August 29, 2006

बाबुजींची एक आठवण...

राम राम मंडळी,
आज मी आपल्याला बाबुजींची (स्व सुधीर फडके यांची) एक आठवण सांगणार आहे. माझ्या मनांत तो दिवस आजही घर करून राहिला आहे. तशी ही जुनी गोष्ट आहे. खरं सांगायचं तर मला आता महिना आणि वर्ष नक्की आठवत नाही, मात्र वीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीची ही घटना आहे, एवढं नक्की.

त्या काळात मी बऱ्याचदा त्यांच्या घरी जात असे. त्यांच्याबद्दल मनात नेहमी आदरयुक्त भितीच असायची. तसे ते माझ्याशी बोलायचे, नाही असं नाही. कधी मुडात असले तर माझी, "काय पंडितजी, आम्हाला कधी ऐकवणार तुमचं गाणं? आम्हालाही कळतं गाण्यातलं थोडं थोडं!" अशी फिरकीही घ्यायचे!! पण मीच फारसा त्यांच्या वाऱ्याला उभा रहात नसे! त्यांच्या घरी गेलो तरी जास्त वेळ ललितामावशींशीच बोलत असे. खूप गोड आहेत हो आमच्या ललितामावशी!

बाबुजींना एकदा रुटीन चेकप् करता दादर येथील डॉ फडके (माझ्या आठवणीप्रमाणे हिंदु कॉलनीतील डॉ अजित फडके) यांना भेटावयाचे होते. पण डॉ फडके यांनी तो वार केईएम् रूग्णालयाच्या व्हीजीटसाठी राखून ठेवला होता. त्यामुळे बाबुजींनी तपासणीकरता केईएम् लाच जायचे ठरवले होते. योगायोगाने मी त्या दिवशी बाबुजींच्या घरी त्यांना भेटावयास गेलो होतो.
ललितामावशींनी मला म्हटलं, "अरे तू आज बाबुजींसोबत केईएम् ला जाशील का?" मी आनंदाने होकार दिला! एकीकडे मनात भितीही होती, पण बाबुजींचा सहवास काही वेळ मिळणार म्हणून मला आनंदही झाला होता. ललितामावशींनी मला टॅक्सीनेच जा, जपून जा असं बजावून सांगितलं होतं.

झालं! आम्ही दोघे शंकर निवासच्या बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर लगेच मला बाबुजी म्हणाले, "अरे अमुक अमुक नंबरची बस केईएम् ला जाते. आपण तिनेच जाऊया. टॅक्सी वगैरे उगाच नको"!! आता मडळी, आली का माझी पंचाईत? बाबुजींनी पहिलाच बॉल अवघड टाकला होता! पण मावशींनी मला बजावलं होतं, त्यामुळे मी टॅक्सीचाच आग्रह धरला. अखेर त्यांनी मान्य केलं. मी हुश्श केलं!

आम्ही दोघे टॅक्सीत बसलो. टॅक्सीवाल्याने विचारलं, "कहा जाना है?" झालं! बाबुजी त्याच्यावर वैतागले. "तुम्ही मुंबईत टॅक्सी चालवता आणि तुम्हाला मराठी येत नाही"? त्यावर तो उर्मटपणे म्हणाला, "तो क्या हुआ?"वातावरण अंमळ तापू लागलं तेव्हा मीच मध्ये पडलो. आणि बाबुजींची समजूत घातली!

थोड्याच वेळात आम्ही केईएम् ला पोहोचलो. आम्हाला तिसऱ्या मजल्यावर जायचं होतं. बाबुजी जिन्याकडे जाऊ लागले. मी त्यांना म्हटलं, "जिन्याने नको. लिफ्टची सोय आहे, आपण लिफ्टनेच जाऊ. उगाच आपल्याला त्रास होईल" झालं! पुन्हा माझ्यावर बाबुजी वैतागले. "तुम्ही लोकांनी मला अपंग करायचं ठरवलं आहे की काय? मी जिन्यानेच जाणार. काही होत नाही मला"! मी पुन्हा त्यांची समजूत काढली, "ललितामावशींनी मला अगदी निक्षून सांगितलं आहे की आपल्याला अगदी जपून, सांभाळून घेऊन जा म्हणून. आपण कृपया ऐका माझं"थोडेसे वैतागूनच ते लिफ्टकडे वळले. आम्ही डॉक्टर फडके यांच्या खोलीपाशी गेलो. दरवाजा बंद होता. बाहेर १०-१२ रुग्ण नंबर लावून वाट पहात होते. डॉक्टर आत एका रूग्णाला तपासत होते.

तेवढ्यात काही कामाकरता डॉक्टर बाहेर आले, आणि त्यांनी बाबुजींना बाहेर थांबलेलं बघितलं. अदबीनेच ते आमच्या जवळ आले, आणि म्हणाले, "बाबुजी, आत चला. आता आपल्यालाच तपासतो."

"नाही! मी रांगेतच थांबतो. माझा नंबर येईल तेव्हाच मी आत येईन! "

डॉक्टर म्हणाले, "कमालच करताय आपण. अहो, आपल्याला कशाला हवा नंबर? आपण please आत चलावं".
"नाही! इथे मी बाबुजी वगैरे कोणी नाहीये. ही मंडळी इथे इतका वेळ थांबली आहेतच की नाही? तसाच मीही थांबेन"! पुन्हा ठाम उत्तर.

साधारण तासाभराने आमचा नंबर लागला! तपासणी झाली आणि आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर बाबुजींच्या एका चाहत्याने त्यांना गाठलं. वाकून नमस्कार केला. बाबुजींनी त्यांची कुठे असता, काय नांव वगैरे आस्थेने चौकशी केली.
ते गृहस्थ बाबुजींना म्हणाले, "माझी आई इथेच ऍडमीट आहे. आम्ही सगळे कुटुंबीय आपले चाहते आहोत. आपण येता का २ मिनिटाकरता माझ्या आईच्या खोलीत? तिला खूप आनंद होईल"!

बाबुजींना त्या गृहस्थाचा आग्रह मोडवेना. आम्ही त्यांच्या आईच्या खाटेपाशी गेलो. बाबुजींना पाहताच त्या वृध्द स्त्रीच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. उठवत नसतानाही ती उठून बसायचा प्रयत्न करू लागली! बाबुजीनी तिचीदेखील आस्थेने चौकशी केली. आकाशवाणीवर प्रथमच जेव्हा गीतरामायणाचा संपूर्ण कार्यक्रम प्रसारीत झाला तो मी ऐकला आहे, असं तिने बाबुजींना अडखळत सांगितलं! आजारपणामुळे तिला बिचारीला धड बोलताही येत नव्हतं!

मंडळी, बाबुजी काय, भीमण्णा काय, फार मोठी माणसं ही! वरील लेख वाचतांना टॅक्सीच्या, लिफ्टच्या, उदाहरणांवरून एखाद्याला बाबुजी खूप हट्टी वाटतील. मलादेखील वाटले!! पण मंडळी, हा हट्टीपणा नव्हे. जीवनाशी आयुष्यभर झगडा करून कमावलेलं तेज आहे हे! या झगड्यातूनच त्यांनी हा पीळ कमावला होता!!

आम्ही टॅक्सीत बसलो. आता मात्र बाबुजी मुडात आले होते. अब्दुलकरीमखासाहेब, हिराबाई बडोदेकर, नारायणराव बालगंधर्व यांच्यावर भरभरून बोलू लागले. त्यांच्या गायकीची वैशिष्ट्य ते मला समजावून देऊ लागले. या तीनही दिग्गजांना बाबुजी गुरूस्थानी मानत. किती मधुकरवृत्तीने त्यांच्या गायकीचा अभ्यास करून त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या संगीतात केला होता!! त्यांच्याबद्दल बोलताना ते अगदी भारावून गेले होते.

मी एकाचवेळी एका माणसाचा जिद्दीपणा, हट्टीपणा पहात होतो, आणि एका शिष्याचं त्यांच्या गुरुंवरचं प्रेम, भारावलेपण बघत होतो.

आजही मी शिवाजीपार्क येथील त्यांच्या घरी जातो. ललितामावशींना, श्रीधरजींना भेटतो. मात्र आजही त्यांच्या दिवाणखान्यात गवसणीत बंद करून ठेवलेली तंबोऱ्यांची जोडी मला अस्वस्थ करून जाते!!!!

तात्या अभ्यंकर.

4 comments:

guru said...

व्वा ! बाबुजींबद्दल वाचुन छान वाटले. इतर अनेकांप्रमाणे मी पण बाबुजींचा एक चाहता.
तुम्हाला त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन मिळाले, खरच भाग्यवान आहात तुम्ही !

तुमचे साहित्य मनोगत वर अधुन मधुन वाचतोच. तुमच्या संगीत कलेचाही आस्वाद घेण्याची संधी लवकर मिळो ही इच्छा.

अनेक शुभेच्छा !

Tatyaa.. said...

प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार...

-तात्या अभ्यंकर.

Anonymous said...

I am amazed at your Pratibha.
can we meet
-raviupadhye2rediffmail.com

Kedar said...

मी केदार. सहज ब्राउज करता करता तुझ्या ब्लॉग वर येउन पोचलो. दिलखुश! गाण्यापासुन खाण्यापर्यंत सगळच माझ्या मनसोक्त आवडीचं. पुन्हा, सर्वच विषयांना स्पर्श करुन जाणारा तुझा ब्लॉग खरच सुंदर आहे. त्यातून तुझी unending energy सहज दिसुन येते. अभिनंदन!