे काय संबंध माझा??


"बस मुझे अब जाना है दो-पाच मिनिटमे. कुछभी सुनाओ, लेकीन पुराना..!"


"पुराने गाने तो मै बहोत कम जानती हू. फिरभी आपके लिये एखाददुसरा गा दुंगी! अभी मुजरा शुरू होनेमे वक्त है. बाजिंदे-साजिंदे नही है!"


अस म्हणून 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' या लतादिदीच्या एका सुरेख गाण्याची दोन कडवी तिने गुणगुणली! आपल्या उत्सुकतेकरता लतादिदीचं मूळ गाणं इथे ऐकता येईल. छान गायली पोरगी. आईने तिला थोडंफार गाणं शिकवलं होतं!


"बस अब चलुंगा!"


"तात्यासाब दुबारा कब आओगे? आओगे ना? जरूर आना..!"


तिच्या त्या 'आओगे ना?' या प्रश्नाच्या टोनमध्ये मला तिची ममत्वाची भूक जाणवली! अगदी विलक्षण जाणवली! कारण तिच्या ठुमक्यांकडे हावरेपणाने बघणारा मी कुणी तिचा गिर्‍हाईक नव्हतो! मी तिथे गेलो होतो तो तिच्या आईच्या ओळखीचा कुणीतरी होतो म्हणून..! 




असो..


काय साला जमना असतो पाहा! काही वर्षांपूर्वी मी त्याच खोलीत रौशनीकडून 'ए मालिक तेरे बंदे हम..' ऐकलं होतं आणि आज तिच्या पोरीकडून त्याच खोलीत 'जीवन डोर तुम्ही संग बांधी..' ऐकलं!


पुन्हा तिथे जाईन की नाही हे मला माहीत नाही!


-- तात्या अभ्यंकर.

July 01, 2010

प्राचार्य गेले - सरस्वतीपुत्र हरवला

माझे मित्र अर्धवटराव यांच्या लेखणीतून उतरलेला हा सुंदर लेख त्यांच्या परवानगीने मी येथे प्रकाशित करतो आहे व माझ्या ब्लॉगची शोभा वाढवतो आहे..


मूळ लेख येथेही वाचता येईल..


-----------------------------------------------------------------------------------------------------------


एका महाविद्यालयाचं आवार. प्राचार्य गाडीतुन उतरतात, पांढरा शर्ट, लेंगा आणि काळं जाकीट, सुरकुतलेला पण उत्साही प्रसन्न चेहेरा, आणि त्यांचे पेटंट मिश्कील हास्य, इमारतीच्या पायर्‍या चढुन येताना, त्यांच्याच व्याख्यानाचा बोर्ड समोर लावला आहे, त्याकडे क्षणभर कटाक्ष टाकुन पुन्हा त्यांच्या नेहेमीच्या पद्धतीने तरातरा चालत, हॉल मधे येतात. हॉल काठोकाठ भरलेला. समोरच्या तांब्याभंड्यातुन थोडे पाणी पीउन प्राचार्य सुरुवात करतात.

"आत्ताच येताना खाली मी व्याख्यानाचा बोर्ड बघितला. त्यावर विषय लिहीलेला नाही. तो लिहायचा राहायलाय असं नव्हे. पण हल्ली कुणी व्यक्त्याला विषय देत नाही, दिला तर आम्ही तो घेत नाही, अणि घेतलाच तर विषयाला धरुन कुणी बोलत नाही. तेव्हा कुठल्याही एका विषयावर न बोलता तुमच्या आणि माझ्या तारा जुळेपर्यंत मी बोलणार आहे...."

आणि त्यानंतर सतत १ तास अखंड, शांत आणि कल्लोळी, शीतल आणि दाहक असा विचारप्रवाह, सतत संवाद साधणारा, काहीतरी हितगुज करणारा, अंतर्बाह्य निर्मळ असा ओघवता प्रवाह. आपलं कर्तव्य, आपलं समाजातलं एक जबाबदार अस्तित्व. अभियंता या शब्दाबरोबर येणारी एक थोरलेपणाची जाणीव हे सगळं सगळं...

काही वेळापुर्वी मित्राचा फोन आला 'प्राचार्य गेले'.. एवढं एक वाक्य बोलुन फोन ठेवावा लागला. आणि त्यानंतर पहिल्यांदा मनात दाटला तो वर उल्लेखलेला प्रसंग. आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातलं त्यांचं हे व्याख्यान. मी पहिल्या वर्षाला असताना ऐकलेलं. अगदी जसंच्या तसं माझ्या समोर अगदी काल घडल्यासारखं दिसतंय ऐकु येतंय..
नंतर अशी अनेक व्याख्यानं आठवत गेली. प्राचार्यांना मी अगदी माझ्या शाळेपासुनच ऐकतोय.. सहा आठ महिन्यातुन एकतरी व्याख्यान शाळेत व्हायचंच. शाळेत अगदी सोप्या सोप्या विषयांवर बोलायचे, खुलवुन सांगायचे. नंतर त्यांना ऐकतच गेलो, समृद्ध होतच गेलो सतत. नुसती विषयांची जंत्री द्यायची झाली तरी त्यांच्या व्यासंगाचा आवाका लक्षात येतो. विवेकानंद, शिवछत्रपती, संतसाहित्य, समर्थ रामदासांचे विचार, मुक्तचिंतने, समाजाभिमुख विषय आणि बरेच काही.
अर्थात आमच्या वाट्याला प्राचार्य नेहेमीच जास्त आले. एकतर फलटणपासुन जवळ आणि सातार्‍यालाच त्यांचे शिक्षण झाल्यामुळे त्यांना वाटणारी आपुलकी. मनात अनेक भाषणं दाटुन आली आहेत आत्ता. शाळेतली, कॉलेजातली, समर्थ सदन मधली, गांधी मैदानावरच विराट जनसमुदयापुढे केलेलं भाषण, आमच्या नगरवाचनालयाच्या छोटेखानी हॉलमधे होणारी छोटी भाषणं.

एक मोठा अविस्मरणीय प्रसंग आठवतो तो म्हणजे.. बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या हस्ते शाहुकलामंदीर मधे झालेला त्यांचा सत्कार. आणि त्यावेळेला अत्यंत आदराने बाबासाहेबांनी काढलेले.. " हा साक्षात सरस्वतीपुत्र आहे" हे उद्गार




खुप समृद्ध केलं ह्या माणसानं, संतसाहित्याची गोडी लावली, महाराजांचा, विवेकानंदांचा वारसा शिकवला. खुप लहान वयात आयुष्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न केला, विचार शिकवला.. जबाबदारीची जाणिव करुन दिली... जागल्या बनुन राहिला मनाच्या कोपर्‍यात.. सतत, ह्या अंधार्‍या जगात..

खुप खोल खोल दाटुन आलय मनात, खुप लिहायचं होतं.. लिहीताही येत नाहिये.. थांबतो..

जाउद्या.. ही सगळी देवाघरची माणसं.. आमची इवलीशी आयुष्य सम्रुद्ध करायला पाठवली होती देवानं.. न मागता दिली होती....न सांगता घेउन गेला..

June 26, 2010

ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे..

माझे किती क्षण राहिले.. (येथे ऐका, येथे अनुभवा!)

दूर कुठेतरी आमिरखासाहेब मारवा आळवताहेत.. दूर कुठेतरी सुरेश भट मारवा उलगडून सांगताहेत..!

'माझे किती क्षण राहिले.. ' हा सुरेश भटांचा मारवा केवळ शब्दातीत आहे, अप्रतिम आहे!

ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे
मी मात्र थांबून पाहतो मागे कितीजण राहिले.!


स्वरांचं बॅलन्सिंग, स्वरांचं बेअरिंग जबरदस्त! अचूक स्वर लागले आहेत, नेमके लागले आहेत..! भटसाहेबांचा हा मारवा ऐकताना त्यांनी गाण्याची कुठे रीतसर तालीम घेतली आहे की काय, असं वाटतं अशी विलक्षण एकतानता, एकाग्रता..! सारं राज्य शब्दांचं, सारा अंमल सुरालयीचा!

भटसाहेबांचा कोमल रिषभ अंगावर येतो!

होता न साधा एवढा जो शब्द मी तुला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले..


मारव्याच्या सुरावटीकरताच केवळ हे शब्द जन्माला आले.. आणि म्हणूनच भटसाहेबांनी हे शब्द मारव्यात गुंफले.. हे विलक्षण अद्वैत आहे.. शब्दांचं आणि मारव्याच्या सुरांचं!

गझल-गायकी म्हणजे काय ते इथे कळतं.. हो, गायकीच ही.. हे फुटकळ गझल वाचन नव्हे.. आज मराठी गझलांच्या वाचनाचे/सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम होतात.. या सगळ्या नवख्यांनी शिकावं की गझल कशी वाचावी, कशी मांडावी.! पण त्या करता जाण असावी लागते स्वरांची. स्वर जगावे लागतात, अनुभवावे लागतात! त्याशिवाय मुशायरा-गायकीची पेशकारी येत नाही!

Suresh Bhat

ह्या गझल गायकीला ताल नाही की ठेका नाही, परंतु लय कशी घट्ट पकडली आहे ते पाहा.. एक अदृश्य लय!
लय- शब्दसुरांचा श्वासोश्वास!

उदाहरणार्थ -
एकाच शब्दाला उभे, आयुष्य तारण राहिले!
'उभे' शब्दानंतरचा लयदार पॉज.. "ष्य' अक्षरावरचा लयदार आधात.. आणि 'ष्य' - 'तारण' वरचा म'गरेसा चा मारव्यातला भन्नाट अवरोह..! याला म्हणतात गाणं, याला म्हणतात लय, याला म्हणतात गायकी!

हे केवळ गझल-गायन वा वाचन नव्हे, हा तर मारव्याचा भन्नाट जमलेला विलंबित ख्याल! भटांची हा मारवा अन् त्याची गायकी भिनते सिस्टिममध्ये!
काळवंडलेलं आकाश.. तीन सांजा झालेल्या.. भयाण तीन सांजा आणि अंगावर सरसरून येणारी कातरवेळ..!
हा मारवा नाही, हे स्वगत आहे.. भटसाहेबांचं स्वगत!

'मागे कितीजण राहिले हा हिशेब मागतो आहे हा मारवा! पण हिशेब द्या किंवा नका देऊ.. दुनियेला फाट्यावर मारतो हा मारवा आणि म्हणतो..

ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे तोरण अद्याप राहिले..!


गेंद्याच्या फुलांचं तोरण काय, कुणीही बांधतो हो.. पण आसवांचं तोरण केवळ भटसाहेबच बांधू शकतात, त्यांच्या मारव्याचे सूर हीच त्या तोरणाची पानं-फुलं!

आकाशातले सारे ग्रह उच्चीचे होतात आणि सुरेश भटांसारखा एक अवलिया गझल लिहून जातो, मारवा गाऊन जातो..!

-- तात्या अभ्यंकर.

June 24, 2010

काही स्वरचित्रे, काही शब्दचित्रे (३७) - रुठो ना...


रुठो ना...(येथे ऐका)

आलिकडच्या काळातलं एक गाणं. 'विथ लव्ह, तुम्हारा...' या चित्रपटातलं.

रुठो ना रुठो ना, बलमा रुठो ना..

सुदीप बॅनर्जीची अगदी शांत परंतु मनाची पकड घेणारी सुंदर चाल. त्याने गायलंयही अगदी मन लावून! अचानक फर्मान निघाल्यामुळे प्रियकराला सैन्याच्या नौकरीत रुजू व्हावे लागत आहे, त्यामुळे त्याची प्रेयसी रुसली आहे..
'बैरी अखिया मानेना केहेना..'या ओळीतली स्वरसंगतीदेखील खूप भावणारी..

'ओ मोरे पिया ये मोरा जिया... ' अंतराही अगदी कल्पकतेने बांधला आहे, 'ये मोरा जिया..'चे स्वर खूप हळवे आहेत..एकंदरीत सारं गाणंच खूप सुरेख झालं आहे.. गाण्याचं चित्रीकरणही छान.. पुढे तो प्रियकर लढाईत मारला जातो आणि त्याच्या मृत्यूची बातमी घेऊन त्याचाच एक अत्यंत सभ्य, सुशील मित्र त्याच्या घरी येतो..अखेरीस ती मुलगी त्या मित्राशीच लग्न करते..अर्थात, अनेक भावभावनांच्या कल्लोळानंतर..!


हा चित्रपटही चांगला आहे, सेन्सिबल आहे..हे गाणं तर नक्कीच चांगलं आहे!


-- तात्या अभ्यंकर.

June 17, 2010

बसंतचं लग्न..१२ (अहीरभैरव)


राम राम मंडळी,

आज बर्‍याच दिवसांनी बसंतच्या लग्नाचा हा बारावा भाग लिहिण्याचा योग आला आहे. बसंतच्या लग्नाच्या पहिल्या अकरा भागांना मनोगताने प्रसिद्धी दिली होती त्याबद्दल मी मनोगत प्रशासनाचा अत्यंत ऋणी आहे. मनोगतावर ही मालिका लोकांना खूप आवडली होती असे आठवते! असो, आज हे सर्व भाग इच्छुकांना आमच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. त्या सर्व भागांचे दुवे खाली देत आहे!


बसंतच्या लग्नाचा बारावा भाग आज लिहीत आहे. वाचकांनी कृपया गोड मानून घ्यावा, ही विनंती...

बसंतचं लग्न --भाग १२
राम राम मंडळी,
आधींच्या भागात म्हटल्याप्रमाणेच बसंतच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. मांडवात आता बर्‍याच रागरागिण्यांची गर्दी जमली आहे. प्रत्येकाचं सौंदर्य वेगळं, प्रत्येकाचा गोडवा वेगळी, प्रत्येकाची नजा़कत वेगळी! 

ती कोण बरं व्यक्ति नुकतीच आली आहे? बसंत त्या व्यक्तिला वाकून नमस्कार करत आहे! चेहेर्‍यावर एक वेगळंच तेज आहे तिच्या! सुरेख पांढर्‍याशूभ्र वेषातली, मस्तकी केशरमिश्रित गंध लावलेली ती व्यक्ति बसंतला कौतुकाने आशीर्वाद देत आहे! कोण आहे बरं ती व्यक्ति?!

मंडळी, ती व्यक्ति म्हणजे राग अहीरभैरव! आपल्या हिंदुस्थानी अभिजात संगीतातील सकाळच्या प्रहरी गायचा एक विलक्षण प्रभावी आणि भारदस्त असा राग, राग अहीरभैरव!! मंडळी, तुम्हाला सांगतो, भल्या सकाळी अहीरभैरव ऐकण्यासारखं सुख नाही! खूप शुभ आणि मंगलदायी वाटतं. अहीरभैरव अक्षरश: तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच भारून टाकतो, तुमच्या मनाचा संपूर्ण ताबा घेतो, इतके प्रभावी सूर आहेत त्याचे! माझ्या आजपर्यंतच्या श्रवणभक्तिमध्ये अनेक दिग्गजांचा अहीरभैरव ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आहे त्यात किशोरीताईंचं नांव अगदी आवर्जून घ्यावं लागेल. किशोरीताई अहीरभैरवची मांडणी भन्नाटच करतात! क्या बात है....!

अहीरभैरव या रागाबद्दल क्या केहेने! या रागाबद्दल किती लिहू अन् किती नको! आपल्याला या रागाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून आयटीसी-एसआरए च्या संस्थळावरील हे क्लिपिंग ऐका. यात रागाच्या आरोह-अवरोहाची, रागाची पकड (रागस्वरूप) याची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि त्यानंतर 'अलबेला साजन आये..' ही या रागात नेहमी गायली जाणारी पारंपारिक बंदिशही आपल्याला ऐकता येईल...

काय मंडळी, अजूनही या रागाची पुरेशी ओळख पटत नाहीये? मन्नादासाहेबांचं 'पुछो ना कैसे' हे गाणं ऐका. हे गाणं याच रागात बांधलेलं आहे! उत्तम लचीला आवाज लाभलेल्या, अभिजात संगीताची भक्कम बैठक असलेल्या आणि आवाजात अतिशय गोडवा भरलेल्या मन्नादांनी या गाण्याचं अक्षरश: सोनं केलं आहे. या गाण्याच्या सौंदर्यात गायक, संगीतकार, कवी, यांचा वाटा तर आहेच आहे परंतु अहीरभैरवासारख्या भारदस्त रागाचे स्वर या गाण्याला लाभले आहेत ही देखील या गाण्याची खूप मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल!

हा राग मला एखाद्या साधूपुरुषासारखा दिसतो. विरागी वृत्तीचा. पण कसा आहे हा साधूपुरुष? हा नुसतीच जपमाळ घेऊन वैराग्याची भाषा करत नाही तर उलट 'आयुष्यातले सगळे भोग अगदी यथेच्छ भोगा परंतु चित्ती मात्र सतत वैराग्याचीच जाणीव असू द्या' हे सांगणारा आहे! मंडळी, अगदी नेमक्या शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर,

'आहे मनोहर तरी गमते उदास!'

अश्याच वृत्तीचा हा राग आहे असं मला वाटतं!

मला हा साधूपुरुष थोडा प्रवासी, भटक्या वृत्तीचा, एका जागी फार वेळ न थांबणारा वाटतो. हा अवचित कधी दाराशी येईल आणि 'सांगेन गोष्टी युक्तिच्या चार..' या न्यायाने आपल्यालाच आयुष्य सावरणारे चार प्रेमळ सल्ले देईल आणि पुन्हा कुठेतरी दूर निघून जाईल!

वर उल्लेख केल्याप्रमाणे या रागात गायली जाणारी 'अलबेला साजन आये..ही पारंपारिक बंदिश इथे ऐका आणि पाहा. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात संगीतकाराने या बंदिशीचा खूप छान उपयोग करून घेतला आहे. गाण्याचं पिक्चराझेशनही खूप चांगलं आहे! विक्रम गोखले गुरुजी ऐश्वर्याला आणि सल्लूबाबाला या रागाची तालीम देत आहेत! Smile

(अवांतर - हा शिणेमाही मला आवडला होता! असो..)

मंडळी, माणसाचं मन हे अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. त्यात आनंद असतो, दु:ख असतं, लोभ, मत्सर, माया, ममता, अगदी सारं काही असतं. परंतु या सगळ्या भावभावानांकडे शेवटी एका विरागी वृत्तीनेच पाहावं, किंबहुना मनातील प्रत्येक भावभावनेला विरागी वृत्तीची झालर असावी, असंच अहीरभैरव हा राग आपल्याला सांगतो किंवा शिकवतो. मग ती भावभावना कुठलिही असो, आनंद असो वा दु:ख असो, अंगी जर मूलभूत विरागी वृत्ती असेल तर या सगळ्या भावनांचा समतोल योग्य रितीने राखला जातो आणि ही विरागीवृत्ती आपल्याला अहीरभैरवकडून मिळते असं मला वाटतं. 'आयुष्यात सगळं काही कर परंतु शेवटी वृत्ती मात्र विरागीच ठेव' असंच हा राग सतत सांगत असतो आणि हीच या रागाची फार मोठी ताकद आहे असं मला वाटतं! 

मंडळी, मी काही कुणी मोठा धर्माचा गाढा अभ्यासक नाही की मोठमोठे ग्रंथ पठण केलेला, गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेला कुणी शास्त्री-पंडित नाही. आपलं हिदुस्थानी रागसंगीत हीच आमची गीता आणि त्यातले एकापेक्षा एक मौल्यवान असे राग हेच आमचे वेद! आणि हेच वेद व गीता आम्हाला बरंच काही शिकवून जातात असा माझा तरी अनुभव आहे! 

मंडळी, खरंच मला तरी अहीरभैरव असाच दिसला, असाच भावला!

मंडळी अहीरभैरव रागाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मला नेहमी भाईकाकांच्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातलं काकांजींचं व्यक्तिमत्व आठवतं! हे काकाजी म्हणजे वर वर पाहता अगदी जिंन्दादिल, बाईबाटलीपासून ते आयुष्यातल्या सर्व गोष्टींचा यथेच्छ आस्वाद घेणारं, आयुष्यावर, खाण्यापिण्यावर, गाण्यावर मनमुराद प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मी 'वर वर पाहता' हे शब्द अश्याकरता वापरतोय की मूलत: त्या नाटकातल्या 'श्याम' या तरूण पात्रासोबत गप्पा मारताना जवान होणारे काकाजी क्षणात हे सगळे भोग सोडून देऊन, "चला आचार्य, आपण दोघे आपले जंगलात जाऊन राहू. अहो या वयात पोरंसोरं देखील दाढ्या ओढतात!" असंही म्हणायला तयार असतात!

"मला लोकांनी आचार्य केला हो! लोक जणूकाही काठावर काठ्या घेऊन उभेच होते, मी जरा जवळ आलो की मला पुन्हा पाण्यात ढोसत होते. त्यांनाही नमस्कार करायला कुणीतरी बुवा हवाच होता!"
असा शेवटी भडभडून आक्रोश करणार्‍या आचार्यांना "शांत व्हा आचार्य!" असा धीर काकाजीच देतात! आचार्य त्यांना म्हणतात, "काय गंमत आहे पहा काकाजी, अहो आयुष्यभर मी शांतीचे पाठ बडबडत आलो परंतु शेवटी तुम्ही मला शांत व्हायचा सल्ला देताय! कारण तुम्ही शांत आहात!! तुम्ही आयुष्यभर सगळं काही केलं परंतु अंगाला काहीच लावून नाही घेतलं!"

शेवटी खरा वैरागी कोण? गीतेचे पाठ बडबडणारा आचार्य की आयुष्याचे सगळे भोग यथेच्छ भोगलेला काकाजी? हा प्रश्न प्रेक्षकांवर सोडून हे नाटक संपतं!

सांगायच मुद्दा पुन्हा तोच की, अहीरभैरव हा रागदेखील माणसाला नेमकी हीच वैरागीवृत्ती अंगी बाणवायला शिकवतो. आनंद, भोगापभोग, याला त्याची कधीच ना नाहीये! 

'गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा!'

भटसाहेबांच्या या फार सुरेख ओळीत जो अर्थ सांगितला आहे, तोच अर्थ हा रागही सांगतो असं मला वाटतं!
खरंच मंडळी, आपलं रागसंगीत म्हणजे नुसते केवळ स्वर नव्हेत किंवा आरोहा-अवरोहाचं, चलनाचं व्याकरण नव्हे! तर या व्याकरणाच्या कितीतरी पुढे जाऊन हे रागसंगीत आपल्याशी संवाद साधतं! आपल्या मनातील भावभावनांचा ठाव घेतं आणि हेच माझ्या मते आपल्या रागसंगीताचं गमक आहे. अहीरभैरव हा राग मला जसा दिसला तसाच प्रत्येकाला दिसेल असंही नव्हे परंतु तो प्रत्येकाच्या थेट हृदयाशी काही ना काही संवाद साधेल, त्याला आपलंसं करेल एवढं मात्र निश्चित!

हिंदुस्थानी रागसंगीताचा हा अनमोल ठेवा आपण सर्वांनी मनसोक्त लुटला पाहिजे. ह्या ठेव्याची व्याप्ती एवढी अफाट आहे, एवढी अमर्याद आहे की कितीही जरी लुटला तरी तो जराही कमी होणार नाही, उलट आपण मात्र अधिकाधिक समृद्ध होऊ, संपन्न होऊ, श्रीमंत होऊ! 

बसंतचं लग्न ही मालिका मी केवळ याच हेतूने लिहीत आहे. खरं सांगायचं तर ही मालिका म्हणजे माझ्या पदरचं काहीच नाही, मी फक्त एक माध्यम बनून हा रागसंगीताचा खजिना मला जसा भावला तसा मुक्तहस्ते आपल्यापुढे लुटायचं काम करतोय, हे माणिकमोती उधळायचं काम करतोय!

असो....

अहीरभैरवचा हा भाग मी रामुभैय्या दाते यांच्या जिन्दादिल स्मृतीस अर्पण करत आहे!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रचारक व प्रसारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.